जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने.....
उद्या २३ एप्रिल - जागतिक पुस्तक दिन- उद्या पुस्तकांची खरेदी करायचा मूड आहेच. पण त्या आधी आणखी काही सांगायचंय. शरद अष्टेकर या तरुणाला मी अनेक वर्षांपासून ओळखते. अतिशय कष्टाळू, धडपड्या आणि विनम्र स्वभावाचा हा मुलगा....साधारणपणे ८-९ वर्षांपूर्वी मी 'मनात' या पुस्तकावर काम करत असताना मनोविकास प्रकाशनाच्या कार्यालयात बराच वेळ असायची. त्या वेळी अनेकदा शरद तिथे भेटायचा. तो काळ त्याचा चाचपडण्याचा होता. दोन मिनिटं का होईना पण प्रेमानं संवाद घडायचा.
चंद्रपूरच्या वातावरणात शरद रमला आणि तिथेच त्याला आयुष्याची जोडीदार माधुरी ही मिळाली. आपली पहिली मुलगी मधुश्रीचा जन्म होताच, पुस्तकांच्या प्रेमातून त्यानं 'मधुश्री पब्लिकेशन' सुरू केलं. आज त्याची सर्वच पुस्तकं गाजताहेत. त्यानं जास्त करून पुस्तकं अनुवादित करण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. जगभरात गाजत असलेल्या पुस्तकांच्या लेखकांशी तो संपर्क करून मराठीतून पुस्तक अनुवादित करण्याचे हक्क मिळवतो आणि महाराष्ट्रात नामांकित असलेले, अनुवाद करण्यात कुशल असलेले असे लेखक शोधतो आणि त्यांच्यावर या पुस्तकांची जबाबदारी सोपवतो. आजपर्यंत त्याची सगळीच पुस्तकं 'बेस्ट सेलर' म्हणून बाजारात लोकप्रिय आहेत. त्याच्या लेखकांमध्ये नंदा खरे, शारदा साठे, माधुरी शानबाग, सुश्रुत कुलकर्णी, प्रतीक पुरी, सुनील तांबे, मुग्धा कर्णिक, मुकूल कुलकर्णी, डॉ. शंतनू अभ्यंकर आणि श्रद्धा भोवड अशी नावं सामील आहेत.
आता शरद आपल्या कामात खूपच व्यस्त झाल्यामुळे प्रत्यक्ष भेट होत नव्हती. पण परवा शरद आवर्जून भेटायला घरी आला. खूप गप्पा झाल्या. या भेटीत त्यानं दिलेल्या पुस्तकांचा खजिना म्हणजे जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं मिळालेली अनमोल भेटच जणू!
आता ही पुस्तकं हावरटसारखी वाचायला सुरुवात केली आहे!
शरद, तुझी अशीच अनेक उत्तमोत्तम पुस्तकं प्रकाशित होवोत आणि ती 'बेस्ट सेलर' ठरोत हीच सदिच्छा! तसंच पुस्तक भेटीबद्दलही खूप खूप आभार!
दीपा देशमुख, पुणे
Add new comment