मंदार जोगळेकर आणि बुक गंगा
काही लोकांची पहिली भेट कधी झाली, त्या भेटीत काय बोलणं झालं हे काही केल्या आठवत नाही. तसंच काही लोकांबद्दल आदर असला तरी त्यांच्याशी औपचारिक पद्धतीनं ‘अहो-जाहो’ असंही बोलता येत नाही. मुक्ता मनोहर मला भेटली, तेव्हा पहिल्याच भेटीत मी तिच्याशी 'अग मुक्ता' असंच बोलायला लागले. त्यातलाच ‘मंदार जोगळेकर’ हा एक तरुण! मंदारची आणि माझी भेट अच्युत गोडबोले यांच्यामुळे पुण्यात झाली हे नक्की. पण बाकी तपशील फारसा काही आठवत नाही. त्या भेटीत लक्षात राहिलं त्याचं मृदू, सौम्य,ऋजू असं प्रसन्न व्यक्तिमत्त्व!
नंतर भेटी होत राहिल्या. तो फिलाडेल्फियाला असल्यानं जेव्हा कधी भारतात येई, तेव्हा आमचं भेटायचं ठरत असे आणि आम्ही फर्ग्य्ग्युसन रोडवर कधी 'वाडेश्व'र तर कधी 'चाई' रेस्तरॉंमध्ये भेटत राहिलो. एके दिवशी त्यानं गरवारे चौकातलं एैतिहासिक इंटरनॅशनल हे पुस्तकांचं दुकान घेतलं असून त्याचं उदघाटन असल्याचं सांगितलं. आम्ही बुकगंगा इंटरनॅशनल मध्ये गेलो. संपूर्ण दुकानाचा कायापालट झाला होता. आधीचं अंधारलेलं वातावरण जाऊन आता स्वच्छ, हसरा सूर्यप्रकाश स्वागताला उभा होता. तसंच आतिथ्यशील स्टाफ, मंदारच्या सहकारी गौरी आणि श्रावणी आणि बहीण सुप्रिया याही तितक्याच गोड, अगत्यानं विचारपूस करत होत्या. नंतर आम्ही कार्यक्रम स्थळी गेलो. अचानक आलेल्या पावसानं सगळ्यांची एकच धावपळ उडवली होती. मात्र मंदार शांत होता. कार्यक्रम सुरू झाला. ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर पासून अनेक मान्यवर तिथं होते. आमच्याबरोबर बाळ्या ऊर्फ वसंत वसंत लिमये हेही होते. या कार्यक्रमात सगळे मंदारविषयी भरभरून बोलत होते. त्यातून मला एकच लक्षात आलं की हा तरुण खूप वेगळा आहे. खूप खडतर, कष्टदायक वाटेवरनं चालत हा प्रवास करतो आहे....!
आमच्या एकीकडे औपचारिक भेटी होतच होत्या. त्यातून ई-बुक, ऑडियो बुक अशा गोष्टींनी जन्म घेतला. कामही सुरू झालं. अधूनमधून मंदारशी व्हॉट्सअप वरून बोलणंही होत होतं. एकदा त्यानं आमच्या प्रत्यक्ष भेटीत अच्युत गोडबोलेंना ‘मला यांचं (माझं - दीपा देशमुख यांचं!) लिखाण खूप आवडतं असं सांगितलं तेव्हा तर मी मनातल्या मनात आनंदानं उड्याच मारल्या. या सगळ्यांमधून पुढच्या कामाविषयी मंदार भारतात आला की आपण भेटायचं असं ठरलं. पण त्याआधीच कल्याण (तावरे) या आमच्या मित्रानं पुढाकार घेतला आणि मंदार, किरण, अतुल, वंदना, उषा, स्वतः कल्याण, माधवी आणि मंदार असं पीवायसी (डेक्कन जिमखाना) इथं जेवायला भेटायचं ठरलं.
मी बुकगंगाचं ऑडिओ रेकॉर्डिंग, नंतर इतर कामं, साधनात विनोद शिरसाटसोबतची मिटिंग, नंतर आशा साठे असं करत थकल्याभागल्या अवस्थेत पीवायसीला पोहोचले. बरोबरच साडेसात वाजता मंदार तिथं आला. मंदार खरं तर कुठलाही व्यवसाय करताना शोभून दिसू शकतो अशी त्याची पर्सनॅलिटी आहे. म्हणजे पांढरा ऍप्रन घातला की डॉक्टर, काळा कोट घातला की वकील वगैरे....वर लबाड नाही, तर त्याच्याबद्दल विश्वास वाटावा असा!
आमच्या गप्पा जेवणाबरोबर सुरू झाल्या. त्याचबरोबर आम्ही मंदारला बोलतं केलं. मंदारनं सांगितलं, निघताना मला बजावण्यात आलंय की जास्त बोलू नकोस. अर्थात आम्ही त्याचं कुठे ऐकणार होतो? मंदारचा प्रवास आम्हाला ऐकायचा होताच. वडील सैन्यात....रत्नागिरीजवळचं साखरपा (कदाचित ऐकण्यात गावाचं नाव माझ्याकडून चुकू शकतं.) कारण मंदार अतिशय हळू आवाजात बोलत होता. कुठे कल्याणचा धरणी दुंभगेल असा आवाज आणि कुठे मंदारचा स्वतःशीच बोलावं इतका हळू आवाज! तर या छोट्याशा गावात मंदारचं कुटुंब राहायला लागलं. गावातल्या वातावरणात पुरेपूर खोडकरपणाला वाव होता...याच वयात कागदी/प्लॅस्टिकची झुंबरं कर, वगैरे वस्तू करून मंदार विकतही असे. याच वयात मंदार वाचनही भरपूर करत असे. मंदारच्या वडलांना मुलानं डॉक्टर व्हावं असं वाटे आणि त्यानंही डॉक्टरच व्हायचं ठरवलं होतं.
दहावीनंतर शिकायचं कुठे? त्या वेळी रत्नागिरी खूप महागडं म्हणून तिथे राहणं शक्य नव्हतं. मग पुण्यालाच यायचं असं ठरलं. याच दरम्यान गावात असा काही पाऊस आला की वडलांचं छोटंसं दुकान त्या पाण्यात जमीनदोस्त झालं. खूप नुकसान सोसावं लागलं. पुन्हा उभं राहणं खूप कठीण होतं. अशा अवस्थेत मंदार पुण्यात पोहोचला. पुण्यातल्या वातावरणात खूप बावचळला. पायात साध्या स्लिपर घालून गेलेल्या मंदारला फर्ग्य्ग्युसनचं एकदम आधुनिक वातावरण बघून तर आपण परतच जायला हवं असा त्यानं निर्णय घेतला. वडलांनी आजीकडे जाताना फक्त प्रवेश मिळेपर्यंत राहा, नंतर तुझी तू व्यवस्था कर असं सांगितलं होतं. वसतिगृह मिळवणंही तितकंच महत्वाचं होतं. अशा सगळ्या परिस्थितीत रस्ता चुकण्याचं निमित्त झालं आणि मंदार, आपटे ज्यू कॉलेजमध्ये जाऊन पेाहोचला. तिथल्या प्राचार्यानी हा गावाकडला मुलगा दिसतोय असं बघून त्याला आपल्या केबिनमध्ये रांगेतून काढून नेलं. त्याची चौकशी केली. मंदारनं सगळं काही सांगितलं. त्या वेळी मंदारला लगेचच प्रवेश मिळाला. त्यानंतर विद्यार्थी साहाय्यता समितीच्या वसतिगृहात मुलाखतीसाठी मंदार गेला. कुठे उतरला आहेस याचं उत्तर 'आजीकडे' असं देताच त्यांनी, 'अरे तुझी तर व्यवस्था झाली आहे आणि आम्ही गरीब, हुशार आणि ज्याची राहण्याची काहीही व्यवस्था नाही अशाच मुलांना इथं प्रवेश देतो' असं सांगितलं गेलं. मंदार मात्र चिकाटी न सोडता बोलत राहिला. त्यानं स्वतःबद्दल, गावातल्या परिस्थितीबद्दल सगळं काही सांगितलं आणि त्याउपरही 'मला फक्त सहा महिने राहू द्या, तुम्हाला त्यानंतरही तेच वाटलं तर मला जायला सांगा' असं सांगून त्यांचं मन वळवलं आणि अशा रीतीनं मंदारला वसतिगृहात राहायला मिळालं.
मंदारची आत्तापर्यंतची जी वाटचाल आहे, त्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका असेल तर ती या वसतिगृहाची आणि आजपर्यंत भेटलेल्या लोकांची असं त्याला वाटतं. वसतिगृहात आपण अनेक चांगल्या गोष्टी शिकलो, ज्यातून आपलं व्यक्तिमत्व घडत गेलं असं त्याला वाटतं. एकदा तर मुलं बसलेली असताना वसतिगृहाच्या कार्यालयातला फोन वाजत राहिला. पण एकाही मुलानं तो उचला नाही. अखेर तिकडून वसतिगृहाचे रेक्टर आले आणि त्यांनी तो फोन उचलला आणि मंदारला बोलावून घेतलं. ते त्याला म्हणाले, 'इतर मुलांचं जाऊ दे. तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. तू का फोन उचलला नाहीस?' मंदारनं त्यांच्याकडे बघितलं आणि तो म्हणाला, 'सर, मी आजपर्यंत फोनला कधी हातच लावलेला नाही. त्यामुळे तो कसा उचलायचा आणि काय पुढे करायचं मला याबद्दल जराही माहिती नाही.' त्याचं निरागस आवाजातलं बोलणं ऐकून रेक्टर गप्प झाले. गावातून आलेल्या एका मुलाची बाजू काय असू शकते याची जाणीव त्यांना झाली. त्यांना स्वतःलाच त्या गोष्टीची टोचणी लागली. त्यानंतर त्यांनी वसतिगृहातल्या सगळ्याच मुलांसाठी व्यक्तिमत्त्व विकासासाठीचे काही तास आयोजित केले. मुलं अनेक गोष्टी शिकली. त्यातच फोन उचलल्याबरोबर समोरच्याला गृहीत न धरता किंवा आपणही फोन कोणाला केलाच तर आधी आपलं नाव सांगूनच पुढलं बोलणं सुरू करायचं वगैरे वगैरे....याच दरम्यान मंदार इंग्रजी शिकत गेला. सकाळी पाच वाजता एका बाईंच्या कुत्र्याला फिरायला नेणं, पुन्हा संध्याकाळी फिरायला नेणं आणि रात्री त्यांना सोबत म्हणून झोपायला जाणं हेही तो करत असे. तसंच मधल्या वेळात कुठे कुठे कामही करून पैसे मिळवत असे. त्यात शिकवण्या घे, बागकाम कर, घड्याळाच्या दुकानात काम कर वगैरे. याचं कारण वसतिगृहात राहताना ‘कमवा आणि शिका’ यानुसार त्याला वसतिगृहाचे पैसे भरण्यासाठी काम करणं आवश्यकच होतं. या सगळ्या कामांनी तो सगळ्याच बाबतीत तरबेज झाला. माणसं भेटत गेली आणि वेगवेगळ्या प्रकारची माणसं कळतही गेली.
