मनोविकास आणि पुस्तक विश्व यांच्या गंथोत्सवात रॉ आणि प्रपोगंडा
‘पुस्तकविश्व’चा नवनाथ जगताप या तरुणाने वर्षभराच्या कालावधीत डहाणूकर कॉलनीत पुस्तक व्यवसायात चांगलाच जम बसवला आहे. त्याची चिकाटी हेरून मनोविकासने त्याला आणखी प्रोत्साहित केलं. याचीच फलश्रुती म्हणजे पुस्तकविश्वमध्ये सुरू असलेला मनोविकासचा १४ जून पर्यंत सुरू असलेला ‘ग्रंथोत्सव’ आणि सुरू असलेल्या साहित्यिक गप्पा!
ग्रंथोत्सवाचं उद्घाटन अरूणा सबाणे, दीपा देशमुख, यांच्या हस्ते झालं आणि त्या वेळी पुस्तकविश्वात अरूणा सबाणेची मी घेतलेली मुलाखत रंगली. त्यानंतर त्या पुढल्या कार्यक्रमात जग बदलणारे ‘ग्रंथ’ यावर मी वाचकांशी संवाद साधला. या दोन कार्यक्रमानंतरचा तिसरा कार्यक्रम म्हणजे ५ जून या दिवशी सायंकाळी ६ वाजता रॉ आणि प्रोपगंडा या पुस्तकांचे लेखक रवि आमले यांची मुलाखत प्रसाद नामजोशी घेणार होते.
कार्यक्रमाचं आयोजन खूपच सुरेख रीतीने करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची सूत्र हाती घेतलेला विजय पवार याचा उत्साह आणि निरागसता दोन्हीमुळे सुरुवातीपासूनच श्रोत्यांच्या चेहऱ्यावर हासू फुललं होतं. बोलत असताना त्याने मनोविकासच्या अरविंद पाटकर यांना अँगी यंग मॅनची यानेकी अमिताभ बच्चनची उपमा दिली. इतकंच नाही तर श्रोत्यांनी ही गोष्ट विसरून जाऊ नये म्हणून दोन वेळा तेच सांगून त्यांच्या मनावर पक्कं ठसवलं देखील. माझ्या शेजारी बसलेल्या आशिश पाटकरला मी, आता तू म्हणजे अभिषेक बच्चन असं म्हटलं.
तर हा कार्यक्रम चांगला आणि रंगतदार होणारच ही खात्री विजय पवारने दिल्यामुळे रवि आमले आणि प्रसाद नामजोशी यांच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य आणखीनच वाढलं. त्यातच विषय देखील गंभीर होता. सुरुवात करतानाच प्रसाद नामजोशीने कार्यक्रम चांगलाच होणार याची जबाबदारी रवि आमलेवर टाकली आणि मी तर निमित्तमात्र असेही भाव चेहऱ्यावर आणले.
रवि आमले यांनी मी लिहितो, पण मला बोलता येत नाही असं सांगत इतक्या लोकांसमोर बोलायचं म्हणजे माझ्या घशाला आधीपासूनच कोरड पडलीये असं सांगितलं आणि कार्यक्रम चांगला होण्याची जबाबदारी धुडकावून लावली. आता कार्यक्रम चांगला होण्याची सगळीच जबाबदारी उपस्थित श्रोत्यांवर येऊन पडल्याने त्यांनी ती मनापासून अंगावर घेतली आणि यशस्वीही करून दाखवली.
तर, तर विनोदाची गोष्ट सोडा, पण कालचा कार्यक्रम खरोखरंच खूप रंगतदार झाला. अतिशय सुंदर कार्यक्रम! प्रसाद नामजोशी यांना आपण सगळेच लेखक, दिग्दर्शक म्हणून ओळखतोच. तसंच रवि आमले हे लोकसत्तेमध्ये वरिष्ठ संपादक म्हणून कार्यरत होतेच, शिवाय लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकप्रभा यांसारख्या अनेक प्रथितयश वृत्तपत्रं, साप्ताहिकांमधून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचं ‘रॉ’ हे पुस्तक मी वाचलं होतं. आणि मला ते खूप आवडलंही होतं. आता मुलाखतीतून ‘रॉ’सारखा गुंतागुंतीचा विषय – तेव्हा त्याची उकल कशी होते हे बघणं खूप उत्सुकतेचं होतं.
आणि प्रसाद नामजोशी यांनी अतिशय संयमितपणे रवि आमलेंना हळूहळू बोलतं केलं. खरं तर असं कॉम्बिनेशन केल्याबद्दल मनोविकासला सगळे गुण द्यायला पाहिजेत.(म्हणजे ते कास्टिंग काऊच का काय असतं ना, किंवा सोप्या भाषेत चित्रपट, मालिका यांच्यासाठी पात्रांची योग्य निवड करण्यासाठीचे जे विशिष्ट लोक कार्यरत असतात ना, त्यात मनोविकासलाही सामील करायला हवं. थोडक्यात, व्यासपीठावरची जोडी तोडीसतोड होती!)
रवि आमलेंकडे बघताना माझ्या मनात विचार येत होते, हा पत्रकार माणूस – सगळ्या प्रकारच्या वृत्तपत्रांमधून लिखाण करणारा, काही विषय मनात घर करून गेले असता, त्यांना प्रत्यक्षात उतरवणारा, सच्चा, भूमिका घेणारा हा एक मीतभाषी माणूस – आपल्या क्षेत्राच्या अनुषंगाने आपलं कुतूहल, चिकित्सा जपत ‘रॉ’ सारखं पुस्तक लिहितो. कॉलेजमध्ये असतानाच या विषयाचं कुतूहल निर्माण झाल्यावर त्याबद्दलची सगळी माहिती मिळवण्यासाठी परिश्रम करतो. मुख्य म्हणजे ते सोप्या आणि रंजक भाषेत वाचकांसमोर आणतो.
‘रॉ’ म्हणजे भारताची गुप्तचर संस्था. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची आर्थिक, मानसिक आणि सामाजिक घडी कशी विस्कटली गेली होती आणि त्यातच चीननं भारतावर आक्रमण केल्यानंतर भारतामध्ये ‘रॉ’ची आवश्यकता कशी भासली आणि त्यातूनच या संस्थेचा जन्म कसा झाला, त्याचे पहिले प्रमुख रामनाथ काव हे कसे होते याविषयी रवि आमले यांनी सविस्तर माहिती दिली. मुळातच रॉसारख्या संस्थांचं काम किती जोखमीचं असतं आणि ते काम कसं केलं जातं, शिवाजी महाराजांच्या काळात बर्हिजी नाईक यांनी हेर म्हणून कसं काम केलं, याविषयीही आमले बोलले. आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे मानवी हेरांचं महत्व किती आहे असा प्रश्न प्रसाद यांनी विचारल्यानंतर प्रगत तंत्रज्ञानाची आवश्यकता आहेच, पण तरीही मानवी मेंदू, त्याचा हस्तक्षेप, त्याचा विचार, त्याची कार्यपद्धती या सगळ्या कशा महत्वाच्या आहेत हे रवि आमले यांनी सांगितलं. एखादी संस्था त्यातल्या माणसाच्या उंचीमुळे मोठी होते, तसंच ती नामशेष होते त्यालाही कारण त्यातली माणसंच असतात हेही त्यांनी नमूद केलं. तसंच अनुभवाचं मूल्यही त्यांनी अधोरेखित केलं.
प्रसाद नामजोशींनी त्यांना त्यांच्या ‘प्रपोगंडा’ या पुस्तकाविषयी, पुस्तकाच्या निर्मितीविषयी देखील काही प्रश्न विचारले, प्रपोगंडामध्ये प्रचार, जाहिरात आणि अपमाहिती अशा प्रकारचे शब्द पुन्हा पुन्हा येतात, त्याविषयी प्रसाद नामजोशी यांनी विचारताच रवि आमले यांनी तिन्ही शब्दांबद्दल सांगताना कोरोना काळात मास्क वापरण्याचं उदाहरण दिलं. प्रबोधनाशी केलेला दुर्व्यवहार म्हणजे प्रपोगंडा असं ते म्हणाले. सत्यावरची निष्ठाच कमी करून टाकणं हा प्रपोगंडाचा मूळ हेतू असतो. मायावी किंवा इमॅजनरी सत्यात जगायला लावणं, मायावी सत्यात लोकांचं अडकून पडणं, वारंवार एखादी गोष्ट कानावर पाडणं, तीच खरी समजायला भाग पाडणं आणि मग अशा वेळी एखाद्यानं हे सत्य नाही असं कितीही ओरडून सांगितलं, तर त्यावर इतर कोणीही विश्वास ठेवत नाहीत ही अत्यंत विदारक बाब रवि आमले यांनी प्रपोगंडाबद्दल बोलताना सांगितली. त्यातच फेकू, पप्पू ही विशेषणं कशी तयार झाली, प्रत्यक्षात काय घडलेलं असतं आणि ते सत्य किंवा वास्तव कसं बदलत जातं आणि समाज घटकांच्या मनावर कशा प्रकारे ठसवलं जातं हेही त्यांनी सांगितलं. तुम्हाला कधी राजकीय लोकांनी संपर्क करून त्यांच्यासाठी प्रोपगंडा करण्याविषयी विचारलं का? असा प्रश्न विचारताच, त्या वेळी त्यांनी आपण राजकारणात, निवडणुकीत चांगलं काय आणि कोणत्या प्रकारे करता येईल याविषयी मी बोलतो, पण प्रोपगंडा हा मुळातच वाईट असल्यानं तो भ्रष्टाचार आपण कधीच करणार नाही असं आमले यांनी ठामपणे सांगितलं.
मुलाखतीनंतर प्रश्नोत्तरंही रंगली. कार्यक्रमात सुभाष इनामदार, दीपक पळशीकर, तांबोळी, रेवती नामजोशीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. एकूणच कार्यक्रम मस्तम मस्त जाहला!
दीपा देशमुख, पुणे. adipaa@gmail.com
Add new comment