राही तू रूक मत जाना....
१२ भारतीय जीनियसच्या ३ संचाचं प्रकाशन १२ नोव्हेंबर २०१६ या दिवशी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, टिळक रोड, पुणे इथल्या सभागृहात पार पडलं. खरं तर माझ्या प्रत्येक पुस्तकात प्रत्येक वेळी इतके अडथळे येत गेले आहेत की......खरं तर सांगायलाच नको....
सुरुवातीची ५ पुस्तकं ‘सुपर हिरो’ मालिकेतली मनोविकास प्रकाशनानं काढली. त्यात अरविंद गुप्ता, डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. प्रकाश आमटे, अच्युत गोडबोले आणि डॉ. अनिल अवचट यांच्यावर ही पुस्तकं किशोरवयीन मुलांसाठी लिहायची ठरली. चार पुस्तकं लिहून झाली आणि आता डॉ. अनिल अवचट यांचं पुस्तकाचं लिखाण सुरू झालं आणि पुण्यातल्या एका पत्रकार कम लेखक महोदयांनी आवई उठवली, 'अनिल अवचट यांच्यावरचं पुस्तक प्रकाशकांनी मला लिहायला सांगितलं होतं, पण दीपा देशमुख यांनी त्यांच्या वैयक्तिक संबंधांचा वापर करून ते माझ्यापासून बळकावून घेतलं.’ माझ्या कानावर ही गोष्ट येताच मला खूपच आश्चर्य वाटलं, कारण माझा हा स्वभावच नाही. त्या पत्रकार कम लेखक महोदय यांना मी प्रत्यक्ष ओळखतही नसताना त्यांनी असं का बोलावं हे त्यांच्याशी बोलून स्पष्ट करावं म्हटलं तर ज्या माझ्या मित्रानं मला हे सांगितलं, तो मध्ये असल्यानं मला गप्प बसावं लागलं. पण मी प्रकाशकांजवळ तशी चौकशी करताच, आपण असं काही कोणाला लिहायला सांगितलंच नाही आणि तरीही त्याच्याशी फोन करून ते बोलले आणि तो एकही ओळ न लिहिता चक्क थापा मारतोय आणि हे पुस्तक तुम्हीच लिहिणार आहात असं सरळ सांगितलं. त्यानंतर मी शांत मनानं अनिल अवचट यांच्यावरचं पाचवं पुस्तकही पूर्ण केलं आणि ही पाचही पुस्तकं प्रकाशित झाली. मात्र पुस्तकातले पाचही सुपरहिरो - ही पाचही मंडळी एकाच वेळी त्यांच्या व्यस्ततेमुळे व्यासपीठावर येणं शक्यच नव्हतं. त्यामुळे या आणि अशाच काही कारणास्तव सुपरहिरोचा प्रकाशन समारंभ होऊ शकला नाही. लोकांनी या पुस्तकाना चांगला प्रतिसाद दिला.
त्यानंतर 'कॅनव्हास' हे चित्र-शिल्प कलेवरचं पुस्तक तयार झालं. या पुस्तकाचं प्रकाशन करावं की नाही असाच सूर काही कारणानं होता. पण प्रकाशकांना मात्र हे पुस्तक त्यांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं वाटत होतं. त्यांना प्रकाशन समारंभ करायचाच होता. त्यांनी मनावर घेतलं आणि या कार्यक्रमाला चित्रकार आणि अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर, चित्रकार आणि लेखक प्रभाकर कोलते आणि चित्रकार, लेखक, पत्रकार अनिल अवचट प्रकाशन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार होते. प्रकाशन समारंभ होण्याआधी दोन दिवस अमोल पालेकर यांचं अचानक मुंबईला शूटिंग ठरलं आणि त्यांनी हाच कार्यक्रम तुम्ही मुंबईला केलात तर मी येऊ शकेन असं सांगितलं. पण इथल्या लोकांना निमंत्रणं गेली होती, त्यांचं काय करायचं? त्यामुळे अमोल पालेकर नसले तरी दोन पाहुणे आहेत तेव्हा आपण पुण्यातच हा कार्यक्रम करू असं आम्ही ठरवलं.
कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी झोपच लागली नाही आणि पहाटे साडेचार वाजता अनिल अवचट यांचा फोन आला. मी त्यांना बाबा म्हणते. बाबा म्हणत होता, 'दीपा, आत्ता काही वेळापूर्वी माझ्या बहिणीचे यजमान वारले आहेत आणि सकाळी १० नंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करायचे आहेत. तू आता कसं करशील?’ मी म्हणाले, 'बाबा काळजी करू नकोस. कार्यक्रम नीट होईल.’ आता एकऐवजी दोन पाहुणे नसणार होते.
तिसरे पाहुणे प्रभाकर कोलते हे आदल्याच दिवशी अमेरिकेहून मुंबईत पोहोचले होते. जेट लॅग वगैरे कुठलीही कारणं न सांगता ते कार्यक्रमाच्या दिवशी पुण्यात आले होते. कार्यक्रम होईपर्यंत आणखी काही अडथळा येतो का अशी धाकधूक मनात होत होती. पण कार्यक्रम खूप छान झाला. प्रभाकर कोलतेसारख्या कलाकारानं 'कॅनव्हास'चं कौतुक करावं यासारखी आनंदाची गोष्ट त्या दिवशी दुसरी कुठलीही नव्हती. हा मोठा जाडजूड ग्रंथ लिहिण्याचं खरंच खूप सार्थक वाटलं.
त्यानंतर 'जीनियस' मालिकेतले एकूण ७२ पैकी पहिले १२ जगप्रसिद्ध वैज्ञानिक लिहून प्रकाशनासाठी तयार झाले. हॉल मिळवण्यासाठी प्रकाशकांना खूप प्रयत्न करावे लागले. प्रकाशन करावं की न करावं हा पेच समोर पडला. पण अखेर हॉल मिळाला आणि वर्षभरापूर्वी दत्तप्रसाद दाभोळकर आणि अनिल अवचट यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. 'जीनियस'च्या निमित्तानं अरविंद पाटकर आणि मी महाराष्ट्रभर फिरलो आणि अनेक लोकांशी, शिक्षकांशी, विद्यार्थ्यांशी आम्ही संवाद साधला. अर्थातच त्याचं फळ आम्हाला मिळालं.
काही उथळ बाजारू वृत्तीच्या व्यक्ती प्रत्यक्ष माझा त्यांच्याशी कुठलाही संपर्क, संवाद नसताना दीपा देशमुखला कसा attitude आहे हे माझ्याच मित्रांशी संवाद साधून पटवण्याचा प्रयत्न करतात, अशांकडे दुर्लक्ष करणंच योग्य!!!!
आता येणार होते, १२ भारतीय जीनियस! दिवाळीचे दिवस असल्यानं पुन्हा हॉल मिळण्याची मारामार...त्यातच अनेक तारखा अच्युत गोडबोले यांनी बाहेरच्या कार्यक्रमांना दिल्यामुळे त्यांच्या तारखा आणि हॉल यात जुगलबंदी सुरू झाली. शेवटी दोन्हीचा समन्वय साधून १२ नोव्हेंबर तारीख ठरली. सगळं काही सुरळीत सुरू असताना ११ तारखेला दुपारी ४ वाजता प्रकाशक अरविंद पाटकर यांचा फोन आला आणि माझ्या मनात पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली. त्यांचा स्वर काळजीचा होता. कारण - मोदीबाबाची कृपा ! अचानक एका रात्रीतून ५०० आणि १००० च्या नोटा बाद झालेल्या....एटीएमसमोर दिवसरात्र लागलेल्या लोकांच्या रांगा, सुट्टे पैसे मिळण्याची वाणवा, पाचशेची नोट घ्यायला कोणी वालीच मिळेना.....एटीएमची रांग सोडून कोण कार्यक्रमाला येणार आणि खिशात पैसे नसल्यावर ते लोक पुस्तक कुठून विकत घेणार, तसंच कार्यक्रमाची तयारी पैशाविना कशी करणार असे अनेक प्रश्न ते मला एकामागून एक विचारत होते. त्यामुळे आपण हा कार्यक्रमच रद्द करूया का असंही ते मला म्हणत होते. मला या अडथळ्यांची सवयच झाल्यामुळे मी शांत होते. मी त्यांना म्हटलं, 'खूप कमी लोक येतील असं आपण मनाला सांगूया. त्यामुळे मग आपल्याला ती कमी उपस्थिती पाहून वाईट वाटणार नाही. तसंच तुम्ही तुमच्या व्यावसायिक मित्राकडून तीन तासांसाठी डेबिट कार्ड स्वाईप करण्याचं यंत्र उसनं मागून घ्या. म्हणजे लोकांजवळ पैसे खिशात नसले तरी कार्डमधून लोक खर्च करू शकतील. तयारीसाठी काही पैसे उभे करायचे असल्यास माझ्या मित्राकडून कल्याण तावरेकडून ते उपलब्ध करून देऊ शकेन. लोक दहा असो की वीस आपण कार्यक्रम करूया. नेहमी तुडुंब गर्दीच असली पाहिजे असं काही नाही. कमी गर्दीचं कारण लोकही समजून घेतील. आणि प्रकाशनाच्या दिवशी पुस्तकं नाही गेली तरी ती आपल्या गतीनं लोकांपर्यंत नक्कीच जातील. आणि याउपरही तुम्हाला वाटतच असेल की नको करायला कार्यक्रम तर आपण तिघं मिळून रद्द करूया.' पण तोपर्यंत अरविंद पाटकर यांना माझं आधीचं बोलणं पटलं असावं. ते म्हणाले, 'आता जसा होईल तसा होईल आपण हा कार्यक्रम करूया.'
दुसर्या दिवशी कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही १०.४५ ला पोहोचलो. तुरळक १० ते १५ लोक सभागृहात बसले होते. हळूहळू लोक यायला सुरुवात झाली. आशीश पाटकर यानं डेबिट कार्ड स्वाईप करायचं यंत्र मिळवलं होतं. तयारी तर झाली होती आणि त्यातच प्रमुख पाहुणे रंगनाथ पठारे यांचंही संगमनेरहून आगमन झालं. आश्चर्य म्हणजे बघता बघता हॉल भरला. अरविंद पाटकर यांच्या चेहर्यावर समाधान झळकलेलं मला पाहायला मिळालं. त्यांनी ते कार्यक्रमातही जाहीररीत्या सांगितलं. कार्यक्रम संपल्यावर पुस्तक स्टॉलवर रीना पाटकर आणि मनोविकासची टीम उपस्थित होती. त्यांनी लोकांजवळच्या पाचशे आणि हजारच्या नोटाही स्वीकारल्या आणि यंत्रही होतंच. त्यामुळे पुस्तकांची विक्रीही मनाजोगती झाली. त्यांच्याही चेहर्यावर समाधानाचे भाव मला पाहायला मिळाले.
आयटीमधले अनेक तरूण कार्यक्रमाला आले होते, त्यांनी दोन-दोन हजार रुपयांची पुस्तकं खरेदी केली होती. त्या खरेदीत 'जीनियस'बरोबरच ‘मनात’ आणि ‘कॅनव्हास’ जास्त करून लोकांच्या हातात दिसत होते. ‘मनात’ या पुस्तकात मी तन-मन-धन अर्पून काम केल्यामुळे या पुस्तकाबद्दलच्या विशेष भावना माझ्या मनात आहेत. त्यामुळे खूप आनंद झाला. त्या तरुणांशी बोलताना ते या क्षेत्रात इतके व्यस्त असूनही आपलं वाचनवेड जपताहेत याचंही समाधान वाटलं.
सध्या प्रतिकूल वातावरण असतानाही रसिक श्रोत्यांनी कार्यक्रमाला येऊन जो प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे आम्ही खरोखरंच आभारी आहोत!
दीपा १२ नोव्हेंबर २०१६.
Add new comment