चाँदसी महेबुबा हो मेरी ....
चाँदसी महेबुबा हो मेरी .... काही नाती अशी असतात, की तिथं मनातलं फार काही बोलावं लागत नाही. भेट होवो न होवो ती तशीच मजबूत असतात, अतूट, अदश्य धाग्यांनी बांधलेली! असंच माझं नातं आशा साठे या लेखिका मैत्रिणीबरोबरचं! भेट होते, तेव्हा हव्याशा मुसळधार पावसाची बरसात होते आणि चिंब भिजवून टाकते. या वर्षांवात तसं बघितलं तर विशेष काही नसतं. कधी रवींद्रनाथ टागोर, तर कधी खलिल जिब्रान, कधी आजची सामाजिक परिस्थिती, तर कधी कवितेची हळुवार बोली.....या सगळ्या विषयांमधून काय मिळतं, तर नवी ऊर्जा, नवी उमेद आणि नवा उत्साह! काल सायंकाळी कितीतरी महिन्यांनी आशाताईंची भेट झाली. खूप गप्पा झाल्या.
निघताना एक अनोखी ऊर्जा घेऊन बाहेर पडले आणि काही साचलेली कामं पूर्ण केली. घरी परतण्यासाठी ओला टॅक्सी बुक केली. तिची वाट बघत असतानाच एक ओळखीची व्यक्ती रस्त्यावर दिसली. खरं तर ती व्यक्ती दिसण्याआधी तिचा मधुर आवाज कानावर पडला. आवाजाच्या दिशेनं बघत मी त्या व्यक्तीजवळ पोहोचले. एकदा आसावरी आणि मी मस्तानीचा स्वाद घेण्यासाठी निघालो असताना भर दुपारी ही व्यक्ती दिसली होती. तेव्हा दुचाकीवर असल्यानं थांबता आलं नव्हतं. आज मात्र संधीचा फायदा घेऊन मी जवळ पोहोचले. नमस्कार केला आणि नाव विचारलं. त्यानं सांगितलं, ‘कमाल’ तो खूप प्रसन्न आणि हसरा होता. आपल्याच धुंदीत रस्त्याच्या कडेला उभा राहून गात होता. मी त्याला विचारलं, मी काही देऊ शकते का, त्यानं मानेनं होकार दिला. मी पर्समधून शंभराची नोट काढून त्याच्यासमोर ठेवली.
मी त्याला मुकेशचं ‘किसीकी मुस्कराहटो पे हो निसार’ हे गाणं येतं का विचारलं. तो म्हणाला, चाँदसी महेबुबा गाऊ का, मी हो म्हणताच, त्यानं गायला सुरुवात केली. त्याचा आवाज ऐकून मी इतकी भारावून गेले की जसं मांडूला गेल्यावर मला तिथली सम्राज्ञी असल्याचा भास झाला होता, तसाच भास मला कमालचं गाणं ऐकताना झाला. ती चाँदसी महेबुबा मी स्वतःच होऊन गेले. (माझा भाऊ नंदू 'चाँद आहे भरेगा' आणि 'चाँदसी महेबुबा' ही गाणी नेहमीच गायचा ती आठवणही तीव्रतेनं या वेळी आली!) कमालचं गाणं पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटत होतं, पण......इतर वेळी यायला भरपूर वेळ लावणारी टॅक्सी समोर येऊन उभी राहिली होती. मी निमूट गाडीत बसले आणि कमालला निरोपाचा हात दाखवत निघाले. आशाताईंकडून मिळालेली ऊर्जा आणि कमालचं चाँदसी महेबुबा मग सोबत करत राहिले!
दीपा देशमुख, पुणे
5June 2019
Add new comment