अप्पा, ये आपने अच्छा नही किया....

अप्पा, ये आपने अच्छा नही किया....

तारीख

सकाळी मोबाईल वाजला, मी तुषार बोलतोय....अप्पांना ॲडमिट केलंय...
मी विचारलं, कसे आहेत आता ते? मी निघते लगेच...
तो चाचरत, अडखळत म्हणाला, नाही तुम्ही येऊ नका....अप्पा आता नाहीत.....
मोबाईल बंद झाला होता...आणि मी सुन्न झाले होते...
चार दिवसांपूर्वी तर हा माणूस घरी आला होता...ताजे ताजे सामोसे आणि ढोकळा घेऊन...स्वत: मात्र मी केलेला इडली सांबार खात, दाद देत बोलत होता....आत्ता तर होता, आणि आता नाही? साडेअकरा-बारा वाजता वैकुंठमध्ये प्रवासाचा शेवट होणार होता...मी अपूर्वला ऑफीसला सुट्टी टाक, जायला हवं म्हटलं....निघालो आणि अचानक संपूर्ण शरीराला घाम फुटला, अस्वस्थता वाढली...डोळ्यातून अश्रू वाहायला लागले...माझी अवस्था पाहून अपूर्वने जाणं रद्द केलं...
मन इतकं बधिर झालं होतं की लिहिणं, व्‍यक्‍त होणं शक्यच नव्‍हतं...अप्पा माझ्या ‘पाथफाइंडर्स’ या पुस्तकामध्ये कायमचे विराजमान झालेले असले, तरी ते मला प्रत्यक्षही भेटत होते, दिसत होते, बोलत होते....आता ते कधीच दिसणार नाहीत, बोलणार नाहीत, भेटणार नाहीत ही जाणीव भयंकर वेदना देणारी होती, आहे....डोळ्यासमोर फक्‍त अप्पा दिसत होते....
एके दिवशी जंगली महाराज रोडला प्लास्टर मध्ये हात अडकवलेल्या अवस्थेत साठीच्या पुढला एक माणूस धावतच जवळ येऊन उभा राहिला...हातात होतं, कॅनव्‍हास पुस्तक...मॅडम, तुमची सही यावर राहिलीय, तुम्ही इथे आहात कळलं, म्हणून धावत आलो...मी बघत होते या वाचकाकडे....सही केली...त्यानंतर मात्र अप्पा आणि माझ्यात जे नातं निर्माण झालं ते शब्दांत बांधता येणार नाही...
कुठलीही अपेक्षा न करता फक्‍त प्रेम भरभरून करणारा हा माणूस....माझ्याकडे अभिजीत (थोरात) या गुणी तरुणाला घेऊन आलेला...त्याच्यावर मनोज अंबिके यांनी लिहिलेल्या ‘स्लमडॉग सीए’ या पुस्तकावर प्रतिक्रिया द्या म्हणणारा....कमलिनी कुटीरमध्ये घेऊन जाणारा....खरवस असो, वा आंबे, तुप असो वा डिंकाचे लाडू सतत काही ना काही घेऊन येणारा, कधी हार्मोनियमवाल्या जोग या मित्राचं वेगळेपण सांगणारा, कधी आनंद अवधानी/सुहास कुलकर्णी बद्दल आत्मीयतेनं बोलणारा, कधी संजय भास्कर जोशी आणि पुस्तक पेठ विषयी आपलं नातं सांगणारा, तर कधी कर्नल जोशींबद्दल बोलणारा, कधी पुलंपासून यदुनाथ थत्ते या सर्व साहित्यिकांची वैशिष्टयं सांगणारा, तर कधी भूत आणि वर्तमानातल्या अनेक साहित्यिकांच्या योगदानाबद्दल भरभरून बोलणारा, कुणाबद्दलही वाईट न बोलणारा, डोळे त्रास देत असतानाही सातत्यानं वाचन करणारा, हे पुस्तक वाचाच असा आग्रह धरणारा, वाचलेल्या पुस्तकावर बोलणारा, कधी अग्निपंखबद्दलच्या गमतीजमती सांगणारा, तर कधी हेमिंग्वेसारखा दाढी वाढवून फिरणारा.... कधी मनातली खंत व्‍यक्‍त करणारा, आपलं ‘चॅम्पियन गॅरेज’ म्हणजे आपलं घरच समजणारा, ‘या’ गॅरेजवर म्हणत, तिथे गेलं की गाडी धुवून देणारा, कोल्ड कॉफी, ज्यूस, लस्सीचा आग्रह करणारा.......वेधच्या कार्यक्रमांना आवर्जून येणारा....आपली गॅरेजची जागा महानगरपालिकेला न जाता, त्या जागेवर डॉ. आनंद नाडकर्णी यांचं मानसोपचारासाठी काम सुरू व्‍हावं असं तळमळीने म्हणणारा...हत्तीला लक्ष्मीचं वाहन समजून आपल्या गॅरेजमध्ये आंघोळ घालणारा, आपल्या मॅकेनिक  मंडळींना पुस्तकातल्या गोष्टी सांगणारा, कधीही कुणाबद्दलही आकस नसलेला, , असा हा माणूस एकाएकी न सांगता निघून जातो....अप्पा, आपण रविवारी कर्नल जोशींना भेटायला जाणार होतो...सगळं काही ठरलं होतं...आणि मग अचानक न सांगता तुम्ही निघून कसे काय जाता? अप्पा, ये आपने अच्छा नही किया...
याआधी कधीतरी लिहिलेली एक पोस्ट.....आनंदयात्री अप्पा
आज सकाळी पुस्तकवेड्या अप्पांचा फोन आला, मी अर्ध्या तासात येतोय. मी या म्हटलं आणि उपमा करण्याच्या तयारीला लागले. काही वेळात दारावरची बेल वाजली. अप्पांच्या अंगात टी-शर्ट, दाढी वाढलेली..त्यांच्या हातात बासुंदीचं पाकीट होतं. अर्थातच, अप्पा नेहमीच काही ना काही घेऊन येतात. कधी चितळेचे डिंकाचे लाडू, तर कधी खरवस, कधी बासुंदी, तर कधी ताजा ढोकळा... कधी कुठल्या तरी प्रसिद्घ बेकरीचा गरमागरम सामोसा...त्यांना स्वत:ला खायला आवडतं, पण इतरांना खाऊ घालायला जास्त आवडतं. आज त्यांनी नरसोबाची वाडी इथली प्रसिद्घ बासुंदी आणली होती.
अप्पांचं पुस्तकवेडाबरोबरच माणूसवेड देखील तितकंच मोठं आहे. पुस्तक वाचलं रे वाचलं की त्या लेखकाला फोन करतील, त्याला भेटतील आणि त्याच्याबरोबर गप्पाही मारतील. आजही अप्पांनी घरात येताच तोंडावरचा मास्क काढला आणि वॉचमन मला आत कसा सोडत नव्‍हता याची तक्रार केली. म्हणाले, मी तुमच्या घरातलाच आहे, मला जाऊद्या असं सांगूनही तो आत जाऊ देत नव्‍हता. मी अप्पांकडे बघितलं. आजचा त्यांचा अवतार एखाद्या गुंडासारखाच होता आणि सध्या कोरोना आणि चोऱ्यांचं प्रमाण वाढल्यामुळे खात्री केल्याशिवाय कुणाला आत सोडायचं नाही अशी सूचना वॉचमनला सेक्रेटरींनी दिली असणार. मी अप्पांकडे बघत त्यांना ही गोष्ट बोलून दाखवली. त्यांनाही हसू फुटलं. मग उपमा, बासुंदी असा भरपेट नाश्ता झाला. अप्पांनी मोह आवरून बासुंदीच्या ऐवजी ताजं ताक पिणं पसंत केलं, मात्र मला आणि अपूर्वला बासुंदीचा भरपूर आग्रह केला.
अप्पांच्या व्‍यकंटेश माडगुळांबरोबरच्या आठवणी आणि मग असाच सिलसिला सुरू झाला. कधी ते पुलंच्या आठव्‍णी सांगतात, तर कधी अतुल पेठे कसा ग्रेट माणूस आहे असं सांगतात. मला म्हणाले, दीपामॅडम, इतका कंटाळलो की मध्येच एक दिवस गुपचूप वसईला जाऊन आलो. मी म्हटलं, अहो जाताना सांगितलं का नाहीत?, तर म्हणाले, तुम्ही ‘जाऊ नका’ असंच मला सांगितलं असतं. मग म्हणाले, मला फादर दिब्रेटोंना भेटायचं होतं, मला वीणा गवाणकर यांना भेटायचं होतं....पण कोरोनामुळे सगळंच राहिलं.
त्यानंतर अप्पांनी रॉबी डिसिल्वा या व्‍यक्‍तीविषयी अपूर्वला भरभरून सांगायला सुरुवात केली. प्रतिकूल परिस्थितीतून घडलेला रॉबी डिसिल्वा, त्याचं गोधड्या करणं, त्यातून त्याची प्रकट होत गेलेली सर्जनशीलता...अप्पा ते सगळं सांगण्यात इतकं गुंतून गेले, की अपूर्व म्हणाला, ममा, अप्पांनी त्याच्यावर हे सगळं लिहिलंय का? त्या वेळी मला त्याला सांगावं लागलं, की अरे रॉबी डिसिल्वाच्या लेखिका आहेत, वीणा गवाणकर. पण एखादं पुस्तक आवडलं की अप्पा त्या पुस्तकात ते पुस्तक स्वत:चच असल्यागत रमून जातात आणि मग भेटेल त्याला त्या वाचलेल्या पुस्तकाविषयी भरभरून बोलतात. अप्पांनी मग आयडा स्कडर पासून वीणाताईंची आपण किती पुस्तकं वाचलीत हे आवर्जून सांगितलं. ही पुस्तकं आपल्याला कशी आनंदी ठेवतात आणि त्यात त्या त्या लेखकांचा किती मोठा वाटा आहे हेही सांगितलं.
हळूच एक गंमतही सांगितली. १५ ऑगस्टला अप्पा जरा जास्त वेळ झोपून होते. त्या वेळी त्यांच्या पत्नीनं त्यांना उठवून विचारलं, अजूनही पुस्तकांच्याच दुनियेत आहात का, उठा आता. अप्पांना काहीच कळेनासं झालं, ते बघतच राहिले. त्या वेळी त्यांची पत्नी म्हणाली, आज १५ ऑगस्ट आहे, टीव्‍हीवर आता राष्ट्रगीत सुरू होईल. चला उठून उभे राहा. एवढी पुस्तकं वाचता, राष्ट्रगीताच्या वेळी उभं राहायचं असतं हे ठाऊक नाही का? बायकोनं दरडावल्यामुळे अप्पा निमूटपणे उठले आणि राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर सावधान करीत उभेही राहिले.
खरं तर अशा अनेक गमतीजमती अप्पा सांगत असतात, त्यांच्या गॅरेजमध्ये येणाऱ्या प्रत्येकाशी त्यांची गट्टी होते. एक तरुण त्यांना सांगत होता, की त्याला लग्नासाठी एक मुलगी आवडली. ती रिसेप्शनिस्ट होती आणि १० हजार पगार होता. हा तरुण आयटीत, महिन्याला दीड लाख रुपये मिळवतो. या तरुणाला तिचं नोकरी करणं, स्वतंत्र असणं सगळंच पसंत होतं. पण ज्या वेळी मुलीनं सांगितलं, अरे, तुला फक्‍त दीड लाख रुपये महिना मिळतोय, मला महिन्याला निदान तीन लाख कमवणारा हवाय. त्या वेळी तो तरुण तिच्याकडे बघतच राहिला. अप्पांना तो हे सगळं मित्र समजून सांगत होता. काही मुली स्वत: फार काही न करता, मुलाकडून मात्र कशा अव्‍वाच्या सव्‍वा अपेक्षा करतात हे ते मला सांगत होते. तसंच, आता दसरा येणार, आपण आपल्या आवडत्या साहित्यिकांच्या गाड्या आपल्या गॅरेजमध्ये स्वच्छ धुवून देणार असं उत्साहाने सांगत होते....मी अप्पांकडे बघत होते....आपल्या आयुष्यातली दु:खं, प्रकृतीच्या अनेक कुरबुरी सगळं काही बाजूला सारून हा माणूस केवळ आनंद वाटण्यासाठी भेट घेतो, आल्यावर सगळं वातावरण आनंदित करून टाकतो. काय म्हणावं याला?
दीपा देशमुख, पुणे.

 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.