काळेकरडे स्ट्रोक्स - प्रणव सखदेव
काळेकरडे स्ट्रोक्स
आज पहाटे उठल्यानंतर लगेचच 'काळेकरडे स्ट्रोक्स' ही प्रणव सखदेव Pranav Sakhadéo या लेखकाची कादंबरी वाचायला घेतली. प्रणव नव्या पिढीची भाषा बोलणारा एक ताकदीचा लेखक आहे. कादंबरी हा साहित्यिक प्रकार कमी कमी हाताळला जात असताना प्रणवसारखे मोजके लोक या प्रांतात मुसाफिरी करताना दिसतात. 'काळेकरडे स्ट्रोक्स' वाचताना वाचक म्हणून कादंबरी संपल्यावर एक सुन्नपणा, एक पोकळी मनाला घेरून टाकते. आपल्याही मनःपटलावर असे असंख्य काळेकरडे स्ट्रोक्स हा लेखक उमटवून गेल्याची जाणीव होते.
या कादंबरीतला नायक समीर, त्याचा मित्र अरूण, त्याच्या संगतीनं लागलेल्या गांजा, मुली या काही सवयी, अरूणच्या जगण्याचं तत्त्वज्ञान, चैतन्य नावाच्या जवळच्या मित्राच्या आकस्मिक अपघाती मृत्यूमुळे आलेलं कोसळलेपण, चारचौघांसारखं आयुष्य जगणारे समीरचे आई-वडील आणि समीर यांच्या नात्यामध्ये निर्माण झालेला दुरावा, आयुष्यात आलेल्या वेगवेगळ्या मुली, त्यातही सानिका आणि सलोनी यांनी त्या जगण्यात आपला वेगळाच ठसा उमटवलेला, भरकटलेपण, स्वच्छंदीपण, काय हवंय हे न कळता सुरू असलेला प्रवास, अनेक गोष्टींमधली घुसमट, अपराधी भावनेनं ग्रासलेलं, चौकटीतून बाहेर पडू पाहणारं आणि या भरटकलेपणातही शाबूत असलेलं एक जिवंत मन असं बरंच काही या कादंबरीत आहे.
कादंबरीचं शीर्षक 'काळेकरडे स्ट्रोक्स' हे त्या नायकाच्या ग्रे शेडच्या मानसिकतेवर भाष्य करतं. वाचक म्हणून ही कादंबरी वाचकाचाही कस बघते, त्याच्याही आखलेल्या चौकटींना छेद देते. अशा प्रकारचं लेखन वाचायला हवं, कारण वाचक म्हणून स्वतःचं विकसित होणं जेवढं या प्रवासात घडतं, तेवढाच एक ग्रे प्रदेशातला प्रवास करताना त्यामागचे अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न माणूस म्हणून सुरू होतो. 'काळेकरडे स्ट्रोक्स' ही कादंबरीचं बोलकं मुखपृष्ठ अन्वर हुसेन Anwar Husain या विख्यात चित्रकाराचं असून निर्मिती रोहन प्रकाशनाची Rohan Champanerkarआहे. मूल्य १९९ रुपये असून पृष्ठसंख्या २२० आहे. Rohan Prakashan जरूर वाचा - 'काळेकरडे स्ट्रोक्स'!
कसे अचानक येऊन बिलगतात अज्ञात पोकळीचे स्वर
काळ्या करड्या गूढ-तवंगी वाटेचा मी प्रवासी आजवर
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment