आज बाबाचा वाढदिवस.
दरवर्षी बाबा ऑगस्ट च्या 26 तारखेला सकाळी फोन करतो आणि म्हणतो, आज माझा वाढदिवस आहे मला विश कर. आणि मला ही त्याची सांगण्याची कल्पना खूपच आवडली. आज मात्र सकाळी फोन वाजला नाही आणि मी आळस झटकून बाबाला फोन लावला. शुभेच्छा दिल्या, त्याचा नेहमी येणारा उत्साही आवाज ऐकला. एकदम भारी वाटलं.
बाबाचे किती मित्र-मैत्रिणी, मुलं-मुली.. मोजायचे ठरवले तर अशक्यच होईल. माझे वडील 21 ऑगस्ट 1991 साली कॅन्सरनं गेले, त्या वेळेपासून छत नाहिसं होणं म्हणजे काय, आयुष्यातली पोकळी म्हणजे काय हे खर्या अर्थानं अनुभवलं होतं. पण बाबा भेटला आणि म्हणाला, ‘मला ए बाबा अशीच हाक मारायची.’ पहिल्याच भेटीत त्यानं माझं पालकत्व घेतलं होतं.
एकदा मी त्याला भेटायला गेले असताना कोणीतरी आलेलं होतं, तेव्हा म्हणाला, ही माझी मुलगी दीपा. त्या क्षणी गेलेलं छप्पर पुन्हा डोक्यावर आल्यासारखं वाटलं. एकदम लै भारी वाटलं.
बाबाबरोबरच्या सगळ्याच आठवणी जपून ठेवण्यासारख्या आहेत. त्याला भेटायला गेल्यावर तो माझा आवडता राग बैरागी भैरव विसरत नाही आणि लगेचच त्यातली बंदीश, सावरिया घर नाही आये, गावून दाखवणार, खूपच मूड असेल, तर ‘चल छैया छैया छैया’ हे गाणं गात राहाणार. कधी मला ‘तू गालातल्या गालात हसतेस, चल दात दाखवून मोकळं हस’ असं सांगणार आणि हसायला लावणार.
त्याच्याबरोबर प्रवास करताना तर नुसती मजाच मजा. एकदा आम्ही मुंबईहून पुण्याला एकत्र आलो, तेव्हा संपूर्ण प्रवास आम्ही गाणी जोरजोरात म्हटली. तो गाणी गायचा आणि मी वैभवच्या कविता. त्यातल्या काही कविता त्यानं माझ्याकडून शिकूनही घेतल्या. काही वेळा मी त्याच्याबरोबर मुक्तांगणला गेले, तेव्हा तर गाडीमध्ये ताजा हिरवागार हरभरा, बोरं, पेरू, मटार या सगळ्यांचा भरभरून साठा आणि मग गप्पा मारत बकरीच्या स्पीडनं तो खायचा.
घरी तर ताकातली भाकरी असो की चिवडा, तुम्ही तृप्त होवूनच तिथून परतणार. पण तरीही त्याच्यातलं अवखळ मूल कधी जागं होईल याचा नेम नसतो. स्वत:ला चहा सांगताना तो म्हणणार, मला चहा कर. हिच्यासाठी चहा वगैरे अजिबात करू नकोस. (मी चहा पित नाही हे त्याच्या लक्षात असतं तरीही.) एकदा बुकगंगामध्ये आमच्या दोघांशी गप्पा असा कार्यक्रम होता आणि त्या वेळी बुकगंगाच्या सुप्रिया लिमयेनं कार्यक्रम शेवटाकडे आलेला असताना मला एखादी कविता किंवा गाणं गायचा आग्रह केला. त्या वेळी बाबा लगेच म्हणाला, मी पण कविता म्हणून दाखवणार. मग मी म्हटलं, आधी तूच म्हण, नंतर मी म्हणून दाखवेन. त्यानंही त्या वेळी एकाऐवजी दोन-तीन कविता छान गावून दाखवल्या. त्याच्यातलं मूल जरी खट्याळ असलं तरी ते त्रासदायक नाही.
ओरिगामीचं नवीन काही केलं की पुन्हा एकदा सगळ्या घड्या उलगडून मला नव्यानं करून दाखवणार आणि मीही त्यातलं मला फार कळतं अशा अविर्भावात ते किती छान जमलंय असं सांगणार. अशा ओरिगामीच्या कितीतरी कलाकृती त्यानं मला ताबडतोब करून दिलेल्या आहेत. अपूर्वच्या फोटोग्राफीचं मनापासून कौतुक त्याला असतं.
ख्रिसमसचा सांताक्लाज जसा हवाहवासा वाटतो, तसाच हा बाबा लईच गोड आहे. सांता तरी वर्षातून एकदा भेटतो, पण आमचा बाबा मात्र सतत आमच्या बरोबर असतो.
वाढदिवसाच्या आणि येणार्या प्रत्येक दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा.
दीपा
Add new comment