प्रिय अब्बू आणि फारूक एस. काझी
फेसबुकमुळे अनेक चांगले मित्र-मैत्रिणी मिळाले, त्यांच्यातली वैशिष्ट्यं मनाला मोहवून गेली. या सगळ्यांकडून आजही भरभरून काहीनाकाही मिळतं....त्यातच पुस्तकं म्हटलं की..........गेल्या काही दिवसांत काही मित्र-मैत्रिणींनी अनेक पुस्तकं दिली. त्यातलाच एक फेसबुकवरचा मित्र म्हणजे फारूक एस. काझी!
कुरियर आलं आणि त्यात एकच पुस्तक असावं असं मी गृहीत धरलं. पण जेव्हा वाचण्यासाठी पार्सल उघडलं, तेव्हा चार-चार पुस्तकं बघून मी हरखून गेले. त्यातही दोन पुस्तकांमध्ये रेश्मा बर्वेची अप्रतिम अशी बोलकी चित्रं बघून तनामनानं लहान लहान होत गेले. प्रिय अब्बू, मित्र, चित्र आणि इतर कथा आणि तू माझी चुटकी आहेस ही चार पुस्तकं! ताजे रंग, बोलकी चित्रं मुखपृष्ठावर बघून मन आनंदून गेलं. यातली दोन पुस्तकं रोहन प्रकाशनाची!
फारूक एस. काझी हे अनेक पुरस्कार मिळवलेले शिक्षक! मुलांच्या मनात काय चाललंय हे अचूकपणे ओळखणारा हा माणूस! त्यांना न भेटताही त्यांची पुस्तकं वाचताना हे कळत जातं. मला ही चारही पुस्तकं आवडण्याचं कारण म्हणजे यात मुलांना कुठलाही उपदेश केला नाही. बर का मुलांनो करत कुठेही काही सल्ला दिलेला नाही आणि पुस्तकात कुठेही बोजड भाषेचा वापर केलेला नाही. यातल्या दोन पुस्तकांमध्ये कोण्या थोरामोठ्यांची प्रस्तावना दिलेली नाही, तर मैत्री आणि कबीर या दोन बालमित्रांची मनोगतं आहेत हे विशेष!
ही पुस्तकं लहानांसाठी असली, तरी मोठ्यांना लहान करण्याची ताकद या पुस्तकांमध्ये आहे. पर्यावरण, स्वावलंबन, परिश्रमाचं महत्व, अनाथांचं दुःख, प्राणिप्रेम, मानसिक आणि शारीरिक विकलांगता असे अनेक विषय हळुवारपणे लेखकानं हाताळले आहेत. यातली चुटकी असो की जैश्यूची अम्मी असो ही मंडळी डोळ्यांत आसवं आणतात. गोष्टी म्हणू किंवा कथा म्हणू, अतिशय छोट्या आहेत. मुलांनी वाचायला किंवा ऐकायला सुरुवात केल्यावर कधी संपल्या न कळणार्या. पण त्यानंतर मात्र कितिक वेळ मनात रेंगाळणार्या, विचार करायला लावणार्या आहेत.
प्रत्येक पुस्तकावर माझ्या नावानं सस्नेह पाठवलेली भेटाक्षरं मला चकित करून गेली. अतिशय सुरेख हस्ताक्षर! जपून ठेवावं असं!
फारूक, इतकी सुंदर भेट पाठवल्याबद्दल मी कुठल्या भाषेत आभार मानावेत खरंच कळत नाही. पण खरोखरंच, ही पुस्तकं, त्यातली पात्रं मला इतकी आवडली की माझं मन आता माझ्या आसपास उबेद आणि इतरांना सतत शोधत राहणार हे नक्की!
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment