सप्टेंबर २०२० मध्ये पुण्यात होणार १०० वा वेध!

सप्टेंबर २०२० मध्ये पुण्यात होणार १०० वा वेध!

तारीख

आज सकाळी ९.३० वाजता वेधच्या तयारीसाठी जमलेल्या कार्यकर्त्यांनी दातार क्लासेसचा हॉल फुलून गेला होता. सध्या कोरोनाच्या छायेत असलेल्या पुणेकरांनी मनातलं भय दूर लोटून आवश्यक ती काळजी घेत मिटिंगला पोहोचण्याचा निश्चय केला. आज डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. महाराष्ट्रातल्या ठाणे, पुणे, औरंगाबाद, लातूर, नगर, परभणी, नाशिक, पेण, कल्याण, बदलापूर आणि अमरावती इथे दरवर्षी वेध हा उपक्रम संपन्न होतो. खरं तर वेध हा उपक्रम नसून ती जगणं समृद्ध करण्यासाठीची डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या पुढाकाराने सुरु झालेली एक चळवळ आहे.

सप्टेंबर २०२० मध्ये १०० वा वेध पुणे शहरात संपन्न होणार असून वेधच्या कार्यकर्त्यांची जोरदार तयारी सुरू आहे. नेहमीप्रमाणेच २४ तास उत्साही असणारे डॉ. आनंद नाडकर्णी हॉलमध्ये प्रवेश करते झाले आणि वातावरणात चैतन्याची लहर आपोआपच पसरली. वेधची गोड आणि हुशार कार्यकर्ती शिल्पा चौधरी हिने पुणे वेध, वेध कट्टा, निधी संकलन, डॉक्टर नाडकर्णा यांचं मार्गदर्शन आणि मुक्त संवाद असं मिटिंगचं स्वरूप सांगितलं.

पुणे वेध २०११ साली दीपक पळशीकर यांच्या पुढाकाराने सुरू झाला. ५० वा महावेधही पुण्यातच संपन्न झाला. ५० व्या वेधमध्ये तर एकाच वेळी ११ दिग्गजांच्या मुलाखती डॉ. आनंद नाडकर्णी यांनी घेतल्या. नाशिकच्या वंदना अत्रे यांनी पुढाकार घेऊन या वेधवर 'वेधक वेचक' नावाचं पुस्तक तयार केलं. आणि आता सप्टेंबर महिन्यात होणारा १०० वा वेधही पुण्यात होणार असून तयारी कशी सुरू आहे याबद्दल शिल्पा बोलत होती.

वर्षभर लोकांशी संवाद राहावा, लोक जोडली जावीत या हेतूनं साहित्य, संगीत, नाट्य यांचा वेध घेत वेध कट्टा सुरू झाला. वेध कट्टा सुरू करणारं पुणे हे पहिलं केंद्र ठरलं. प्रतिभा रानडे, जनरल पाटणकर, अच्युत गोडबोले, अनिल अवचट, पल्लवी आणि प्राची गोडबोले, किरण केंद्रे, चैतन्य सरदेशपांडे, लक्ष्मीकांत देशमुख, राजीव तांबे यांच्या सहभागाने आजवरचे वेधकट्टे रंगतदार झाले. १० वा वेध कट्टा अस्मादिक म्हणजेच दीपा देशमुख यांच्या बुकगंगा प्रकाशित 'पाथफाइंडर्स' या दोन पुस्तकांच्या संचाच्या प्रकाशनानं आणि मुलाखतीनं लवकरच संपन्न होणार आहे.

वेध कट्टयाला प्रत्येक कार्यक्रमागणिक चोखंदळ आणि रसिक श्रोत्यांचा प्रतिसाद वाढतो आहे. आजवर या कट्टयाचा सर्व खर्च दीपक पळशीकर यांनी उचलला असून यापुढे आपण प्रत्येक कट्टयाचा खर्च एकेकानं उचलावा असं आवाहन प्रदीप कुलकर्णी यांनी केलं. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून त्यांनी स्वतःच 'एप्रिल महिन्यात माझा वाढदिवस असून तो खर्च मी करणार' असं जाहीर केलं. शिल्पा चौधरीनं मार्च कट्टयाच्या खर्चाची जबाबदारी उचलली, तर दीपा देशमुखने ऑक्टोबर महिन्याची!

वेधच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेषतः पालकांनी आपल्या मुलांना यात सहभागी करून वेध कट्टयाला उपस्थिती लावावी असं आवाहनही प्रदीप कुलकर्णींनी केलं. वेध कट्याचं गेले तीन महिने मॅक्स महाराष्ट्रद्वारे लाईव्ह प्रसारण होत असून त्यांचेही आभार या प्रसंगी मानावे वाटले. स्वागत थोरात यानं दिव्यझेप हा २० तरूणांचा गट १००व्या वेधसाठी कार्यकर्ता म्हणून साहाय्य करणार असल्याचं सांगितलं.

यानंतर डॉक्टर नाडकर्णी यांनी करोनानं वातावरणावर परिणाम केलेला असतानाही मिटिंगची उपस्थिती पाहून समाधान व्यक्त केलं. ते म्हणाले:

३० वर्षांपूर्वी आयपीएचची सुरुवात झाली आणि मग त्यातूनच मानसिक आरोग्य सुदृढ व्हावं यासाठी एक एक उपक्रम आकार घेत गेले. आयपीएच सुरू करताना हे सगळे उपक्रम सुरू करायचे असं ठरलं नव्हतं. पण चालणं सुरू झालं आणि एक एक गोष्टी घडत गेल्या. १९९० साली अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट फारशा लोकांना माहीत नव्हती. हुशार असेल तर जा इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला आणि त्यापेक्षा कमी हुशार मुलांनी कॉमर्स किंवा आर्ट्सला जावं असाच प्रघात होता. बरं या टेस्ट कुठे कशा आणि कधी होतात हेही बहुतांशी लोकांना ठाऊक नव्हतं. अशा वेळी आयपीएचनं पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरू केला. एकेका सेवेबरोबर संवादाचा पूल बांधत आयपीएचची वाटचाल सुरू झाली. पहिला वेध तर अक्षरशः एका वर्गात काही विद्यार्थ्यांच्या समोर झाला. मग ड्रग्जशी सामना करण्यासाठीची चळवळ सुरू झाली. आपलं व्यक्तिमत्व असं विकसित करा की ड्रग्जला आपणच ठामपणे नकार देऊ शकू. मग पुढे टफ्टिन ग्रुप सुरू झाला. आणि याचाच पुढला टप्पा म्हणजे वेध!

वेधची वाटचाल सांगत असतानाच डॉक्टरांनी वेधचा आणि वेध कट्टयाचा विस्तार होण्यासाठी काय काय करायला हवं याविषयी मार्गदर्शन केलं. यात वेधचं सादरीकरण, सोशल मिडियाबरोबरच वैयक्तिक संपर्क, वेध बाँन्डस, क्राऊड फंडिंग, वैयक्तिक निधी, परदेशस्थ भारतीयांचा सहभाग, अशा अनेक गोष्टी कशा रुजवता येतील, कशा पद्धतीनं त्यावर काम करता येईल हे अतिशय सोप्या पद्धतीनं सांगितलं. डॉक्टरांचं बोलणं ऐकून असं वाटलं, अरे ही गोष्ट फार कठीण नाही, मलाही सहज जमू शकेल. (अर्थात समोरच्याला प्रेरित करणं आणि त्याच्यातला आत्मविश्वास वाढवणं हे कसब डॉक्टरांचं आहे!) १०० व्या वेधसाठी कार्यकर्त्याच्या दोन टीम कशा काम करतील आणि त्यांच्यावर ताणही कसा येणार नाही याविषयी देखील डॉक्टर बोलले.

यानंतर नाशिकमध्ये लवकरच म्हणजे १० ऑक्टोबरला आयपीएच कशा अभिनव स्वरूपात (Mind Lab) सुरू होणार आहे याविषयी डॉक्टरांनी माहिती दिली. मुकुल यानं विनोदी शैलीत खास आभार मानले.

कुठलीही मीटिंग संपली की सहभागींना हुश्श होतं, पण डॉक्टर नाडकर्णींबरोबरची मिटिंग म्हणजे ती संपल्यावर सगळेच एखाद्या ताज्या टवटवीत फुलासारखे दिसायला लागतात.

वेधच्या या मिटिंगचं आजचं वेगळेपण म्हणजे शाल्मली नावाच्या एका ग्राफिक डिझायनर तरुणीनं १०० व्या वेधच्या तयारीसाठी केलेलं माहितीपत्रक डॉक्टर नाडकर्णी, दीपा देशमुख, स्वागत थोरात आणि स्वतः शाल्मली यांच्या हस्ते प्रकाशित झालं. अतिशय सुरेख! या पोरीचं मनापासून खूप खूप कौतुक! रंगांचा आणि सौंदर्यदृष्टीचा या पोरीचा सेन्स लाजबाब! दीपक पळशीकर यांनी या माहिती पत्रिकेविषयी सविस्तर पणे सांगितलं.

एक नवा उत्साह घेऊन अर्थातच पावलं घराच्या दिशेनं पडू लागली! सप्टेंबर महिन्यातल्या वेध चं आत्तापासूनच सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण! जरूर या. वेळ, ठिकाण, तारीख सर्व काही कळवत राहीनच.

दीपा देशमुख, पुणे.

adipaa@gmail.com

 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.