नेत्रासह सुहानी संगीत सफर!

नेत्रासह सुहानी संगीत सफर!

तारीख

वेध आणि दिवाळी अंक यांच्यामुळे आलेला मानसिक थकवा असतानाच नेत्राचा आग्रहवजा आदेशाचा फोन आला! नेत्रानं रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टच्या वतीनं ग्रामीण शाळांच्या सुविधांसाठी निधी संकलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम लक्ष्मीकांत प्यारेलाल ऑर्केस्ट्रा गणेश कला क्रीडा इथे सायंकाळी सात वाजता असणार होता. संगीताची आवड असली तरी फक्त आणि फक्त नेत्रासाठी अपूर्वला बरोबर घेऊन पुण्यातल्या वाईट्ट ट्रॅफिकमधून गणेश कला क्रीडा गाठलं. सातला फक्त चार मिनिटं बाकी होती. आमच्या प्रवेशिका नेत्राकृपेनं एकदम समोरच्या आसनांच्या असल्यानं आम्ही खुशीत स्थानापन्न झालो. नेत्राची जुळी बहीण म्हणावी अशी आमची ड्रीमगर्ल प्रतिभा सोबत होती. साऊथ कॉटन साडीतली प्रतिभा झळकत होती. त्याच वेळी आम्हा सगळ्यांचं नेत्रा-दीपक यांना कडकडून भेटणं-बोलणं झालं.
औरंगाबादचे नाट्यकलावंत सीमा-सुधीर मोघे यांची नेत्रा (सुधीरची) लाडकी बहीण! नेत्रा एखाद्या जपानी बाहुलीसारखी दिसते आणि ‘इसकी त्वचा से इसकी उम्र का पताही नही लगता’ असं ती संतुरवाली हिच्याकडे बघून म्हणत असावी.... दहा हत्तीचं बळ घेऊन कुठल्याही कामाचा फडशा पाडणारी नेत्रा....सदैव हसरी आणि अगत्यशील! आताही तिनं आमच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था करून बरोबर आणलंच होतं. आमच्या सगळं स्वाधीन करून विचारपूस करून ती पुन्हा कामात मग्न झाली. 

गणेश क्रीडा सभागृह खच्चून भरलं होतं.....मुंगीलाही आता आत शिरायला जागा नव्हती....छान सुरेखशा साड्या/ड्रेसेस आणि हलक्याशा मेकअपमधल्या सगळ्याच वयोगटातल्या गोड बायामाणसं बघताना मला नेहमीच आनंद होतो. मात्र मला निरीक्षण करायला फार वेळ मिळाला नाही, कार्यक्रम लगेच सुरूच झाला.

मला नेहमी कुठलाही कार्यक्रम समोरून बघायला आवडतं. याचं कारण मागे बसलं की लोकांचे वेगवेगळे आवाजच चित्त विचलित करतात. तसंच मला व्यासपीठावर जे काय चाललंय ते सगळं टिपायचं असतं, त्यामुळे मग समोर बसायला मिळालं तरच मी कार्यक्रमाचा चांगला आस्वाद घेऊ शकते. लहानपणी वडील सरकारी अधिकारी असल्यानं त्यांच्याबरोबर अगदी व्हीआयपी म्हणून पहिल्याच रांगेत बसून अनेक नाटकं बघता आली. ती फुलराणी (सतीश दुभाषी आणि भक्ती बर्वे), नाथ हा माझा (यशवंत दत्त आणि नयनतारा), संध्याछाया (चित्तरंजन कोल्हटकर, विजया मेहता), डार्लिंग डार्लिंग (अशोक सराफ आणि नयना आपटे) अशी काही नाटकं बघितलेली आठवतात .....त्या वेळी फारसं काही कळत नसलं तरी समोर घडतंय ते खरंखुरं आणि जिवंतपणा असलेलं वाटायचं. ....

आठवणींमधून बाहेर आले .....व्यासपीठ अनेक रंग उधळल्यासारखा रंगीन दिसत होता....बापरे! मोजता येणार नाहीत इतके वादक व्यासपीठावर विराजमान झाले होते. सगळेच कसे हसरे, प्रसन्न वा! हातवारे करणारे (ज्यांना संगीताच्या भाषेत कंडक्टर म्हणतात) दोघं होते. त्यातल्या एकाचं नाव अरविंद हसबनीस आणि दुसरी व्यक्ती खुद्द प्यारेलाल! प्यारेलालजी हा ७७ वर्षं वय असलेला गोड दिसणारा वृद्ध ताठपणे उभा होता. त्यांच्यासमोर एक खुर्ची ठेवलेली होती. त्यावर ते बसत का नव्हते कोणास ठाऊक! तब्बल चार तास चाललेल्या या कार्यक्रमात हा म्हातारा चक्क उभा होता.....आणि मग उलगडा झाला.... आणि ती समोर ठेवलेली रिकामी खुर्ची त्याच्या जिवलग मित्रासाठी ठेवलेली होती. त्याच्या दृष्टीनं तो मित्र म्हणजे ती खुर्ची होती. तो मित्र म्हणजे लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीतला लक्ष्मीकांत! लक्ष्मीकांत आपल्या मित्राला, संगीताला सोडून कायमचा गेला असला तरी प्यारेलालच्या मनातून तो कधीच जाऊ शकला नाही आणि म्हणून आजही हा ७७ वर्षांचा हा वृद्ध स्वतःचं नाव सांगताना लक्ष्मीकांत प्यारेलाल असंच सांगत होता....आणि निवेदकही त्याच नावानं त्यांना संबोधून बोलत होता! अशा मित्र-प्रेमाला काय म्हणावं? आयोजकांनी लक्ष्मीकांत प्यारेलालजींना पुणेरी पगडी घालून सन्मानित केलं. 

लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीतानं सजलेली जवळपास सगळीच गाणी गाजली. सर्वसामान्यांच्या हृदयात जागा मिळवेल, त्यांना भावेल, त्यांना रुचेल असंच संगीत त्यांनी दिलं. बिनाका गीतमाला असो की फिल्म फेअर ऍवार्ड्स...लोकप्रियतेच्या बाबतीत लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीचं स्थान धृवतार्‍यासारखं अढळ होतं. अजातशत्रू असलेली ही जोडी.....लक्ष्मीकांत शरीरानं नसला तरी तो आहेच असं मानणारा हा मित्र प्यारेलाल आणि त्यांच्याबरोबर ३० ते ४० वर्षांपासून काम करणारे त्यांचे संगीतातले सहकारी हे दृश्य पाहून अचंबित व्हायला झालं. 

सर्व गायक मंडळी तरुण होती. कुशल होती. प्रत्येकाचा आवाज वेगळेपण जपणारा आणि त्यावर त्यांची पकड असणारा होता. त्यातही संपदा गोस्वामी हे नाव विशेष लक्षात राहिलं. गोड गळा असलेली बिनधास्त मुलगी! ती औरंगाबादचीच असावी असं मला शेवटपर्यंत वाटत राहिलं. 

या कार्यक्रमानं मला भूतकाळात नेलं.......तो जमाना रेकॉर्ड प्लेअरचा होता.....माठांचे स्पीकर भावानं (नंदू) ने घरीच तयार केले होते. त्यामुळे त्यातून येणारा आवाज फारच भन्नाट यायचा......मैत्रीवरची गाणी ऐकताना तेव्हा मन कातर व्हायचं.....चाहुँगा मै तुझे सॉंज सवेरे असो की मेरा तो जो भी कदम है हे गाणं असो......कितीदाही ही गाणी ऐकली तरी समाधान व्हायचं नाही. खरंच संगीताशिवाय आपलं जगणं किती अधुरं आहे! 

प्रेमात पहिलं पाऊल पडल्यावरचं गाणं - नजर ना लग जाये किसीकी ....मेरे दिल मे आज क्या है असो की इम्तेहानमधलं रोज शाम आती मगर ऐसी न थी असो..किंवा एक दुजे के लिये मधलं वासू-सपनाचं प्रेम अजरामर करणारं गाणं तेरे मेरे बिचमे असो...रुसवाफुगवा झाला की लटक्या रागातलं वो है जरा खफा खफा असो. आणाभाका, शपथा घेणारं - मैना भुलुँगा मै ना भुलुंगी आणि एक प्यार का नगमा है ही गाणी साथीला होतीच. प्रेमभंग झाला तरी मुकेश सांत्वन करायला होता. एवढं सगळं घडल्यावर ‘रुक जाना नही तू कहीं हारके’ असं सांगत पुन्हा सावरण्यासाठी आणि पुढला प्रवास सुखकर करण्यासाठी लक्ष्मीकांत-प्यारेलाल बरोबर होतेच! 

नेत्रा आणि प्रतिभा यांच्या सहवासात कार्यक्रम कधी संपला कळलच नाही .....एकाच वेळी भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्य घेऊन मी 'अच्छा तो हम चलते है' म्हणत संगीताच्या सुरावटींवर विहरत आशा पारेख बनून घरी पोहोचले!

दीपा देशमुख

१७ सप्टेंबर २०१७.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.