एकाक्ष
तसं बघितलं तर तोही उपेक्षितच. तो ओरडायला लागला की पोरं त्याला खडे मारून पळवायची. तो जायचा- पण जोरात निषेध व्यक्त करत थाटात जायचा. मला ती गोष्ट आठवायची. काऊ आणि चिऊची. गोष्टीतली चिऊ खूपच चांगली असते आणि काऊ मात्र वाईट. खरं तर ही चिऊच दुष्ट. एव्हढ्या मुसळधार पावसात, बेघर झालेल्या, आश्रयाला आलेल्या काऊला घरात घ्यायचं सोडून मुद्दाम ही बया- “थांब माझ्या बाळाची अंघोळ होऊ दे, थांब माझ्या बाळाला तीट लाऊ दे, अमुक होऊ दे, तमुक होऊ दे” करत बसली. बाहेर मुसळधार पाऊस चालू आणि हिचं बाळ अंघोळ कशी काय करत होतं
कुणास ठाऊक ? मला शोधूनही या गोष्टीचं उत्तर सापडलं नाही आणि चिऊला कोणी कधी वाईटही ठरवलं नाही. कारण शेवटी का होईना या बयेनं उपकार केले होते अन् घेतलं होतं ना काऊला घरात.
मला आठवतं, मी खूप लहान होते. एखादा दिवस असा उगवायचा, झोपेतनं जाग यावी अन् आई बाजूला नसावी. मी घरभर “आई आई” असं ओरडत फिरायची. आई कुठल्यातरी कोप-यात दिसायची. “जवळ येऊ नको” म्हणायची. रागवायची. बाबांना काही विचारलं तर ते काहीच सांगायचे नाहीत. फक्त गालातल्या गालात हसायचे. मग काम करणारी आजी यायची. तिलाही मी विचारायची, “आजी गं, आईला काय झालंय?” कारण आई तर नुसतीच बसलेली. आजारपण म्हणावं तर औषध दिसायची नाहीत, की डॉक्टर. आजी आईकडे बघून चमत्काररक हसायची आणि म्हणायची, “अगो पोरी, तुझ्या आईला कावळा शिवलाय”.
आणि मग हा कावळा दर महिन्याला नियमित येऊन आपली ओळख देऊ लागला. या कावळ्याची भेट मी माझा वर्गमित्र महेशला सांगितली. तो मख्खपणे म्हणाला,“हॅ, यात काय विशेष? माझ्यापण आईला तो कावळा शिवतो माहितीये?”
आम्ही दोघांनी मग खूप विचार केला. या कावळ्याला येऊच द्यायचं नाही असंही ठरवलं. कारण या चार दिवसांत आई आमच्याजवळ नसायची. खाण्यापिण्याचे हाल व्हायचे. पण आमच्या ठरवण्यानं काय होतंय? आम्हाला हुलकावणी देऊन हा पठ्ठया कधी यायचा अन् आईला शिवून पळून जायचा आम्हाला कळायचं देखील नाही.
एके दिवशी खरोखरंच गंमत झाली. महेश आणि मी दोघंही ओरडतच शाळेतून घरी आलो. कारणही तसंच तर घडलं होतं. महेश आणि मला खरोखरंच एक कावळा शिवला होता. मी घरात ऐटीत सांगितलं, “आई, आता मी पण तुझ्यासारखी चार दिवस कोप-यात बसणार. शाळेत जाणार नाही. चार दिवस कुठली कामंही करणार नाही, अगदी अभ्यास सुद्धा!” बाबा कौतुकानं हसले. पण आई मात्र माझ्यापासून दूर व्हायचं सोडून माझ्या पाठीत जोराचा धपाटा तिने घातला. “मला तू शिवू नकोस” असं मी तिला ठणकावून सांगताच, “काटे आगाऊ बोलतेस? दिवसेंदिवस चहाटळ होत चाललीय” असं बरंच काही पुटपुटत तिनं मला चांगलंच बदडून काढलं.
महेशच्याही घरात थोडयाफार फरकानं हे असंच घडलं. आमचं म्हणणं खरं असूनही कोणी नीट ऐकून घेतलं नाही. मला मात्र या कावळ्यानं खूपच आकर्षित करून सोडलं होतं. तो कुठेही दिसला की मी त्याच्याकडे एकटक बघत राही. शाळेत असताना आम्हाला चिमणा-चिमणी, मोर-लांडोर, अशा अनेक जोड्या शिकवल्या होत्या. पण कावळा-कावळी अशी जोडी कोणी आम्हाला सांगितलीच नाही. कदाचित बिचारा ब्रह्मचारी असावा. एकटाच फिरताना म्हणजे उडताना दिसायचा.
महेश, मी आणि आणखी आमच्या काही मित्र-मैत्रिणी आम्ही दुपारच्या वेळी खेळायचो. एके दिवशी आम्ही भातुकली खेळत होतो. मी सगळ्यात लहान, त्यामुळे खेळातली छोटीमोठी कामं सगळीजण मलाच सांगायची. मला राग यायचा. मग मी एके दिवशी खूप विचार केला आणि जाहीर करून टाकलं,
“ए मला कावळा शिवलाय”. आता हा कावळा सगळ्यांच्याच परिचयाचा असल्यामुळे माझा फारच थाट झाला. मला एका कोपऱ्यात बसायला जागा देण्यात आली. सगळा खेळ बाकीच्यांनी मांडायचा.. खाऊ देखील त्यांनीच आणायचा. खेळातला स्वयंपाक झाला की आयतं वाढलेलं ताट माझ्यापुढं येऊ लागलं.
माझा मग तो नीयमच होऊन बसला. खेळायचं ठरलं की मी माझा कावळा कार्यक्रम जाहीर करायची आणि मस्त आयतं बसून सगळा आनंदही घ्यायची. एके दिवशी माझा हा गनिमी कावा इतरांनी ओळखला. सगळीजण भांडायला लागली. “तुलाच गं काय म्हणून कावळा शिवणार? आम्हाला पण शिवणार”. महेश म्हणाला, “ए, आज कावळा मलाच शिवणार”. “आज मला, आज मला” असं करत भांडणाचा जोर वाढला. आम्ही एकमेकांचे गळे, केस,गाल पकडले. नखांनी करामती दाखवायला सुरूवात केली. आमचे चढलेले आवाज ऐकून क्षणातच कोणाची आई, कोणाचा भाऊ, कोणाची मावशी धावत आले. आम्हाला एकमेकांपासून सोडवण्यात आलं. भांडणाचं कारण विचारण्यात आलं. कोणीच सांगेना. शेवटी मीच पुढे होऊन कारण सांगितलं. शाबासकी मिळण्याऐवजी आम्हाला भरपूर चोप मिळाला. पुन्हा असला खेळ खेळायचा नाही अशी सक्त ताकीदही मिळाली.
मधले खूप दिवस मला त्याचा जरा विसरच पडला. एके दिवशी आजोबा वारल्याची बातमी आली. आई सारखी रडत होती. मी या दिवसांत सतत बाबांसोबत होते. तेरा दिवसांनी आम्ही एका कुठल्यातरी गावी नदीकाठी गेलो. बाबा, मामा, आणखी बरेच लोक, एक शेंडीवाला ढेरपोट्या ब्राम्हण, असे अनेकजण मला न कळेल अशा भाषेत बरंच काही बोलत होते. काहीतरी विचित्र चाललं होतं एवढं मात्र खरं. तिथचं भात ठेवला होता. आई म्हणायची, “अन्न नेहमी झाकून ठेवावं. वाया घालवू नये”. इथे मात्र उघड्यावर तो भाताचा गोळा ठेवला होता. एका भुकेल्या जीवासाठी तो पुरेसा होता. पण त्याच्यासाठी होताच कुठे तो ? भाताला भात म्हणायचं सोडून ही सगळी मंडळी त्याला पिंड पिंड असं म्हणत होती. मग मला कळालं की ती कावळ्याला देखील बोलावत होती. एकदंर या प्रसंगी कावळा उपेक्षित नव्हता, तर चक्क हिरो होता. पण त्याला माणसाचं हे दुटप्पी वागणं कळत असावं. कारण तो समोर असूनही येत नव्हता. नुसती मजा बघत होता. आणि हे सर्व लोक लाचार, अगतिक होऊन त्याची विनवणी करत होते. वाघासारखा गुरगूर करणारा मामा आज अगदी शेळी होऊन गेला होता. मी मात्र आजही कावळ्याच्या बाजूनं होते. मी जोरात ओरडले, “ए काऊदादा, या सगळ्यांना अद्दल घडव. तू येऊच नकोस. उघडा भात खाऊ नकोस. हवं तर मी माझ्यातलं अर्ध चॉकलेट देईन तुला”. मी असं म्हणताच त्यानं ते लक्षपूर्वक ऐकलं असावं. तो नाचत नाचत आला आणि पुन्हा झाडावर जाऊन बसला.
