शेषप्रश्न - शरदचंद्र चटटोपाध्याय

शेषप्रश्न - शरदचंद्र चटटोपाध्याय

बंगाली साहित्यातलं आपला वेगळा ठसा उमटवणारं एक नाव म्हणजे शरदचंद्र चट्टोपाध्याय किंवा चटर्जी! त्यांच्या परिणिता, देवदास, चरित्रहीन, श्रीकांत, पथेरदाबी या आणि इतर अनेक कादंबर्‍या खूपच गाजल्या. यातल्या अनेक कादंबर्‍यांवर चित्रपटही निघाले आणि ते देखील खूपच लोकप्रिय झाले. शरदचंद्रांवर रवींद्रनाथ टागोर आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा खूप मोठा प्रभाव होता. 
शरदचंद्रांच्या लिखाणात स्त्री-पुरूष यांच्यातलं नातं, परस्परांमधले संबंध अशा विषयांना हाताळलेलं दिसतं. त्यांची नायिका संपूर्ण कादंबरीमध्ये अशा रीतीनं वावरते की ती वाचकाच्या मनाचा कधी ताबा घेते कळतही नाही. त्यांच्या बहुतांशी कादंबर्‍यातली नायिका ही पतिव्रता, निष्ठा, सहिष्णुता, आपल्या कुटुंबाची मानमर्यादा जपताना तिनं केलेला असामान्य त्याग अशा गुणांनी युक्त अशीच बघायला मिळते. 
याच शरदचंद्राची ‘शेषप्रश्न’ ही कादंबरी मात्र त्यांच्या इतर सर्वच कादंबर्‍यांपेक्षा सर्वस्वी वेगळी आहे. १९३१ साली लिहिलेली ही कादंबरी त्यातल्या विषयामुळे आजही तितकीच ताजी वाटते. माझ्या मनावर ‘शेषप्रश्न’ या कादंबरीनं जी मोहिनी घातली ती आजपर्यंत कायम आहे. एके दिवशी या कादंबरीवर चर्चा करत असताना माझी लेखिका मैत्रीण आणि रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्याच्या गाढ्या अभ्यासक आशा साठे यांनी मला ‘शेषप्रश्न’ या कादंबरीचा मराठीतून अनुवाद  मामा वरेरकर यांनी १९४७ साली केला असल्याचं सांगून ती कादंबरी माझ्या हातात ठेवली. मूळ कादंबरी जेवढी सशक्त आहे, तितकाच मराठी अनुवादही! मी शिकत असताना आचार्य अत्रेंच्या लिखाणातून मामा वरेरकरांचं नाव पहिल्यांदा ऐकलं होतं. अत्रेंच्या चेष्टेचा विषय अनेकदा मामा वरेरकर असत. पण पुढे कर्वे यांनी समाजस्वास्थ्य हे आरोग्य आणि संततीनियमन यांच्या प्रसारासाठी काढलेलं नियतकालिक आणि त्या वेळी त्यांच्यावर भरले गेलेले खटले आणि यातून उसळलेला जनक्षोभ या वेळी मामा वरेरकर यांनी कर्वेंना दिलेली खंबीर साथ याविषयी वाचून मन आदरानं भरून गेलं होतं. त्यानंतर मामा वरेकरकरांची नाटकं, त्या नाटकातून सातत्यानं मांडले गेलेले सामाजिक प्रश्न याविषयी वाचलं. डॉक्टर न होता, साहित्याची वाट पकडणार्‍या नाटककार मामा वरेरकरांविषयीचा आदर वाढत गेला. आधुनिक रंगभूमीचे शिल्पकार म्हणून महाराष्ट्रानं त्यांना गौरवलं ते उगीच नाही. 
‘शेषप्रश्न’ ही कादंबरी काय आहे, ती वाचकाला का आवडते याविषयी विचार करताना जाणवलं की मनाला खोलवर विचार करायला लावणारी ही कादंबरी आहे. यातलं प्रत्येक पात्र वाचकाला अंतर्मुख व्हायला भाग पाडतं. ‘शेषप्रश्न’ ही कादंबरी स्वातंत्र्यपूर्व काळात आग्रा या शहरात घडते. कुठल्यातरी कारणांमुळे आग्रा शहरात येऊन स्थायिक झालेली काही बंगाली कुटुंबं या कादंबरीत वाचकाला भेटतात. 
‘शेषप्रश्न’ मध्ये जातिव्यवस्थेचं प्रबळ प्रस्थ, स्त्री-पुरूष संबंध, आनंदाच्या, नीतिमत्तेच्या व्याख्या, आग्र्यासारख्या ऐतिहासिक वास्तूचं मोल आणि त्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन, असे अनेक विषय येतात. यातल्या प्रत्येक पात्राला आपली काही मतं आहेत. या कादंबरीत आशुतोष मुखर्जी नावाचे सधन प्रतिष्ठित विधुर असलेले गृहस्थ आपल्या एकुलत्या एक मनोरमा नावाच्या मुलीबरोबर आग्रा शहरात येऊन राहतात. सधन आणि सुसंस्कृत अशा आशूबाबूंच्या बंगल्यात गायन, वाद-चर्चा अशा कार्यंक्रमांची रेलचेल असते. या कार्यक्रमांना अनेक बंगाली कुटुंबाना आमंत्रित केलं जात असतं. आशुतोष मुखर्जी यांची मुलगी मनोरमा आणि आशुतोष मुखर्जी यांच्यातलं बाप-लेकीचं मोकळीक जपणारं आणि हळूहळू बदलत गेलेलं नातंही इथे बघायला मिळतं. 
यात आशुतोष म्हणजेच आशूबाबू, त्यांची मुलगी मनोरमा, त्यांचा प्राध्यापक असलेला मित्र अविनाश, हरेन, अक्षय, अविनाशची मेव्हणी नीलिमा, मनोरमेचा भावी नवरा अजित, गायक शिवनाथ आणि त्याच्याबरोबर बायकोसारखं राहणारी कमल (शिवानी), आपल्याला भेटतात. यांची प्रत्येकाची काही ठाम मतं आणि विचारधारा आहे. काहीजण कर्मठ विचारांना चिटकलेले आहेत, तर काही नव्या, पुरोगामी विचारांची कास धरून त्याप्रमाणे चालणारे आहेत. ‘शेषप्रश्न’मध्ये मनोरमा ही जरी सुरूवातीला नायिका वाटली, तरी खरी नायिका कमल असल्याचं लक्षात येतं. कमल ही परिस्थितीशी टक्कर देत झुंजणारी, बंडखोर, लढाऊ वृत्तीची आहे. जात-धर्म, देशभक्ती याबद्दलचा तिचा व्यापक दृष्टिकोन या कादंबरीतून मनाची पकड घेतो.
‘शेषप्रश्न’मध्ये कमल बरोबरच लक्षात राहण्याजोगी व्यक्तिरेखा आशूबाबूंची आहे! आशूबाबू परदेशात राहून आलेले असले तरी त्यांची वृत्ती सनातनी आहे, पण त्याचबरोबर समोरच्याचे विचार ऐकून घेण्याचीही आहे. या कादंबरीत कमलची मतं आपल्यालाही विचार करण्यास भाग पाडतात. कमल ही मनस्वी, तरीही ठाम आणि वर्तमानाला बरोबर घेऊन जगणारी स्वतंत्र व्यक्तिमत्वाची एक स्त्री आहे. माणसं कशी असायला हवीत, यापेक्षा माणसं जशी आहेत तशी त्यांना स्वीकारणारी ती आहे. कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता, न कोलमडता पुढे जाणारी ती आहे. कुठल्याही नात्यातलं वास्तव ती सहजपणे स्वीकारते. निसर्गाचं चक्र तिला भावतं आणि म्हणूनच झाडाचं वाळलेलं गळून पडलेल्या पानानंतरचं नवं उगवलेलं पान तिला जास्त आवडतं. नात्यातला गोडवा संपल्यानंतर तरीही ते नातं टिकवून ठेवण्याचा अट्टाहास करत त्या नात्याला फरफटत नेत निभावणं तिला मान्य नाही. प्रेमामध्ये एकनिष्ठ राहणं याविषयी तिची मतं खूप स्पष्ट आहेत. 
आशुतोषबाबूंची आणि अविनाश या दोघांचीही पत्नी हयात नाही...या दोघांनी आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरं लग्न न करता आपल्या पत्नीवरचं प्रेम दर्शवण्यासाठी घरभर तिच्या तसबिरी लावलेल्या.....त्यांच्या बोलण्यातूनही त्या प्रेमाच्या एकनिष्ठतेचे संदर्भ येत राहतात. अशा वेळी कमल मात्र तिची याबाबतीतली बंडखोर मतं मांडते. ‘पत्नी होती, तेव्हा तिच्यावर असणारं प्रेम होतं. मात्र ती गेल्यानंतर तिला देण्यासारखं किंवा तिच्याकडून काही मिळण्याचा संभव नाही. थोडक्यात, तिला आता सुखी करता येत नाही आणि दुःखही देता येत नाही. ती आता नाही. आता आहे ती एकदा प्रेम केल्याच्या घटनेची आठवण. ती आठवण सारखी मनात घोळवत ठेवायची आणि वर्तमानकाळापेक्षा भूतकाळच चिरस्थायी म्हणून आयुष्य कंठायचं’ या वृत्तीला कमल दुबळेपणा म्हणते, आदर्श मानत नाही. 
आयुष्यातल्या घडणार्‍या अनेक गोष्टींपैकी ती लग्न एक गोष्ट मानते. त्यापलीकडे ती लग्नाला विशेष महत्व देत नाही. तसंच या देशातल्या विधवांना भावनेच्या सक्तीखाली जबरदस्तीनं वैधव्यात राहायला भाग पाडलं जात आहे असं ती म्हणते. ‘नव्याचा स्वीकार न करणारे, भूतकाळात जगू बघणारे लोक तिला शरीरानंच नव्हे, तर मनानंही म्हातारे झाल्यासारखे वाटतात. त्या साचलेपणाचा, आहे तिथं थांबण्यात ते आनंद घेतात आणि त्यातच आयुष्याचं सार्थक मानतात. त्यांच्या जगण्याचं विजयवाद्य नाही, तर आनंदाच्या विसर्जनाचं शोकगीत आहे आणि ते त्यांना कळतही नाही’ असंही कमल म्हणते. 
स्वतंत्र बुद्धीने विचार करणारी कमल जाती-धर्माबद्दल बोलतानाही माणुसकीला जास्त महत्वाचं मानते. स्त्री-पुरुष असं वेगळा भेद न करता ती व्यक्ती म्हणून प्रत्येकाकडे बघताना दिसते आणि त्यामुळे समोरची व्यक्ती पुरूष आहे, म्हणून स्त्री संकोचामुळे बोलू शकत नाही अशी अवस्था तिची होताना चुकूनही दिसत नाही. 
‘शेषप्रश्न’ ही शरदचंद्र लिखित आणि मामा वरेरकर अनुवादित कादंबरी वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. लिखाणातून लेखकही उलगडत जातो, तसाच या कादंबरीतून शरदचंद्रातला विचारी, प्रगल्भ माणूसही कळत जातो. शेषप्रश्न ही कादंबरी मानवी नातेसंबंधाविषयीचा, त्यातल्या बदलणार्‍या परिस्थितीबद्दलचा आणि आयुष्यातल्या अनेक प्रश्नांचं उत्तर शोधणार्‍यांना तत्वज्ञानाचा एक मार्गही दाखवते. आणि म्हणूनच १९३१ साली लिहिलेली ‘शेषप्रश्न’ आजही तितकीच महत्वाची कादंबरी म्हणून आपलं स्थान अबाधित राखणारी आहे.
दीपा देशमुख, पुणे.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.