मध्यरात्रीनंतरचे तास, साहित्य अकादमी पुरस्कार, सोनाली नवांगुळ आणि मनोविकास प्रकाशन!
‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या भारतीय लेखिका मालिकेतल्या तमीळ भाषेतल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद केल्याबद्दल सोनाली नवांगुळ या लेखिकेला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. सोनालीला हा पुरस्कार मिळणं ही अत्यंत आनंदाची आणि गौरवाची बाब मला वाटते.
मनोविकास प्रकाशनाने भारतीय लेखिका ज्या वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहित्या आहेत त्यांच्या लिखाणावर भारतीय लेखिका याच नावाने मालिका करायचं ठरवलं. या मालिकेचं संपादन करण्याची जबाबदारी मनोविकास प्रकाशनाने कविता महाजन या मराठीतल्या नामवंत लेखिकेवर सोपवली. मनोविकास आणि कविता महाजन यांनी एकूण २५ पुस्तकं या मालिकेत प्रकाशित केली. खरं तर माझ्या माहितीप्रमाणे ही मालिका ४० पुस्तकं प्रकाशित करून पूर्णविराम घेणार होती, पण काही कारणांमुळे ती २५ वर थांबली.
‘भारतीय लेखिका’ या मालिकेतली ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ ही तमीळनाडूमधल्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातल्या सलमा या लेखिकेनं लिहिलेली कादंबरी. या पहिल्याच कादंबरीने सलमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्दी दिली. या लेखिकेचा प्रवासही अजिबात सोपा नव्हता. मुस्लिम समाजातली स्त्री, रुढींच्या, स्त्रियांच्या परिस्थितीवर बोलते, इतरांना काय वाटेल याचा विचार न करता कविता करते, तेव्हा परंपरावादी समाज हादरला, चिडला आणि संतापला. तिच्यावर अश्लील लिखाण केलं म्हणून आरोप करण्यात आले, तिला धमक्या देण्यात आल्या. मात्र सलमा डगमगली नाही. ती ठामपणे चालत राहिली, बोलत राहिली आणि लिहीत राहिली. आज ती तिरुवनकुरिची या गावची सरपंच आहे.
‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या पुस्तकाचा मराठीत अनुवाद करणाऱ्या सोनालीला मी पहिल्यांदा भेटले ते २०१४ साली अखिल भारतीय विशेष व्यक्तींचं साहित्य संमेलन पुण्यात आयोजित करण्यात आलं होतं तेव्हा. ती या संमेलनाची अध्यक्ष होती. त्या वेळी तिने केलेलं भाषण माझ्या दीर्घकाळ लक्षात राहिलं होतं. त्यानंतर ड्रीमरनर हे आणि तुमचे आमचे सुपरहिरो या मालिकेतलं मेधा पाटकर यांच्यावर लिहिलेली दोन्ही पुस्तकं मी वाचली. तिची सहजसोपी, ओघवती भाषा यामुळे पुस्तकं चटकन वाचून हातावेगळी होत गेली. स्वागत थोरातनं स्पर्शज्ञान हे ब्रेललिपीत सुरु केलेल्या पाक्षिकाची ती सहसंपादक म्हणूनही काम बघते, त्यात लेख लिहिते हेही मला कळत गेलं. मनोविकासचे अरविंद पाटकर यांची ती मानसकन्या. त्यामुळे त्यांच्याबरोबरच्या गप्पात तिचे आणखी पैलूही कळत गेले. सलमासारखाच पण वेगळ्या पातळीवरचा संघर्ष करत सोनाली प्रवास करते आहे, पण अत्यंत हसतमुख राहून, आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत ती चालते आहे. खरं तर फोन करून सोनालीला मिळालेल्या पुरस्काराबद्दल भरभरून शुभेच्छा दिल्या असल्या तरी तिला ज्या पुस्तकाबद्दल हा पुरस्कार मिळाला, त्या पुस्तकात नेमकं काय आहे याविषयी व्यक्त करावंसं वाटलं, म्हणून हा खटाटोप.
‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या कादंबरीत राबिया, रहिमा, जोहरा, अमिना, वहिदा, खदीजा, फिरदोस, फरिदा आणि नुराम्मा अशा स्त्रियांची गोष्ट सांगितली आहे. मुस्लिम स्त्रियांचं उंबरठ्याआतलं जगणं, त्यात त्यांच्यावर असलेली बंधनं, इतकंच यात रेखाटलं नाही, तर त्यांनी कुठे उभं राहू नये, कुठे बसू नये, काय आणि किती बोलू नये, अशा अनेक नकारात्मक सूरांचा पाढा लहानपणापासून त्यांच्यासमोर वाचला जातो किंवा बिंबवला जातो. उंबरठ्याबाहेरच्या जगात बरंच काही घडत असतं, त्याचे पडसाद पडत राहतात. पण अप्रत्यक्षरित्या. घरातल्या पुरुषांचं अर्थाजनासाठी घराबाहेर पडणं, त्यांची पुरुषी वर्चस्ववादी वृत्ती, स्त्रीकडे भोग्यवस्तू म्हणून बघण्याचा दृष्टिकोन, नात्यांमध्ये होणारी लग्नं, स्त्रियांची लैंगिक भूक, हक्क समजून केलेले बलात्कार, विधवा आणि घटस्फोटित स्त्रियांकडे बघण्याचा तिरस्करणीय दृष्टिकोन, रुढी-परंपरा, असं बराच प्रवास या कादंबरीतून वाचकाला घडत जातो. यातली राबिया ही १२-१३ वर्षांची पौंगडावस्थेतली मुलगी आहे. ती जगाकडे कसं बघते, तिला अनेक गोष्टींचं कुतूहल आहे, तिची निरागस स्वप्नं आहेत, खरं तर तिचीच नाही, तर यातल्या सगळ्याच स्त्रियांची स्वप्नं, त्या तशा का वागताहेत याची काही कारणं आहेत, त्यांच्या स्वप्नांचं काय होतं हेही या कादंबरीत आहे. ही कादंबरी विद्रोह करत नाही, हातात बंडाचा झेंडा घेत नाही. पण तरीही ती अनेक प्रश्न वाचकांसमोर उभे करून संपते. कादंबरी संपल्यानंतर वाचक म्हणून आपण अस्वस्थ होतो. स्त्रीचं अस्तित्व, तिच्या भावना, तिचं स्वातंत्र्य, तिचं लैंगिक स्वातंत्र्य, समाजातलं तिचं स्थान, तिचं शिक्षण, असे अनेक मुद्दे वाचकाला छळायला लागतात. ही कादंबरी म्हणजे केवळ कल्पनाविलास नाही, तर काही निवडक शहरं सोडली, तर भारतातल्या अनेक शहरातलं, गावातलं अजूनही हे कठोर वास्तव आहे हे लक्षात येतं.
‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या कादंबरीची भाषा वाचकाला गुंतवून ठेवते. राबियापासून ते या कादंबरीतल्या प्रत्येक स्त्री-पात्राशी वाचकाची ओळख होते आणि तो सहजासहजी त्यातून सुटका करून घेऊ शकत नाही. घरातला नवरा म्हणवणारा पुरुष केवळ भोगापुरता तिचा वापर करतो, त्या वेळी तिचं मन जाणण्याचाही विचार करत नाही. याच घरात तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणारी लिंगपिसाट नजर इतर ज्येष्ठ पुरुषांची असते आणि अशा घरातून स्वत:ला सुरक्षित ठेवणं किती कठीण असू शकतं याची जाणीव क्षणोक्षणी ही कादंबरी करून देते. उंबरठ्याबाहेरचं जग यातली प्रत्येक स्त्री कधी बघू शकेल, तिच्या स्वप्नातलं जग तिला कसं आणि कधी मिळेल, तिची स्वतंत्र ओळख कधी आणि कशी होईल अशा प्रश्नांना वाचकावर सोपवून कादंबरी संपते‘.
‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या कादंबरीचा सोनाली नवांगुळने अतिशय अभ्यासपूर्वक, गांभीर्याने, मूळ कादंबरीचा बाज राखून, मराठी अनुवाद केला आहे. ५५० पानं असलेल्या कादंबरीचं आव्हान पेलणं तितकीशी सहजसोपी गोष्ट नाही, पण हे आव्हान सोनालीने अतिशय लीलया पेललं आहे. मनोविकास प्रकाशन नेहमीच अशा हटक्या विषयांना हाती घेऊन काम करतं. त्यामुळे मनोविकास आणि सोनाली यांना ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या पुस्तकाच्या यशाबद्दल, मिळालेल्या पुरस्काराबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.
दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com
२७ सप्टेंबर २०२१
Add new comment