माझं काय चुकलं मला कळलंच नाही. पण सगळे माझ्यावर चिडले. इतर वेळी माझे खूप लाड करणारा माझा मामा, पण तोही लाल लाल डोळे करून माझ्याकडे बघू लागला. यानंतर मला तिथून हलवण्यात आलं. त्या कावळ्याने त्या भाताचं काय के लं हे मात्र मला समजलं नाही. हळूहळू मी त्याला विसरत गेले. शाळेची वेळ वाढली. आता मी मोठी होतेय असं म्हणत आई, बाबा, दादा घरातली सगळीच मला लहानमोठी कामं सांगू लागली. वर 'तू आता मोठी होते आहेस' असंही सारखं सांगू लागली. शाळा,गृहपाठ, खेळणं यात दिवस भराभर पळत होते.
आणि मग तो दिवस उजाडला. मी झोपले होते. सुट्टीचा दिवस होता. आईच्या हाकांचं संगीत कानावर पडत होतं, “राणी उठ, नऊ वाजत आलेत” तर कधी, “कार्टे, उठ लवकर, सूर्य डोक्यावर आलाय”. या हाका ऐकत मी माझी स्वप्नं बघत होते. एवढ्यात महेश आला. नेहमीप्रमाणं मला उठवू लागला. माझ्या तळपायाला गुदगुल्या करू लागला. मी आळस झटकून उठले आणि त्याला म्हणाले, "महेश, चल आपण सायकल सायकल खेळू”. आमचा नेहमीचा आवडता खेळ होता. पायाला पायाचे तळवे जोडले की आमची चार पायांची सायकल सुरू व्हायची.
महेश कॉटवर बसला आणि आमची चार पायांची सायकल सुरू झाली, तिने वेग घेतला. महेश वेगवेगळे आवाज काढत होता. मी टाळ्या वाजवत होते. एवढ्यात विंचू चावावा तसा महेश ओरडला, “ए, बघ, बघ, तुला काय झालंय, तुझ्या फ्रॉकला रक्त लागलंय”. मला वाटलं महेश माझी गंमत करतोय. पण नाही. माझा फ्रॉकच काय, कॉटवरची चादरही लालेलाल झाली होती. आता मी घाबरले. मी रडतच बाबांना हाक मारली. बाबा आले. आई देखील आली. ते माझ्याजवळ येणार तोच आईनं खुणेनंच त्यांना बाहेर पाठवलं.
मला आईचा आणि बाबांचा दोघांचाही राग आला. महेश मात्र माझा खराखुरा मित्र होता. तो अगदी माझ्या जवळ थांबला. मला म्हणाला, “घाबरू नकोस. मी आहे ना तुझ्याजवळ. रडू नकोस हं”. मी त्याचा हात घट्ट पकडून ठेवला. मला आधाराची खूप गरज होती. आईनं महेशकडे बघितलं. आईला नेहमी महेशच खूप कौतुक असायचं. पण आज तिला काय झालं होतं कुणास ठाऊक. ती त्याच्यावर ओरडलीच. तो जात नव्हता तेव्हा आणखी रागावली आणि तिने जवळ जवळ त्याला हाकललंच. महेश डोळ्यातलं पाणी आवरत निघून गेला.
आता मी एकटी उरले होते. आई माझ्याजवळ - नाही - जवळ नाहीच. ती माझ्यापासून खूप दूर उभी होती. माझा एवढा राग का करावा तिने? काय झालंय मला? ती मला दुरूनच म्हणाली, “ए, तुला कावळा शिवलाय. दूर हो, शिवू नकोस कुणाला”.
असा कसा हा कावळा मला न सागंता शिवून गेला? या कावळ्याने माझ्या चिमुकल्या विश्वात खूप मोठी उलथापालथ केली. त्यानंतर माझं आणि बाबांचं जे नातं होतं ते बदललं. महेशला माझ्यापासून दूर ठेवण्यात आलं. माझ्यावर अनेक गोष्टी लादण्यात आल्या. काय काय करायचं नाही याच गोष्टींचा त्यात जास्त समावेश होता. माझं सुंदर जग उध्वस्त करण्यात आलं होतं. मला सारखं रडायला येत होतं. आई जवळ हवी होती. पण ती तर माझा स्पर्शही टाळत होती. हे सगळं केवळ एका क्षणात झालं होतं.
ज्या कावळ्याला मी सतत जवळचं मानलं, ज्या कावळ्याच्या बाजूने मी भांडले, त्याच कावळ्याने मला असं एकटं करावं? या एकटेपणाच्या काळात त्याने माझ्याकडे ढुंकूनही बघितलं नाही.
आयुष्यातला नाजूक काळ, जिथे मायेची, प्रेमाची, आधाराची गरज होती, तिथेच या कावळ्याने मला फसवलं. माझ्याशी प्रतारणा केली.
Add new comment