तुमको न भूल पायेंगे....... राजकपूर - पुरूष उवाच दिवाळी 2020

तुमको न भूल पायेंगे....... राजकपूर - पुरूष उवाच दिवाळी 2020

रणबीरराज कपूर हा ‘द ग्रेटेस्ट शोमन ऑफ इंडियन सिनेमा’ म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत गाजला. तो एक कसदार अभिनेता, यशस्वी निर्माता, कुशल दिग्दर्शक आणि संगीताची उत्तम जाण असणारा दर्दी रसिक होता. 1971 साली भारत सरकारद्वारा पद्मभूषण पुरस्कार देऊन त्याला गौरवण्यात आलं. तसंच 1987 साली दादासाहेब फाळके पुरस्कारानं त्याला सन्मानित करण्यात आलं. ‘बरसात’, ‘आवारा’, ‘आह’, ‘अनाडी’, ‘श्री. 420’, ‘जागते रहो’, ‘जिस देशमे गंगा बहती है’, ‘संगम’,‘मेरा नाम जोकर’ यातल्या काही चित्रपटांना फिल्म फेअर पुरस्कारानं गौरवलं गेलं, तर काही चित्रपटांच्या कलात्मकतेची समीक्षकांनीही भरभरून वाखाणणी केली.  केवळ भारतातच नाही तर रशियात राज कपूर आणि नर्गीस यांचे चित्रपट बघण्यासाठी लोक तौबा गर्दी करत. तिथल्या लोकांसाठी राजकपूर म्हणजे एखाद्या दंतकथेपेक्षा वेगळा नव्हता. ‘श्री 420’ या चित्रपटानं रशियामध्ये विक्रम केला होता. युरोप, रशिया, मध्यपूर्व, इराण, वेस्ट इंडीज आणि पूर्व आफ्रिका या सगळ्याच देशांमध्ये राज कपूरच्या चित्रपटांनी प्रचंड धुमाकूळ घातला होता. 

राजकपूरचा जन्म 14 डिसेंबर 1924 या दिवशी आजच्या पाकिस्तानमधल्या पेशावर इथे झाला. पृथ्वीराज कपूर यांना आपल्याला पहिला मुलगाच होणार असं वाटत होतं आणि त्यांनी त्याच्या जन्माआधी एक तास आपल्या बायकोच्या उशीखाली ‘रणबीरराज कपूर’ अशी त्याच्या नावाची चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती. पुढे चित्रपटात काम करताना सुटसुटीत नाव धारण करण्याच्या हेतूनं आपल्या नावातलं रणबीर काढून राज कपूर असं नामकरण राज कपूरनं स्वतःच केलं. आपल्याला कदाचित माहीत नसेल, पण हिंदी चित्रपटसृष्टी दुमदुमवून सोडणारे राजकपूर आणि दिलीपकुमार हे दोघंही अभिनेते एकाच गावचे आणि बालमित्र होते! त्यांची मैत्री शेवटपर्यंत अबाधित राहिली.

राजकपूर लहानपणापासून अभ्यासात हुशार नव्हताच. शाळा म्हणजे कोंडवाडाच असं त्याला वाटत असे. शाळेत जाणं कसं चुकवता येईल याचाच तो सातत्यानं विचार करत असे आणि शाळेला शक्य तितक्या दांड्याच तो मारत असे. राज कपूर लहानपणापासून स्वभावानं अतिशय लहरी, पण जिद्दी आणि मनमिळाऊ होता. कुठल्याही वयोगटातल्या माणसांशी त्याची पटकन मैत्री होत असे. दिसायला गोरापान, निळे डोळे आणि सुदृढ प्रकृती यामुळे तो सगळ्यांनाच आवडत असे. लहान असताना राज कपूरला मातीची खेळणी बनवण्याचा नाद होता. तासन्तास तो या खेळात रमून जात असे. तसंच संगीत ऐकतानाही तो त्यात तल्लीन होऊन जात असे. राज कपूरनं पं. जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे संगीताचे धडेही गिरवले होते. लहान असताना मुरी नावाच्या डोंगराळ प्रदेशातल्या अनेक गावांमध्ये राजनं कित्येक कार्यक्रमांमधून तिथल्या गावकर्‍यांसमोर आपल्या गाण्याचे कार्यक्रम सादर केले होते. एकदा बिहारच्या आपदग्रस्तांसाठी पृथ्वीराज कपूर पैसे जमा करत असताना नाटकाचा प्रयोग संपल्यावर हातातली झोळी पसरून लोकांना मदतीचं आव्हान करत होते. त्या दिवशी राज कपूरनं आपल्या वडलांना आव्हान करताना बघितलं आणि तो तडक स्टेजवर आला आणि त्यानं एका चित्रपटातली दोन गाणी उपस्थित प्रेक्षकांना गाऊन दाखवली. त्याच्या गाण्यांतल्या भावनांनी लोकांच्या हृदयाला हात घातला. लोक मंत्रमुग्ध होऊन गाणं संपलं तरी आपापल्या जागेवर खिळून तसेच उभे राहिले. भानावर येताच त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि पृथ्वीराज कपूरची झोळी पैशांनी भरून टाकली. राज कपूर संगीत क्षेत्रात गेला असता तर उत्तम संगीतकार आणि कुशल गायक नक्कीच झाला असता यात शंकाच नाही!

नापास होत होत राज कपूर कसाबसा मॅट्रिकपर्यंत पोहोचला, पण मॅट्रिकलाही तो नापासच झाला. त्यामुळे अखेर एके दिवशी ‘ये अपने बस की बात नही’ म्हणत त्यानं तथाकथित शिक्षणाला कायमचा रामराम केला. आपल्या वडलांना तो म्हणाला, ‘एखाद्याला डॉक्टर व्हायचं असेल तर तो मेडिकल कॉलेजमध्ये जातो. वकील व्हायचं असेल तर तो लॉ कॉलेजमध्ये दाखल होतो. मला चित्रपटसृष्टीत जायचं आहे; अभिनय करायचाय; दिग्दर्शन करायचंय; चांगले चित्रपट निर्माण करायचेत आणि यासाठी मला आता या चौकटीतलं शिक्षण घेण्यासाठी आणखी 5 वर्षं वाया घालवायची नाहीत.’ खरं तर राज कपूरचे वडील पृथ्वीराज कपूर त्या काळचे दिग्गज अभिनेता म्हणून प्रसिद्ध होते. चित्रपटसृष्टीत आपला हा लहरी मुलगा काही करू शकेल याबद्दल त्यांना खात्री नव्हती. पण त्यांनी राजचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांनी त्याला न्यू थिएटर्समध्ये बरोबर न्यायला सुरुवात केली. तिथे  त्या वेळचे प्रसिद्ध गायक पंकज मलिक, सैगल यांचं गाणं ऐकून राज कपूरचे कान चांगलेच तयार झाले. त्यानंतर भालजी पेंढारकरांच्या जयप्रभा स्टुडिओत राज कपूर आपल्या वडलांबरोबर जात राहिला. तिथे तो पडेल ती कामं करत राहिला. या काळात त्यानं दिग्दर्शन कसं केलं जातं, चित्रिकरणाआधी सराव कसा केला जातो, संवादफेक कशी केली जाते याचं बारकाईनं निरीक्षण केलं. त्याचं तल्लीन होऊन हे सगळं बघणं भालजी पेंढारकरांनी हेरलं होतं. ‘हा मुलगा पुढे चित्रपटसृष्टीत नावलौकिक कमावेल’ असं त्यांनी पृथ्वीराज कपूरना म्हटलं. भालजींचे ते शब्द अक्षरशः पुढे खरे ठरले. 

एकदा भालजी पेंढारकर यांनी राज कपूरला आपल्या चित्रपटात नारदाची लहानशी भूमिका दिली. या चित्रपटात वाल्मिकीच्या भूमिकेत पृथ्वीराज कपूर काम करत होते. वाल्मिकीला बघून नारद, ‘अरे मुर्खा’ असं म्हणतो असं दृश्य होतं. आपल्या वडलांना बघून ती शिवी राज कपूरच्या ओठाबाहेर काही केल्या निघेचना. अखेर भालजींनी, ‘ते तुझे वडील नाहीत आणि तूही त्यांचा मुलगा नाहीस. ते फक्त एक लुटारू आहेत आणि तू नारद आहेस’ असं समजावून सांगत त्याच्याकडून अभिनय करवून घेतला. राजनं त्या छोट्याशा प्रसंगात आपला जीव ओतला. भालजींनी खुश होऊन त्याला आशीर्वाद तर दिलाच, पण पुढे ‘स्वतःच्या मालकीचा स्टुडिओ काढ’ असं म्हणत पाच हजार रुपये आर्शीवादपर त्याच्या हातात ठेवले. राजनं भालजींबद्दलची कृतज्ञता तशीच जपली आणि आपल्या स्टुडिओत त्यांची आठवण म्हणून भगवा ध्वज कायम ठेवला.

त्यानंतर पृथ्वीराज कपूर यांनी मुंबईतल्या रणजित स्टुडिओच्या चंदुलाल शहा यांच्या हातात त्यांनी राज कपूरला सोपवलं. त्यांनी चंदुलालशी बोलताना दोन अटी घातल्या. एक म्हणजे आपल्या मुलाला पृथ्वीराज कपूरचा मुलगा म्हणून वागणूक दिली जाऊ नये आणि दुसरं म्हणजे तो जी काही कामं करेल त्याचे पैसे देऊ नयेत. एका साध्या कामगाराप्रमाणेच त्याच्याकडून वाट्टेल ती कामं करून घ्यावीत. असं असलं तरी पृथ्वीराज कपूर यांनी आपल्या मुलाला खर्चायला दरमहा तीस रुपये द्यायचा सुरुवात केली. राज कपूरनं इथे सगळीच कामं न कुरकुरता केली. इथेच कॅमेरा कसा वापरावा याचं तंत्र त्यानं शिकून घेतलं. कॅमेरा हाताळणं, संगीत ऐकणं आणि जो जे सांगेल ती ती कामं विनातक्रार करणं या गोष्टीं राज कपूर तिथे करत होता. यानंतर बॉम्बे टॉकीजमध्ये 200 रुपये महिना पगारावर राज कपूरला काम मिळालं. गंमत म्हणजे राज कपूरचा मित्र दिलीपकुमार याच बॉम्बे टॉकीजमध्ये अभिनयाचं काम 1200 रुपयांवर करत असताना राज कपूर मात्र एक साधा कामगार म्हणून 200 रुपयांवर काम करत होता. यानंतर राज कपूरनं पृथ्वी थिएटर्स या आपल्या वडलांच्याच संस्थेत काम करायला 201 रुपये पगारावर सुरुवात केली. इथे तो रंगमंच व्यवस्था, प्रकाश योजना आणि संगीत यातले बारकावे शिकला. ही कामं करत असताना राज अभिनयाची लहानमोठी पडतील ती आणि मिळतील ती कामं करतच होता. 

1947 मध्ये केदार शर्मानं राज कपूरची कामावरची निष्ठा पाहून ‘नीलकमल’ या चित्रपटात नायकाच्या भूमिकेसाठी निवडलं. या चित्रपटाची नायिका मधुबाला होती. मात्र हा चित्रपट फारसा चालला नाही. पण कामाचा अनुभव राजकपूरला फायद्याचा ठरला आणि त्यानं वयाच्या 24 व्या वर्षीच म्हणजे 1948 मध्येच आर. के. फिल्म्सची स्थापना केली. त्यानं ‘आग’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आणि या चित्रपटानं मात्र यश मिळवलं. या चित्रपटाची तयारी सुरू असताना प्रेमनाथ आपली लष्करातली नोकरी सोडून पृथ्वी थिएटरमध्ये दाखल झाला होता. प्रेमनाथच्या वडलांना आपल्या मुलाचं हे वागणं जराही आवडलं नव्हतं. तेव्हा त्यांची समजूत काढण्यासाठी राज कपूर प्रेमनाथबरोबर त्यांच्या घरी गेला. तेव्हा शेजारच्या खोलीतून सतारीचे स्वर त्याच्या कानावर पडले. त्याची पावलं आपोआपच त्या दिशेनं वळली आणि तिथे सतार वाजवत असलेली एक गोड तरूणी त्याच्या नजरेस पडली. तिथे असलेल्या तबल्याची साथ त्यानं तिला द्यायला सुरुवात केली. तबला आणि सतार यांची जुगलबंदीच सुरू झाली. ही तरूणी म्हणजे प्रेमनाथची बहीण कृष्णा होती. हीच पुढे कृष्णा कपूर बनून राज कपूरच्या आयुष्यात त्याची अर्धांगिनी म्हणून आली आणि तिनं शेवटपर्यंत त्याला चांगली साथ दिली.

‘आग’ या चित्रपटातल्या नायिकेच्या भूमिकेसाठी राज कपूरला सुरैया किंवा नर्गीस या त्या वेळच्या आघाडीच्या नट्यांना घ्यायचं होतं. सुरैयाच्या घरच्यांनी या चित्रपटासाठी अव्वाच्यासव्वा रक्कम मागितल्यामुळे राज कपूरची पावलं नर्गीसच्या घराकडे वळली. नर्गीसची आई जद्दनबाई हिला जाऊन राज भेटला. त्या वेळी नर्गीस स्वयंपाकघरात भजी तळत होती. पिठात बुडवलेल्या हातानं ती तशीच दार उघडायला आली. तिला त्या अवस्थेत बघून राज कपूर तिच्याकडे फक्त बघतच राहिला. शेवटी वैतागून नर्गीसनं ‘काय काम आहे लवकर बोला’ असं म्हटल्यावर तो भानावर आला. वैतागलेल्या नर्गीसनं त्याच्याशी बोलत कपाळावर आलेल्या बटा मागे सारण्यासाठी केसांना हात लावला आणि त्या वेळी हाताचं पीठ केसांना लागलं. नर्गीसची ही भेट राज कपूर कधीच विसरला नाही. (पुढे बॉबी चित्रपटात त्यानं या प्रसंगाचा वापर केला.) नर्गीस त्या वेळची आघाडीची नायिका होती. हा एवढा लहान मुलगा काय चित्रपट बनवणार असा विचार करून जद्दनबाईनं राज कपूरला अनेक अटी तर घातल्याच पण या कामाचा मोबदला म्हणून चाळीस हजार रुपये सांगितले. त्यापैकी 5 हजार रुपये अ‍ॅडव्हान्स म्हणून द्यायचे होते. ही रक्कम त्या वेळी खूपच मोठी होती. तिला वाटलं आता राज कपूर तिथून निघून जाईल. पण राज कपूरनं सगळ्या अटी मान्य केल्या आणि दुसर्‍याच दिवशी 5 हजार रुपये जद्दनबाईच्या हातात ठेवले. या चित्रपटात फ्लॅशबॅक या नव्या तंत्राचा वापर राज कपूरनं अतिशय यशस्वीरीत्या केला होता आणि लोकांनी या चित्रपटाला डोक्यावर उचलून घेतलं.

राजकपूरवर नेहरू आणि समाजवादी विचार यांचा खूप मोठा प्रभाव होता. त्यामुळे त्याच्या बहुतेक सर्वच चित्रपटांमध्ये सामाजिक संदेश पेरलेला असतो. मानवतावादाची आदर्श कल्पना आणि मानवी मूल्यं यांच्याविषयी त्याचे चित्रपट भाष्य करतात. विषमता, बेरोजगारी, स्त्री-पुरुष समानता आणि भ्रष्टाचार, अशा अनेक प्रश्नांवर त्याचा चित्रपट प्रेक्षकांशी बोलतो आणि विचार करायला भाग पाडतो. पण याचबरोबर राज कपूरला प्रेक्षकांच्या गळी कडू गोळी उतरवायची असेल तर ती शुगर कोटेड हवी हे कळलेलं होतं. त्यामुळे तो चित्रपट मनोरंजनाच्या दृष्टीनं कसा तयार करता येईल याकडे त्याचं बारकाईनं लक्ष असायचं. म्हणूनच त्याच्या चित्रपटात उत्तम कथाबीजाबरोबरच निसर्ग आणि चटकदार व्यक्तिरेखा, तसंच श्रवणीय संगीत या सगळ्यांची भरभरून पेरणी केलेली असायची. राज कपूरच्या प्रत्येक चित्रपटात भावना आणि प्रणय यांचा उत्कट मिलाफ असायचा. प्रेक्षकांची नाडी त्याला अचूकपणे कळायची. राज कपूर इतका भाऊक आणि हळवा होता, की त्याच्याकडे कोणी गरजू माणूस नोकरी मागायला आला की त्याला ‘नाही’ म्हणणं त्याच्या खूप जिवावर येत असे. कामगारांच्या अडचणी आणि त्यांची सुखदुःखं तो जातीनं समजून घेत असे. आपल्या कामगारांच्या लग्नालाही तो आवर्जून न विसरता जात असे. स्वभावानं तो अत्यंत नम्र आणि विनयशील होता. 

‘आग’, ‘बरसात’ आणि ‘आवारा’ या चित्रपटात राज कपूर - नर्गीस या जोडीनं कहर केला. या चित्रपटांनी प्रचंड यश मिळवलं. राज कपूर आणि नर्गीस यांच्या भेटी वाढल्या आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. एखादी स्त्री जेव्हा पुरुषाच्या प्रेमात पडते, तेव्हा ती सर्वार्थानं त्याची होते. नर्गीसचंही तेच झालं. जद्दनबाई हयात असेपर्यंत नर्गीसवर अनेक बंधनं होती. पण जद्दनबाईच्या मृत्यूनंतर मात्र नर्गीसला स्वातंत्र्य मिळालं आणि ती राज कपूर आणि त्याचा आर. के. स्टुडिओ यासाठी रात्रंदिवस झटू लागली. राज कपूरला नर्गीस म्हणजे आपलं स्फूर्तीस्थान वाटत असे. मात्र राज कपूर एका स्त्रीच्या प्रेमात रमणारा पुरुष नव्हता. खरं तर राजकपूर ‘वूमनायजर’ म्हणूनच हिंदी चित्रपटसृष्टीत ओळखला जायचा. तो सतत कुणाच्या न कुणाच्या प्रेमात पडत राहणारा माणूस होता. ‘माझ्या चित्रपटातल्या नायिकेच्या प्रेमात पडल्याशिवाय मला कामच करता येत नाही’ तसंच ‘माझी नायिकाही माझ्याशी जोपर्यंत समरस होत नाही, तोपर्यंत त्या कामाची मला स्फूर्ती मिळत नाही आणि त्या कामात जिवंतपणा येत नाही’ असं तो म्हणायचा. त्यामुळे नर्गीस जरी त्याच्या आयुष्याचा भाग असली, तरी पद्मिनी, वैजयंतीमाला, पद्मिनी कोल्हापुरे, झीनत अमान, मंदाकिनी अशा अनेक स्त्रिया त्याच्या आयुष्यात आल्या, असं म्हटलं जातं. स्त्री सौंदर्य कशा रीतीनं चित्रपटात दाखवायचं यात तो चांगलाच वाक्बगार होता. त्याच्या नायिकांच्या अंगप्रदर्शनाबद्दल टीकाकार टीका करत, सगळीकडे वाद-चर्चा झडत पण असं असलं तरी प्रेक्षक आवर्जून त्याचे चित्रपट बघायला जात. एक मात्र नक्की होतं चित्रपट बघताना ते श्रृगांरिक प्रसंग आंबटशौकिनांसाठी मुद्दाम जाणीवपूर्वक टाकले आहेत असं प्रेक्षकांना मुळीच वाटायचं नाही आणि राज कपूर ते ते प्रसंग चित्रित करताना ही दक्षता आवर्जून घ्यायचा. राज कपूरच्या नायिकांचं शरीरसौष्ठव दाखवताना तो पांढर्‍या तलम साडीचा वापर करत असे. तिचे उन्नत उरोज कसे दाखवता येतील याकडे त्याचा कटाक्ष असे. त्यामुळेच पद्मिनी असो, की अंगाखांद्यावर पाणी झेलणारी मंदाकिनी असो, तिचे अवयव ठळकपणे त्या वस्त्रांआडूनही प्रेक्षकांना दिसत आणि त्यांच्या नजरांना सुखावण्याचं काम करत. 

राजकपूरच्या चित्रपटांमध्ये संगीत हा त्या चित्रपटाचा आत्मा असे. संगीतकार शंकर-जयकिशन, गीतकार शैलेंद्र यांना घेऊन राजकपूरनं संगीताच्या दुनियेत वेगळा ठसा उमटवला. त्याच्याइतका संगीतातला दर्दी दुसरा कोणी शोधून सापडणार नाही. कवी शैलेंद्र हा डाव्या विचारसरणीचा होता. त्याची ‘जलता पंजाब’ ही ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणारी कविता ऐकून राज कपूर त्याचा चाहता झाला. राज कपूरच्या बहुतेक चित्रपटांना शैलेंद्रचीच गीत ठरलेली असायची. राज कपूरचा तो अतिशय जिवलग मित्र होता. तसंच ‘आवारा’, ‘आह’, ‘श्री 420’ या चित्रपटांचा लेखक आणि डावी विचारसरणी असलेल्या के. अब्बास यांच्याशीही राज कपूरचे सूर जुळले होते. ‘श्री. 420’ या चित्रपटाच्या नावामागची गोष्ट खूप गंमतशीर आहे. या चित्रपटात वाममार्गाला गेलेल्या आणि नंतर सन्मार्गानं वाटचाल करू इच्छिणार्‍या एका युवकाचा प्रवास होता. या चित्रपटाला कुठलं नाव द्यायचं हे काही केल्या ठरत नव्हतं. एकदा स्टुडिओत दोन कामगार भांडत राज कपूरजवळ आले आणि एकमेकांची तक्रार करताना त्यातला एक जण म्हणाला, ‘साब, ये आदमीने चारसोबीसी करके मुझसे 50 रुपये लिए है. ये आदमी पक्का चारसोबीस है....’ त्याक्षणी राजकपूरच्या डोक्यात ट्यूब पेटली आणि त्यानं त्या कामगाराच्या हातात 100 रुपयांची नोट बक्षिसी म्हणून ठेवली आणि आपल्या चित्रपटाचं नाव 420 असं नक्की केलं. त्या वेळी नर्गीसनं हे नाव जरा अर्धवट वाटतं असं म्हणून 420 च्या आधी श्री लावलं आणि ‘श्री. 420’ प्रेक्षकांसमोर वाजतगाजत समोर आला. या चित्रपटातून ‘स्वतःचं दुःख विसरा आणि दुसर्‍याला हसवत स्वतःही हसत राहा’ असा संदेश देण्यात आला होता. 

यानंतरच्या ‘बूट पॉलिश’ या चित्रपटानंही भारतातच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती मिळवली. ‘जागते रहो’ यातला राज कपूरचा अभिनय चार्ली चॅप्लीनच्या अभिनयाशी मिळताजुळता होता. शहरीकरणानं माणुसकी हरवलेल्या लोकांचं चित्रण यात केलं होतं. या चित्रपटात राज कपूरचा मित्र आणि आवडता संगीतकार शंकर-जयकिशन ऐवजी इप्टाचे सलील चौधरी यांची निवड केली. त्यांनी संगीतबद्ध केलेलं ‘जिंदगी ख्वाब है, ख्वाबमे सच है और भला झूठ है क्या.....’ हे गाणं आजही अविस्मरणीय गाण्यांमध्ये मोडतं. 

राज कपूरच्या या स्वभावामुळे अनेकदा कृष्णा कपूर दुखावली जात असे. मात्र तिनं आपल्या नवर्‍याला पुरतं ओळखलं होतं आणि त्याच्या गुणांबरोबरच त्याच्या दोषांनाही स्वीकारून तिनं आपलं संपूर्ण आयुष्य त्याच्याबरोबर व्यतीत केलं. मात्र तीच गोष्ट नर्गीसला जमली नाही. याचं कारण कृष्णा ही राज कपूरची कायदेशीर बायको होती, तर नर्गीसला त्याच्या आयुष्यात कायद्यानं कुठलंच स्थान नव्हतं. नर्गीसला राज कपूरशी लग्न करायचं होतं. तिला त्याच्या मुलांची आई व्हायचं होतं. त्यासाठी ती वेळोवेळी राज कपूरच्या मागे लागायची. पण राज कपूरनं नेहमीच तिच्या या मागणीकडे दुर्लक्ष केलं. तो आपल्या स्थिर कुटुंबाला कुठलीही हानी पोहोचवू इच्छित नव्हता. अखेर नर्गीसनं कंटाळून 9 वर्षांची उत्कट साथ संपवून त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. खरं तर तिनं आत्महत्येचाही प्रयत्न केला, पण ती त्यातून वाचली. तिनं राज कपूरबरोबरचे व्यावसायिक आणि वैयक्तिक दोन्ही स्तरावरचे संबंध तोडले. नर्गीसच्या आयुष्यात अपघातानंच (‘मदर इंडिया’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी खरोखरंच अपघात घडला होता.) सुनिल दत्त आला आणि तिला जे जे हवं ते त्याच्या प्रेमानं तिला मिळवून दिलं. ती तिच्या संसारात आणि मुलांमध्ये रमली. यानंतर मात्र तिनं राज कपूरकडे फिरून वळून बघितलं नाही.

राज कपूर मात्र नर्गीसच्या जाण्यानं खूप दुखावला गेला. तिचं आणि सुनिल दत्तचं लग्न ज्या दिवशी झालं त्या दिवशी तो खूप दारू प्यायला आणि ढसढसा रडला. राज कपूरची एक खासियत होती. राज कपूरनं नर्गीसबरोबर एकत्रित 16 चित्रपटांमध्ये काम केलं. नर्गीस गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात पद्मिनी आली. पद्मिनीनं राज कपूरबरोबर काम करू नये यासाठी तिला आणि तिच्या आईला राज कपूर कसा वूमनायजर आहे अशा अर्थाची असंख्य पत्रं आली. पण राज कपूरमध्ये समोरच्याला संमोहित करण्याची अशी काही जादू होती की पद्मिनीनं या पत्रांना आणि पत्रांमधून आलेल्या धमक्यांना अजिबात जुमानलं नाही. एवढंच काय, पण आपल्या आईच्या विरोधात जाऊन तिनं राजकपूरबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला. 

यांनतर संगमच्या निमित्तानं वैजयंतीमाला राजच्या आय्ाुष्यात आली. त्या वेळी दिलीपकुमार आणि वैजयंतीमाला यांच्यातली जवळीक सगळ्यांनाच ठाऊक होती. असं असताना तिला आपल्याकडे खेचून घेणं हे राज कपूरसाठी फार मोठं आव्हान होतं. त्यातच वैजयंतीमालानं राजकपूरकडे सुरुवातीला दुर्लक्षच केलं होतं. मात्र राज कपूरनं आपला पाठपुरावा अजिबात सोडला नाही. संगम चित्रपटात काम करण्याविषयी तो सारखा तिला विचारत राही आणि ती त्याला ‘पाहू’ म्हणून टाळत असे. एकदा तर राजकपूरनं मुंबईहून मद्रासला (आताचं चेन्नई) तिला चक्क तार (टेलिग्राम) ठोकली आणि त्यात लिहिलं, ‘बोल राधा बोल संगम होगा के नही’ या तारेचा अर्थ वैजयंतीमालाला समजला आणि तिनं ‘होगा, होगा जरूर होगा’ अशी उलट तार त्याला पाठवली. संगम हा सानेगुरुजींच्या तीन मुलं या आणि इंग्लिश कवी आल्फ्रेड टेनिसनच्या इनॉक ऑर्डन या कथाकाव्यावर आधारित होता. हा चित्रपट अर्थातच खूपच गाजला. हा चित्रपट देश-विदेशातही इतका गाजला की तेहरान-इराण या विद्यापीठानं राज कपूरला सिनेमाटोग्राफीबद्दल चक्क डॉक्टरेट प्रदान केली. 

खरं तर संगम चित्रपटाचं नियोजन करत असताना राजकपूरच्या मनात दिलीपकुमारला घ्यायचं होतं. दोघंही आपापल्या जागी दिग्गज कलाकार होते. दोघांचे चाहते या दोघांत ग्रेट कोण म्हणून आपसांत भांडत असत. राज कपूरनं दिलीपकुमारला ‘संगम’ चित्रपटात काम करण्याविषयीचा प्रस्ताव समोर ठेवला. पण दिलीपकुमार राजी व्हायला तयारच नव्हता. चित्रपटाचं कथानक ऐकायची सुद्धा त्याची तयारी नव्हती. राजकपूरनं दिलीपकुमारची खूपच विनवणी केली. आपल्या दोघांच्याही अभिनयाचा या चित्रपटात कस लागणार आहे असं सांगून सुंदर आणि गोपाल या दोन्ही नायकांपैकी हवी ती भूमिका दिलीपकुमारनं निवडण्याची मुभाही राज कपूरनं दिलीपकुमारला दिली. शेवटी दिलीपकुमार अखेर ‘संगम’ चित्रपटात काम करण्यासाठी तयार झाला. मात्र त्यानं राज कपूरला एक अट घातली. राज कपूरनं या चित्रपटाचं दिग्दर्शन करायचं नाही, ‘संगम’ चित्रपटाचं दिग्दर्शन राज कपूर सोडून कोणीही केलं तरी चालेल अशी त्याची मागणी होती. राज कपूरनं दिलीपकुमारला हरप्रकारे समजावलं. पण दिलीपकुमार आपल्या म्हणण्यावर अडून बसला. शेवटी राज कपूरनं दिलीपकुमार ऐवजी राजेंद्रकुमारला गोपालच्या भूमिकेसाठी विचारणा केली आणि ‘संगम’ पूर्ण केला. ‘संगम’ चित्रपट बघताना आपल्याला एक प्रेक्षक म्हणूनही लक्षात येईल की राज कपूरनं गोपालच्या भूमिकेतही कुठेच अन्याय केला नव्हता. सुंदर आणि गोपाल या दोन्ही भूमिका त्यानं तोडीस तोड ठेवल्या होत्या. दिलीपकुमारनं संगमची भूमिका नाकारली, पण ‘संगम’ नं अफाट यश मिळवलं.

संगम चित्रपटानं भरभरून यश मिळवलं आणि त्याचबरोबर राज कपूर आणि वैजयंतीमाला यांच्या प्रेमाच्या चर्चाही सर्वत्र गाजायला लागल्या. या वेळी मात्र कृष्णा कपूर इतक्या चिडल्या की त्यांनी राज कपूरला सरळ धमकी देऊन आपल्या मुलांना घेऊन घर सोडलं आिाण नटराज नावाच्या हॉटेलमध्ये मुक्काम ठेाकला. त्या वेळी पृथ्वीराज कपूर यांनी आपल्या सुनेचं मन वळवलं. इतकंच नाही तर नर्गीसनं स्वतः येऊन कृष्णा कपूरची समजून काढून घरी जायला भाग पाडलं. 

‘संगम’नंतरचे राजकपूरचे चित्रपट बाजारू आणि गल्लाभरू म्हणूनच जास्त गाजले. त्यातला सुरुवातीच्या काळातला आत्मा हरवला. राज कपूरच्या आयुष्यातून नर्गीस, पद्मिनी आणि वैजयंतीमाला गेल्यानंतर तो जास्तच दारू प्यायला लागला. एकदा पृथ्वीराज कपूर यांनी त्याला डोळ्यात पाणी आणून सांगितलं, ‘प्रत्येक बापाची आपल्या मृत्यूनंतर आपल्याला आपल्या मुलानं अग्नी द्यावा अशी इच्छा असते. मात्र तू ज्या रीतीनं दारू पितो आहेस त्यावरून मलाच तुझे अत्यंसंस्कार करण्याची वेळ येते की काय असं वाटतंय. असं झालं तर माझा आत्मा भरकटत राहील. कृपया असा प्रसंग तू माझ्यावर आणू नकोस.’ राज कपूरनं आपल्या वडलांना शब्द दिला आणि त्या दिवसानंतर आपलं पिणं थांबवलं. तसाही राजकपूर आपल्या चित्रपटांचं चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत मांसाहार आणि मद्यपान करत नसे. 

‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटानंतर राज कपूरची प्रकृती खालावत चालली होती. याचं कारण त्याचे जिवलग असलेले मित्र शंकर-जयकिशनमधला जयकिशन, कवी शैलेंद्र, मुकेश, संजीवकुमार, किशोरकुमार यांच्या मृत्यूमुळे तो मनातून खचला होता. मुकेश आणि तो एकमेकांना ‘दो जिस्म मगर एक जान है हम’ असंच समजत असत. राज कपूरला फुप्फुसाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं आणि त्याला 30 मे या दिवशी मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. याच दरम्यान राज कपूरला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याचं जाहीर झालं. आपली प्रकृती चांगली नसतानाही पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यानं दिल्लीला जायचं ठरवलं. 2 मे 1988 या दिवशी दिल्लीतल्या सिटी फोर्ट ऑडिटोरियममध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज कपूरचं नाव पुकारण्यात आलं. राज कपूर आपल्या जागेवरून उठण्याचा प्रयत्न करायला लागला. पण आपल्याला उठणं तर सोडाच, पण श्वासही घेता येत नाहीये ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. त्या वेळचे भारताचे राष्ट्रपती व्यंकटरमण यांनी व्यासपीठावरूनच राज कपूरची ही स्थिती पाहिली आणि ते स्वतः राज कपूरच्या जागेवर पुरस्कार देण्यासाठी पोहोचले. राज कपूरनं धडपडत पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न केला, पण पुरस्कार घेत असतानाच तो पुन्हा खुर्चीत कोसळला. त्याला लगेचच ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आलं. 

राज कपूरची फुप्फुसं निकामी झाली होती. पाच तज्ज्ञ डॉक्टर्स आणि त्यांचा स्टाफ राज कपूरवर रात्रंदिवस उपचार करण्यात गुंतला होता. राज कपूरच्या गळ्याला छिद्र पाडून कृत्रिम श्वास घेण्याची व्यवस्था केल्यानं तो बोलूही शकत नव्हता. त्याला भेटायला आलेला त्याचा जिवलग मित्र दिलीपकुमार आणि सायराबानो यांच्याकडे बघून त्यानं ओठ हलवले, पण तोंडातून शब्द बाहेर पडू शकत नव्हते. ते दृश्य पाहून दिलीपकुमारच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. राज कपूर, दिलीपकुमार आणि देवआनंद हे तिघंही जिवलग मित्र! या तिघांमध्ये दिलीपकुमारचंच लग्न उशिरा झालं. दिलीपकुमारच्या लग्नात ‘मी गुडघ्यावर नाचत वरातीत मिरवेन’ असं राज कपूरनं म्हटलं होतं आणि दिलीपकुमार आणि सायराबानो यांच्या लग्नात राज कपूरनं आपला शब्द खरा केला होता. हे सगळं सगळं दिलीपकुमारला आठवत होतं आणि त्याला आपले अश्रू आवरणं कठीण जात होतं. 

मृत्यूशी झुंज देणार्‍या राज कपूरला अखेर डायलेसिसवर ठेवण्यात आलं. हळूहळू एक एक अवयव निकामी होत त्याची साथ सोडून चालला होता. त्याच्या शरीरावरचं नियंत्रण गेलं आणि त्यातच त्याला हृदयविकाराचे तीन झटके आले. अखेर 2 जून 1988 या दिवशी त्याचा मृत्यू झाला. राज कपूरला 2 मे या दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि योगायोग म्हणजे 3 मे हा नर्गीसचा मृत्यूदिन होता. राज कपूरनं 2 जूनला हे जग सोडलं आणि 1 जून हा नर्गीसचा जन्मदिवस होता. राज कपूरच्या मृत्यूची बातमी जाहीर होताच हिंदी चित्रपटसृष्टीत शोकाकुल वातावरण झालं. धर्मेद्रला आपलं रडू आवरता येत नव्हतं. राज कपूरचा परममित्र देवआनंद याला तर आता हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या मित्राशिवाय जिवंत कशी राहील असं वाटत होतं. बडबड्या स्वभावाचा, गोबर्‍या गालाचा, निळ्या डोळ्यांचा, अवखळ, एका जागी स्वस्थ न बसणारा आणि सतत सगळ्यांना हसवणारा आपला नवरा इतका शांतपणे हालचाल न करता पहुडला आहे आणि तो कधीच उठणार नाही यावर कृष्णा कपूरचा विश्वासच बसत नव्हता. 
राज कपूरचा देह मुंबईला आणण्यात आला. विमानतळापासूनच त्याच्या हजारो चाहत्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. चित्रपटसृष्टीतले सगळेच दिग्गज त्याच्या दर्शनासाठी हजर झाले होते. राज कपूर व्ही. शांताराम यांना गुरू मानायचा. त्यांची प्रकृती ठीक नसतानाही ते आपल्या लाडक्या शिष्याला शेवटचं बघण्यासाठी आले होते. खरं तर दोघंही हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज दिग्दर्शक, दोघांनाही फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं. तरीही ते एकमेकांचे स्पर्धक कधीच नव्हते. राज कपूरनं जेव्हा जेव्हा चांगलं काही केलं तेव्हा तेव्हा व्ही. शांताराम यांनी त्याचं कौतुक करत त्याचा जाहीर सत्कारही केला. ‘माझ्यानंतर माझा वारसा चालवणारी एकमेव व्यक्ती म्हणजे राज कपूर असेल’ अशा शब्दांत व्ही. शांताराम राज कपूरचं कौतुक करत. राज कपूरच्या मृत्यूनंतर दोनच वर्षांत व्ही. शांताराम हे जग सोडून गेले. 

आज 29 वर्षांनंतरही राज कपूर नावाची जादू तशीच कायम आहे. राज कपूर स्वप्नाळू कलावंत होता. पण त्याची स्वप्नं फक्त बघण्यापुरती नव्हती, तर ती स्वप्नं खरी करण्यासाठी तो जिवाचं रान करत असे. आज जरी तो आपल्यात नसला तरी आजही तो आपल्याला सांगतोयः

ये मेरा गीत जीवनसंगीत कल भी कोई दोहरायेगा
जगको हसाने बहरुपीया रूप बदल फिर आयेगा......
कल खेल मे हम हो न हो, गर्दिश मे तारे रहेंगे सदा
ढुढोगे तुम ढुढेगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा
रहेंग यही अपने निशान, इसके सिवा जाना कहाँ
जी चाहे जब हमको आवाज दो.....हम थे यही हम है यहाँ

दीपा देशमुख

Comments

Submitted by Naresh Shikshit. Wed, 05/26/2021 - 16:42

अप्रतिम लेख.राज कपूर यांच्या जिवनातील बारीक सारीक गोष्टींचा आलेख नजरेसमोर ऊभा राहिला. तसचं डोळे पण भरून आले. माझा अत्यंत प्रिय Actor.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.