शुभबुद्धीचे उपासक रवींद्रनाथ आणि आशा साठे
आशा साठे माझी अशी एक मैत्रीण की ती भेटली, ती बोलली की मन कसं पुन्हा उल्हसित होतं, मनावर जमलेली अनेक जळमटं झटकली जातात. पुन्हा नवी उमेद घेऊन मी कामाला लागते. मैत्रीण आपलीच असते, तिला आपल्याबद्दल आणि आपल्याला तिच्याबद्दल बोलायची खरं तर काहीच गरजही नसते. पण तरीही आजकाल असं वाटतं, आकस्मिक कधी आपण गेलो, तर मनातलं व्यक्त करणं राहूनच जायला नको.
तर आशा साठे या मैत्रिणीची आणि माझी घट्ट मैत्री आहे, भेट होवो, अथवा न होवो. पुन्हा तेच सांगेन, ना वयातलं अंतर आड येतं, ना अनुभवातली दरी तयार होते! आशा साठे एक सशक्त, ताकदीच्या लेखिका आहेत, त्या नाटककार आहेत, त्या कवयित्री आहेत आणि या सर्वांपेक्षाही त्यांच्यातला संवेदनशील खरा खरा माणूस नेहमीच जागा असतो!
आशाताईंचं 'अम्लान कथा' पुस्तक वाचकांनी जरूर वाचावं. यात मराठीतल्या उत्कृष्ट अशा २५ कथांचा रसास्वाद आहे. 'आमादेर शांतिनिकेतन' या हिंदी पुस्तकाचा त्यांनी मराठीतून केलेला अनुवाद वाचनीय आहे. 'प्रिय मित्रा' हा लघुकथा संग्रह आहे, 'विद्याताई आणि ....' हे अंजली मुळेसह लिहिलेलं पुस्तक देखील प्रसिद्ध आहे. रस्किन बाँड यांच्या 'द रूम ऑन द रूफ' आणि 'व्हायग्रंट्स इन द व्हॅली' या दोन लघुकादंबर्याचा त्यांनी केलेला अनुवादही वाचकांनी आवर्जून वाचायला हवा. मुलांसाठी 'नाटक नावाचा खेळ' हा नाट्यसंग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे.
तसंच 'स्वयम्' या दीर्घांकाचं त्यांनी लेखन केलं आणि ते रंगमंचावर दीपा लागूंनी आणलं. यात लालन सारंग आणि दीपा लागू यांच्या भूमिका होत्या. पुढे औरंगाबादच्या पद्मनाभ पाठकच्या संस्थेनं देखील हे नाटक सादर केलं होतं. सानेगुरूजी आणि अनेक विषयांवरच्या कार्यक्रमांचं लेखन आणि सादरीकरण त्यांनी केलंय. मिळून सार्याजणी या मासिकाच्या काही काळ त्या कार्यकारी संपादक होत्या. आकाशवाणीवरून त्यांचे अनेक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. तसंच त्या ठाणे इथल्या न्यू इग्लिंश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेजमध्ये अध्यापनाचं कामही करत होत्या.
आशा साठेंचे नुकतंच सकाळ प्रकाशनानं 'शुभबुद्धीचे उपासक रवींद्रनाथ' हे पुस्तक प्रकाशित केलं आणि ते कधी एकदा बघते असं मला झालं. आशाताईंचाही निरोप होताच, 'दीपा तुझी एक प्रत ठेवली आहे, जमेल तशी ये आणि घेऊन जा.' १४ ऑगस्टला सायंकाळी पावणेसातला घरातून बाहेर पडले, पण वाहतुक कोंडीमुळे मी त्यांच्याकडे रात्रीच्या साडेनऊ वाजता पोहोचले. पुस्तक हातात पडलं आणि मन एकदम शांत झालं. नेहमीप्रमाणे गप्पा झाल्या. पुस्तक वाचण्याची ओढ मनात घेऊन रात्री साडेअकराला घरी परतले.
मुखपृष्ठावर रवींद्रनाथ टागोरांची विचारमग्न गंभीर मुद्रा! पहिलं पान उलटलं आणि आशाताईंनी माझ्यासाठी लिहिलेले शब्द दिसायला लागले. 'प्रिय दीपा, हे लिहिताना तू सोबत होतीसच'......खरंच आपल्याच माणसाकडून आपलंच कौतुक ऐकताना/वाचताना किती बरं वाटतं! आशाताई रवींद्रनाथांच्या अभ्यासक, त्यांचे अनेक कार्यक्रम मी ऐकले. त्यांचं बोलणं कधीही कृत्रिम नसतं. मोठमोठ्या जंगी कार्यक्रमांपेक्षा त्यांना छोट्याशा गटात, अनौपचारिकरीत्या बोलायला जास्त आवडतं. रवींद्रनाथांच्या कविता असोत, त्यांची नाटकं असोत, त्यांचं रवींद्रसंगीत असो, त्यांची चित्रं असोत वा त्यांचं शांतिनिकेतन आणि शिक्षणविषयक विचार असोत. हे सारं ऐकावं ते आशाताईंकडूनच. त्यामुळे आज पुस्तकरूपात हे सगळं समोर आल्यामुळे इतका आनंद झाला की ते सारं आपल्या ताब्यात कायमचं आहे या भावनेनं मन भरून आलं.
आशाताईंनी रवींद्रनाथांच्या बाबतीत 'शुभबुद्धीचे उपासक' हा शब्द वापरला आहे. माझ्या मित्राला धनंजय सरदेशपांडेला 'शुभबुद्धी' हा शब्द इतका आवडला की त्यावर तो अर्धा तास माझ्याशी भरभरून बोलत बसला. आशाताईंचा पहिलाच लेख या शब्दांना घेऊन वाचकांशी संवाद साधतो. जागतिकीकरण, त्याचे दुष्परिणाम, बदललेली मानसिकता, आजूबाजूचं अस्वस्थ करणारं वातावरण, सगळंच जग कसं स्वार्थानं बदलत चाललेलं आणि ‘मी’ च्या पुढे न सरकणारं, अशा वेळी रवींद्रनाथच या विचारांतून, या उदासीमधून बाहेर काढायला मदत करतात असं आशाताई म्हणतात. जगण्याची उमेद वाढवणार्या रवींद्रनाथांच्या त्या मनापासून ऋणी आहेत आणि आपणही असायलाच हवं.
रवींद्रनाथांचा जन्मापासूनचा प्रवास त्यांनी या पुस्तकात रंगवला आहे. मात्र तो नेहमीच्या पठडीप्रमाणे नाही. अतिशय नेमक्या आणि नेटक्या शब्दांत तो उलगडत जातो. विशेष करून त्यांचा जडणघडणीचा पाया आणि त्यांचं विविध विषयातलं कार्य यातून तो पुढे पुढे सरकत राहतो. रवींद्रनाथ टागोरांच्या सुसंस्कृत घरातलं मोकळं वातावरण, कोणी तत्वज्ञ, तर कोणी गणिती, कोणी संगीतकार, तर कोणी आयसीएस अधिकारी! आपल्या हुशार, बुद्धिमान भावंडांच्या अर्धांगिनी आणि रवींद्रनाथांच्या भावजयी देखील तितक्याच गुणसंपन्न आणि अनेक कलांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या. त्यातली त्यांचा लाडकी कादंबरी वहिनी त्यांना अधिक जवळची होती.
लहान मुलांसाठी रवींद्रनाथांनी केलेलं लेखन आपल्या मनातलंही औत्सुक्य वाढवतं, पण त्याचबरोबर मुलांचं संवदेनशील मन, त्यांच्यातलं कुतूहल यावर प्रकाश टाकतं. त्यांचं हे लिखाण, या कविता पालकांनी तळमळीनं काही सांगू पाहतात. मुलांच्या खोड्यांकडे बघताना आपण त्यांना मोठ्यांचं मोजमाप लावून का बघतो हा प्रश्न टागोर विचारतात. केल्यानं देशाटन, माणसाच्या अंगी चातुर्य कसे येते हे रामदासांनीही सांगितलं आहे. तेव्हा वडिलांबरोबर केलेला प्रवास आपल्याला किती समृद्ध करून गेला तेही टागोर वाचकांना सांगतात. आपलं जग किती विस्तारलं याबद्दल ते बोलतात. चौकटीतलं शिक्षण त्यांना कधीच मानवलं नाही आणि त्यांनी अखेर शाळा सोडून दिली. त्यांच्या वडिलांनीही त्यांना त्याबद्दल कधीही फटकारलं नाही. आपल्या अनुभवांतून, निरीक्षणातून, वाचनातून त्यांनी स्वतःची अभ्यासपद्धती विकसित केली.
आशा साठेंनी 'शुभबुद्धीचे उपासक रवींद्रनाथ' या पुस्तकात रवींद्रनाथ यांच्या कविता आणि कथा यांबद्दल खूप छान लिहिलं आहे. त्यांचा विस्तृत आढावा घेतला आहे. या नाटक, कथा, कविता कशा कालातीत आहेत हेही सांगितलं आहे. यातून मानवता, स्त्री-सन्मानाची भावना अनेकदा व्यक्त होताना दिसते. याच पुस्तकात रवींद्रनाथांना मिळालेला (भारताला पहिल्यांदा मिळालेला) नोबेल पुरस्कार याबद्दलही आपल्याला वाचायला मिळतं.
रवींद्रनाथ टागोर यांचे आईन्स्टाईन, गांधीजी, दादाभाई नौरोजी, सुभाषचंद्र बोस, जगदीशचंद्र बोस, शरदचंद्र चटर्जी, पं. नेहरू यांच्याबरोबरचं अकृत्रिम स्नेहाचं नातं याच पुस्तकातून आपल्यासमोर येतं. याच पुस्तकातून टागोर जमीनदार असले तरी त्यांचं सर्वसामान्य माणसाशी असलेलं नातं, त्यांच्यासाठी केलेल्या अनेक गोष्टी, इतकंच नव्हे तर त्यासाठी त्यांनी केलेला होमिओपॅथीचा अभ्यास यातून ते प्रत्येक माणसाच्या किती जवळचे होते आणि प्रत्येकाला ते आपल्या आयुष्याचा भाग समजत होते हेही यातून कळतं.
समानतेचा हक्क भीक मागून मिळत नसतो, तर तो स्वपराक्रमाने आणि स्वतःच्या प्रभावानंच मिळवायचा असतो असं रवींद्रनाथ टागोरांनी परखडपणे सांगितलं होतं. माणसाचं मन, बुद्धी आणि स्वतंत्र आणि निर्भय बनवली पाहिजे याचा ते सतत आग्रह धरत. जात, धर्म, लिंग, गरीब-श्रीमंत, देश या सगळ्यांच्या पलीकडे गेलेला हा माणूस होता. आपण त्यांनी लिहिलेलं 'जन,गण,मन' हे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं. टागोरांच्या देशप्रेमाला दिलेली ही दाद आहे असं लेखिका म्हणते. टागोरांना मात्र राष्ट्रवादापेक्षाही मानवतावाद जास्त प्यारा होता. म्हणूनच त्यांनी केलेली विश्वभारतीची निर्मिती आपल्याला संपूर्ण विश्व हे एक कुटुंब आहे ही जाणीव करून देते. कट्टर देशभक्त असणं, जमिनीच्या एका तुकड्यापुरतं संकुचित राहणं यापेक्षा विश्वचि माझे घर ही संकल्पना त्यांचं आयुष्य कसं बदलून गेली हेही आपल्याला या पुस्तकातून अनुभवायला मिळतं.
'शुभबुद्धीचे उपासक रवींद्रनाथ' या पुस्तकाबद्दल मला स्वतंत्र एका पुस्तकाएवढं भरभरून बोलता येईल. रवींद्रनाथांची चित्रं, त्यांचे राजकारण आणि राष्टाविषयीचे विचार, त्यांच्या कथा आणि त्यांच्या कविता! पण मोह आवरते. कारण हे सगळं या पुस्तकात आशा साठे यांनी इतकं समर्पकपणे मांडलं आहे की १००० पानी रवींद्रनाथांवरचा ग्रंथ वाचायचा की १२८ पानं असलेलं रवींद्रनाथांच्या जगण्याचं सार असलेलं हे पुस्तक वाचायचं असा प्रश्न मला कोणी विचारला तर मी ‘शुभबुद्धीचे उपासक रवींद्रनाथ’ असंच उत्तर देईन.
जरूर वाचा 'शुभबुद्धीचे उपासक रवींद्रनाथ!'
दीपा देशमुख, पुणे
Add new comment