मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन....

मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन....

तारीख

आज सकाळी दार उघडताच चायकॅटनं माझ्यावर गुरकावून ‘चल दे दूध’ म्हणायला सुरुवात केली. मी त्याला, ‘रोज रोज काय रे’, असं म्हणताच, त्यानं ‘दे गुपचूप बोलण्यात वेळ घालवू नकोस, भूक लागलीय’ म्हणून थयथयाट करायला सुरुवात केली. मी दूध तापवण्यासाठी फ्रीज मधून काढून गॅसवर ठेवलेलंच होतं. मागचा अनुभाव लक्षात घेवून एका मोठ्या डिशमध्ये जास्त दूध घेवून मी त्याला दिलं. दोन चार घोट घेत त्यानं माझ्याकडे रागानं बघितलं आणि ‘इतकं थंड दूध देतेस?’ असं म्हणून पुन्हा माझ्यावर डाफरायला सुरुवात केली. मलाही राग आला. ‘इतर वेळी सगळे उकिरडे फुंकून मिळेल ते खातोच ना, मग माझ्याजवळ कशाला नखरे करतोय. दिलं ते चुपचाप पी’ मीही ओरडले. त्यावर त्यानं माझ्याकडे एक जळजळीत कटाक्ष फेकला आणि सरळ शेपूट उंचावून माझा निषेध करत चालता झाला.

मीही त्या चायकॅटची पर्वा न करता स्वयंपाकघरात शिरले. आज नाश्त्यासाठी बटाट्याची भाजी आणि ब्रेडला बटर लावून टोस्ट करणं काम सुरू केलं. बटाट्याची आणि कांद्याची सालं टाकायला पुन्हा दार उघडलं तर चायकॅट कुठेच सोय न झाल्यानं पुन्हा परतले होते. पण आपली गरज आहे आता तरी नम्रपणे बोलावं हा भाव चेहऱ्यावर अजिबात नव्‍हता. उलट ‘मीच तुझ्यावर उपकार करतोय, फिरून परत आलोय, तर दे आता दूध’ असं म्हणायला सुरुवात केली. तो थंड दूध पिणार नाही हे कळल्यामुळे मी त्याला ‘जरा वेळ बडबड न करता बस’ असं म्हणत दूध जरा कोमट केलं आणि पुन्हा एकदा बशीत घालून त्याला दिलं.
आता मात्र एक घोट पिवून होताच, त्यानं माझ्याकडे समाधानानं मान वर करून बघितलं. त्यानंतर सगळं दूध चाटून पुसून पिवून झाल्यावर तृप्त होवून मिशांवर पंजा फिरवून माझा निरोप घेतला. जाताना जणूकाही मी त्याला ‘पलट पलट’ म्हटलंय असं समजून त्यानं वळून माझ्याकडे बघितलं. पण थँक्यू ऐवजी आजही, 

‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन,  मी पुन्हा येईन’ असं म्हणत शेपटी नाचवत चायकॅटनं आपला रस्ता धरला.

दीपा देशमुख

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.