एम्प्रेस गार्डन, कॅम्प परिसर, पुणे
आज अपूर्वला सुट्टी असल्यानं सकाळीच एम्प्रेस गार्डनचं प्रदर्शन बघण्याचा फतवा काढला. कॅम्प परिसरात पोहोचताच तिथल्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच, फुलोंके डेरे है, साये घने रे है, झूम रही है हवाये’ असं मन गायलाच लागलं. समोर फुलांचा ताटवा घेऊन तो तरूणपणातला पिवळ्या धम्मक रंगातल्या पँँट-शर्टमधला अमिताभ, हातात गिटार घेऊन गाणं गात उभा होता. मन प्रफुल्लित झालं.....पावलं फुलांच्या दिशेनं निघाली.....किती किती प्रकार.....रंगीबेरंगी, नाजूक फुलं.....मन एकदम काश्मीरमध्येच जाऊन पोहोचलं. गर्दी असली, तरी ती त्रासदायक नव्हती. सगळेजण माझ्यासारखेच आनंदात न्हाऊन निघालेले दिसत होते.
डोळ्यांनी जेव्हा तृप्ततेचा अनुभव घेतला, तेव्हा मग अपूर्व आणि मी निघालो. तेव्हा माझ्यातल्या बकरीला एक जोडपं हातात हरभरा घेऊन जाताना दिसलं. मी त्यांच्या मागे धावतच निघाले. अशा वेळी अपूर्वला माझी थोडीशी लाज वाटते. तो दूर जाऊन उभा राहिला. मी धावत धावत त्या जोडप्याला पकडलं आणि खांद्यावर थाप टाकत म्हटलं, हा हरभरा कुठे मिळाला? तो म्हणाला, गेट के बाहर! मी म्हटलं, मै एक हरभरेका दाना ले लूँ क्या? असं म्हणून माझा हातही पुढे झाला होता. तो छानसं हसला. बायकोला म्हणाला, दीदीको आधा दे देना. तिनं माझ्या हातात प्रेमानं अर्धी गड्डी ठेवली. मी आनंदात थँक्यू म्हणत खात खात निघाले. अपूर्व आश्चर्यानं बघत माझ्यामागे निघाला.
संपूर्ण रस्ता हरभरा खात कटला. अजूनही मी गातेच आहे आणि समोर अमिताभ अजूनही उभाच आहे ः
फुलोंके डेरे है, साये घने रे है......
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment