संवाद - विसंवाद
संवाद - विसंवाद
आज वाढदिवस.....माझ्या दृष्टीनं इतर दिवसांसारखाच हाही दिवस......पण तरीही कुणी wish केलं की मनाला बरं वाटतंच. रात्री बाराच्या ठोक्यापासून वॉट्स अप आणि मेसेजचं सत्र चालू.....केव्हातरी झोप लागली. पहाटे ६ ला जाग आली तीही मोबाईलच्या रिंगमुळेच....
वाढदिवसाच्या शुभेच्छा.....
थँक यू....
पुण्यात आल्यावर पार्टी पाहिजे......
हो नक्की....
दुसरा फोन
वाढदिवसाच्या शुभेच्छा
ही मैत्रीण मला खूप आवडते....तशी ती गंभीर स्वभावाची...जगात, आजूबाजूला घडणार्या घडामोडींवर वैतागणारी...अस्वस्थ होणारी, पण जवळच्या माणसांशी वागताना मात्र एकदम कोमल...त्या अस्वस्थतेचे पडसाद त्यांच्यावर पडणार नाहीत याची काळजी घेणारी..तरल, कवी मनाची! फोनवर मग एकदम दिलखुलास गप्पा रंगल्या....इतक्या की सकाळची अनेक कामं लांबणीवर पडली....
फोन ठेवताच, दुसर्या मित्राचा फोन...आवाज गंभीर...मला संकटाची चाहूल.......
काय म्हणतोस?
काय म्हणणार, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फोन केला होता.
अरे मग देकी. थँक यू
याआधी दोनदा ट्राय केला
हो का, मी बोलत होते एकीशी....म्हणून लागला नसेल
पण नंतर माझे दोन मिस कॉल तर दिसले असतील ना?
नाही रे, नाहीतर मी रिटर्न कॉल केला असता ना!
म्हणजे तुला काय म्हणायचंय, मी तुला दोन वेळा कॉल केलाच नाही?
तसं नाही रे, तू केला असशील, पण माझ्या इंस्ट्रुमेंटवर त्याची नोंद नाही आली.
असं कसं होईल? आणि सगळे कॉल येतात, तर माझाच फक्त येत नाही असं कसं होऊ शकेल?
अरे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं असं होऊ शकतं. तू केला असशील पण नाही मिळाला....
मी खोटं बोलतो असं वाटतंय का तुला...
नाही. तू खोटं कशाला बोलशील? पण मला खरंच कॉल मिळाले नाहीत. आणि जाऊ दे ना...यापुढे तू एखादा एसएमएसही सोबत टाकत जा....किंवा वॉट्सअपवर मेसेज....
ती गोष्ट नंतरची झाली, पण आजच्या दोन कॉल्सचं काय? इतरांच्या कुणाच्याही बाबत असं घडत नाही, माझ्याच बाबतीत का?
असं काही नाही रे, मेलच्या बाबतीत कित्येकदा असं होतं. माझा एक मित्र कामाची मेल पाठवतो आणि गृहीत धरतो की मला ती मिळाली...आणि कित्येकदा मला ती मिळालेली नसतेच. मग जेव्हा प्रत्यक्ष फोनवर बोलणं होणं तेव्हा कळतं, मग तो पुन्हा पाठवतो आणि कन्फर्म करून घेतो. पण असा चिडत नाही, वैतागत नाही.... विचार हवं तर त्याला़ त्यामुळे आपल्याच बाबतीत असं घडतं असा विचार तू डोक्यातून काढून टाक.
म्हणजे मला मेल करता येत नाही हे सांगायचंय का तुला? हो, नाही जमत मला ते माध्यम. पण तो चिडत नाही, वैतागत नाही हे मला का सांगतेस? मी चिडतो, वैतागतो असंच सरळ सांग ना!
हे बघ, सोड हा विषय आपण दुसर्या विषयावर बोलू...
का दुसर्या विषयावर का, याच विषयावर बोलायचंय आणि याचा छडा लावायचाय.
अरे, पण तुझा कॉल मला मिळाला नाही असं सांगून मला काय मिळणार आहे? कशाला उगाचंच कीस करत बसतोस...सोड ना आता...
तुला काय मिळणार आहे मला माहीत नाही...आणि मी कीस करतो असं म्हणतेस....काय कीस केला ग मी......
तुझं घरी बायकोबरोबर भांडण झालंय का?
त्याचा काय संबंध?
नाही .....तो राग तू असा काढतो आहेस.....
वाट्टेल ते बोलू नकोस .......
ठीक आहे बाबा, तू खरं बोलतोस, मिळाले होते मला तुझे दोन्हीही कॉल...आता झालं का समाधान?
हो, असं बोलून उपकारच करतेस तर माझ्यावर....
उपकार? मग काय करू? विषय संपवण्यासाठी खोटं बोललेलंच चांगलं नाही का?
नको, नको, एवढं महान बनू नकोस.....
हे बघ, हं आता माझाही पेशन्स संपत चाललाय...हा विषय इतका महत्वाचा आहे का? अरे काही अघटित घडलंय का? आज माझा चांगला वाढदिवस आहे, तुला wish करायचं होतं आणि आता तेही करून झालं की! तुझा तिकडे ऍक्सिडेंट झालाय किंवा इकडे माझा झालाय आणि अशा वेळी फोन लागत नाही असं झालं तर गोष्ट वेगळी ना....
हं, चांगले विचार आहेत....दुर्देवानं इकडे ऍक्सिडेंट वगेरै काहीही झालेलं नाही.
अरे देवा....अरे आता बस कर ना....सकाळच अशी गेली तर दिवस कसा जाईल माझा?
आणि माझा? अर्ध्या तासापासून तुझ्याशी डोकं लावतोय, माझ्या नशिबी नाही का आता डोकेदुखी?
अरे, मग का करतोस असं? सोड ना हा विषय आणि ठेव फोन.
अच्छा, म्हणजे माझ्याशी बोलणंही तुला नकोसं होतंय, इतका मी वाईट आहे.....
प्लीज..........आय से स्टॉप धीस.........तू नको ठेवूस मीच ठेवते.......!
-दीपा
Add new comment