‘मी’ ते ‘आम्ही’ पर्यंतचा ‘स्त्री’चा प्रवास

‘मी’ ते ‘आम्ही’ पर्यंतचा ‘स्त्री’चा प्रवास

तारीख

‘मी’ ते ‘आम्ही’ पर्यंतचा ‘स्त्री’चा प्रवास
2026 चा महिला दिन साजरा करण्यासाठी मी पोहोचले बालेवाडी इथल्या सफा बँक्वेट हॉलमध्ये. हॉलमध्ये पोहोचताच हॉलच्या सुंदरतेकडे लक्ष गेलं. विशेषत: छतावरही दिसणारे मोर आपल्यावरचं लक्ष हटवू देत नव्‍हते. आज इथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्योजक महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार होते. मी ज्या वेळी परीक्षक म्हणून काम केलं, तेव्‍हा यात सहभागी झालेल्या सर्वच स्त्रिया किती सक्षम, किती आत्मविश्वासाने परिपूर्ण झाल्या आहेत हे लक्षात आलं होतं. त्यातून काही निवडक क्रमांक काढणं अत्यंत कठीण काम होतं.
हॉलमध्ये दाखल झालेल्या स्त्रियांबरोबर त्यांचे जोडीदार, काहींची मुलं देखील आलेली होती. आजचा दिवस माझा म्हणत सर्व स्त्रिया छान तयार होऊन आल्या होत्या. कोणी वेस्टर्न आउटफिटमध्ये तर कोणी भारतीय पेहरावात. प्रत्येकीकडे बघताना मलाच खूप उत्साहित वाटत होतं. सगळ्यांना पारितोषिकं दिली गेली, त्यांना सन्मानित करण्यात आलं. माझं स्त्री सक्षमीकरणावर छोटंसं भाषणही झालं.
या निमित्ताने मला आठवला ‘स्त्री’ चा प्रवास. ‘स्त्री फाउंडेशन’ ची संस्थापक प्राची सिद्दिकी हिचा 2016 ते 2026 या काळातला तिचा प्रवास मी खूप जवळून बघितला होता. प्राचीचा प्रेम विवाह. ती हिंदू तर नवरा फिरोज सिद्दीकी हा मुस्लीम. दोघांना रेहान आणि इशान ही दोन मुलं. घरात तिच्या सासूबाई असतात. ती त्यांना ‘अम्मी’ म्हणते. इथे दोन वेगळ्या धर्मांचा उल्लेख यासाठी करते आहे, की कुठल्याही गोष्टींचं अवडंबर न करता, भेदाभेद, द्वेष न बाळगता दोन्ही धर्माच्या व्‍यक्‍तींचं नातं निर्माण झाल्यावर दोन्ही कुटुंबं किती एकोप्याने राहू शकतात त्याचं हे उत्तम उदाहरण.
प्राचीच्या घरात इद साजरी होताना मी बघितली आहे आणि शिरखुर्मा आणि बिर्याणीचा आस्वादही घेतला आहे. त्याच बरोबर गुढीपाडव्‍याच्या दिवशी घराबाहेर लावलेली गुढी आणि सुरेख रांगोळी ही देखील बघितली आहे आणि त्या वेळी पुरणपोळीवर तावही मारला आहे. कधी हिंदी तर कधी मराठी अशी संमिश्र भाषांचे आवाजही घरातून येताना ऐकले आहेत. फिरोज सिद्दीकी हे आयटी क्षेत्रात कार्यरत असून अतिशय शांत असं त्यांचं व्‍यक्तिमत्व. त्यांना गाण्यांची प्रचंड आवड असल्यामुळे रात्रीच्या शांत वेळी जुनी हिंदी चित्रपटांतली गाणी त्यांच्या आवाजात माझ्या कानावर पडत. मग न राहवून माझी पावलं वेळेचा विचार न करता त्यांच्या घरापर्यंत पोहोचत. मग आम्ही दोघं मिळून अनेक गाणी गात असू. फिरोज सिद्दीकी यांनी प्राचीला शांतपणे, कुठेही मध्ये अहंकार, ‘मी’पणा न आणता प्रत्येक पावलावर प्रोत्साहन दिलं. त्यामुळेच ती लग्नानंतर ‘नजाकत’ सारखं लखनवीचं बुटिक सुरू करू शकली. एके काळची पुरूषोत्तम करंडक जिंकलेली प्राची - संसार, मुलांचं संगोपन, सासूसासऱ्यांची देखभाल, पाहुण्यांची सरबराई करत असताना आतून कुठेतरी अस्वस्थ होती आणि ती माझ्याजवळ येऊन ती अस्वस्थता व्‍यक्‍त करायची. आणि एके दिवशी तिलाच तिचा मार्ग् सापडला.
बेट्टी फ्राईडन म्हणते तसं प्रत्येक स्त्रिला काहीच वर्षांत आपल्यातल्या असमाधानाचं कारण शोधावं वाटतं आणि त्यातूनच तिचा स्वत:चा मार्गही निश्चित व्‍हायला सुरू होते. प्राचीने चाळीशीनंतरच्या स्त्रियांना आत्मशोध घेण्यासाठी साहाय्यभूत व्‍हायचं ठरवलं. यातूनच स्त्री फाउंडेशनची निर्मिती झाली. कला, संगीत, साहित्य, नृत्य, उद्योग अशा अनेक क्षेत्रांत भरारी घेणाऱ्या स्त्रिया ‘स्त्री फाउंडेशन’ च्या छताखाली एकत्र आल्या. यासाठी प्राचीने खूप परिश्रम घेतले. आपल्या कामाला तांत्रिक गोष्टींची मदत घेऊन अप टू डेट ठेवलं. यासाठी डिजिटल क्रिएटर म्हणून रेहानने तिला खूप मदत केली. यातूनच स्त्री फाउंडेशनचं ई-मॅग्झीन साकारलं.
अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत स्त्री फाउंडेशनने शेकडो स्त्रियांना सजग तर केलंय, पण त्याचबरोबर सक्षमही. कोणी पेंटिंग करत आपल्या व्‍यवसायाची सुरूवात केलीय, तर कोणी योगशिक्षक म्हणून क्लासेस घ्यायला सुरूवात केलीय. कोणी विज्ञान-गणित या क्लिष्ट विषयांची शिकवणी घ्यायला सुरूवात केलीय, तर रेहमतसारख्या एका तरुणीने बिर्याणी बनवून ‘टेक अवे’ सर्‍व्हिस द्यायला सुरुवात केलीय. कोणी शिक्षणावर काम करतंय, तर कोणी आयटीसारख्या व्‍यस्त कार्यक्षेत्रात असूनही वेळ काढून आपल्या छंदाला व्‍यवसायाचं रूप देताहेत. खरं तर हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही, पण या प्रवासात या सगळ्या एकमेकींचा हात घट्ट पकडून एकमेकींना आधार देताहेत. वेळ काढून पर्यटनही करताहेत. या सगळ्यांचे आनंदी, समाधानी चेहरे बघणं माझ्यासाठी खूप आनंददायी अनुभव होता.
या वेळच्या महिला दिनाचं खास आकर्षण म्हणजे या कार्यक्रमात प्रार्थना बेहेरे या अभिनेत्रीचं आगमन. अत्यंत साधा ड्रेस परिधान केलेली प्रार्थना इतकी सुंदर दिसत होती, की तिचं बोलणं, तिचं प्रत्येक स्टॉलला भेट देणं बघून छान वाटलं. एका मुलाखतीत, तिने थॉयरॉईडवर कशी मात केली आणि वाढत्या वजनाला कसं नियंत्रणात ठेवलं हे मी ऐकलं होतं. तिच्याकडे बघताना तिने स्वत:ची घेतलेली काळजी, सुरेख त्वचा नजरेत भरत होती.
याच कार्यक्रमात योगिता या तरुणीने ‘आ जा सनम मधुर चाँदनी मे हम’ ही आणि अशी अनेक उत्तमोत्तम रसाळ गाणी गायली आणि उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. इथे भेटलेल्या सर्व उत्साही मैत्रिणींची आणि माझी छान ओळख झाली, पुढल्या भेटीचे वेधही लागले आणि यासाठी साहाय्यभूत असलेल्या स्त्री फाउंडेशनचे मी मनापासून आभारच मानते. थँक्यू, प्राची आणि थँक यू स्त्री फाउंडेशन.
दीपा देशमुख
adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.
Categories