शब्दोत्सव दिवाळी अंक २०१९
शब्दोत्सव दिवाळी अंक २०१९ १४ वर्षांपासून सातत्यानं वाचकांसमोर येत असलेला, संपूर्ण रंगीत असा 'शब्दोत्सव' दिवाळी अंक अंबाजोगाईचा अभिजीत जोंधळे आणि त्याची टीम प्रसिद्ध करत असते. या अंकाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्धीपूर्व नोंदणी जवळपास २००० वाचक दरवर्षी करतात. त्याशिवाय होणारी विक्री वेगळीच ! 'शब्दोत्सव' दिवाळी अंकाची सजावट आणि आतली मांडणी अंबाजोगाईमधले कलाकार करतात आणि छपाई लातूर शहरात केली जाते. अभिजीत आणि त्याचे १० ते १२ मित्र नोंदणीपासून ते अंक प्रसिद्ध होईपर्यंत आणि वितरण करेपर्यंतच्या प्रक्रियेत बरोबर असतात. विशेष म्हणजे या अंकात स्थानिक अंबाजोगाईच्या काही लोकांनी लिहिलंच पाहिजे हा आग्रह अभिजीत जोंधळे धरतात आणि त्याप्रमाणे लेख त्या त्या लेखकांकडून लिहूनही घेतात.
दिवाळी सुरू होत असतानाच या वेळी 'शब्दोत्सव'चा अंक हातात पडला. अंकाचं मुखपृष्ठ दिवाळी सुरू झालीय याचे संकेत देऊन गेलं. अंक वाचण्याची उत्सुकता लागली होतीच. पहिलं पान उलगडताच प्रसाद कुलकर्णींची कविता समोर आली. आनंदाचे जंतर मंतर....अतिशय सुरेख लय असलेली, तिच्यातच संगीत भरलेली आणि अर्थपूर्ण अशी ही कविता गुणगुणत राहावी वाटते आणि ही दिवाळी चार दिवसांचीच नाही तर कायमच सोबत करणारी याचे संकेतही देते. खरं तर अंकाची प्रत्येक वर्षीची थीम वेगळी असते. या वर्षीची थीम 'गांधीजींची १५० वी जयंती' अशी होती. या विषयानुरूप प्रत्येकाला भेटलेले गांधी, उमगलेले गांधी आणि आजही मनामनात गांधी जीवित कसे आहेत, कुठलंही पाऊल टाकताना गांधी आडवे कसे येतात अशा अनेक मुद्दयांवरचे लेख 'शब्दोत्सव'मध्ये आहेत.
अंकातली गांधीजींची रेखाचित्रं संपूर्ण अंकावर गांधींची छाप सोडतात. हेरंब कुलकर्णी, अमर हबीब, संजय आवटे, गिरीश कुलकर्णी, सोनाली नवांगुळ, शैलजा बरुरे, सुभाष देशपांडे यांचे लेख यात आहेत. गांधी आणि समाजकारण, गांधी आणि राजकारण, गांधी आणि अर्थकारण, गांधी आणि धर्मकारण अशा प्रत्येक क्षेत्रात असलेले गांधी सुभाष देशपांडे यांच्या लेखामधून व्यक्त होतात आणि आपल्याला शाश्वत विकासाच्या ध्येयाकडे वाटचाल करण्याबद्दल उद्युक्त करतात. आपल्या अनेक आठवणींमधून आपल्या आयुष्यात गांधींनी कसा प्रवेश केला आणि आपलं जगणं कसं व्यापून टाकलं याबद्दल बोलताहेत हेरंब कुलकर्णी. तळातल्या माणसाला समजून घेण्याची नजर गांधीमुळेच मिळाली हे प्रांजलपणे ते कबूल करतात. दारूबंदी, शिक्षण आणि जीवनविषयक मूल्य यांचे धडे गांधीजींनीच दिले असल्याचं हेरंब कुलकर्णी सांगतात. सोनाली नवांगुळ या तरुणीच्या लेखामधून तर गांधीजींनी दिलेला गृहपाठ संपतच नाही याविषयी सांगितलं आहे. आत्मशोध घेणार्या प्रत्येक व्यक्तीला हा गृहपाठ कसा कामी येतो हे लेखिका वाचकाला सांगते. अमर हबीबचा 'गांधींनी मला देश दिला' या लेखातून अंतर्मुख होऊन गांधींबद्दल विचार करण्याची गरज भासते. शैलजा बरूरे यांनी कस्तुरबा गांधींचं व्यक्तित्व उलगडलं आहे. तर संजय आवटे यांनी रोजच पाऊल टाकताना गांधी कुठे कुठे आडवा येतो याबद्दल लेखाद्वारे सांगितलं आहे. शेती असो, वा व्यवस्थापन, शिक्षण असो वा राजकारण गांधी प्रत्येक ठिकाणी भेटत राहतात. सत्याच्या मार्गावरून चालायला लावतात. प्रत्येक क्षणी गांधी आजही कुणाच्या न कुणाच्या रुपात भेटतात. स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी यांच्या जीवित गांधी यांच्या लेखातून रमेश कचोलिया या अवलियाची ओळख होते आणि त्यांच्या रुपात एक जीवित गांधी आपल्याला कसा भेटतो तेही कळतं. त्यामुळेच गांधी कळण्यासाठी, गांधींना सोबत घेऊन चालण्यासाठी 'शब्दोत्सव' मधला प्रत्येक लेख जरूर वाचला पाहिजे.
यातलं वेगळं सदर म्हणजे 'वेगळ्या वाटेचे प्रवासी' हे आहे. यात 'मिरॅकल कॅन्डल' या लेखात भावेश भाटिया या तरुणाचा थक्क करणारा प्रवास अमृत महाजन यानं मांडला आहे. भावेशची दृष्टी हळूहळू क्षीण होत होत पूर्णपणे गेली आणि त्यातच कुटुंबातल्या जवळच्या व्यक्तींच्या मृत्युने तो एकाकी पडला. अशा अवस्थेतही त्याची चिवट इच्छाशक्ती त्याला साथ देत राहिली. डिम्पल कपाडियाच्या कॅन्डल निर्मितीच्या प्रकल्पातही त्यानं तीन वर्षं नोकरी केली. अनेक गोष्टी शिकून घेतल्या आणि त्यानंतर स्वतः कॅन्डल निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. त्याला अचानक मिळालेली डोळस जोडीदार, तिचं प्रेम, तिची साथ वाचून तर थक्क व्हायला होतं. साध्याशा मेणबत्त्या, पण या मेणबत्त्यांनी भावेशच नव्हे तर अनेक अंध आणि डोळस यांच्या जगण्यातला अंधार दूर केल्याची गोष्ट या लेखात आहे. हा लेख जरूर वाचायला हवा. सोनम वांगचुक नाव आपल्याला 'थ्री इडियट्स' या चित्रपटामुळे ओळखीचं आहेच. मात्र या खर्याखुर्या सोनम वांगचुकचा परिचय, त्याचा शाश्वत जीवनशैलीचा ध्यास आणि त्याचं काम याविषयीचा डॉ. शुभदा राठींचा लेख देखील वाचकांनी वाचायला हवा. अजिंक्य नावाच्या तरूणाची शिक्षणक्षेत्रातल्या प्रयोगांविषयीचा लेख अभिजीत जोंधळे यांनी लिहिलाय तोही वाचला पाहिजेच.
नर्मदेची परिक्रमा करत असताना त्या त्या परिसरातल्या लोकांची अवस्था पाहून भारती ठाकूर या स्त्रीनं त्यांच्यासाठी शिक्षण, व्यवसाय इथंपासून काय काय उभारलं याची एक विलक्षण कथा विवेक गिरधारी यांच्या लेखातून वाचकाच्या समोर येते. यातला एक आणखी वेगळा लेख म्हणजे 'एक होता कार्व्हर'नं घराघरात पोहोचलेल्या वीणा गवाणकर यांच्याविषयी बोलणारा! हा मुलाखतवजा लेख मंजुळ प्रकाशनाचा प्रमुख संपादक चेतन कोळी या तरुणानं लिहिला आहे. वीणताईंचं मृदू आणि सौम्य असं व्यक्तिमत्व, त्यांची अभ्यासू वृत्ती आणि त्यांना भावणारे विषय, त्यांचं वाचन अशा अनेक पैलूंवर चेतननं प्रकाश टाकला आहे. हा लेख तर वाचकांना वाचा असं सांगण्याची आवश्यकताच नाही, कारण ते वाचणारच ही खात्री आहे. युवराज माने या तरुणाचा शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना घडवण्याचा प्रयास आणि प्रवास देखील चकित करणारा आहे. मुलांमधली कल्पकता, त्यांच्यातलं कुतूहल आणि त्यांच्यातली चिकाटी जीवित ठेवण्याचा प्रयत्न करत त्यांच्यासाठी अनेक उपक्रम राबवणारा हा तरूण विलक्षणच!
नुकतीच भारताची चांद्रयान मोहिम पार पडली. भारतानं या मोहिमेत कधी पाऊल टाकलं आणि जागतिक पटावरही काय काय घडलं, आजच्या चांद्रयान मोहिमेविषयी असा सगळा आढावा घेणारा दीपा देशमुख म्हणजे माझा लेख या अंकात अर्थातच समाविष्ट आहे. कथा विभागातल्या कथा लघुकथा असल्या तरी चांगल्या आहेत. विशेषत्वानं उल्लेख करावा अशी मोहिब कादरी यांचा अनुभव माणुसकीचं दर्शन घडवणारा आहे. कवितेच्या भागातल्या 'पुस्तकाचे होवून जाणे' ही प्रभाकर साळेगावकर यांच्या कवितेसह इतर सर्वच कविता वाचनीय आहेत. चांगला, दर्जेदार दिवाळी अंक गेली १४ वर्षं नेटानं काढत असलेल्या अभिजीत जोंधळे या धडपड्या उत्साही कार्यकर्त्याचे आणि त्यांच्या टीमचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा.
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment