28 ऑक्टोबरचा वाढदिवसाचा सिलसिला

28 ऑक्टोबरचा वाढदिवसाचा सिलसिला

तारीख

28 ऑक्टोबरचा वाढदिवसाचा सिलसिला 27 तारखेपासूनच सुरू झाला. 27 च्या सायंकाळी आसावरी आणि आलाप या मायलेकांनी सुप्रसिध्द संदीपमध्ये मला वाढदिवसाची पार्टी दिली. तिथली फेमस ड्रायफ्रूट्सची मस्तानी तर झालीच, पण वर नॅचरलमधलं आईस्क्रीम मी खावं याचा भरपूर आग्रह आसावरीने केला...झालंच तर माझ्यासाठी केक आणि दिवाळीचे सुंदर दिवे असं काय काय माझ्या स्वाधीन केलं. माझ्यावर मनापासून प्रेम करणार्‍या या मैत्रिणीला थँक्स कसे म्हणायचे?
रात्री 9-9.30 वाजता घरी आल्याबरोबर कम्प्युटरवर आर्किटेक्चरचं काम सुरू केलं आणि अचानक एक टोळधाड घरात शिरली. कल्याण, प्रज्ञा, विनू आणि संकेत मास्क लावलेल्या डाकूच्या वेषात आल्यामुळे मी बघतच राहिले. त्यांनाही अ‍ॅडव्हान्समध्ये वाढदिवस साजरा करायचा होता. सुरेखशी ऑर्किडची फुलं प्रज्ञानं माझ्या हातात दिली. मग गप्पा, हसणं यानं वातावरणही तितकंच सुखद झालं. अपूर्व मला गिफ्ट देत नाहीये अशी खोटी तक्रार करताच, कल्याणनं चल, आपण साडी घ्यायला जाऊ म्हटलं. त्याच क्षणी मला या ल्योकाकडून साडी मिळाल्याचा फील आला.
28 तारखेच्या पहाटे बॉस्टनवरून माझा मुलगा अजिंक्य याचा फोन आला. त्याच्या आणि माझ्या स्वभावात बर्‍यापैकी साम्य असल्यानं अनेक गोष्टी न बोलता बिटविन द लाइन्स कळत असतात. त्यामुळे त्याच्या फोननं वाढदिवसाची सुरुवातच अतिशय सुखावणारी झाली. त्याच्या शुभेच्छांनी दोन देशातलं अंतर एका क्षणात कमी झालं. गझलकार आणि उत्कृष्ट निवेदक असलेले सुरेशकुमार वैराळकर यांच्या शुभेच्छांनी बहार आणली. त्यानंतर सकाळी बुकगंगाची सुप्रिया आणि गौरी दोघी आल्या आणि मला एक आणखी सुखद धक्का त्यांनी दिला. पाथफाइंडर्सची दोन पुस्तकं बुकगंगाच्या वतीनं नुकतीच आली असताना, माझं तिसरं पुस्तक नारायण धारप त्यांच्यासोबत होतं. पुस्तक बघताना हे किती किमती गिफ्ट आहे या भावनेनं मन आनंदानं नाचायला लागलं. दोन-तीन दिवसांच्या अंतरानं माझी तीन पुस्तकं बुकगंगा पब्लिकेशन्सनं वाचकांसमोर आणली याचा आनंद आम्ही साजरा केला. त्यातही सुप्रियानं स्वत: माझ्यासाठी बनवलेला केक विकतच्या केकला कम्पिट करून पराजित करेल असा होता. त्यावरची आयसिंग केलेली फुलं तर अप्रतिम. दोघींनी आणलेली माझ्यासाठी मला आवडेल अशी सुरेख बॅग अहाहा...त्यानंतर नयन ही माझी मैत्रीण आवर्जून मला भेटायला आली आणि तिच्या सहवासात मला घर भरल्यागत वाटलं. आशा साठे आणि नयन यांच्याजवळ मनातल सगळ काही बोलून मोकळ व्हाव अशा या माझ्या घट्ट मैत्रिणी. 
त्यानंतर मात्र फोनच सिलसिला सुरु झाला. त्यातच आमचा कर्‍हाडचा विज्ञानवेडा संजय पुजारी, बुकगंगात  गेला आणि त्यानं चक्क बुकगंगाच्या स्टाफसह पाथफाइंडर्स हातात घेत प्रकाशनच करून टाकलं. आपल्याही नकळत आपल्याच पुस्तकाचं प्रकाशन असं कोणी करतंय, ही भावना  देखील सुखावणारी होती. गीता भावसार माझ्या पुस्तकांची वाचक आणि त्यानंतर झालेली माझी छोटी मैत्रीण ही तर मागच्या वर्षीपासून वाढदिवसाची आठवण ठेवून घरी येते आणि चक्क मला ओवाळते. माझ्यासारख्या नास्तिक व्यक्तीच्या घरी काहीही सापडणार नाही हे ठाउक असल्यानं ती दिवा, वगैरे सगळ्या औक्षणाच्या गोष्टी बरोबर घेऊन येते. काहीनाही, पण अक्षत म्हणून तांदुळ मात्र तिला माझ्याकडे मिळतात. मिठाई घेऊन आलेल्या गीता आणि आर्याबरोबर गप्पा झाल्या आणि मग मात्र येऊन गेलेले फोन अणि येणारे फोन यांच्यासमोर जाण्यासाठी सज्ज झाले.
मनोविकास हा माझ्या आणि मी त्यांच्या कुटुंबाचा भागच समजते. त्यामुळे आशिश आणि रिना यांचा फोन येताच, कानावर शब्द पडले, तुमची साडी रेडी आहे, खूप खूप शुभेच्छा. काहीच वेळात अरविंद पाटकर यांचा फोन, या वेळी मात्र खुप गप्पा तर झाल्याच, पण नवीन लिखाणाचं कामही त्यांनी सोपवलं आणि मी डिसेंबर 2020 च्या शेवटापर्यंत त्यांना द्यायचं  कबुल केलं. त्यांच्याकडून ही वाढदिवसाची भेटच म्हणावी लागेल.
माजी आयएएस अधिकारी आणि विख्यात साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी शुभेच्छा देत माझं लिखाण आवडत असल्याचं सांगितलं. तसंच जीवन समरसून जगण्याची माझी वृत्ती आवडते असं म्हणत त्यांनी आमची भेट झाली तेव्हाच्या गप्पांचाही उल्लेख केला. वेधकट्टयावर लक्ष्मीकांत यांच्या कैफी आझमी पुस्तकानिमित्त मारलेल्या गप्पा मला आठवल्या. तेलंगणात असलेले आमचे मित्र आणि ज्यांचा मित्र म्हणून खूप अभिमान वाटावा असे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांनी आवर्जून फोन करून त्यांच्या मृदू भाषेत शुभेच्छा दिल्या. त्यांची ओळख ज्या मित्रामुळे झाली, तो कल्याण तावरे या मित्राचाही लगेच फोन आला. वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यानं वाढदिवसाचा एक फ्लेक्स आपण पुण्यात लावायला हवा असं मीश्कीलपणे सांगितलं, त्यावर मीही आपण तो फ्लेक्स तुझ्याच गुडलकजवळच्या ऑफीसवर लावू असं म्हटलं. ज्याला मी माझा हक्काचा लहान भाऊ म्हणते, तो नगरचा किरण काळे यानंही त्याच्या मनातलं प्रेम व्यक्त करत शुभेच्छा देणारी सुखावणारी पोस्ट टाकत फोनही केला. अमेरिकेहून विनायक घाटे याचाही शुभेच्छा देणार फोन आला. 
मला आईचं स्थान देणारा अनंता (झेंडे) याचा शुभेच्छा देणारा आणि काळजी व्यक्त करणारा फोन आला. दिसायला साधा, पण कामानं आभाळाची उंची गाठणार्‍या या मुलाचा अभिमान वाटतो. याच मुलामुळे डॉ. प्रकाश सेठ सारखा डॉक्टर मित्र मिळाला. कोणाचंही न ऐकणारी मी पण प्रकाश सेठ यांचे सगळे सल्ले ऐकते अणि त्यांचं पालन केल्यामुळे माझी प्रकृती ठणठणीत होण्यास मदत मिळाली. त्यांचाही फोन आला आणि त्यांनी भरभरून शुभेच्छा व्यक्त केल्या. हा माणूस फक्त डॉक्टरच नाही, तर स्नेहालय संस्थेसाठी जे कार्य करतोय त्यासाठी त्यांना सलाम. माझा लाडका सजल याचाही फोन आला आणि 30 तारखेला प्रत्यक्ष भेटण्याचा वादा त्यानं केला.
विशेष म्हणजे भारतातलं पहिलं विज्ञानगाव ज्यानं उभारलं तो, ज्यानं मला आपल्या आईचा दर्जा दिला, तो जयदीप यानं अतिशय सुरेख पोस्ट टाकून आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत मला शुभेच्छा दिल्या. इतकी गुणी मुलं असल्यामुळे आपण जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहोत याची मला जाणीव झाली. नाशिकच्या सचिननं माझी लिखाणाची शैली त्याला आवडते, तसंच माझ्यातलं माणूसपण जास्त भावतं असं सांगत आरोग्यमय शुभेच्छा देताना लवकरच आपण त्याच्या शाळेत गप्पांचा कार्यक्रम करू असं आश्वासन दिलं. शिक्षणक्षेत्रात कल्पकतेनं प्रयोग करत एक यशस्वी, मुलांना जाणून घेऊन त्यांना घडवणारी शाळा उभा करणारा सचिन याचा मला मनोमन अभिमान वाटतो.
बारामतीहून दिनेश अदलिंगचा फोन आला. हा देखील माझा गुणी मुलगा. त्यानं फोनवर शुभेच्छा देत दमदाटी करत सांगितलं, फक्त माझ्यावर प्रेम करायचं, बाकी कुणावरही नाही. आणि बारामतीला येताना कोणालाही सांगायचं नाही, सगळा वेळ फक्त मला द्यायचा. मी त्याला होकार दिलेला आहे. यात फक्त सूट आहे ती माझी लाडकी मैत्रीण सुवर्णसंध्या हिला. बारामतीहून डॉ. सुजीत अडसूळ, डॉ. संजीव कोल्हटकर, डॉ. भास्कर जेधे, संगीता काकडे, सीमा चव्हाण, शशांक मोहिते, नीता शेंबेकर, नसरीन यांच्याही शुभेच्छा मिळाल्या. 
माझी मैत्रीण मीनाक्षी मोरे हिचा फोन आला आणि पंख लावून लगेच तिला भेटायला जावं असं वाटलं. खूप दिवसांनी तो परिचित आवाज ऐकून भरून आलं. अश्विनी दरेकर हिच्या शुभेच्छांनी खूप छान वाटलं. माझा मित्र अभय जोशी, श्रीपाद पद्माकर, चंद्रकांत कुलकर्णी, जयश्री देसाई यांच्याही शुभेच्छा मिळाल्या. संध्या नलावडे हिचा फोन आला, पण नंतर मी केल्यावर मात्र ती आउट ऑफ रिच असल्यानं संवाद होऊ शकला नाही, पण शुभेच्छा मिळाल्या. वेधचे दीपक पळशीकर, प्रदीप कुलकर्णी, डॉ. ज्योती शिरोडकर, केतकी जोशी, मानसी देशमुख आणि विश्वंभर चौधरी यांच्याही शुभेच्छा मिळाल्या. बाबा यानेकी अनिल अवचट याचा मेसेज आणि फोन यांनी आशीर्वाद दिला. तर पेशंटच्या तपासणीतून लंच टाईममध्ये वेळ काढून डॉ. आनंद नाडकर्णी यांनी त्यांच्या प्रसन्न आवाजात भरभरून शुभेच्छा दिल्या आणि मग रंगा एकदम खुश झाला. 
गोव्यावरून मीलन, मुंबईहून रंजन, इथल्या हुजुरपागा, क्रिस्पिन शाळेच्या हेमा आणि माझ्या मैत्रिणी, माझ्यावर प्रेम करणारी मानसोपचारतज्ज्ञ आणि कौन्सिलर अरुंधती, माझी साहित्यिक मैत्रीण नीलम ताटके, मला दीपाराणी म्हणणारी मैत्रीण प्रतीभा दाते, डी. वाय. पाटील यांच्या शुभेच्छांनी आनंद झाला. या वेळी किती लोकांचे आभार मानू खरंच कळत नाहीये. अनेक नावं मी विसरण्याची दाट शक्यता आहेच. औरंगाबादहून मिनाक्षी वळसे या मैत्रिणीच्या शुभेच्छा मिळाल्याच, पण त्याचबरोबर आरंभ ही ऑटिस्टिक मुलांसाठी काम करणारी संस्था आणि तिची संचालक अंबिका टाकळर या मैत्रिणीच्या पोस्टनं तिला लगेचच भेटावं असं वाटायला लागलं. तिच्या कामामुळे आणि तिच्यातल्या माणुसकीनं संवेदनशीलतेनं मी भारावून गेले आहे. अमरावतीहून गुंजन गोळे, माझा लाडका लहान भाऊ अभिजीत थोरात, प्रांजल थोरात , पुस्तकवेडे अप्पा यांच्याही शुभेच्छा मिळाल्या. नाशिकहून विनायक रानडे याच्या उत्साही आवाजात शुभेच्छा मिळाल्या अणि त्याच वेळी जळगाव इथे नुकताच बदली होवून गेलेला हंसराज याच्या फोननं दिवस आणखीनच ताजातवाना झाला. आपल्यातल्या शारीरिक विकाराला तंबी देऊन आकाशाला गवसणी घालणार्‍या या तरुणाचा मला विलक्षण अभिमान वाटतो.
माझ्यावर नेहमीच भरभरून लिहिणारा जनार्दन यानं लिहिलेलं वाचून मला भूतकाळातले आमच्या आठवणींचे सुखद क्षण आठवले. दीपस्तंभासारखं काम करणारा यजुवेंद महाजन याच्या फोनवरच्या शुभेच्छांनी उत्साह वाढला, त्याच वेळी जळगावच्या मनोबलमधूनही शुभेच्छा मिळाल्या. माझी मुलं अमित नागरे, प्रियदर्श म्हणजेच सोनू यांच्या शुभेच्छांनी पुन्हा प्रत्यक्ष भेटल्यासारखं वाटलं. सोनाली, सानिया भालेराव, श्रीयोगी यांच्या फोननं या गोड मुली डोळ्यासमोर येऊन त्या प्रत्यक्ष शुभेच्छा देताहेत असा भास झाला. सुचित्रा, सुमेध आणि दाक्षिणी यांनी खास व्हिडिओ कॉल करत त्यांच्या लाडक्या माऊला म्हणजेच मला शुभेच्छा दिल्या. 
त्यानंतर माझा मित्र धनू याची शुभेच्छा देण्याची पद्घत बघून मी अवाकच झाले. तुम्हीच बघा तो काय म्हणतो. अर्थात या पोस्टमागे दडलेलं त्याचं, मंजू, नुपूर आणि चैतूचं माझ्याविषयीचं प्रेम मला ठाऊक आहे. ‘माझी एक मैत्रीण आहे, एक नंबर हावरट. पुस्तकं किती वाचावी. एका दिवसात तीन चार मोठी पुस्तकं वाचून टाकते. बरं हे समजलं त्यावर हावरटासारखे लिहिते. लिखाण तर विचारूच नका. ही झोपते, जेवते की नाही कुणास ठाऊक. रोज रतीब लावल्या सारखं लिखाण चालूच. जेवते बरं कारण जिथं खाते त्यावर लिहिते. मित्र? पायलीचे पन्नास त्या शिवाय पन्नास पाथ फाईंडर लिहिणार आहे? कोणत्याही क्षेत्रात हिचे चांगले मित्र,मैत्रिणी आहेतच. हावरट एक नंबर. लिहिते, वाचते, खाते, पिते इथपर्यंत ठीक पण सिनेमा, नाटक, गाण्याचे कार्यक्रम हावरटपणे पाहते. अनेक गोष्टी हिला करायच्या असतात, शिकायच्या असतात, समजून घ्यायच्या असतात. आता काय लहान आहे का? वाढदिवस आहे ना आज मग जरा हावरट पणा कमी करून प्रकृती कडे लक्ष दे. तुझी माझी मैैत्री हावरटपणे अशीच बहरत राहो. दीपा, वाढ दिवसाच्या आरोग्यपूर्ण सदिच्छा.💐🎂🎂धनंजय.'
संध्याकाळी यमाजी मालकर या मित्राच्या आमंत्रणावरून विष्णुजीकी रसोई इथे जेवायला जायचं होतं. सध्या वाढत चाललेल्या ट्रॅफिकमधून वाट काढत आम्ही पोहोचलो. तिथेच मी मला नारायण धारप पुस्तकात मोलाची मदत करणार्‍या अजिंक्य विश्वास या त्यांच्या चाहत्याला बोलावून नारायण धारप हे पुस्तक सुपूर्त केलं. मग अंजली, यमाजी, जनक, अपूर्व आणि मी विलास या मित्राची वाट बघत बसलो. विलास एखांडे आमचा कॉलेजचा मित्र. अतिशय उत्तम असा नर्तक, लेखक, कार्यकर्ता, उद्योजक आणि अभिनेता. आज स्वादिष्ट जेवणाबरोबरच आम्ही कॉलेजमधल्या वयात जाऊन पोहोचलो आणि एकमेकांची खेचताना इतके हसलो की गडबडा लोळायचंच बाकी राहिलं. त्याच वेळी माझी एक अतिशय गोड डॉक्टर असलेली आणि सामाजिक कामात सक्रिय असलेली माझी मैत्रीण यामिनी अडबे हिच्या फोननं मला अतिशय अतिशय छान वाटलं. इतकं की आमच्या भेटी कोरोनाला बाजूला सारून व्हायला हव्यात असं जाणवलं.
परभणीहून उषा लोहाट, माझी चित्रकार मैत्रीण रेणुका माडीवाले, प्रभाकर भोसले, निलेश चौधरी, मिशी ऊर्फ मिलिंद शिंदे, किरण केंद्रे, गायत्री, सुचित्रा सोमण, रविंद्र क्षीरसागर, शुभदा बर्वे, गौरव बर्वे, गिरीश पाटील, अक्षय जहागिरदार, निर्मला जोशी, मेधा जोशी, विलास फुटाणे, शर्मिला राजेनिंबाळकर-राजज्ञे, सोनाली बढे, वैशाली बोदाडे, अभय चंद्रास, सुवर्णरेहा जाधव, शरद बाविस्कर, कांचन थोरात, स्वागत थोरात, या सगळ्यांचेही खूप खूप आभार. 
मला चिंतन आदेश मधून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा एक फोन आला आणि माझे डोळे अचानक भरून आले. दरवर्षी मला एक फोन नियमितपणे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा यायचा आणि तो असायचा अभिनंदन थोरात यांचा. माझी आणि त्यांची प्रत्यक्ष ओळख नसतानाही ते मला स्वत:  फोन करून शुभेच्छा देत. पुढे स्वागत थोरात या मित्रामुळे माझी आणि त्यांची प्रत्यक्ष भेट झाली आणि पहिल्याच भेटीत आत्मीयता निर्माण झाली. अभिनंदन थोरात आज आपल्यात नाहीत, पण त्यांनी जी घडी बसवली तीच पुढे चालू ठेवण्याचं काम त्यांचे वारसदार पुढे चालू ठेवताहेत आणि त्याचबरोबर त्यांनी दाखवलेला हा माणुसकीचा वेगळा पैलूही जपताहेत हे बघून ते आहेतच असं वाटलं. थँक्यू अभिनंदनजी.
