येवल्यात साजरी झालेली अविस्मरणीय बुद्धपोर्णिमा!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पैठणी या दोन गोष्टींनी येवला या ठिकाणाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ आहेत. १३ ऑक्टोबर १९३५ या दिवशी येवला इथे परिषद भरली होती. त्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीररीत्या म्हटलं होतं, ‘मी हिंदू धर्मात जन्मलो असलो, तरी हिंदू धर्मात मरणार नाही.’ आपलं म्हणणं त्यांनी खरं करून दाखवलं. अनेक वर्षं ते अनेक धर्मांचा अभ्यास करत होतेच. त्या त्या धर्माच्या अभ्यासकांना भेटत होते, चर्चा करत होते. या सगळ्यांतून त्यांना बुद्धाची शिकवण, बुद्धाची तत्वं आवडली आणि आपल्या तळागाळातल्या उपेक्षित बांधवांसाठी हाच धर्म योग्य असल्याची खात्री त्यांना पटली. त्यानंतर लक्षावधी दलितांना त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
६ डिसेंबर १९५६ या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला, त्याही दिवशी त्यांना निरोप देताना एक लाख लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, हे असं इतिहासात पहिल्यांदाच घडलं! आजही मुंबईमध्ये १४ एप्रिल आणि ६ डिसेंबर या दिवशी पंधरा लाख लोक, तर नागपूर इथे १४ ऑक्टोबर (धम्मचक्र परिवर्तन दिन) या दिवशी आपल्या या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करायला एकत्र येतात! १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. पं. नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान झाले आणि नेहरूंच्या मंत्रीमंडळात कायदेमंत्री म्हणून बाबासाहेबांनी शपथ घेतली. त्याच वर्षी भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. पं. नेहरू, रामगोपालाचारी, डॉ. राजेंद्र प्रसाद आणि घटना समितीतले इतर सभासद यांच्याशी चर्चा करून बाबासाहेबांनी आदर्श अशी भारतीय राज्यघटना तयार केली. हिंदू समाजातल्या स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा, शिक्षण, संपत्तीत हक्क, घटस्फोट या गोष्टी मिळाव्यात म्हणून संसदेत हिंदू कोड बिल मांडलं. ‘समाजाची प्रगती ही त्या समाजात असलेल्या महिलेची स्थिती आणि गती यावरून ठरत असते’ असं बाबासाहेब म्हणत असत. राज्यघटनेच्या निमिर्र्तीनं भारतीय लोकशाहीचा पाया भक्कम करण्याचं काम केलं. संविधानाद्वारे बाबासाहेबांनी प्रत्येक नागरिकाला व्यक्तिगत स्वातंत्र्याची सुरक्षा प्रदान केली. २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी संविधान सभेनं संविधानाचा स्वीकार केला.
बाबासाहेबांनी समाजप्रबोधनासाठी विपुल लेखन केलं. त्यांनी एकूण ५८ ग्रंथांची निर्मिती केली. बाबासाहेबांना ६ भारतीय आणि ४ विदेशी भाषांचं ज्ञान होतं. इंग्रजी, हिंदी, मराठी, पाली, संस्कृत, गुजराथी, जर्मन, फारसी, फ्रेंच आणि बंगाली भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. त्यांचे ग्रंथ जगभर प्रसिद्ध आहेत. भारतीय संविधान तर भारताचा राष्ट्रग्रंथ मानला जातो. हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे साधारणतः महिन्यापूर्वी मला येवल्याहून एक फोन आला. येवल्यामध्ये ‘बुद्धिस्ट असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ आणि ‘रंजना पठारे बहुउददेशीय सेवाभावी संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धपोर्णिमा साजरी करायची असून या दिवसाचं औचित्य साधून बुद्ध वंदनेचं ब्रेल लिपीत पुस्तकाचं प्रकाशन करायचा कार्यक्रम असल्याचं आयोजकांनी सांगितलं. या कार्यक्रमाला मी प्रमुख पाहुणे म्हणून यावं असा त्यांनी आग्रह केला. अध्यक्ष म्हणून 'ब्रेल मॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळखला जाणारा स्वागत थोरात माझा मित्र असणार होता. मी ताबडतोब होकार दिला.
महाराष्ट्रातून सगळीकडून अनेक अंध व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होत्या. सातार्याची माझी मैत्रीण ऍड. सुचित्रा काटकर ही स्वागत थोरात वर पुस्तक लिहीत असल्यानं ती या कार्यक्रमाला बरोबर येणार असल्याचं मला समजलं. सुचित्रा सातार्यातली एक चांगली नामांकित वकील असून ती अतिशय चांगली लेखिका आहे. तिची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. आम्ही २९ एप्रिल या दिवशी पहाटे सहा वाजता पुण्याहून नाशिकला निघालो. वाटेतच अपूर्व मेघदूत नाटकातली अभिनेत्री तेजस्विनी हिलाही बरोबर घेतलं. वाहनचालक विनायक, सुचित्रा आणि तेजस्विनी यांच्यामुळे प्रवास खूपच सुखाचा झाला.
प्रवास करत असताना मला मात्र मागच्या वर्षी जुन्नरच्या नाणेघाटात आम्ही साजरी केलेली बुद्धपोर्णिमा आठवत होती. ती चांदण्यात न्हालेली रात्र, तो बेभान वाहणारा वारा आणि त्या नव्यानं भेटलेल्या मॅड ग्रुपच्या आठवणी.....मी आठवणीतून बाहेर येईपर्यंत नाशिकमध्ये पोहोचलो. नाशिकमधली कामं आटोपून ३० ला सकाळीच येवल्याकडे निघालो. सुचित्रा, तेजस्विनी, स्वागत आणि मी येवल्यात थेट कार्यक्रमस्थळीच पोहोचलो. आयोजकांनी आमचं स्वागत केलं. सुरुवातीला दोन चार तुरळक लोक तिथे दिसत होती कारण आम्ही देखील तासभर आधीच तिथे पोहोचलो होतो. बघता बघता संपूर्ण मंडप लोकांनी भरून गेला. वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातून सर्वदूर ठिकाणांहून आलेले ते अंधबांधव आणि भगिनी होत्या. कोणालाही दिसत नसताना केवळ बुद्धवंदना आपल्याला आता ब्रेललिपीतून वाचायला मिळणार या ओढीनं ती मंडळी येऊन पोहोचली होती. त्यांनी उन्हाची पर्वा केली नव्हती, की प्रवासातल्या अडथळ्यांची! सगळ्यांच्या चेहर्यावर अमाप उत्साह झळकत होता. आवाजाच्या दिशेनं वळत त्यांची सहज हालचाल सुरु होती. गप्पा सुरू होत्या. अनेकजण आम्हाला येऊन भेटत होते. काहीच वेळात कार्यक्रम सुरू झाला.
या कार्यक्रमाबद्दल घडलेल्या अनेक गोष्टी मला सांगायच्या आहेत. एक तर अंध व्यक्तींसाठी अनेक पुस्तकं आता ब्रेल लिपीत होत असली तरी खूप काम आणखी होण्याची आवश्यकता आहे. तसंच हे काम व्यापक पातळीवर सरकारनं हाती घेण्याची गरज आहे. खूप साध्या साध्या गोष्टीत अंध व्यक्तींना झगडावं लागतं. उदाहरणच घ्यायचं झाल्यास आपल्या मनाला शांतता देणारी, जगण्याला ऊर्जा देणारी अशी प्रार्थना - बुद्ध वंदना - वाचायची असल्यास कुठल्यातरी डोळस व्यक्तीच्या मागे लागून ती ऐकणं याचा त्रास अनेक वर्ष अंध व्यक्तींना होत होता. ही बुद्ध वंदना ब्रेल लिपीत आणण्यासाठी सतीश निकम गेली वीस वर्ष प्रयत्न करत होते. पण प्रत्येक ठिकाणाहून त्यांना नकारच मिळत होता. त्यातच आर्थिक बाजू उभी करणं हेही शक्य होत नव्हतं. अशा वेळी सतीश निकम यांची भेट स्वागत थोरातशी झाली. स्वागतला खूप वाईट वाटलं. पैशाअभावी हे काम अडून राहू नये यासाठी त्यानं क्षणात सतीश निकम यांना सांगितलं, ब्रेल लिपीत ही बुद्धवंदना मी छापून दिली असं समजा. सतीश निकम आणि त्यांच्या इतर सहकार्यांना इतका आनंद झाला की त्यांनी येवल्याला बुद्धपोर्णिमेच्या दिवशी बुद्धाची आणि बाबासाहेंबांची आठवण करत ही बुद्धवंदना प्रकाशित करायचं ठरवलं. आणि मग पुढल्या तयारीनं वेग घेतला. स्वागत थोरातने स्वतःचे पैसे खर्च करून कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वच व्यक्तींसाठी बुद्धवंदना या पुस्तकाच्या प्रती स्वतःच्या गाडीत टाकून आणल्या होत्या. स्वागतसाठी सगळ्यांच्या मनात कृतज्ञभाव भरून आले होते.
