दी फॅमिली मॅन
श्रीकांत तिवारी म्हणजेच मनोज बाजपेयी हा एनआयए म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिंग एजन्सी ऑफ इंडियाचा भाग असलेल्या टास्क म्हणजे थ्रेट ॲनॅलेसिस अँड सर्व्हिलियन्स सेल मध्ये कार्यरत असतो. त्याचं काम अत्यंत जोखमीचं, गुप्तता बाळगून करायचं असल्यानं आपलं कुटुंब आणि आपलं काम करताना त्याची तारेवरची कसरत चालू असते. एका कॉलेजमध्ये मानसशास्त्राची प्राध्यापक असणारी त्याची सुचित्रा नावाची (प्रिया मणी) सुंदर बायको, ध्रुती आणि अर्थव ही दोन आताच्या काळाबरोबर अपडेट असलेली गोड पण व्रात्य असलेली मुलं आपल्याला सिझन वन मध्ये भेटतात.
या मालिकेच्या दोन्ही सिझनमध्ये काश्मीर, लडाख, दिल्ली, मुंबई, कोचीन, चेन्नई, सिरिया, बलुचिस्तान (चित्रीकरणाला परवानगी न मिळाल्याने लडाख मध्ये सेट उभारला गेला.) फ्रान्स, लंडन, श्रीलंका अशी अनेक ठिकाणं तर दिसतात, तिथल्या निसर्ग, त्या त्या भागाची वैशिष्ट्यं दिसल्यानं त्या ठिकाणातून आपण प्रवास करत असल्याचा फील येतो. त्याच बरोबर देशाची सुरक्षा व्यवस्था अबाधित ठेवणं हे किती जिकिरीचं आणि जोखमीचं काम आहे हे त्या मिशनवरून, अतिरेक्यांच्या विध्वंसक कारवायांवरून, हिंसाचारावरून कळतं. अतिरेक्यांची कट्टर मानसिकता, राष्ट्रप्रेम, राजकारण, स्वार्थी वृत्ती, संशय, मोहाचे क्षण, कौटुंबिक ताणतणाव, वाढत्या मुलांचे वेगळे प्रश्न, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचं लागणारं व्यसन, कामाचा अतिरिक्त ताण आणि त्या तुलनेत सरकारी नोकरीत मिळणारा तुटपुंजा पगार, आयटीमधलं चकचकित पण अत्यंत खोटं आणि कृत्रिम वातावरण, मनामनांमध्ये वाढत चाललेलं अंतर, एका चक्रव्युहात फिरावं तसे फिरणारे असंख्य लोक, अशा इतक्या छटा या वेबसेरिजमध्ये बघायला मिळतात की बघताना आणि बघून झाल्यावर प्रेक्षक सुन्न होतो.
द फॅमिली मॅन या वेबसिरीजचा पहिला सिझन २०१९ मध्येच प्रदर्शित झाला आणि लोकांनी भरभरून पसंती दर्शवली. त्यानंतर २०२१ साली दुसरा सिझन प्रदर्शित झाला. पहिल्या सिझनपेक्षा हा थोडा संथ असला, तरी हाही सिझन तितकाच उत्कंठावर्धक आहे. यातली श्रीकांत तिवारीची भूमिका मनोज बाजपेयीनं जिवंत केलीय. श्रीकांत तिवारी म्हणजेच मनोज बाजपेयी असंच प्रेक्षकांना वाटायला लागतं. कधी त्याच्या तोडातल्या शिव्या खटकतात, तर कधी मुलांनी त्याची उडवलेली चेष्टा बघून आपणही त्यात सामील होतो, कधी त्याच्यातला उतावळेपणा, थापा मारण्याचा स्वभाव बघून राग येतो, तर कधी घराला, बायकोला, मुलांना वेळ देत नसलेला असा फॅमिली मॅन बघून वैतागही येतो. आणि तरीही मनोज बाजपेयीचा श्रीकांत इतक्या पातळ्यांवर कसा काम करतोय याचं आश्चर्य वाटून त्याची पाठ थोपटल्याशिवाय राहवत नाही.
बायकोवरचं प्रेम, तिच्यावर येणारा संशय, आपण घरासाठी वेळ देऊ शकत नाही याची लागलेली टोचणी, टास्क मधलं काम हाच श्वास झालेला मनोज बघणं अतिशय सुरेख असा अनुभव आहे. मनोज बाजपेयी आपल्या सहजसुंदर अभिनयाने सिझन वन आणि सिझन टू वर आपली भरभक्कम पकड आणि छाप सोडतो.
द फॅमिली मॅन या मालिकेतल्या श्रीकांत तिवारी या प्रमुख भूमिकेसाठी अक्षय खन्ना याला विचारण्यात आलं होतं, पण त्यानं अव्वाच्या सव्वा रक्कम मागितल्यामुळे ही भूमिका मनोज बाजपेयीला मिळाली आणि त्यानं ज्या पद्घतीने साकारली आहे की बस्स! यात त्याची बायको सुची हिच्या मित्राच्या अरविंदच्या भूमिकेतला शरद केळकर हाही भाव खाऊन जातो. श्रीकांतचा मित्र जेके हाही प्रेक्षकांच्या जवळचा होऊन जातो. आताच्या अतिस्मार्ट झालेल्या आणि वयात येणाऱ्या मुलांना कसं सांभाळावं हा प्रश्न पडावा अशी यातली अर्थव आणि ध्रुती ही दोन मुलं आहेत. श्रीकांत तिवारीच्या ऑफीसमधले त्याचे जेके पासून अनेक सहकारी आपल्याला या वेबसेरिजमध्य भेटतात. जेकेसारखा सहकारी आणि जिवाला जीव देणारा मित्र या भूमिकेत शारीब हाश्मी यानं जीव ओतला आहे. मुसा, साजिद, मेजर विक्रम, मिलिंद, झोया, चेल्लम सलमान (कल्याण) या पात्रांचा पायाही इतका मजबूत केलाय, की ते तसे का वागतात, त्यांची मानसिकता प्रेक्षकांना सहज समजते.
सिझन टू मध्ये राजीचं पात्र जगणारी - खल प्रवृत्तीचं काम करणारी सामंथा अखिनेनी ही मल्याळम अभिनेत्री खतरा आहे आणि तिची ओ बेबीमधली भूमिका बघून मी तर तिच्यावर फिदाच आहे. तिचे डॉयलॉग खूप कमी आणि तेही मल्याळम भाषेतले असले तरी ती डोळ्यांनी बोलते. तिच्या वेदना, तिचा भूतकाळ, तिच्या व्यथा, तिचं गोठल्यासारखं जगणं बघून थरकाप उडतो. सामंथा आपण तुझे डायहार्ट फॅन झालो आहोत. दुसऱ्या सिझनमध्ये पंतप्रधानांच्या भूमिकेत सीमा विश्वासनं बहार आणली आहे. तिच्याकडे बघून ममता बॅनर्जीचा भास होतो. प्रिया मणी हिचा अभिनय देखील कसदार आहे, पण मनोज बाजपेयी आणि सामंथा पुढे तो दुर्लक्षिला जातो.
राज आणि डीके यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला ‘ द फॅमिली मॅन’चा पहिला आणि नुकताच 4 जूनला प्रदर्शित झालेला दुसरा सिझन ॲमेझॉन प्राईमवर बघून एका दमात संपवला. पहिल्या सिझनबद्दल मनोज बाजपेयी, प्रिया मणी, राज आणि डीके यांना पुरस्कार आणि प्रथितयश वृत्तपत्रांकडून अर्थातच भरभरून प्रशंसा मिळाली. प्राईमवरची ही सर्वाधिक लोकप्रिय मालिका ठरली आहे.
द फॅमिली मॅन ही दोन्ही सिझनची मालिका बघणं म्हणजे एकाच वेळी थरार, उत्कंठा, भीती, काळजी, चीड, हासू, वेदना, या साऱ्यांचा अनुभव घेणं आहे. या मालिकेवर प्रचंड परिश्रम आणि खर्च झाला असणार असं मालिका बघत असताना जाणवत राहतं. विशेष म्हणजे दोन्ही सिझन बघून संपले तरी त्यातली सगळी लहान-मोठी पात्रं आपला ठसा आपल्यावर उमटवून जातात. त्यामुळे जरूर बघा - द फॅमिली मॅन सिझन एक आणि सिझन दोन - ॲमेझॉन प्राईमवर!
दीपा देशमुख, पुणे
Comments
दीपा ताई , फॅमिली मॅन वेब…
दीपा ताई , फॅमिली मॅन वेब सिरीज बघतांना शासकीय कामांमधील बारकावे आणि अडचणी समोर येतात. एखाद्या व्यक्तीला एखाद्या क्षेत्रातील कामाचे कसे व्यसन असते ,ती व्यसनाधिनता मनोज वाजपेयी यांनी उत्तम साकारलेली आहे. सर्वच पात्र खुलून आलेली आहेत. समंथा ने तर नेत्र अभिनय कमाल केला आहे.
आणि सर्वच आपण खूप छान मांडलंय
Excellent Review
I too enjoyed the series. Beautifully described.
Family man
या सिरीयल बद्दल खूपदा ऐकलंय, पण माहित नाही का पण अजूनपर्यंत पार्ट 1पण बघितला नाही, आता तुझं परीक्षण बघून दोन्ही पार्ट एकदम बघणार आहे.
मी बघितला, मस्त सिरीज आहे…
मी बघितला, मस्त सिरीज आहे. All time favourite मनोज वाजपेयी, राजी चे पात्र खूप छान उभे केले आहे. सगळ्याच कलावंतांनी काम छान केले आहे. बालकलावंतांनी ही. छोटे छोटे प्रसंग आपल्या जगण्यात ही घडतात इतके खरे आहेत. उदा. Dhurti ला वडिलांचा फोन येतो तर ती सांगते spam call होता. तसेच बक्षिस घेताना मनोज म्हणतो होम लोन विषयी बोलू का मॅडमशी, medals ठेवून घेतात तेव्हा...... खूप मस्त. थोडी क्रूर दृश्य आहेत. ती बघवत नाहीत.
वा! प्रत्यक्ष बघितल्याचा फिल…
वा! प्रत्यक्ष बघितल्याचा फिल आला.
In reply to वा! प्रत्यक्ष बघितल्याचा फिल… by Anonymous
Thank you
Thank you
फॅमिली मॅन
फॅमिली मॅन या सिरीजचा रिव्ह्यू छान लिहिला आहे. कामाच्या गडबडीत बऱ्याच दिवसात कोणतीच वेब सिरीज पाहिली नाही. उद्यापासून फॅमिली मॅन पाहून संपवतो. आणि मग फीडबॅक सांगतो. मनोज वाजपेयी ला बघणे म्हणजे एक पर्वणी असणार आहे. मजा येईल. लवकरच बघायला हवी. उत्सुकता जाम वाढली आहे.
वेब सिरीज जेवढी रंजक आहे…
वेब सिरीज जेवढी रंजक आहे तेवढीच शब्दरचना.खूप सुंदर मांडणी केली आहे.
Add new comment