विवेक प्रकाशन, राजीव तांबे आणि अय्या खरंच की....
'पुणे तिथे काय उणे' असं म्हटलेलं अक्षरशः खरं आहे आणि हा अनुभव मी रोजच घेते. पुण्यातलं सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक वातावरण असेल, पुण्यातल्या सफाई कामगारांची (पाट्या न टाकता) भल्या पहाटे शहराची केलेली सफाई असेल यासारख्या लक्षात घ्याव्यात अशा अनेक गोष्टींची यादी वाढतच जाणारी......तर या पुण्यात राहत असताना आपल्याला रावणासारखी दहा डोकी असती, दहा शरीरं असती तर मग आपण पुण्यात रोज होणार्या निदान दहा तरी कार्यक्रमांना हजेरी लावली असती असं सारखं वाटत राहतं. प्रत्यक्षात मात्र एका वेळी एकाच कार्यक्रमात सहभागी होता येतं. (आणि या गोष्टीचं खूप खूप वाईटही वाटतं. म्हणजे मला रोजच वाटतं, दिवसाचे २४ तास कमी पडतात, तर ४८ तासांचा दिवस असायला हवा होता, वगैरे वगैरे.)
तर सांगायची मुख्य गोष्ट म्हणजे राजीव तांबे या माझ्या मित्राच्या दहा पुस्तकांचा प्रकाशनाचा रीतसर जाहीर कार्यक्रम २८ फेब्रुवारी २०२० या दिवशी डेक्कन कॉर्नरच्या सावरकर हॉलमध्ये होणार होता. माझ्या कमकुवत स्मरणशक्तीमुळे मी पार विसरून गेले होते. अशा वेळी सकाळीच राजीवचा आवाजी निरोप (व्हॉईस मेसेज) येऊन धडकला आणि त्यात मी पंधरा-वीस मिनिट आधी कसं पोहोचलं पाहिजे याचा प्रेमळ दम भरला होता. त्यातही एक गंमतच झाली. आधी कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता ठरला होता. पण काही कारणांमुळे तो चार वाजता होणार असल्याचं ठरलं. म्हणजे मला तीन वाजताच घरातून निघणं आवश्यक होतं. मी बरोबर पावणेचार वाजता कार्यक्रमस्थळी पोहोचले.
राजीवनं माझं स्वागत केलं. वीणाताई (गवाणकर), मीनाताई (चंदावरकर), विवेक प्रकाशनाची टीम, चित्रकार श्रीनिवास बाळकृष्णन असे सगळे हॉलच्या वरती असलेल्या ऑफीसमध्ये जमलेले होते. आमच्या सगळ्यांच्या छान गप्पा झाल्या आणि पुढल्या पंधरा मिनिटांनी आम्ही हॉलमध्ये पोहोचलो.
पुण्यातल्या लोकांची १ ते ४ ही विश्रांतीची वेळ असूनही आपणच केलेला नियम तोडून पुणेकर मोठ्या संख्येनं हॉलमध्ये जमले होते. एकही खुर्ची रिकामी तर नव्हतीच, पण मागे, बाजूला सगळीकडे लोकांचे रंगीबेरंगी थवेच्या थवे दिसत होते. गर्दीतून कशीबशी वाट काढून समोर पोहोचले तेव्हा, एका उदार अंतःकरणाच्या गोड तरुणीनं मला जागा दिली. बरं, मोठे तर मोठे पण त्यांच्या बरोबर असलेल्या बच्चे कंपनीनंही एकच गर्दी केली होती. त्यांना त्यांच्या लाडक्या राजीवकाकांचं बोलणं ऐकायचं होतं. वीणाआज्जी आणि मीनाआज्जी काय गोष्टी सांगतात याचीही उत्सुकता त्यांना होतीच. सुरुवातीला विवेक प्रकाशनाच्या वतीनं अगदी पाचच मिनिटांत या विवेक प्रकाशनाविषयी आणि पुस्तकांविषयी सांगण्यात आलं. चित्रकार श्रीनिवास बाळकृष्णन या तरुण चित्रकारानं आपल्याला ही चित्रं काढताना कशी मजा आली हे मुलं कंटाळणार नाहीत, इतक्या कमी वेळात सांगितलं.
जरा हटके पद्धतीनं राजीव तांबेच्या अय्या खरंच की आणि इतर ९ पुस्तकं असं प्रकाशन झालं. या प्रकाशनसोहळ्यात मुलांनाही तितकंच महत्व होतं. म्हणजे वीणाताई आणि मीनाताई बरोबर ही मुलंही तितकीच मान्यवर होती.
मुलांमध्ये मूल होऊन वावरलं तर मुलं कशी शांत होतात, तुमचं ऐकतात, तुम्हाला भरभरून प्रतिसाद देतात हे सगळं या कार्यक्रमात बघायला मिळालं. सभागृहात ६ वर्षांपर्यंतच्या चिमुकल्या मुलांची इतकी गर्दी झाली होती की ही मुलं अखेर व्यासपीठावर बसवावी लागली. ही मुलं खोड्या करत होती, हसत होती, जोरजोरात ओरडत होती आणि इथे 'मुलांनो, आवाज करू नका, शांत बसा, मी काय म्हणते तिकडं लक्ष द्या' असं त्यांना कोणीही सांगत नव्हतं.
असं असताना वीणाताईंनी माईक हाती घेतला. मुलांमध्ये मूल होणं म्हणजे काय हे मी या प्रसंगी अनुभवलं. वीणाताईं देखील वय वर्ष सहाच्या झाल्या आणि त्यांनी मुलांना छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या. मुलांना वीणाआज्जीच्या गोष्टी खूपच आवडल्या. वीणाताईंची मुलगी चार वर्षांची असताना तिला गणित शिकवताना वीणाताईंनी तिला कागदाच्या पाच होड्या करून दिल्या आणि त्या पाण्यात सोडल्या. तिला विचारलं, आता पाच होड्यांमधल्या किती होड्या शिल्लक आहेत? त्या वेळी उत्तर येत असूनही ती उत्तर देतच नव्हती. अखेर तिला खूप आग्रह केल्यावर ती म्हणाली, ‘अग, तुला होड्यांचं पडलंय, माझ्या त्या होड्यामध्ये माझी माणसं होती, ती बुडाली ना, मी त्यांचा विचार करतेय’ या गोष्टीतून मोठ्यांपेक्षाही मुलं कसा वेगळा विचार करतात आणि त्यांच्याशी संवाद साधला तर त्यांच्या मनात काय चाललंय हे समजायला कशी मदत होते हे वीणाताईंनी सांगितलं. दुसरा एक अनुभव सांगताना, आपल्या मुलीला गणित चांगलं येत असूनही तिला जेव्हा बोरं, पेरू यांची उदाहरणं घातली की ती अचूक उत्तर द्यायचीच नाही. इतके पेरू तुझ्याकडे आहेत, तू इतके पेरू तू तुझ्या मैत्रिणीला दिलेस तर तुझ्याकडे किती शिल्लक राहिले. असं विचारल्यावर ती गप्प बसायची आणि वजाबाकी करायचीच नाही. तिचं म्हणणं असायचं, मी माझ्याकडचे पेरू आणि बोरं मी कोणालाही देणार नाही त्यामुळे वजाबाकी करण्याचा संबंधच येत नाही! हवं तर माझ्याकडची बिस्किटं वगैरे मी मैत्रिणीला देईन.
वीणाताईंनी आपल्या नातवांचा एक अनुभव सांगितला. रोज रोज किती गोष्टी सांगणार, मग त्यांना एक युक्ती सुचली. वर्तमानपत्रातले कार्टून्स बघून त्यावर गोष्ट रचून नातवांना त्या सांगत. एके दिवशी मुलांच्या लक्षात ही गोष्ट आली. मग त्यांनी सांगितलं, आज्जी, आम्ही तुला गोष्टीचा प्लॉट देतो, त्यावर तू गोष्ट रच. त्या दिवसापासून वीणाताईंचे नातू त्यांना गोष्टींचे विषय सुचवायला लागले आणि वीणाआज्जीं त्याप्रमाणे गोष्टी तयार करायला लागल्या. आपल्या मुलांना क्वालिटी टाईम पालकांनी कसा द्यावा, त्यांच्यातलं कुतूहल जागं कसं ठेवावं, याबद्दल वीणाताईंनी मोठ्यांशी बोलताना त्यांना सांगितलं. मोठ्यांशी बोलताना त्यांनी ३० वर्षांपूर्वी एका अनाथाश्रमातला प्रसंग सांगितला. तिथे गेल्यावर ते वातावरण बघून वीणाताईंना रडायला येत होतं, पण त्याच वेळी राजीव तांबेनं मात्र आपल्या भावना बाजूला सारून त्या मुलांना तासभर कसं हसवलं याची आठवण सांगितली. त्याच वेळी हा तरूण मुलांसाठी पुढे काय करणार याचा अंदाज वीणा गवाणकर यांनी बांधला होता आणि आपला तो अंदाज २०० टक्के खरा ठरल्याचं सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. राजीवची पुस्तकं मुलांना विचार कसा करायचा हे सांगणारी आहेत असं त्या म्हणाल्या.
मीना चंदावरकर या शिक्षणतज्ज्ञ, आपलं सगळं आयुष्य मुलांसाठी वाहिलेलं, त्यांना तर मुलांची नस चांगलीच ठाऊक होती. त्यांनी मुलांना आवडणार्या गाण्यानं सुरुवात केली. मीनाताईंबरोबर मुलंही 'येरे येरे पावसा' सुरात म्हणायला लागली. त्यानंतर मीनाताईंनी मुलांना राजीवची दोन पुस्तकं हातात धरून चक्क वाचून दाखवली. वाचून दाखवली म्हणण्यापेक्षा त्या गोष्टी अशा रीतीनं वाचल्या की प्रत्यक्ष प्रसंग समोर उभे केले. मीनाताईंनी या पुस्तकातल्या चित्रांविषयीची मौजही मुलांना दाखवली. गोष्ट वाचताना त्यांच्या पाठोपाठ मुलंही ती वाक्यं म्हणत होती. असे लोक मुलांना का आवडतात, मुलांची आणि त्यांची का दोस्ती होते हे मला मीनाताईंकडे बघून कळलं.
त्यानंतर मुलांचे राजीवकाका बोलायला उभे राहिले. मुलांचं एकाग्र चित्त झालं. मुलं रमली आणि मग हळूच राजीवकाकांनी मुलांची परवानगी घेऊन मी तुमच्या आई-बाबांशी थोडं बोललं तर चालेल का असं विचारलं. मुलांनीही उदार मनानं राजीवकाकांना परवानगी दिली. मग मोठ्यांची फिरकी घेत मोठ्यांनी काय करू नये हे राजीवकाकांनी उपदेश न करता त्यांना सांगितलं. मुलांचं निरागस मन आणि पालकांनी घेतलेला मुखवटा यावरही राजीवकाका बोलले. या दहा पुस्तकांचं वेगळेपण काय आहे ते राजीव तांबे यांनी सांगितलं. पुस्तकातल्या गोष्टी वाचताना, ऐकताना मुलांची शब्दसंपत्ती कशी वाढते, मुलं विचार कसा करायला लागतात आणि त्यातूनच ती समृद्ध कशी होतात हे सांगितलं.
मुलांसाठी गोष्टी सांगण्याचा उपक्रम विवेकने हाती घेतला होता. त्यात सहभागी झालेल्या सगळ्याच मुलांना विवेक प्रकाशनातर्फे पुस्तकं भेट देण्यात आली. त्यामुळे बक्षीस मिळाल्यानं मुलं एकदम खुश झाली. कार्यक्रम कधी संपला कळलंच नाही. ५०० रुपयांची १० पुस्तकं सवलतीच्या दरात ४०० रुपयांना प्रकाशनानिमित्त ठेवण्यात आली होती. पुस्तकाच्या स्टॉलवर मुलं आणि पालक यांची झुंबड उडाली होती.
शुभा तांबे आणि सई तांबे यांची आणि माझी भेट झाली. दोघीही एकदम गोड तयार होऊन आल्या होत्या. त्यांच्या भेटीनं आणखीनच छान वाटलं. सगळ्यांचा निरोप घेऊन मुलांच्या-पालकांच्या गर्दीतून वाट काढत मी बाहेर पडले!
जरूर वाचा - विवेक प्रकाशन निर्मित, गिरीश सहस्त्रबुद्धे आणि श्रीनिवास बाळकृष्णन चित्रीत आणि राजीव तांबे लिखीत 'अय्या खरंच की आणि इतर ९ पुस्तकांचा संच'!
दीपा देशमुख, पुणे.
Comments
ज्ञान प्रबोधिनी,सोलापूर साठी…
ज्ञान प्रबोधिनी,सोलापूर साठी राजीव तांबे सरांचा दहा पुस्तकांचा संच पाहिजे आहे.त्यासाठी फोन नं.कळवावा.
Add new comment