आपली मुंबई !

आपली मुंबई !

तारीख

तीन वर्षांपूर्वी मुंबईत आले तेंव्हा-
अजस्त्र अवाढव्य मुंबई पाहून दडपण आलं होतं. पुस्तकात, चित्रपटात, टीव्हीवर बघतो तशीच तर होती ही मुंबई ! मुंग्यांसारखी माणसं, इकडून तिकडे धावणारी ! कोणाचंच कोणाकडे लक्ष नाही-आपल्यातच मग्न मुंबई, मी मात्र एकदम परकी---या शहराला---या इमारतींना---या गर्दीला !

कधी कधी जीव रडकुंडीला यायचा! इतके सगळे प्लॅटफॉर्मस्- जनरल डबा, लेडीज डबा, फर्स्ट क्लास डबा - कुठे कोणता कसा येतो? आणि हे या लोकांना कळतं कसं? ट्रेनचं तोंड म्हणजे इंजिनवाला भाग नेमका कुठे असतो? कोणत्या दिशेने चर्चगेट तर कोणत्या दिशेने विरार? सगळंच अवघड होतं. ईस्ट आणि वेस्ट कसं ओळखावं?  (त्यात आधीच माझा भूगोल कच्चा) दादरला तर हमखास चूक व्हायची. घोकून पाठ केलेलं असलं तरी कबुतरखाना म्हणजे ईस्ट असंच वाटायचं (वाटण्याला काय अर्थ असतो?) मग मात्र स्वामीनारायण मंदिर आहे ती दिशा पूर्व हे माझं मीच घोषीत करुन टाकलं. अर्थात ते तसंच होतं. विरेंद्र, हा श्रमिक संघटनेचा कार्यकर्ता- माझ्या दृष्टीनं जगातला सर्वात बुध्दिमान माणूस होता. तो चपळाईनं मला या स्टेशनवरुन, त्या जिन्यानं नाही, या जिन्यानं असं करीत गल्ली बोळातून भराभर वाट काढावी तसा हा मला घेऊन जाई. मला कळतच नसे की हा असा बाहेर बाहेरुनच्या मार्गांनी मला स्टेशनमध्ये का नेतो?  असं कोणतं मी पाप केलंय? सरळ समोर स्टेशन दिसत असताना असा कुठंतरी कोपर्‍यात जाऊन तिथून का तिकीट काढतो?  मग कळालं की पासवाल्यांसाठी अमुक एक रांग, त्यांनी तिथूनच जावं, तिकीट नसेल तर त्यांनी अमुक तमूक ठिकाणाहून आत जायचं नाही. तिकीटं काढण्याची ठिकाणंही ठरलेली !

एकदा वाशीहून प्रवास करताना माझा कार्यकर्ता मित्र दत्ता म्हणाला, ‘कुपन्स घे, कुपन्स !’
कुपन्स ही काय भानगड असते मला माहीत नव्हतं. मग ३० रुपयाची कुपन्स घेतली. तेव्हा दत्तानं मनातल्या मनात काहीतरी पुटपुटत हिशोब करीत एका लाल डब्याच्या मशीनमधून ती कुपन्स बाहेर काढली म्हणजे पंच केली. मग मला म्हणाला, ‘ ही तुझी ! घे आणि लेडीज डब्यात बैस !’ मी सरळ नकार दिला. एकटाानं प्रवास करणं माहीतच नव्हतं.

दादर ईस्टला तर अंधेरी वेस्टला हे सांगून लक्षात येत नसे. मी जेन्टसच्या डब्यातही दत्ताच्या मागे गांगरलेल्या पोरासारखी उभी राही. मग कुठेतरी जागा मिळे. दत्ता लगेच झोपी जाई ! मला मात्र सतत भीती वाटायची, ही सगळी बसलेली, उभी असलेली लोकं झोपू कशी शकतात?  स्टेशन निघून गेलं तर ? ट्रेन तर २ मिनीटसुध्दा थांबत नाही. समजा चुकून पुढच्या स्टेशनवर गेलो तर मागं फिरायचं कसं ? कारण मागं येण्यासाठी पुन्हा वेगळा प्लॅटफॅार्म -तो ओळखायचा कसा ? मी प्रत्येक स्टेशन नाव वाचून लक्षात ठेवायचा प्रयत्न करी. सगळी नावं मला अपरिचित होती. काही तर भर्वन डोळयापुढून निघून जात, वाचायच्या आतच नजरेआड होत. ट्रेनमधल्या बायका मात्र, आज ट्रेन या ट्रॅकवर गेली, त्या ट्रॅकवर आली तर बरं होईल असं काही बाही बोलायच्या. मला मात्र काही म्हणता काही कळायचं नाही. कसला ट्रॅक ? काय फरक पडतो त्यामुळं ? कुठंही येऊ देकी ट्रेनला ! कधी प्लॅटफॉर्मवर उभं रहावं तर अनाउन्समेंट होई, अमुक एक ट्रेन आज तमूक एका प्लॅटफॉर्मऐवजी तमूक तमूक प्लॅटफॉर्मवर येईल आणि या बदलाबद्दल दिलगिरीही व्यक्त होई. मग सगळाा मुंग्या जिन्यावरनं धावत प्लॅटफॉर्म बदलत. मला अर्थातच तेही कळत नसे. त्यातच स्लो ट्रेन, फास्ट ट्रेन काय भानगड आहे तेही समजत नसे. फास्टच का ? स्लो का ? हे कळणं महाकठीण वाटे.
 
त्यात एक दिवस अचानक शोध लागला की सगळी मुंबई ही तीन लाईनमध्येच विभागली गेलीय. त्या लाईन्स होत्या, सेंट्रल, हर्बर आणि वेस्टर्न ! 

एकदा मी व्हीटी म्हणजे सीएसटीला पोहोचणार होते. त्यावेळी मी दत्ताला फोन केला आणि विचारलं, ‘दत्ता, मी सीएसटीला ईस्टला उतरु की वेस्टला ?’

मला वाटलं, मी फार शहाणपणा केलाय, काय चुकलं होतं कुणास ठाऊक पण दत्ताने रागाने फोन बंद केला. मात्र जेव्हा सीएसटी आलं तेव्हा ईस्ट वेस्ट तिथे काहीही भेदभाव नसून एकच बाहेर पडण्याचा मार्ग दिसला आणि दत्ताच्या रागाचं कारण समजलं. माझ्या एका मित्रानं, विजयनं मात्र हा गोंधळ कमी केला. त्याने मला सांगितलं, ‘दीपा, एक नम्बरचा प्लॅटफॅार्म म्हणजे वेस्ट साईड हे कायम लक्षात ठेव आणि तिथूनच बाहेर पडायचा मार्ग असतो ! त्या दिवसापासून बरेच प्रश्न सुटले.

मला सराईत झाल्यासारखं वाटू लागलं. पालघरहून मुंबईकडे जाताना मी सतत टाईमटेबल आणि नकाशा सतत पर्समधून काढून पुन्हा पुन्हा बघत असे. पालघर ते चर्चगेट म्हणजे पश्चिम लाईन हे मला कळालं होतं! हळूहळू मी या लाईनवरची ठिकाणंही लक्षात ठेवायचा प्रयत्न करु लागले. तरी विरारला न थांबता डायरेक्ट मुंबई सेंट्रलला थांबणारी ट्रेन मला सोयीची आणि सोपी वाटे. कारण विरारला उतरुन दुसरी लोकल पकडणं हे एक अग्नीदिव्य वाटे. ही लोकल कोणती, कोणत्या प्लॅटफार्मवरुन पकडायची हे मला कळतच नसे. एकदा तर दादरहून पालघरला येताना विरेंद्रने मला अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये बसवून दिलं. ट्रेन पालघरला न थांबता जेव्हा जोरात धावायला लागली तेव्हा मात्र मी घाबरले आणि धाय मोकलून रडायला सुरुवात केली. चक्कर येऊनच कोसळले. पराभूत उमेदवाराप्रमाणे भोईसरला उतरले. मग टमटम, बस करीत मुक्कामी ! माझ्यापेक्षा मासे विकणार्‍या, फुलं विकणार्‍या स्त्रिया मला बुध्दिमान वाटत. माझ्या शिक्षणाचा आणि एकूणच गोष्टीतला फोलपणा मला लक्षात येई. त्यांना जमतं- मला का नाही? या विचारानं मी अस्वस्थ होई. एक दिवस कळालं की डोंबिवली आणि ठाणे भाग सेंट्रल लाईनमध्ये मोडतो. आणि वाशी आणि पनवेल हर्बर लाईलमध्ये ! पालघरहून मुंबईला येताना हळूहळू मेल, लोकल, शटल्, पॅसेंजर, एक्स्प्रेस यातला फरक कळत गेला. मग कोणत्या ट्रेनचं तिकीट कोणत्या ट्रेनला चालत नाही हेही कळायला लागलं. दोन चार वेळेला फटका बसल्यामुळे  डबेही हळूहळू ओळखता येऊ लागले. तिरप्या पट्टाांचे फर्स्ट क्लास, अन् जरा वेगळी गर्दी या डब्यांपुढे दिसे. अर्थातच त्याचा कुठलाही परिणाम मानसिकतेवर दिसून येत नसे. म्हणजे शिक्षणानं माणूस बदलतो वगैरे हे म्हणणं इथं सपशेल चुकीचं ठरे. जनरल डब्यात मराठीतून आई बाप कळत तर फर्स्ट क्लासमधून इंग्रजाळलेल्या वाफा बाहेर पडत!

चर्चगेटला उतरलं की १३८ पकडायची आणि सीएसटीला उतरलं तरी १३८ पकडायची अन् यशवतंराव चव्हाण सेंटरला पोाहोचायचं ही गंमतच वाटायची. अर्थात १३८ घोकून घोकून पाठ केलेलं असायचं. चर्चगेटहून चालत चव्हाण सेंटरला जाणं खूपच सोपं वाटायचं मात्र तेच एकटं असताना मात्र हे रस्ते चक्रव्‍युहाचं रुप धारण करीत. मंत्रालयाचा चौक भूलभूलैयाप्रमाणे भीती दाखवी. तिथून नेमकं कुठे गेलं, तर चव्हाण सेंटर हेच मला कळत नसे. मग लहानपणापासून बोट न सोडता चाललो नाहीत याचा पश्चाताप होई. कधी तरी सगळं जमूनही जाई. त्यावेळी मी विजयी मुद्रेने दत्ताच्या ऑफीसमध्ये प्रवेश करी. कोणीतरी मला पारितोषिक जाहीर करावं, सत्कार करावा असंही मनापासून वाटे. यासारख्या अनेक चुका करतानांच एके दिवशी दत्तानं समजुतीच्या स्वरात सांगितलं, ‘अग, तोंड आहे ना, त्याचा जरा वापर कर की जरा. कसला इगो धरुन बसतेस, जरा विचारावं आजुबाजूच्या माणसांना ! सांगतात ते माहिती !’ मला मात्र दत्ताचीच कीव करावी वाटे. वाटायचं, ‘याला कळत कसं नाही, कसं विचारायचं मी इतरांना, काय खात्री ते खरंच सांगतील याची’ मी वाचलेली, चित्रपटातली, टीव्हीत बघितलेली मुंबई जशी होती तेच चित्र घेऊन मी वावरत होते. टॅक्सी ड्रायव्हर कसे भन्नाट वेगानं टॅक्सीत बसलेल्या नवख्यांना माहीत नसलेल्या जागी नेऊन सोडतात, जागोजागी फसवणारे भामटे मुंबईत आहेत, अन् कुंभके मेले मे बिछडे हुये सारखं जर का आपण या मुंबापुरीत हरवलो तर मग ---आपल्यालाही पत्ता लागणार नाही की आपण कुठे आहोत याचा ! या आणि अशा विचारांवर मी ठाम होते. त्यामुळे चुकून कधी रस्ता वा पत्ता विचारायचा प्रसंग आलाच तर सांगणार्‍यावर मी काडीचाही विश्वास ठेवत नसे. त्यांनी सांगितलेलं खोटचं आहे हे मी गृहीत धरुन चाले.

मुंबईचे लोक स्वार्थी, आपल्यात मग्न, समोर माणूस मेला तरी बघणार नाहीत हेही त्या गृहीतकांमध्ये होतंच. यंत्रवत ! संवेदनाशून्य ! नुसती धावधाव धावणारी मुंग्यांची मुंबई ! अशी प्रतिमा करुन मी तिला भिंतीवर टांगलं होतं.
आणि नेमक्या या सार्‍या कल्पनेला तिनं तडा दिला !

या मुंग्यांची गर्दी हळूहळू माझ्या परिचयाची झाली. एक वेगळं सौंदर्य मला तिच्यात दिसू लागलं. लोकल मधून प्रवास करताना दत्तानं सांगितलेली प्रत्येक गोष्ट पटू लागली. इंडिकेटर्स, नावाचे फलक, सगळं कसं सुनियेाजित होतं. शांतपणे बघण्याची फक्त गरज होती. मग स्लो काय ? फास्ट काय? सेंट्रल, वेस्टर्न सगळे मनातले वाद संपले. घामाघूम होत प्रवास करणारी मी त्यांच्यातली एक होण्याचा प्रयत्न करु लागले.

लोकलच्या डब्यातले रोजचे विषय मला आकर्षित करत. १८-२२ च्या मुली, त्यांचे विचार- भारतीय संस्कृती- चूल आणि मूल यात अडकलेलं मध्यमवर्गीय मन, लग्न हीच स्त्री जीवनाची इतिश्री, त्याग, सोशिकता हा स्त्रीचा दागिना ही ठाम मत बघून मी थक्क होई. फॅशननं बाहारुप बदललं होतं मात्र आतला विचारांचा पगडा तोच !

शहरी बदलांना ,प्रश्नांना सामोरी जाणारी स्त्रीही यात होती. कधी मोबाईलवरचे संवाद कानावर पडत. हिन्दी, इंग्रजी,तेलगू, मराठी,बंगाली-अनेक भाषांमधले ! भाषेच्या चढउतारावरुन सारं काही आकलन होई ! ती आणि तो संघर्ष ! समानता, नीती-अनीतीच्या घट्ट असणार्‍या कल्पनेला जाणारे तडे, मूळास पकडण्याचा चाललेला अट्टाहास, भौतिक हव्यासापोटीचा आटापिटा, कधी स्वाभिमानाने घेतलेला कठोर निर्णयही अचंबित करे. या गर्दीत म्हटलं तर हवी तेवढी प्रायव्हसीही ! एकटं होऊन हसा, रडा, कितीही खाजगी बोला कोणाचाही अडथळा ही गर्दी आणत नाही. दखलही घेत नाही. 

मात्र हीच गर्दी मदतीला धावून येणारीही ठरे. एखादी प्रेग्नंट मुलगी दमलेली, त्रासलेली बघताच तिला जागा देणं, पाणी देणं,घामाघूम झालेल्या बाळाला सगळाांनी पाळीपाळीने यशोदेच्या भूमिकेत शिरुन सांभाळणं, खाण्याचे पदार्थ ओळख नसतांनाही देवाणघेवाण आग्रहाने करणं,चुकलेल्या मुलाला पोहोचवण्याची जबाबदारी उचलणं, जागरुक नागरिकत्वाची भूमिका बजावणं असे कितीतरी प्रसंग रोज अनुभवायला मिळत. मानवतेची पातळी जपणारं एक अनोखं नातं तयार होई. प्लॅटफॉर्मवरुन येतांना काही भेटकार्डावर असाव्यात अशा जोडााही दिसत. पाय थबकून कौतुकानं बघत आणि पुनश्च वेग घेत.

अशा या मुंबईनं एक वेगळा लळा लावला. खूप कमी वेळात आपलंस केलं, आपलं मानलं. या गर्दीतून काही माणसं वेगळी आणि एक घट्ट नात्यात बांधूनही दिली. किती मित्र-मैत्रिणी ! जमेल तसे भेटत, कधी फोनवरुन, कधी एसएमएस मधून, कधी नेटवरुन, कधी आर्कुटच्या स्व्रॅपमधून, कधी प्रत्यक्षपणे ! आजारी पडावं तर एखादा काळजीचा आवाज येई, भुकेच्या आतच कोणी एक ‘एक घास काऊचा!’ म्हणे. 

यातली काही बघितलेली, न बघितलेली पण जिवाभावाचीही झाली. ‘थांबायचं नाही चालत रहा. मी सोबत साथ द्यायला आहेच हं’ असं हळूच सांगणारी ही मुंबई ! जगण्याला नवा अर्थ देणारी,अधिकाधिक विस्तारीत करणारी आपली मुंबई !

दीपा

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.