महेश पाटील, भूषण म्हेत्रे, मेधा कुलकर्णी, चंद्रकांत तुपे, दिनेश असबे, संजय बारी, ईश्वर चौधरी, सुमेधा गंगाखेड कर, साहिल कबीर, गणेश विसपुते, सोनाली मराठे, हेमा उपासनी, शशी पानीकर, गणपत महाडिक, रमा अतुल नाडगौडा, किरण पडयाळ, समीर शेख, विश्वास पाटील, सुबोध मोरे, सीमा गवासणे, सुह्द जावडेकर, राजीव बर्वे, निरंजन सोमण, सरिता नेने, प्रमोद शिंदे, विद्या कापसे, अमृत साळुंखे, उदय कुलकर्णी, मुकुंद पिंगळे, राहुल देशमुख, उज्ज्वला अांबेकर, समीर इनामदार, मनोज अंबिके, शरद अष्टेकर, समीर मनियार, ह्षिकेश शिंपी, नीतीन रानडे, अश्विनी कुलकर्णी, शिरूरकर, श्वेता मंडलिक-देशपांडे, संगीता काटे-भाटे, शौनक कुलकर्णी, अर्चना बापट, आकाश देशमुख, रवींद्र घाटपांडे, मंदार, शमा सुबोध,  गिरीश कुलकर्णी, उज्ज्वला पाटील, सुचिता थोरात, विकास रायमाने, बीना सतोसकर, अनिल फरांदे, माधव कोल्हटकर, गजानन कान्हेकर, आरती खानोलकर, अविनाश पेठे, संगीता कदम, सविता सातव, सुनिल पाटील, रंजन बेलखोडे, उमाकांत बार्‍हाळे, हेमंत पाटील, अनिरुद्घ अभ्यंकर, परिणिता शिंगारे, अमित गद्रे, अमित बिडवे, स्वाती प्रभुणे, शास्त्री, सुखदा चिमोटे, आशा साठे, बापू दासरी, संजय गुगळे, माधुरी राऊत, डावकिनाचा रिच्या, अजिंक्य कुलकर्णी, सुप्रिया चित्राव, वेदांग, शमिका दळवी, फारूख काझी, जयश्री वडगावकर, कविता महंदळे, प्रदीप पवार, निखिल परोपते, संगीता जोगळेकर, मधुरा विपरा, सीमा भिसे, वैशाली मोटे, यशवंत शीतोळे, प्रनोती, बाल ग्राम, दिल्लीहून मि. आणि मिसेस प्रफुल पाठक आणि याशिवाय 458 शुभेच्छांचे मेसेज फेसबुकवरून, आणिक कितीतरी व्हॉटसअप आणि मेसेंजरवरून मला पाठवणार्‍या मित्र-मैत्रिणींचे आभार. अनिकेत कोनकर याने माझ्या वाढदिवसाला भेट म्हणून चक्क एक लेख प्रसिद्ध केला, त्याचेही मनापासून आभार.
या सगळ्यांत माझा अगदी जीवलग मित्र अतुल गडकरी याच्या अद्श्य शुभेच्छा कायम माझ्या बरोबर असतात. त्यातच त्याने मला मी माझ्या पसंतीनं एक साडी त्याच्यातर्फे खरेदी करावी असं फर्मान काढलं त्यामुळे मोगॅम्बो खुश झाला. सुवर्णसंध्या, जिविधा आणि शेखर हे माझ्या आयुष्याचा भाग आहेत. त्यामुळे तिचं ते माझं आणि माझं ते सगळं तिचं असाच सगळा कारभार आहे. तिचे शब्द, तिची कृती, तिची माझ्यासाठी जाणवणारी काळजी, प्रेम, माया, अस्वस्थता हे सगळं माझ्यासाठी खूप अनमोल आहे. तिचे शब्द मला लिहिण्यासाठी बळ देतात. 
वाढदिवस हा माझ्यासाठी विशेष दिवस कधीच नव्हता, पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानं तो विशेष सुंदर झाला हे मात्र खरं. मी काल सम्राट अशोकाच्या तोर्‍यात वावरतेय असं मला वाटत राहिलं, पण रात्री बिछान्यावर डोळे मिटत असताना मात्र सम्राट अशोकानं बौद्घ धर्माच्या प्रसारात आपलं पुढलं आयुष्य व्यतीत केलं होतं हे आठवून आपल्याला खूप चांगलं लिहायचंय, खूप शिकायचंय आणि आपल्यातली माणुसकी सतत जपत पुढे चालत राहायचंय असं मनाशी म्हणत मी निद्रेच्या आधीन झाले. 
पुनश्च सगळ्यांचे खूप खूप आभार.
दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.