'डायरेक्टर्स' प्रकाशन समारंभ
'डायरेक्टर्स' प्रकाशन समारंभ
16 मेची सायंकाळ, एस. एम. जोशी फाउंडेशनचा हॉल हळूहळू रसिक वाचकांनी भरून गेला. मनोविकासचे प्रकाशक अरविंद पाटकर म्हणाले, हॉल ओसंडून वाहायला हवा आणि बघता बघता तसंच झालं. काही लोक मागे उभे राहिले, काही बाहेरच्या जिन्यावर जाऊन बसले, तर काहींनी जागा न मिळाल्यामुळे स्टेजवर बसणं पसंत केलं.
आसावरी कुलकर्णी हिने कार्यक्रम सुरू होत असल्याची सूचना देत सूत्रं आपल्या हाती घेतली. सुप्रिय चित्राव हिची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे आसावरीने मोठ्या मनाने इतक्या वेळेवर सूत्रसंचालनाचं काम हाती घेतलं त्याबद्दल तिचे आभार.
जयप्रद देसाई, सुनील सुकथनकर, अरविंद पाटकर आणि मी व्यासपीठावर स्थानापन्न झालो. मान्यवर पाहुण्यांच्या मागे ‘डायरेक्टर्स’चं बॅनर झळकत होतं. पाहुण्यांचं स्वागत झालं आणि अरविंद पाटकर यांनी डायरेक्टर्स आणि मनोविकास प्रकाशन याबद्दल बोलायला सुरुवात केली. अतिशय नर्मविनोदी शैलीत त्यांनी वाचकांशी संवाद साधला. 15 मिनिटं बोलूनही लोकांना मात्र ते पाचच मिनिटं बोलले असं वाटलं. त्यानंतर दस्तुरखुद्द दीपा देशमुख म्हणजे मी बोलायला उभी राहिले.
पुस्तकाचं मुखपृष्ठ हे त्याच्या अंतरंगात काय आहे हे दाखवणारा आरसाच असतो. डायरेक्टर्सचं इतकं सुरेख मुखपृष्ठ गिरीश सहस्त्रबुद्धे यांनी तयार केलं असून त्यांना सन्मानित करण्यात यावं असं मनापासून वाटत होतं. सुनील सुकथनकर यांनी गिरीश यांचा सत्कार केला. जिने या पुस्तकाच्या सर्व तांत्रिक बाजू सांभाळल्या त्या गौरी खराडे हिचाही सत्कार जयप्रद देसाई यांनी केला.
डायरेक्टर्स हे पुस्तक लिहायला सुरुवात 2017 सालीच झाली होती आणि त्याच वेळी ते अर्पण करायचं तर माझा मित्र धनंजय सरदेशपांडे यालाच असं माझ्या मनाने नक्की केलं होतं. याचं कारण धनंजयमधलं माणूसपण मला नेहमीच भावलेलं आहे. नेमका याच वेळी त्याला जिगीषा संस्थेचा मिलिंद सफई स्मृति पुरस्कारही जाहीर झाला. त्यामुळे त्याचा सत्कार सगळ्यात आधी पुणे शहरात व्हायलाच हवा या भावनेतून नाट्यकर्मी अतुल पेठे यांच्या हस्ते धनंजयला सन्मानित करण्यात आलं.
मी काय बोलले हे आत्ता सांगत नाही. कारण ‘डायरेक्टर्स’ हे पुस्तक कसं आणि का आकाराला आलं याबद्दल पुस्तकात मी सांगितलं आहेच.
मात्र या कार्यक्रमाला रंगत आली ती जयप्रद देसाई आणि सुनील सुकथनकर यांच्यामुळे. नागरिक, हुतात्मा, मुखबीर, कौन प्रवीण तांबे, फिर से आयी हसीन दिलरूबा अशा अनेक चित्रपट-मालिकांचा दिग्दर्शक जयप्रद देसाई याने चित्रपट कसा बघावा आणि त्यासाठी घेतलेले परिश्रम याकडे लक्ष वेधलं. व्यक्तीचं काम हीच त्याची खरी ओळख असते हे सांगत असताना त्याने स्वत:चे काही अनुभव सांगितले. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करून हॅटट्रिक साधणाऱ्या सुनील सुकथनकर यांना कोण ओळखत नाही? त्यांनी सुरुवातीलाच ‘आपल्याला डायरेक्टर्स हे पुस्तक आवडल्याचं’ जाहीर केलं. त्यानंतर त्यांनी व्ही. शांताराम असोत, की राज कपूर असोत. अनेक प्रसंगांना साक्षीदार राहिलेल्या सुनील यांनी त्या आठवणी जागवल्या. उत्कृष्ट आणि देखण्या निर्मितीबद्दल मनोविकास प्रकाशनाचं भरभरून कौतुकही केलं.
खरं सांगायचं तर जयप्रद आणि सुनील या दोघांनी कार्यक्रमरूपी मैफल एका उंचीवर नेऊन ठेवली. आलेला प्रत्येकजण मंत्रमुग्ध झाला. कार्यक्रम संपल्यावर जाताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. (कोरोनाकाळामुळे माझ्या दोन पुस्तकांचं प्रकाशन करता आलं नाही, पण माझ्या आजवरच्या सगळ्याच पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम छान झाले, पण तरीही ‘डायरेक्टर्स’चा प्रकाशन समारंभ जयप्रद देसाई आणि सुनील सुकथनकर यांच्या संवादामुळे ‘पुढल्या दहा हज्जार वर्षांत असा कार्यक्रम होणार नाही’ असा बहारदार झाला. हे सगळं मलाच वाटत नाहीये, तर कार्यक्रम झाल्यानंतर, कालचा संपूर्ण दिवस आणि आजची सकाळ मला येणारे अखंड फोन हेच सांगत होते. थँक्स जयप्रद आणि सुनील सुकथनकर.
भरलेल्या हॉलमध्ये सगळी माझीच माणसं असली, तरी प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात काहीतरी वेगळं करणारी होती. अनिसची तरुणाई, कॉलेजचे विद्यार्थी, असे सगळेच वेगवेगळ्या वयोगटातले रसिक वाचक उपस्थित होते. यमाजी मालकर, रेणूताई गावस्कर, नयन कुलकर्णी, मल्हार अरणकल्ले, नीना भेडसगावकर, अलका वैद्य, सुनिता भागवत, प्रतिभा पानसे, संजय पुजारी, पाश्ते, वैभव देशमुख, गीताली आणि मुकुंद, रवींद्र तांबोळी, इंदुमती आणि महावीर जोंधळे, विकी सॅम, मिलिंद प्रभुणे, प्रांजल आणि अभिजित थोरात, माधुरी आणि वसंत दातार, सुधीर मोघे, रेखा देशमुख, पटवर्धन, नीलम ताटके, शिल्पा, ओंकार, स्नेहल, रोहित, शशी, रिच्या, मॅगी, गीता, गजानन, धनंजय, पूजा, प्रियदर्शन, कल्याण, शंकर, विनू, संकेत, शास्त्री, डॉ. प्रकाश सेठ, अजित दळवी, संजय लकडे, मेधा, अंजली मुळे, शुभांगी मुळे, सुषमा पेठे, डॉ. जेधे, रेणुका माडीवाले, राजश्री, राज, हर्षल, दिग्विजय, दिनेश ज्योति आणि ओनी, किती जणांची नावं घ्यावीत?
आलेल्या सर्वांची मी मनापासून आभारी आहे. तुम्ही या आनंदसोहोळयात सामील झाल्यामुळेच हा कार्यक्रम आनंदाच्या एका मागून एक येणाऱ्या लाटांमध्ये चिंब भिजवून गेला.
(टीप: मी कार्यक्रमाविषयी सविस्तर लिहिलं नाहीये, कारण लवकरच मी जयप्रद देसाई, सुनील सुकथनकर, दीपा देशमुख, अरविंद पाटकर, धनंजय सरदेशपांडे ही सर्व मंडळी काय बोलली याची लिंक पोस्ट करणार आहे. तसच कार्यक्रमाचे सुंदर फोटो रविराज अडसूळ या तरुणाने काढले आहेत. Thanks Raviraj.)
दीपा देशमुख, पुणे
Add new comment