साबुदाणा खिचडीच्या देशात
साबुदाणा खिचडीच्या देशात (डॉ.आनंद नाडकर्णी यांच्या आगामी ‘मनमैत्रीच्या देशात’ या पुस्तकावरून प्रेरणा घेऊन हे शीर्षक)
आला फोडणीचा वास ....खवळली कशी भूक
तूप जिऱ्याची फोडणी .....फिका अत्तराचा वास
वर पडे साबुदाणा .......ढवळतो कढईत
खाली वर होई जीव .....किती उशीर ..उशीर
कुणी खोवतं खोबरं .......कुणी चिरे कोथिम्बीर
वाफ खाई साबुदाणा .......लिंबू पिळाहो खच्चून
काचेच्या बशीत ..............वसे खिचडी डोंगर ...
वर शिखर बर्फाळ ...........खाली झाडी कोथिंबीर
जीभ पाझरते झरे ............वास करितो बेभान
अग खिचडे खिचडे ............ये ग मुखी लवकर
ही कविता आहे द ग्रेट बाबाची, म्हणजेच अनिल अवचट यांची. ही कविता ऐकल्यावर साबुदाणा खिचडीपासून कोणी दूर राहू शकतो का? ही कविता अक्षरश: अस्सल आहे, ताजी आहे आणि ज्यांनी ज्यांनी बाबाच्या खिचडीचा स्वाद घेतलाय ते सांगू शकतील की ही कविता आणि आपण घेतलेला अनुभव वेगळा नाही म्हणून.
ज्या वेळी मला साबुदाण्याची खिचडी बाबाने खाऊ घातली, त्या वेळी अनेकांनी मला खिचडीचा फोटो का नाही टाकला असं विचारलं. मी तर खिचडीच्या प्रेमात फोटो काढायचा विसरूनच गेले होते. पण अपूर्वने आठवणीने काढला होता आणि आज मला दिल्यामुळे तो टाकते आहे.
आणखी सांगायची गंमत म्हणजे बाबाकडे तृप्त होईपर्यंत साबुदाण्याची खिचडी खाल्ली आणि दुसऱ्याच दिवशी सरिताचा - हमरस्ता नाकारताना या आत्मचरित्राची लेखिका मैत्रीण - फोन आला, तिनं मला विचारलं, दीपा तुला साबुदाण्याची खिचडी आवडते का, मी हो म्हटलं. मग ती म्हणाली, आनंदला (करंदीकर) साबुदाण्याची खिचडी खूप आवडते आणि मला मात्र चालत नाही. त्यामुळे उद्या तुझ्यासाठी आणि आनंदसाठी मी साबुदाण्याची खिचडी बनवते.
सकाळी मी महत्प्रयासानं स्कूटी सुरू करून (कोरोनाकाळाचे प्रताप...बॅटरीचे तीनतेरा...) अथश्रीला पोहोचले. सरिता आणि आनंद वाट बघत होते.
ही खिचडी तुम्हा दोघांना संपवायची आहे असं सरितानं प्रेमानं म्हटलं. मी प्लेटमध्ये खिचडी घेत होते, अगदी तश्शीच होती, बाबानं केली तशी. तिनं ओलं खोबर आणि कोथिंबीर वरून घातली. माझ्या चेहऱ्याकडे ती बघत होती. मी काही बोलायच्या आतच ती म्हणाली, कशी झालीये? मी आणि आनंदने प्रशंसा केली. तुला शंका का येतेय असं विचारताच ती म्हणाली, ही खिचडी मी अनिल अवचटकडून शिकले आहे. म्हणून जमली की नाही विचारत होते. मला या योगायोगाची गंमतच वाटली. सरितानं खरोखरं अप्रतिम खिचडी केली होती. मी आणि आनंद - आम्ही दोघांनी काहीच क्षणात साबुदाणा खिचडी, बरोबर असलेली काकडीची कोशिंबीर सगळं फस्त केलं. मांजरासारखं तोडं पुसून घेतलं. थोड्या गप्पा मारल्या आणि मग सरिता आणि आनंदचा निरोप घेत मी स्कूटीवरून घराकडे कूच केलं.
अचानक घबाड मिळावं तसं सध्या हे खिचडीचं प्रेमप्रकरण माझ्या आयुष्यात आलंय. बाबा, मग सरिता आणि आता पुन्हा बाबानं खिचडी खायला ये म्हणून सांगितलेलं आहेच.
त्यामुळे खरोखरंच देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाडके......
दीपा देशमुख, पुणे
Blog comments
युरोपियन मराठी संमेलनात ही…
युरोपियन मराठी संमेलनात ही कविता प्रत्यक्ष ऐकली होती अनिल अवचट यांच्याकडून. समाधानी असणं हे किती आपल्या मनावर अवलंबून असतं याचा प्रत्ययकारी अनुभव पुलंसारखाच देणारे अवचट गेले तेव्हा आठवली ही कविता. इथे वाचायला उपलब्ध केल्याबद्द्ल धन्यवाद.
Add new comment