अय्या खरंच की....आणि इतर ९ पुस्तकं
राजीव तांबे हा मुलांसाठी लिहिणारा लेखक म्हणून ओळखला जातो. २०१६ साली साहित्य अकादमीनं त्याला पुरस्कार देऊन गौरवलं. त्याचं लिखाण मुलांशी बोलतं, त्यांना त्या गोष्टीतून त्यांना हव्या त्या दुनियेची सैर करून आणतं आणि त्याचबरोबर त्यांना हळूहळू मोठंही करतं.
अय्या खरंच की आणि त्याबरोबरच असलेली ९ पुस्तकं ही ८ वर्षांपर्यंतच्या मुलामुलींसाठी आहेत. चित्रमय रंगीत असलेली ही सर्वच पुस्तकं अतिशय देखणी असून छोट्यांनाच नव्हे तर मोठ्यांनाही ती आकर्षित करणारी आहेत. यातलं 'अय्या खरंच की' आणि 'साराचे मित्र' या दोन पुस्तकांची मुखपृष्ठं आणि आतली चित्रं चित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धे यांनी काढली आहेत. चिमणी आणि सारा या दोघांची गोष्ट असलेल्या 'अय्या खरंच की' पुस्तकात सारा चिमणीशी गप्पा मारते आणि त्यातून काय काय मौज अनुभवायला येते हे दिसतं. तसंच साराची दोस्त कंपनी म्हणजे चिमणी, कावळा, पोपट, कोंबडी, कबुतर, मांजर असे तिचे अनेक मित्र! या मित्रांबरोबर तिचा सुट्टीतला वेळ कसा भुर्रकन उडून जातो ते या गोष्टीत आहे. या दोन्ही पुस्तकांची मजा म्हणजे यात शब्द कमी आणि चित्रं जास्त बोलतात. किंवा यातल्या शब्दाशब्दांमधून आपल्यासमोर चित्र तयार होतं. ही चित्रं मुलांना आपल्यात गुंतवून ठेवणारी आहेत. पण त्याचबरोबर सारा आणि तिच्या जगातले ‘सगळे’ यांचं आणि तिचं नातं उलगडणारी आहेत. कुठेही उपदेशाचा आव न आणता मूल्य शिक्षण, निसर्ग दर्शन, मानवतावाद अगदी सहजपणे पेरून जाण्याचं काम या गोष्टी करतात. वाचताना आणि चित्रं बघताना खरोखरंच मजा येते.
यानंतरच्या ८ पुस्तकांना श्रीनिवास बाळकृष्णन या चित्रकाराची मुखपृष्ठं आणि चित्रं आहेत. ही चित्रं नेहमीच्या चित्रांपेक्षा जरा हटके आहेत, पण या चित्रांमधून, सगळं दृश्य उभं करण्याची ताकद आहे. यातलं 'किती मजा येईल' या पुस्तकात डोंगर चालायला लागले तर, रोजच खायला केक, चॉकलेट मिळालं तर, किती मजा येईल आणि ती मजा कशी येईल हे यातली चित्रं सांगतात. याचबरोबर जिराफ का बसत नाही, ससा उड्या मारतच का धावतो, वारा कसा उधळतो, तर जिराफ किंवा गोगलगाय झाल्यावर काय होईल असं म्हणत लेखक या सगळ्यांची वैशिष्ट्यं नकळत सांगून जातो, त्याचबरोबर त्यांच्या मर्यादाही तो सांगतो आणि विशेष म्हणजे हे अगदी लहान मुलांना सहजपणे सांगता येईल, त्यांना समजेल, त्यांना उत्सुकता वाटेल याच पद्धतीनं अतिशय कमी शब्दांमध्ये पण जास्त बोलक्या चित्रांनी हे सांगितलं आहे. 'रंगीत जादू', 'असं झालं तर', 'वारा', 'असं का', 'प्रकाशच प्रकाश', 'नदी' आणि 'पाऊस' या पुस्तकांची चित्रं खरोखरंच भुरळ पाडणारी आहेत. यातल्या 'पाऊस'चं मुखपृष्ठ तर लईच ब्येश्ट आहे. चित्रकाराचं नाव झाडांमध्येच गुंफलं गेलंय आणि पाऊस कुठे कुठे पडतो ते या गोष्टीतून लेखक सांगत राहतो. पावसाचं सर्वत्र पडणारं 'रूपडं' खरोखरंच मोहात पाडतं. तेच नदीचंही आहे. नदीच्या उगमापासून नदीचं धावणं, तिचा प्रवास, तिचा उपयोग हे सगळं सगळं नदीच्या प्रवासातून चिमुकल्याना कळू शकतं. यातून त्या त्या मुलाला या नदीत पोहोण्याचा, डुंबण्याचा आनंदतर घेता येतोच, पण त्याला नकळत नदीची माहितीही उत्तम प्रकारे मिळते. ही नदी एकदम हटके पद्धतीनं चित्रकारानं चितारली आहे.
'प्रकाशच प्रकाश'मध्ये मुलांना प्रकाश कुठल्या कुठल्या माध्यमातून दिसत असतो, ते सांगत सांगत सूर्याच्या लख्ख प्रकाशापर्यंत ही चित्र-शब्दमय गाडी मुलांना सैर करून आणते. तीच गोष्ट वार्याची वार्याचं स्वरूप वेगवेगळ्या ठिकाणी कसं बदलतं हे 'वारा' या पुस्तकातून लेखक सांगतो. 'रंगीत जादू' मध्ये सारा जादूची कांडी फिरवते आणि तिच्या मित्रांचे रंग बदलवून टाकते. 'असं झालं तर' आणि 'असं का' या दोन्ही पुस्तकांमधून आपण आहोत त्यापेक्षा वेगळे झालो तर काय होईल आणि कीटक, पक्षी आणि प्राणी हे तसेच का आहेत या प्रश्नांची उत्तरं मिळतात.
एकीकडे मुलांना गोष्टींबरोबर सुरेख बोलक्या चित्रांची भेट, दुसरीकडे कमी शब्दांत जास्त सांगण्याचा प्रयत्न आणि या सगळ्यांमधून हसत-खेळत आपल्या आसपास असणार्या, दिसणार्या गोष्टींची ओळख मुलांना कमी वयातच करून देणं, त्यांच्या जाणिवा विस्तारणं, त्यांच्या मनात कुतूहल आणि प्रश्न निर्माण करणं हे सगळं लेखक खूप लीलया करतो. तो मुलांमधलं मूल होतो हेच त्याचं वैशिष्ट्य आहे.
ही दहा पुस्तकं भलतीच सुरेख झाली आहेत. लेखक, चित्रकार, प्रकाशक यांनी मुलांसाठी आणि मुलांबरोबरच्या मोठ्यांसाठी खरोखरंच खूपच हटके काम केलंय. या तिघांचंही मनापासून अभिनंदन. यात 'प्रकाशच प्रकाश' या पुस्तकात 'इंजिनाचा' हा शब्द मुद्रितशोधन करायचा राहून गेला आहे. तसच 'नदी' या पुस्तकात 'आसरा' वगैरे शब्द मुलांना जड होतील का असं वाटलं. अर्थात या गोष्टी खूप कमी आहेत. पण एकूण संच देखणेबल आणि वाचणेबल झाला आहे.
येत्या २८ फेब्रुवारीला विवेक प्रकाशनातर्फे राजीव तांबेंच्या १० पुस्तकांचं प्रकाशन पुण्यात सावरकर हॉल, डेक्कन कॉर्नर इथे सायंकाळी ५ वाजता संपन्न होणार आहे. १० पुस्तकांचा हा संच प्रकाशनाच्या दिवशी सवलतीच्या दरात ४०० रुपयांना मिळणार आहे. तरी कार्यक्रमाला जरूर या.
दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmail.com
Add new comment