या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन येवल्याचे अजितभाई शेख करत होते. त्यांचं मराठी, हिंदी आणि उर्दू या भाषांवरचं प्रभुत्व अप्रतिम होतं. वयानं ६५ ओलांडलेले अजितभाई त्यांच्या उत्साहामुळे फक्त २५ वर्षांचे वाटत होते. सर्वधर्मसमभाव काय असतो ते या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. आलेल्या सर्व श्रोत्यांसाठी अजितभाई शेख यांच्या पत्नीनं स्वतःच्या हातानं जेवण बनवलं होतं. अतिथी देवो भवः म्हणत या पती-पत्नींनी त्यांच्यासाठी ही व्यवस्था केली होती. वैयक्तिक मला अजितभाई शेख यांच्यातला मानवतावाद जपणारा माणूस खूपच भावला. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची भाषणं झाली. प्रत्येकानं मदतीचा हात पुढे केला. उपस्थितांमधून भारताचं संविधान ब्रेलमध्ये यानंतर यावं अशी इच्छा व्यक्त केली, तेव्हा स्वागत थोरातनं ती जबाबदारी पुनश्च स्वतःच्या खांद्यावर घेतली. मुंबईमध्ये या संविधानाच्या प्रकाशनाचा सोहळा साजरा करण्याची जबाबदारी मुंबईहून आलेल्या प्रकाश पंडागळे या पाहुण्यांनी लगेचच स्वीकारली.
माझ्या भाषणात मी बाबासाहेब, बुद्ध आणि बुद्धपोर्णिमेच्या दिवशी घडणारा हा सोहळा याबद्दल बोलत हर्षद, तेजस्विनी, अजितभाई आणि उपस्थितांचे विशेष आभार मानले. या सगळ्यांमधला उत्साह आणि स्वाभिमान मलाही खूप काही देऊन गेला. माझं विज्ञाननिष्ठ, कलेला जपणारं, विवेकवादी आणि मानवतावादी असं लिखाण ब्रेलमधून आणण्यासाठी स्वागत थोरात आणि मी प्रयत्नशील राहू असं आश्वासन मी दिलं. या वेळी अतिशय सुरेल आवाजात बुद्धाचं गीत गायलेली करूणा अहिरे ही तरुणी मला खूप आवडली.
अध्यक्षीय समारोप करण्यासाठी स्वागत उभा राहिला असताना मी बघत होते. काहीच दिवसांपूर्वी जिवावर बेतलेल्या प्रसंगातून हा माणूस पुन्हा उभा राहिला हे मला आठवत होतं. बायपास सर्जरी, पायाची शस्त्रक्रिया आणि त्यानंतर लगेचच या माणसानं पुन्हा कामाला सुरुवात केली होती. ना प्रसिद्धीची हाव ना संपत्तीचा मोह! काश्मीर असो वा भारतातलं कुठलंही जंगल असो, हा माणूस एकटाच पर्यावरणाचा, पशुपक्ष्यांचा अभ्यास करत आणि त्यांची छायाचित्रं टीपत भटकंती करत असतो. अंधासाठी काम करताना तर त्यानं अनेक दिवस डोळ्याला पट्टी बांधून अंधांचं जगणं अनुभवलं. आज अनेक ठिकाणी स्वखर्चानं प्रवास करत हा माणूस अनेक अंध व्यक्तींना मोबिलिटीचं प्रशिक्षण देतो. अंधाना स्वाभिमानानं इतरांची कमीत कमी मदत घेऊन जगता यावं हा त्याचा हेतू असतो. आपलं बोलणं आणि जगणं एकसारखं असावं अस मला नेहमीच वाटतं. तेच स्वागतमध्येही मला दिसत होतं. स्वागतनं त्याच्या कवितेनं कार्यक्रमाचा शेवट केला. त्या ओळी होत्या ः
कोणीतरी कोणासाठी आयुष्य वेचावे
जीवनाच्या वाटेवरी सुख पेरीत जावे
कोणीतरी कोणासाठी नीत्य गीत गावे
त्या गीताच्या बोलांनी आयुष्य हे फुलावे
कोणीतरी कोणासाठी मुक्त हास्य व्हावे
त्या हास्याच्या मोहराने आसमंत भारावे
कोणीतरी कोणासाठी...................
दीपा देशमुख, पुणे.