या प्रवासात मोदीबागेत असलेल्या एका कुटुंबातल्या मुलानं गृहपाठ केलाय की नाही हे बघण्याचं काम त्याच्यावर सोपवण्यात आलं. या मुलाकडे पहाटे ५ वाजता जावं लागे. त्या मुलाला शिकवायला आणखी तीन दिग्गज प्राध्यापकही वेगवेगळ्या वेळात येत असत आणि त्यांना प्रत्येकी ३ हजार असे ९ हजार रुपये दिले जात. मंदारला मात्र ६० रुपये मिळत. मंदार तिथे गेल्यावर सुरुवातीला नाखुश असलेला मुलगा नंतर मंदारच्या प्रेमातच पडला. दोघांचं खूप छान जमायला लागलं आणि मंदारच्या संगतीनं तो अभ्यासातही चमकायला लागला.
मंदारचं मेडिकलचं जायचं स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकलं नाही कारण त्याला बी. जे. मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला नाही आणि दुसरीकडे डोनेशन देण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. मग मंदारनं एकीकडे सगळ्यात अवघड भाषा शिकायचं ठरवलं आणि ती भाषा होती जपानी! तसंच त्यानं मायक्रोबॉयलॉजी करूया म्हणून कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. याच वेळात त्यानं ऍप्टेकचा कम्प्युटर्सचा कोर्स केला. कामं करणं आणि कमवणं सुरूच होतं. मायक्रोबॉयलॉजीचे प्रयोग करणं शक्य होत नव्हतं. मग त्यानं सरळ आर्ट्स शाखेत प्रवेश घेतला. आता प्रयोगांना उपस्थित राहण्याची आवश्यकता नव्हती. ऍप्टेकच्या कोर्सनं मंदारला कम्प्युटर्समधली खूप कौशल्यं आत्मसात करता आली. मात्र कोर्स संपल्यानंतर तो जिथं कुठे इंटरव्ह्यूसाठी जात असे, तिथून त्याच क्षणी परत फिरण्याचे संकेत मिळत. अखेर मुंबईतल्या एके ठिकाणी त्यानं धीर करून विचारलं, की 'माझा बायोडेटा बघताच मला मिळणारी संधीची दारं बंद का होतात?' तेव्हा त्याला उत्तर मिळालं, तिथे येणारी मुलं कम्प्युटर्समधून इंजिनियरिंग केलेली येत आणि मंदार मात्र बीए आणि कम्प्युटर्सचा कुठलातरी कोर्स केलेला असा होता! त्यामुळे तो त्या नोकरीसाठी त्यांना पात्रच वाटत नसे. मंदार पुण्यात परत फिरला. यापुढे इंटरव्ह्यूज द्यायचे नाहीत असं त्यानं मनाशी पक्वं ठरवलं.
पुढला प्रवास मात्र खूप वेगात झाला. त्यानं हिम्मतीनं एका मित्राला घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला. मोदीबागेत ज्या मुलाला तो शिकवायला जात असे, त्यांच्याही व्यवसायात त्यानं मदत केली. या सगळ्यांतून तो पुढे पुढे जात राहिला. स्वतःचे ऍप तयार करणं आणि त्यात यश संपादन करत पुढे जाणं हे चालू राहिलं. हळूहळू त्यानं गावाकडून आपल्या भावंडांना पुण्यात आणलं. आपल्या कष्टानं आणि नम्र, विनयशील स्वभावानं मंदार अमेरिकेतही जाऊन पोहोचला. त्याच्या वडलांनी त्याला सांगितलेलं एक वाक्य त्यानं आजही लक्षात ठेवलंय आणि ते अंगात मुरवलंय. वडील म्हणाले होते, 'तू जे काय करशील त्यात कधीही समोरच्याला आपल्याला यानं फसवलंय असं वाटता कामा नये.' वडलांच्या बोलण्यातला सार लक्षात घेऊन मंदारनं आपल्याला जे करायचंय ते उपयुक्त आणि लोकांच्या हितासाठी हे कायम लक्षात ठेवलं.
