एक होता गोल्डी
दोन दिवसांपासून मंजुल प्रकाशनाचं ‘एक होता गोल्डी’ हे पुस्तक वाचायला घेतलं होतं. मला नेहमीच वाटतं, एखाद्या माणसाचं काम समजून घ्यायचं असेल तर आधी त्या माणसाला समजून घ्यावं. तसंच बहुतांश वेळा लेखक देखील त्याच्या लिखाणातून कळतो. मला गोल्डी वाचताना पुन्हा एकदा या गोष्टींचा प्रत्यय आला. अनिता पाध्ये या लेखिकेनं गोल्डी म्हणजेच विजय आनंद याचा प्रवास त्याच्याशी भेटून, त्याच्याशी गप्पा मारून वाचकांसमोर उलगडला आहे.
गोल्डी आणि लेखिका यांच्यातल्या स्नेहाच्या नात्यानं, त्यांच्यातल्या मैत्रीनं हा प्रवास जास्त जिवंत होत गेला. या पुस्तकाचं लेखिकेचं मनोगत बरंच काही सांगून जातं. पुस्तक, गोल्डी याबरोबरच लेखिकाही कळत जाते. ‘गाईड’ या चित्रपटानं चित्रपटसृष्टीत मानाचं एक अढळ स्थान निर्माण केलं. खरं तर या चित्रपटानं इतिहास घडवला. भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर या चित्रपटानं जे यश आणि नावलौकिक कमावला त्याला तोड नाही! अशा या चित्रपटाचा दिग्दर्शक विजय आनंद म्हणजेच गोल्डी याच्याविषयी सविस्तर जाणून घेण्याचं कुतूहल मनात जागं झालं आणि त्याच वेळी नेमकं बुकगंगामध्ये हे पुस्तक माझ्या नजरेला पडलं. दिसायला देखणा असणारा विजय आनंद लहानपणी त्याच्या सोनेरी केसांमुळे जास्तच लोभस दिसत असे. आणि याच त्याच्या सोनेरी केसांमुळे घरातले त्याला गोल्डी या नावानं हाक मारत असत. लहानपणापासून आपला मोठा भाऊ चेतन आनंद आणि वहिनी उमा यांच्याबरोबर गोल्डी राहिला.
देव आनंदपेक्षा गोल्डी दहा वर्षांनी लहान होता, पण त्याचं देव आनंदवरही तितकंच प्रेम होतं. बहुतेक चित्रपट त्यानं नवकेतन या तिघा भावांनी उभारलेल्या संस्थेबरोबर केले. टॅक्सी ड्रायव्हर, नौ दो ग्यारह, काला बाजार, हम दोनो, तेरे घर के सामने, हकिकत (अभिनय), गाईड, तिसरी मंजिल, ज्वेलथीफ, जॉनी मेरा नाम, तेरे मेरे सपने, छुपा रुस्तुम, ब्लॅकमेल, कोरा कागज, मै तुलसी तेरे आँगन की (अभिनय), राम बलराम, राजपूत यासारख्या चित्रपटांचं यशस्वी दिग्दर्शन गोल्डीनं केलं. काहींच्या पटकथा, संवाद आणि संकलनही गोल्डीनंच केलं. या सगळ्या चित्रपटांची निर्मिती प्रक्रिया, कामात आलेले अडथळे, परिश्रम, सहकार्यांबरोबर वागण्याची पद्धत, हे सगळं खूप चांगल्या रीतीने उलगडून दाखवलं आहे. त्याच वेळी गोल्डीला आलेले कटू गोड अनुभव देखील मनाला स्पर्शून जाणारे आहेत.
गोल्डी अतिशय संवेदनशील होता. त्याचं आपल्या भावांवर निरतिशय प्रेम होतं. आपल्या भावांमधली बलस्थानं त्याला चांगली ठाऊक होती. देवआनंदमधल्या अनेक खुब्या, बारकावे त्याला ठाऊक होते. देव आनंदला घेऊन केलेले सर्वच चित्रपट त्यानं यशस्वी केले. दिग्दर्शनाबरोबरच संगीतामधलंही गोल्डीला कळत होतं. म्हणूनच प्रत्येक चित्रपटातलं त्याचं संगीत आपल्या मनात रेंगाळत राहतं. कुठल्या चित्रपटाला कोणता संगीतकार न्याय देऊ शकेल हे त्याला चटकन कळायचं.
आरडी बर्मन याला पहिला ब्रेक ही गोल्डीनंच दिला. साहिरपेक्षाही शैलेंद्रचं काव्य त्याला आवडायचं. व्यवहाराच्या बाबतीत, तसच भावांबरोबरच्या नात्यात गोल्डी खूप भिडस्त होता. पण तोच गोल्डी कामाच्या बाबतीत मात्र खूप स्पष्टवक्ता होता. तिथं कुठलीही तडजोड करायची त्याची तयारी नसायची. वहिदा रहेमानमधली बुद्धिमत्ता, परिश्रम करण्याची प्रचंड तयारी गोल्डीनं या पुस्तकात सांगितली. तसंच तनुजामधला अवखळपणा आणि तिच्यातली अभिनयाची समज याविषयी तो भरभरून बोललाय. मात्र त्याच वेळी वैजयंती मालाबरोबर काम केल्यानंतरचा मनस्ताप त्यानं व्यक्त केला आहे. याच पुस्तकात त्याला अनेकांनी शब्द देऊन जो विश्वासघात केला, अनेक लोक दुटप्पीपणानं वागले त्याची बोचही जन्मभर राहिली. पण बोलून दाखवायचा स्वभाव नसल्यानं त्यानं ते दुःख गिळून टाकलं. मात्र त्या लोकांबरोबर त्यानं पुढे काम करणंही टाळलं. लोक श्रेय देताना कसे बदलतात याचा अनुभव गोल्डीला वारंवार आला.
अध्यात्माकडे, तत्वज्ञानाकडे असलेला ओढा गोल्डीला रजनीशकडे घेऊन गेला. मात्र रजनीशच्या आश्रमात राहिल्यानंतर तोही एक व्यवसाय (बिझिनेस) आणि बाजारच असल्याचं त्याच्या काही दिवसांत लक्षात आलं. त्याच्या मनातल्या आदर्शांना तडे गेले. तिथून परतल्यावर गोल्डीनं पुन्हा चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं. अर्थात, त्याला फारसं यश नतंर मिळालं नाही. त्यानंतर यू. जी. कृष्णमुर्ती यांचा प्रभाव त्याच्यावर पडला. अनेकांना शब्द दिल्यानुसार त्या शब्दाला जागून गोल्डी त्या त्या लोकांना घडवत राहिला. पण त्यापैकी त्याची कदर किंवा जाणीव कोणीही ठेवली नाही. हे शल्यही त्याला बोचत राहिलं. शेवटच्या काळात गोल्डी नैराश्याच्या खाईत गेला. १४ फेब्रुवारी २००४ या दिवशी त्याचा मृत्यू झाला. त्यानं अनेक यशस्वी चित्रपट केलेले असले, तरी त्याचा ‘गाईड’ सारखा चित्रपट कोणीही विसरू शकत नाही!
आयुष्यभर प्रत्येकाला तो देतच राहिला. खरं तर शापित गंधर्व हा शब्द वापरून वापरून खूप गुळगुळीत झाला असला तरी गोल्डीच्या बाबतीत हाच शब्द चपखल बसतो! 'एक होता गोल्डी' हे पुस्तक खूप वाचनीय झालेलं आहेच, पण त्याहीपेक्षा गोल्डीची गोष्ट चटका लावून जाणारी आहे आणि त्याचं श्रेय लेखिका अनिता पाध्ये यांना आहे. मंजुल प्रकाशनानं या पुस्तकाची निर्मिती खूप चांगली केली आहे. याचं मुखपृष्ठ असो की पानं - वाचताना सुखद अनुभव येतो. जाता जाता एक सांगणं, ते म्हणजे हे पुस्तक आपण का केलं याबद्दलची प्रकाशक या नात्याने आपली भूमिका मांडायला हवी. मंजुल प्रकाशनाचं म्हणजेच चेतन कोळी याचं मनःपूर्वक अभिनंदन. अशीच चांगली चांगली पुस्तकं काढण्यासाठी खूप शुभेच्छा!
दीपा देशमुख, पुणे
Add new comment