माझा अत्यंत आवडता अभिनेता फहाद फाझिल.

माझा अत्यंत आवडता अभिनेता फहाद फाझिल.

तारीख

मल्याळम चित्रपट किती ग्रेट आहेत हे सांगणारा आजचा ग्रेट अभिनेता म्हणजे फहाद फाझिल किंवा फासिल! हा अभिनेता मला भेटला तो फेसबुक फ्रेंड डॉ. प्रशांत पाटील यांच्यामुळे. प्रशांत पाटील यांनी ‘महेशिंते प्रथिकारम’ हा चित्रपट मला बघायला सांगितला आणि त्यानंतर मी एकापाठोपाठ एक मल्याळम चित्रपट बघतच सुटले. मामुटी असो की सूर्या, महेशबाबू असो, की मोहनलाल मला हे सगळेच अभिनेते आवडत असले, तरी फहाद फाझिलनं मनावर जो ठसा उमटवला आहे तो कधीच मिटला जाऊ शकणार नाही. अभिनय कसा असतो, तो किती सहज असतो हे सांगणारा फहाद फाझिल हा माझ्याच नव्हे तर संपूर्ण भारतीयांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. अमिताभ बच्चन असो की त्याच्यासारखे इतर दिग्गज अभिनेते, ते जेव्हा चित्रपटात एखादं पात्र रंगवतात, तेव्हा त्या पात्रात गुंतण्याऐवजी आपण त्या त्या अभिनेत्यालाच जास्त लक्षात ठेवतो किंवा तो अभिनेताच ठळकपणे जाणवत राहतो. पण फहाद फाझिलचं विशेष हे की तो आधी पात्राच्या रुपात आपल्या मनावर ताबा मिळवतो आणि भानावर आल्यावर कळतं की अरे हा तर आपला फहाद फाझिल आहे. प्रत्येक चित्रपटातली त्याची भूमिका हटके असते आणि गंमत म्हणजे प्रत्येक वेळी तो त्या चित्रपटाचा नायकच असतो असंही नाही, उदाहरणार्थ कुम्बलिंगी नाईट्समध्ये बॉबी आणि बेबी हे खरे नायक नायिका...तसंच या चित्रपटातले चार भाऊ हेही एका तर्‍हेनं या चित्रपटातले नायक म्हणावे लागतील, या बेबीचा जिजाजी हा फहाद फाझिल यात दाखवला आहे. त्याचं एक कटिंग सलून आहे. तो स्वभावानं विचित्रच असल्याचं सुरुवातीपासून आपल्या लक्षात येतं, ते त्याच्या डोळ्यात दिसणारी जी चमक आहे त्यामुळे. त्याचं शांत बोलणं, त्याच्यातली खलनायकी वृत्ती आपल्याला हे प्रकरण वेगळं आहे हेच सांगत राहते. तो बावळट आहे की आणखी काही याचा विचार आपण सतत करत राहतो. या चित्रपटातली त्याची प्रत्येक कृती आपल्याला अचंबित करून टाकते. खरं तर प्रादेशिक मल्याळम चित्रपटांच्या इतिहासामध्ये आज अत्यंत अल्प काळात फहाद फाझिल यानं आपलं अस्तित्व कायमचं निर्माण करून ठेवलं आहे. ना अमिताभसारखी उंची, ना विनोद खन्नासारखं देखणेपण,...पाच फूट सहा इंच उंचीचा हा अभिनेता केवळ आपल्या डोळ्यांनी बोलत राहतो. त्यानं घेतलेली अभिनयातली मेहनत दिसत नाही, इतका सहजसुंदर अभिनय तो करतो की तो जणू काही तो तसाच आहे आणि त्याच भूमिकेसाठी जन्मला आहे असं वाटत राहतं. त्याच्या अभिनयानं इतकी उंची गाठली आहे की त्याचा अभिनय त्याच्या शब्दांतून बाहेर पडण्याआधी त्याच्या डोळ्यात तरळत राहतो आणि ज्याने त्याला बघितलं, त्याच्या हे सहज लक्षात येतं. लल्लन टॉपच्या यमन नावाच्या पत्रकारानं तर त्याला चक्क एक जाहीर प्रेमपत्रच लिहून आपल्या भावना आणि त्याच्याविषयीचं प्रेम व्यक्त केलं आहे. खरं तर फहाद हा मल्याळम चित्रपटातले नामवंत दिग्दर्शक, पटकथालेखक फाझिल यांचा मुलगा. 8 ऑगस्ट 1982 या दिवशी केरळमधल्या कोची शहरात त्याचा जन्म झाला. मल्याळम चित्रपटसृष्टीत आपल्या मुलाला फहाद फाझिलला चित्रपटात त्याच्याच वडिलांनी प्रथम आणलं. 'कहिएथम दुरत' नावाच्या या चित्रपटात फहाद फाझिलच नव्हे तर दिग्गज अभिनेता मामुटीनं देखील भूमिका साकारली होती. पण तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर अपयशी ठरला, इतकंच नाही तर समीक्षकांनीही या चित्रपटाकडे पाठ फिरवली. फहादचं वय त्या वेळी फक्त 19 वर्षांचं होतं. फहादनं त्या वयातही वडील असो की चित्रपटाचं कथानक, कोणावरही आपल्या अपयशाचं खापर फोडलं नाही, आपलीच तयारी कमी पडली याची जाणीव त्याला झाली. त्यानं अंतर्मुख होऊन विचार केला आणि त्याला स्वत:लाच असं वाटलं की अभिनय ही ‘अपने बस की बात नही’...आणि या विचारांवर ठाम होत त्यानं मल्याळम चित्रपटसृष्टीचा निरोप घेतला आणि आपल्या करियरवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. फहादनं आपलं पुढलं शिक्षण अमेरिकेत घेतलं, त्या वेळी त्याचा मित्र निकुंज आणि तो कॉलेजजवळच्या भागात असलेल्या एका दुकानात नियमित जात असत. तिथल्या खालिदभाईंबरोबर भारतीय चित्रपटावंर गप्पा मारत असत. खालिद भाईला त्यांचं चित्रपटप्रेम लक्षात आल्यानं तो फहाद आणि निकुंज यांना अनेक चित्रपटांच्या डिव्हीडीज बघायला देत असे. एके दिवशी नसिरुद्दीन शाह दिग्दर्शित ‘यूँ होता तो क्या होता’ नावाचा चित्रपट खालिदभाईकडून आणल्यावर दोघांनी बघितला. चित्रपट सुरू झाला आणि त्यात सलिम राजाबली या पात्राचं आगमन पडद्यावर झालं. आपल्या भेदक टपोर्‍या डोळ्यातून बोलणार्‍या या अभिनेत्याला याआधी कधी फहादनं बघितलंच नव्हतं. तो चकित होऊन त्याच्याकडे बघतच राहिला. हा अभिनेता अभिनय करतच नव्हता, तो ते पात्र जगत होता. त्याचा अभिनय इतका सहजस्वाभाविक होता की अभिनय म्हणजे काय हे त्यानं त्या चित्रपटातून फहादला शिकवलं होतं. फहादवर त्या अभिनेत्यानं प्रचंड प्रभाव पाडला आणि त्यानंतर वेड लागल्यासारखा फहाद त्या अभिनेत्याचे चित्रपट शोधत राहिला आणि ते मिळवून बघत राहिला. फहादनं इंजिनिअरिंगमध्ये आपलं भविष्य घडवायचं नाही याचा ठाम निश्चय केला आणि आपल्यावर प्रभाव पाडणार्‍या अभिनेत्याला गुरू मानून अभिनय क्षेत्रात पुनरागम करायचं ठरवलं आणि तो भारतात परतला. फहादनं पुन्हा जवळजवळ 7 वर्षांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करायचं ठरवलं. जर खालिदभाईंनी आपल्याला ‘यूँ होता तो क्या होता’ या चित्रपटाची डीव्हीडी दिली नसती तर? या विचारानं आजही फहाद अस्वस्थ होतो. आज आपण जे काही आहोत त्याचं श्रेय तो खालिदभाई, तो चित्रपट यांना तर देतोच, पण सगळ्याच जास्त ऋण, कृतज्ञता तो त्या चित्रपटातल्या अभिनेत्याविषयी व्यक्त करतो. भारतात आल्यावर फहादनं दमदारपणे मल्याळम चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं. त्याच्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी 2009 साली प्रदर्शित झालेला 'केरला कॅफे' हा चित्रपट त्याच्या तयारीची साक्ष देतो. दहा वेगवेगळ्या माहितीपटांपैकी 'मृत्युंजयम' ही एक अत्यंत थरारक गोष्ट. यातलंं फहादचं काम प्रशंसलं गेलं आणि त्याला चित्रपटांचे एकामागून एक प्रस्ताव यायला सुरुवात झाली. आपण आता अशा तयारीनं आलो आहोत की आपल्यात आता ठरवूनही कोणी खोट काढू शकत नाही असा आत्मविश्वास फहादमध्ये आला होता. त्यानंतर 2010 मध्ये त्याचे 'प्रमेडी', 'कॉकटेल' आणि 'टुर्नामेंट्स' असे तीन चित्रपट लागोपाठ प्रदर्शित झाले. या चित्रपटांनी फहादच्या करियरची दिशाच बदलली, त्याची स्वत:चीच नाही तर मल्याळम चित्रपटांनाही एक वेगळी दिशा मिळाली. 2011 मध्ये फहादचा 'चप्पा कुरेशी' नावाचा चित्रपट आला आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरश: डोक्यावर घेतलं. या चित्रपटात त्यानं चांगला किंवा वाईट असं नाही तर चक्क एक ग्रे शेडमधलं कॅरेक्टर रंगवलं आणि ते इतकं गाजलं की त्यानंतर त्याला लगेचच तशाच स्वरुपाची भूमिका साकारावी लागली. या चित्रपटाला पुरस्कार तर मिळालाच, पण या चित्रपटातलं दोन मिनिटांचं दीर्घ चुंबन मल्याळम चित्रपटसृष्टीत खूपच खळबळ निर्माण करून गेलं. मल्याळम चित्रपटसृष्टीत तोपर्यंत अशा तर्‍हेची इंटिमेंट दृश्य दाखवली गेली नव्हती, त्यामुळे त्यावर अनेक वाद-चर्चा रंगल्या. मात्र त्यानंतर मल्याळम चित्रपटसृष्टीनं आणि प्रेक्षकांनीही अशा प्रकारच्या दृश्यांना स्वीकारलं! 2013 मध्ये '22 फिमेल कोट्टायन' नावाच्या चित्रपटाला प्रेक्षकांनीच नव्हे तर एकमुखानं सर्वच समीक्षकांनीही वाखाणलं, फहादला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर राजीव रवी जो 'गँग्ज ऑफ वासेपूर', 'उडता पंजाब'सारख्या चित्रपटांचा सिनेमॅटोग्राफर आहे, त्यानं त्याच्या 'अन्नयम रसूलम' या चित्रपटासाठी फहादला विचारलं आणि अर्थातच फहादनं होकार दिला. तसं बघितलं तर चित्रपटाची एक साधीच आहे. एक मुस्लीम मुलगा हा ख्रिश्चन मुलीवर प्रेम करतो आणि या प्रेमाला घरच्यांचा विरोध असतो. या विरोधातूनही हे प्रेमिक पुढे कसे जातात याचं चित्रण या चित्रपटात आहे. या चित्रपटात अ‍ॅक्शन किंवा कॉमेडी दोन्हीलाही वाव नाही. मात्र या चित्रपटातली फहादची भावनिक बाजूची उत्तुंग अशी उंची बघायला मिळते. कितीही कठोर ह्दयाचा माणूस असला, तरी शेवटच्या प्रसंगात तो आपले अश्रू आवरूच शकत नाही ही कमाल फहादनं या चित्रपटात केली. त्यानंतर फहादनं एकापाठोपाठ एक असे सरस 10 चित्रपट साकारले आणि सगळ्यांनाच प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. 'आमेन' आणि 'अन्नयम रसूलम' या चित्रपटातून एक रोमँटिक फहाद प्रेक्षकांना बघायला मिळाला. 'इंडियन प्रणयकद' यातही त्याचा सहज अभिनय लोकांना आवडला. 'नॉर्थ 24 काथम' यातली त्याची हलकीफुलकी अदा प्रेक्षकांनी उचलून धरली. यातला नायक हरिप्रसाद नावाचा एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असतो आणि त्याला ओसीडी या विकारानं ग्रासलेलं असतं. त्याची कंपनी एका नव्या प्रोजेक्टसाठी त्याला त्रिवेंद्रमला पाठवते आणि या प्रवासात त्याला जे काही अनुभव येतात आणि त्याला आयुष्याकडे कसं बघायला शिकवतात हे या चित्रपटात दाखवलं. यातल्या भूमिकेबद्दल फहादला राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवलं गेलं. 'आर्टिस्ट' या चित्रपटात एका कलाकाराचा अहंकार, संताप, राग आपल्या भूमिकेतून फहादनं दाखवला. या काळात 11 प्रकारचे फहाद लोकांनी बघितले. 'तोडी मूलयम साक्षी' या चित्रपटात नव्यानं लग्न झालेलं एक जोडपं प्रवास करत असतं. त्यात त्या नायिकेची गळ्यातली सोन्याची साखळी चोरीला जाते. ती प्रसाद यानं चोरलेली असते आणि त्या प्रसादची भूमिका फहादनं साकारली आहे. या चित्रपटाचं बहुतांश चित्रीकरण पोलिस स्टेशनच्या सेटवरच झालं असून या चित्रपटाचा दिग्दर्शक मासूमचाच शेखर कपूर असून या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलं. फहादचा 'महेशिंते प्रथिकारम' हा असाच एक नितांत सुंदर चित्रपट! आपले वडील आणि आपला पाळलेला कुत्रा यांच्याबरोबर राहणारा महेश, एकदा शेजार्‍यांचं भांडण बघून ते सोडवायला मध्ये पडतो आणि स्वत:च मार खातो. अपमानित होतो. यानंतर आपण याचा सूड घेतल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही असं ठरवतो. आपला सूड तो कशा प्रकारे घेतो आणि इतकंच नाही तर या प्रवासात काय काय लहान-सहान गोष्टी घडतात की त्यामुळे त्याचं आयुष्य, त्याचं जगणं, त्याचं वागणं सारं काही अंतर्बाह्य बदलून जातं. त्याचप्रमाणे त्याचा 'ट्रान्स' हा चित्रपट आहे. आपल्याला सगळ्यात जास्त थकवणारा चित्रपट असा उल्लेख फहादनं या चित्रपटाबद्दल केला आहे. आजकाल अध्यात्मिक व्याख्यानं देणार्‍या अनेकजणांचा सुळसुळाट आपण बघतो. हे अध्यात्मिक लीडर्स किंवा बाबा लोकांना कसं जगू नका असं कळकळीनं सांगत असतात, पण स्वत:च्या जगण्यात मात्र ते ते सगळं ते करत असतात. हे सगळं ढोंग, लबाडी चव्हाट्यावर आणण्याचं काम, लोकांना जागृत करण्याचं काम या चित्रपटानं केलं असून यात फहादबरोबर नजरिया नझीम ही अभिनेत्री देखील आहे. 2014 मध्ये 'बंगलोर डेज' या चित्रपटानं तर धमालच केली. इतकी की मैत्रीवर असलेला हा भारतीय चित्रपट म्हणून सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून याच्याकडे बघितलं गेलं. यात दूलकर सलमान, निविन पॉली आणि नजरिया नझीम हे तिघं भावंडं असतात. नजरियाच्या नवर्‍याची भूमिका यात फहादनं साकारली होती. या चित्रपटानं फहादच्या आयुष्यात एक गुलाबी वळण आलं. काम करताना नजरिया आपल्या किती ‘दिल के करीब’ आलीय हे फहादच्या लक्षातच आलं नाही. आपल्याला फहाद आवडतोय ही गोष्ट नजरियाच्या देखील लक्षात आली होती, पण ती तो आपल्याला विचारेल म्हणून प्रतीक्षा करत राहिली. एके दिवशी तिच्या लक्षात आलं की हा काही स्वत:हून विचारणार नाही, तेव्हा नजरियानं स्वत:च पुढाकार घेऊन आपल्या प्रेमाचा इजहार फहादजवळ केला आणि आपण शेवटपर्यंत ही साथ निभावू असं म्हटलं. फहाद तिच्याकडे बघतच राहिला. दोघांच्या घरच्यांची अर्थातच या नात्याला संमती होती, 21 ऑगस्ट 2014 मध्ये दोघांचं लग्न झालं. फहादचा सस्पेन्स क्राइम थ्रिलर 'इरूल' चित्रपट तर अंगावर अक्षरश: काटा आणतो. संपूर्ण चित्रपटात तो गुन्हेगार आहे की नाही हे आपल्याला त्याच्या क्षणाक्षणाला बदलणार्‍या अर्विभावावरून कळतच नाही. आय प्रकाशन मधला आळशी, कामचुकार, थापाड्या पी. आर. आकाश देखील फहादमुळे जीव लावून जातो, तसंच त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला 'जोजी' हा शेक्सपिअरच्या मॅक्बेथवर बेतलेला चित्रपट तर कमाल आहे. याही चित्रपटाला एकजात समीक्षकांनी प्रशंसलं आहे. फहाद हा काहीही करू शकतो यावर आता सगळ्यांच प्रेक्षकांनी शिक्कामोर्तब केलं आहे. फहादला न्यू एज सिनेमाचा पोस्टर बॉय म्हणून संबोधलं जातं. मॉर्डन क्लासिक्समध्ये ज्याचं नाव घ्यावं असा अभिनेता म्हणजेच फहाद फाझिल असं समीक्षक त्याला म्हणतात. आज केरळमध्ये सगळ्यांचा लाडका अभिनेता म्हणून फहादनं प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली आहे. त्याचा कुठला चित्रपट चांगला आणि कुठल्या भूमिकेला पुरस्कार मिळालेत याची नोंदच ठेवायची गरज नाही असं स्थान त्यानं निर्माण केलंय. मात्र या वाटचालीत ज्यानं आपल्याला अभिनय हेच तुझं क्षेत्र आहे, तू याच क्षेत्रात पुन्हा प्रवेश कर असं नकळत सांगितलं, त्याच्यावर प्रचंड प्रभाव पाडला त्याला आपल्या लाडक्या अभिनेत्याला, आपल्या गुरूला भेटायचं, प्रत्यक्ष भेटून थँक्यू राहूनच गेलं, याची खंत, याचा सल आज फहादला बोचत राहतो. कारण फहादनं ठरवलं तरी तो आपल्या आवडत्या टपोर्‍या डोळ्यांच्या, अभिनयाची एक उत्तुंग उंची गाठणार्‍या अभिनेत्याला भेटू शकणार नाही कारण त्या ‘यूँ होता तो क्या होता’ मध्ये काम करणार्‍या अभिनेत्याचं नाव होतं - इरफान खान! दीपा देशमुख, पुणे adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.