यावरून एक किस्सा आठवला. मंदार आज जिथे बुकगंगा आहे तिथेच शेजारी एक घड्याळाच दुकान होतं. तिथेही मंदार महाशय काम करत. लोक येत तेव्हा परत जाताना मालकाने मंदारला माणूस बघून ३० रुपये, ५० रुपये किंवा १०० रुपये आकारायला सांगितले. त्यामागचा अर्थ मंदारला कळला नाही. कोणाला किती पैसे मागायचे हे कसं ठरवायचं असा प्रश्न करताच मालक म्हणाला, 'तू हुशार आहेस जमेल तुला.' मंदारच्या स्वभावामुळे आणि वागणुकीमुळे मालकाचा त्याच्यावर अपार विश्वास बसला. एकदा मालकाने त्याला पैशाचं एक पाकीट दिलं आणि अमूक एक माणूस आला की त्याच्याकडून दुसरं पाकीट घेवून हे देवून टाकायचं असं सांगितलं. त्यानं सांगितलं तसचं मंदारने केलं. पण त्या वेळी त्याच्या लक्षात आलं की त्या माणसाने दिलेल्या पाकिटात घड्याळाचे सेल असायचे. ज्याची किंमत केवळ २ किंवा ३ रुपये प्रत्येकी तो मालक देत असे मात्र ग्राहकाकडून मंदारकरवी ३०, ५० किंवा १०० रुपये घेत असे. इतका प्रचंड फायदा? मंदार थक्क झाला. त्याला त्याही वेळी वडलांचे शब्द आठवले. त्यामुळे स्वताच्या आयुष्यात समोरच्याचं, हित आणि आनंद बघून काम करायचं हे आणखीनच पक्कं झालं.
यातूनच बुकगंगाचं गरवारे चौक, डेक्कनवरचं मोक्याचं इंटरनॅशनल दुकान घेता आलं. गावातल्या मुलामुलींना घेऊन त्यानं त्यांना प्रशिक्षित करून कॉल सेंटर्स सुरू केली. ग्लोबल मराठी न्यूज लेटर, ई-बुक्स सुरू झाली. ऑनलाईन पुस्तकं सुरू झाली. त्याचबरोबर या वेळी ऑडियो दिवाळी अंक सुरू झाला. जपानीशिवाय मंदारला अरेबिकसह आणखी 7 भाषा अवगत आहेत. कल्पक मंदारच्या डोक्यात सतत नवनवीन प्रकल्प घोळत असतात आणि ते वास्तवात आणण्यासाठी तो आणि त्याची टीम धडपडत असते.
नुकतीच मंदारची पंतप्रधान मोदींशी भेट झाली. चांगली चर्चा झाली. मंदारनं शेतकर्यांसाठी एक ऍप तयार केलं असून शेतकरी ते थेट ग्राहक अशी भेट होऊन मधले अनेक मध्यस्थ दूर हटवले जाणार आहेत. शेतकर्यांच्या अनेक गोष्टींमध्ये तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं सक्षम करण्याचा मंदारचा मानस आहे.
मंदार शुद्ध शाकाहारी, अपेयपान न करणारा असा तरूण आहे. त्याच्या प्रवासात अनेक कटू अनुभव आले असले तरी तो त्यांचा उच्चारही करत नाही. त्याला कुणाचा राग नाही किंवा द्वेषभावना नाही. मध्यंतरी तो पॉंडेचरीला गेला असताना तिथं त्यानं 'स्पिरिच्युऍलिटी आणि टेक्नॉलॉजी' अशा विषयावरचं पुस्तक वाचलं. पुढे काय असा प्रश्न त्याच्या मनात नेहमी येत असे, त्याचं उत्तर त्याला तिथे मिळालं. त्याची अस्वस्थता मिटली. इतरांचा विचार करत चालणारा हा तरूण असून त्याला जो भेटतो, तो त्याचा कायमचा मित्र होतो हे मात्र नक्की!
दीपा
१3 डिसेंबर २०१६
Add new comment