प्रभात रूपगंध स्त्रियांनी काय घालावं? कसं वागावं?

प्रभात रूपगंध स्त्रियांनी काय घालावं? कसं वागावं?

नुकत्याच एका राज्याच्या मंत्र्यानं स्त्रियांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य ऐकलं आणि  मनातलं चक्र सुरु झालं. आंधप्रदेशचे डीजीपी श्री दिनेश रेड्डी आणि कर्नाटकचे महिला आणि बालकल्याण मंत्री सी. सी. पाटील यांनी स्त्रियांविषयी आपलं जे मतप्रदर्शन केलं ते निंदनीय आहेच आहे. अशा वेळी एका राज्याचा मंत्री म्हणतो, स्त्रियांवर बलात्कारासारख्या घटना जेव्हा घडतात तेव्हा अशा घटना घडू नयेत यासाठी त्यांनी काय घालावं याचं थोडं भान ठेवावं. अशा प्रकारचे संवाद ऐकून मनात अनेक प्रश्‍न निर्माण होतात. पहिला हा की असंच जर असेल, पुरुष इतके असंस्कृत किंवा वासनामयी असतील तर आदिवासी भागात अनेक स्त्रियां चोळी  न घालता जगत होत्या, जगताहेत. अनेक जमातीतल्या स्त्रिया आजही त्यांच्या रुढी-परंपरेनुसार काही दंतकथांवर त्यांची श्रद्धा असल्यामुळे चोळी वापरत नाहीत. एका आदिवासी जमातीतली आख्यायिका अशीही आहे की सितेला सुवर्णमृगी हरणाच्या कातडीची चोळी घालण्याचा मोह झाला नसता तर पुढचं रामायणचं झालं नसतं आणि  म्हणून सीतेला दैवत मानणार्‍या त्या आदिवासी जमातीतल्या स्त्रियांनी चोळी घालणं सोडून दिलं. आजही त्या त्या भागात स्त्रिया (प्रमाण कमी असलं तरी) चोळी वापरत नाहीत. खरंतर मग त्या ठिकाणी दरदिवशी बलात्कार घडायला हवे होते.  पण असं घडताना दिसत नाही. या जमातींचा मी उल्लेख करतेय त्या नागरी जीवनाच्या परिघाबाहेर आजही आहेत. आज भारतीय समाजाचं मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेलं असून आपण नागर संस्कृतीत आज जगतो आहोत.
नागरी जीवनाचा विस्तार होत गेला तसे नागरी जीवनाची एक विशिष्ठ नियमावली तयार होत गेली. नागरी समाजात स्त्री-पुरुष संबंधांच्या बाबत काम करण्याची, प्रबोधन करण्याची आवश्यकता होती. अगदी पूर्वीच्या काळाचा संदर्भ घेतला तर आपल्याकडे वात्सायनाचं कामशाा म्हणजे लैंगिक शिक्षणाबाबतचा एक केवढा जागृत प्रयत्न दिसून येतो. पण तो समजून घेण्यात आपण कमी पडलो. त्या विषयाबाबतचं वात्स्यायनाचं चिंतन आपण समजून घेतलं नाही आणि मधल्या काळात तर लैंगिकतेवर बोलणं हे काहीतरी पाप आणि असभ्यपणाचं लक्षण आहे अशा समजाने उचल खाल्ली आणि तो विषयच त्याज्य ठरवला गेला. खरंतर यातूनच नागरी समाजाचा दांभिकपणा दिसून येतो.
काही वर्षांपूर्वी आयपीएस दर्जाच्या गील नावाच्या पोलीस अधिकार्‍यानं एका सहकारी आयएएस अधिकारी महिलेच्या पार्श्‍वभागावर चापटी मारली होती आणि ती केस बरीच चर्चेत आली होती. भर पार्टीत अशी कृती करायला एखादा पुरुष उद्युक्त का होतो? तेव्हा याची अनेकविध कारणं सापडतात. अशी कृती करताना अनेकदा त्यात ‘मर्दपणा’ दडलेला असतो. स्त्रियांशी सुसंस्कृत वागणं, त्यांना मदत करणं यासारख्या गोष्टीं करणार्‍या पुरुषांना ‘बायल्या’ किंवा ‘तो बायकी आहे’ असं संबोधलं जातं आणि रॅशपणे, बेफिकिरीनं वागणार्‍या पुरुषांचं एक चित्र पुरुषांच्याच नव्हे तर कित्येक स्त्रियांच्या मनावर ठसलेलं असतं/आहे. की पुरुष हा असा असाच वागला पाहिजे तर तो पुरुष! स्त्रियांनाही ‘आपण याच प्रकारे वागलो तर आवडतो’ अशी एक प्रेरणा पुरुषांना नकळत मिळाल्यामुळे पुन्हा हाच विषमतेचा समज दृढ होण्यास मदत होते.
स्त्रियांनी काय घालावं काय घालू नये, काय बोलावं आणि काय बोलू नये पासून सगळ्याच गोष्टीवरचा अंकुश पुरुषप्रधान संस्कृतीने ठेवला आहे. त्यात संस्कारात आजची पिढीही वाढते आहे. त्यामुळे आमची मानसिकता आम्ही कितीही पुस्तकी शिकलो तरी ती शिकवण आतपर्यंत झिरपत न गेल्यामुळे आम्ही बदलू शकलो नाहीत. त्यामुळे हा प्रश्‍न मानसिकता बदलण्याचा आहे. समाजातली एक जबाबदार, असंख्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती जेव्हा असं बोलते तेव्हा आपल्या समाजाचं वास्तव दर्शन घडवणारी ही बाब असते. त्या त्या अधिकारप्राप्त पुरुषांवर केवळ ताशेरे ओढून, त्यांचा निषेध नोंदवून बदल घडणार नाहीत. तर आपल्या समाजाची मानसिकता बदलण्याची नितांत गरज आहे असं मला वाटतं. त्यासाठी अनेक कायकर्ते झटत आहेत, अनेक सामाजिक संस्था प्रयत्न करताहेत. अनेक साहित्यिकांनी या संदर्भातल्या विषयावर विस्तृत लेखन केलं आहे. कामगारनेत्या मुक्ता मनोहर यांनी तर बलात्कारामागची पाश्‍वर्भूमी आणि त्याची मुळं शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून ‘नग्नसत्य’ हे पुस्तकही नुकतंच लिहिलं आहे. आपण अशा विषयांकडे डोळसपणे बघून ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
स्त्रियांना मिळणारी दुयमत्त्वाची वागणूक, समान संधी म्हटलं तरी प्रत्येक गोष्टीसाठीचा झगडा, अनेक कौटुंबिक, सामाजिक बांधिलकीचे अडसर यांच्यात आजही शहरी आणि ग्रामीण स्त्री  अडकलेली दिसून येते. खूप कमी शहरात सुशिक्षित अशा लोकांमध्ये हळूहळू मुलींसाठीची वागणूक बदलतेही आहे. त्यामुळेच मुली आत्मविश्‍वासानं अनेक क्षेत्रात आपली कामगिरी बजावू शकताहेत. शहरीच नाही तर ग्रामीण भागात बचतगटाचं मोठं माध्यम स्त्री शक्तीला एकत्र आणतंय. या माध्यमातून तिचा आत्मविश्‍वास, अस्तित्वाचं भान आणि जाण तिला येत आहे. मुख्य म्हणजे अनेक शतकांचा, सहाकांचा दडपशाहीचा इतिहास असूनही आजच्या स्त्रीनं हे बदल अत्यंत कमी वेळात स्वतःत घडवून आणले आहेत. म्हणजेच प्रत्येक स्त्री  त्या स्वातंत्र्याची पहाट होण्याची त्या बदलाची स्वप्नं कधीची पाहत होती हेच दिसून येतं.
यासाठी मोठ्या व्यापक पातळीवर प्रयत्नांची गरज आहे. म्हणून झालेल्या घटनेच्या संदर्भात प्रत्येकाला अस्वस्थपणा आलाच पाहिजे. समाजाची ही मानसिकता बदलण्यासाठी शिक्षणाची जागृती अत्यंत आवश्यक आहे. शिक्षण हे केवळ पुस्तकी नको तर रोजच्या जगण्यातल्या फरकाची दरी ओळखायला लावणारं, समतेच्या पायावर उभं असणारं असायला हवंय. तरच एक मोकळं, नीतळ वातावरण समाजात तयार होईल. बलात्कार, किंवा स्त्रियांवरचे अत्याचार या घटना कमी होण्यास त्याने नक्कीच मदत होईल.
एकूण स्त्री-पुरुष विषमतेचा मुद्दा लक्षात घेऊन लैंगिक शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करायला हवाय. अनेक विषयांची लपून चर्चा करण्यापेक्षा या विषयावर बोलण्याची धिटाई लोकांमध्ये आणली पाहिजे. चर्चा झाल्या पाहिजेत. लैंगिकतेच्या संदर्भात प्रबोधन आणि कायदे या दोन्हीची नितांत गरज आहे. लैंगिक शिक्षणाला शास्त्रीय  विषयाच्या आधारावर समाजात रुजवण्याची गरज आहे. भावनिक किंवा नैतिकतेच्या चौकटीपेक्षा शास्त्रीय कसोटीवर त्याचं मापन केलं गेलं पाहिजे. अशा वक्तव्यांचा निषेध जरुर करावा पण फक्त त्यावरच टीकेची झोड उठवण्यापेक्षा त्या प्रश्‍नाच्या मुळाशी जायला हवं. त्यामुळे वरील वक्तव्यांच्या निमित्ताने आपण ‘लैंगिक शिक्षणातून मानसिकतेत बदल’ या विषयाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहावं असं मला वाटतं!
दीपा देशमुख
adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.