धो धो कोसळणार्या पावसाच्या साक्षीनं ब्रेल मॅन ऑफ इंडियाशी संवाद!
मुसळधार पाऊस सुरू असताना रस्त्यावरचे भिजलेले वृक्ष न्याहाळत मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पोहोचले. ब्रेल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणार्या स्वागतची मुलाखत विद्यावाणी कम्युनिटी रेडिओसाठी घ्यायची होती. एक चित्रकार, एक छायाचित्रकार, एक पत्रकार, एक नाटककार, एक दिग्दर्शक, संगीतातला एक दर्दी, एक इंटेरिअर डेकोरेटर, एक नेपथ्यकार, एक मेकअपमन, एक पक्षीवेडा या सगळ्या गोष्टी स्वागतमध्ये एकवटलेल्या आहेत. त्यातच त्यानं अंध व्यक्तींसाठी स्वतःचं आयुष्य वाहून घेतलेलं आहे. त्यांच्यासाठी, त्यांना घेऊन केलेलं 'अपूर्व मेघदूत' असो, वा 'तीन पैशांचा तमाशा' या नाटकांनी इतिहास घडवलाय. एवढ्यावर स्वागत थांबलेला नाही, तर सुरुवातीला अंधांसाठी 'स्पर्शगंध' हा दिवाळीअंक, नंतर 'स्पर्शज्ञान' हे मराठीतून पाक्षिक आणि त्यानंतर जगभरात जाणारं आणि मोफत असलेलं हिंदीमधलं रिलायन्स दृष्टी! आता तर मराठीतून अंध व्यक्तींसाठी तो मासिकही सुरू करतो आहे. चांगलं साहित्य वाचण्यासाठी आसुसलेल्या या मंडळींना या मासिकातून अनेक गोष्टी देण्याचा स्वागतचा मानस आहे. तसंच भारतीय संविधान असो, वा इतर अनेक साहित्यकृती त्यानं ब्रेलमधून आणल्या आहेत. अंध व्यक्तीनं इतरांवर अवलंबून राहू नये यासाठी तो त्यांचं मोबिलिटी प्रशिक्षणही घेतो. खरं तर स्वागतबद्दल आणखी खूप काही बोलता येईल. पण मुलाखत प्रसारित झाली की जरूर ऐका.
मुलाखत पाऊणतासाची घ्यायची होती, पण इतकी रंगली की दीड तासाच्या वर अवधी लागला. रेकॉर्डिंग आटोपून स्वागत आणि मी भिजतच शेजारच्या कँटिनमध्ये गेलो. छान गरमागरम बटाटेवडा विथ सांबार मागवला. समोर भला मोठा वडाचा वृक्ष अनेक पारंब्या जमिनीत रुजवून वेडावाकडा पसरलेला होता. पावसानं तोही नखशिखांत ओला झालेला. सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचा परिसर बघण्याची खरी मजा ही पावसाळ्यात येते. कुठल्याही रस्त्यानं जा, सगळीकडे कसं हिरवंगार. एका रस्त्यानं दुतर्फा सगळी वडाची झाडं ध्यानस्थ अवस्थेत दिसतील, तर दुसर्या रस्त्यानं बांबूचं बन दिसेल. मधूनच डोकावणार्या दगडी इमारती स्वागत करताना भेटतील, तर त्याच वेळी आजूबाजूला फाटे फुटलेली रस्त्यांची वळणं इकडे या म्हणत साद घालताना दिसतील.
त्या वातावरणातून मन निघायला तयार नव्हतं, पण पुढली कामं प्रतीक्षेत उभी असलेली दिसत होती. आजच्या छान हिरव्यागार पावसाळी वातावरणात भेटलो याचा आनंदही व्यक्त करत आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
घर येईपर्यंत पाऊस सोबतीला होताच!
दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmail.com
Add new comment