झाड व्हायचं दोघांनी
झाड व्हायचं दोघांनी
हनुमंत चांदगुडे या अस्सल कविता जगणार्या माणसाची आणि माझी ओळख साधारणपणे ३-४ वर्षांपूर्वी झाली. एखाद्याच्या जगण्यात, वागण्यात, बोलण्यात कविता कशी अविरत वाहते ते या माणसाकडे बघून कळतं. नुकताच काही दिवसांपूर्वी 'झाड व्हायचं दोघांनी' हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आणि तो कधी वाचेल असं मला झालं. मनात आलं आणि ते आपोआप कळल्याप्रमाणे हनुमंत चांदगुडे यांनी पुस्तक माझ्यापर्यंत पोहोचतं केलं!
या कवितासंग्रहाचं शीर्षकच इतकं भावलं.....दोघांचे अहंकार, दोघांचं अस्तित्व, दोघांचं द्वैत नष्ट झालं आणि त्यांनी एकरूप होऊन झाड व्हायचं ठरवलं तर काय घडेल किंवा घडावं याबद्दल कवी बोलतो. कवितेची सुरुवातच मुळी एका शेतकरी कुटुंबाच्या घरापासून होते. मन सुरुवातीपासून चिंतीत होतं. याचं कारण या कवितेतला शेतकरी हा गरीब असणार, त्याच्यावरचं कर्ज कधीही न फिटणारं, त्याची मुलं शाळा सुटलेली, त्याच गरिबीत कर्जबाजारी होऊन मरण येणारं....असं सगळं चित्र बघण्यासाठी माझं मन काही केल्या तयार होईना. पण तरीही ही कविता, ही गोष्ट वाचावीच लागणार होती. ती मला खुणावत होती, बोलावत होती. मग मी माझ्याही नकळत तिला शरण गेले. मला दिसलेला गरीब शेतकरी या कवितेत होता. त्याची कष्टाळू बायको होती. त्यांची सोन्यासारखी दोन मुलं होती. घरात गरिबी असली तरी मुलीच्या जन्मानं या घरात आनंद साजरा केला होता....मुलीचं रांगणं, चालणं, बोबडे बोल बोलणं सगळं काही हे घर कौतुकानं बघत होतं.... प्रेमानं, एकमेकांना जपण्याच्या वातावरणानं घरातला कोपरा न कोपरा जसा उजळून निघाला होता, तसा बाहेरचाही आसमंत फुलून गेला होता. मुलगी मोठी झाली, उपवर झाली आणि तिच्या लग्नाची चिंता तिच्या आई-बापाला सतावू लागली...अर्थातच मग सावकाराकडून कर्ज काढणं आलं, मुलीचं लग्न लावलं गेलं. मुलगी सासरी गेली आणि कर्ज आणि कर्जाचं व्याज फेडताना शेतकर्याचं कुटुंब देशोधडीला लागलं......कोणाएका क्षणी मुलीला माहेरी आणायचा क्षण येतो आणि त्या वेळी जे काही घडतं, ते खूपच विलक्षण आहे, स्तब्ध करणारं आहे ..... मात्र तरीही या कवितेचा सार, या कवितेचं सकारात्मक जगणं, बघून वाचक स्तिमित होतो.
मुलीचं सासर तिच्यावर संकट कोसळल्यावर तिचं माहेर कसं बनतं, तिचं माहेर आणि तिचं सासर यातलं अंतर मिटवण्यासाठी ते कसं काम करतं, तिचा सासरा, तिची सासू, तिचा नवरा सगळेच तिला कसा भरभक्कम आधार देतात हे या कवितेत खरोखरंच बघण्यासारखं आहे. अशी नाती, असे संबंध जर असतील, तर कुठल्याही वाटेवर ती मुलगी प्रसन्नपणे, खंबीरपणे वाटचाल करू शकते! तिचा जोडीदार तिच्यासमोर प्रेमानं हात पसरून उभा असेल तर त्याच्या दोन्ही हाताच्या शेकडो फांद्यांमध्ये तिचं मन पारंब्यासारखं लवचिक पण तितकंच मजबूत होऊन एकरूप होणार आहे आणि म्हणूनच झाड व्हायचं दोघांनी हा संदेश प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक नात्याला, प्रत्येक जोडीला लागू पडतो!
कविता जेव्हा संपते, तेव्हा मन गाऊ लागतं, आपलंही झाड व्हावं, ते समृद्ध व्हावं आणि असंच बहरावं सर्वार्थानं! हनुमंतजी, तुमच्या कष्टप्रद जगण्यातून देखील तुम्ही सतत आशेचा दिवा तेवत ठेवत आहात, सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच वाटचाल करत आहात. खूप खूप शुभेच्छा पुढल्या काव्यप्रवासासाठी!
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment