मनाचं झाकलेपण उघडं पाडणारे अश्रू.....
रोहन प्रकाशन या पुण्यातल्या नामांकित प्रकाशन संस्थेचे संचालक प्रदीप चंपानेरकर यांच्याशी प्रत्यक्ष भेटीतून मैत्री झाली, पण त्याहीपेक्षा त्यांच्या लिखाणातून ही मैत्री जास्त वृद्धिंगत होत गेली. त्यांचं रोहन मैफल असो वा दिवाळी अंकातले लेख, ते वाचल्यानंतर हा माणूस आपल्याला कळतोय असं वाटायला लागलं. त्यांचं संवेदनशील असणं भावलं.
मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षीच्या ‘पुरुष उवाच’च्या दिवाळी अंकात त्यांचा ‘....आणि मी रडलो’ या विभागात लेख दिसला. लगेचच वाचून काढला. स्त्रिया रडून पटकन मोकळ्या होतात, पण पुरूषांना लहानपणापासून शिकवलं जातं आणि ते रडले तर दुबळे ठरतील असंही त्यांच्या मनावर बिंबवलं जातं असं आपण ऐकतो. प्रदीप चंपानेरकर यांनी म्हटलंय, 'रडणं म्हणजे व्यक्त होणं आणि हे व्यक्त होणं प्रत्येकाचं वेगळं असतं. व्यक्त होण्याची क्रिया कधी जाणूनबुजून केली जाते तर कधी स्वाभाविकपणे घडते.'
स्वतःच्या वैयक्तिक अनुभवांच्या बाबतीत प्रदीप चंपानेरकर यांनी लिहिलंय. त्यांचे वडील, भाऊ आणि पत्नी यांच्या मृत्यूनं त्यांना हादरवून सोडलं. मात्र त्या त्या वेळी त्यांना आपण रडल्याचं आठवत नाही. उलट त्या प्रसंगात खंबीर राहून त्यांनी पुढल्या कृती पार पाडल्या. मात्र नंतर एखाद्या प्रसंगानं, एखाद्या घटनेनं त्यांच्या मनाचं झाकलेपण उघडं झालं आणि त्यांना आपल्या अश्रूंना आवरणं कठीणही झालं.
मला स्वतःला कितीतरी पुस्तकं वाचताना रडू आवरत नाही. कधी कधी एखादं गाणं अंतःकरण कापत जातं, तर कधी एखादा चित्रपट अश्रूंना मुक्त वाट करून देऊनही आपल्या भावनांना शांत करू शकत नाही. खरोखरंच पथेर पांचाली, सत्यकाम, दो बिघा जमीन या चित्रपटांनी मला ढसढसा रडवलं. नेमकं प्रदीप चंपानेरकर हा धागा पकडून म्हणतात, शाश्वत मूल्यांचं प्रभावी चित्रण प्रेक्षकाला त्या निर्मितीशी एकरूप करून टाकतं. अशा कलाकृती आपल्या संयमी मनातल्या फटी शोधून आतलं रूदन बाहेर काढतात.
भावनांच्या प्रकटीकरणाच्या बाबतीत स्त्री आणि पुरूष म्हणून प्रत्येकावर काही बंधनं किंवा मर्यादा असल्या तरी मला तरी व्यक्त होताना स्त्री-पुरुष भेद संपून तिथं फक्त एक संवेदनशील व्यक्ती शिल्लक राहते असंच वाटतं.
थँक्स प्रदीपजी, वपूंनी म्हटल्याप्रमाणे ‘आपण जितकं व्यक्तिगत लिहितो, तितकं ते सार्वत्रिक असतं’ हेच खरं.
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment