अहमदनगरमधली रंगलेली मुलाखत - स्लमडॉग सीए अभिजीतची!

अहमदनगरमधली रंगलेली मुलाखत - स्लमडॉग सीए अभिजीतची!

तारीख
-
स्थळ
Nagar

अहमदनगरमधली रंगलेली मुलाखत - स्लमडॉग सीए अभिजीतची! थिंक ग्लोबल फाऊंडेशन, न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीनं आयोजित स्लमडॉग सीए अभिजीत थोरात याची मुलाखत नगर इथं १३ मार्च २०१८ ला संपन्न होणार होती. खरं तर मागच्या दोन महिन्यात केवळ माझ्या प्रकृतीमुळे दोनदा ठरलेल्या तारखा बदलाव्या लागल्या आणि नेमक्या परीक्षा जवळ आलेल्या असताना ही मुलाखत ठरली. कारण अहमदनगरवासीयांना ऑगस्टपर्यंत हा कार्यक्रम लांबवायचा नव्हता. आज हा कार्यक्रम खूपच चांगला झाला. माझ्या मनात परतीच्या प्रवासात असताना अनेक विचार येत होते. खरं सांगायचं तर मी माझ्या मनातलं केवळ लिहून बोलू शकत असे. पण 'जीनियस'नं - त्यातल्या २४ वैज्ञानिकांनी मला बोलायला शिकवलं. माझ्या हातातला लिहिलेला कागद त्यांनी भिरकावून दिला. ‘तू मनापासून बोल, लोकांना ते नक्कीच आवडेल’ अशी खात्रीची थाप त्यांनी माझ्या खांद्यावर मारली. दुसरी गोष्ट मी मुलाखतकार नाही.

या क्षेत्रातले सुधीर गाडगीळ, डॉ. आनंद नाडकर्णी ही दोन माणसं माझ्यासाठी आदर्श! त्यांचं बोलणं, त्यांची सोपी भाषा, त्यांचा मीश्किलपणा आणि मुलाखत रंगली पाहिजे, त्यावरची पकड जाता कामा नये हा आत्मविश्‍वास या दोघांमध्ये मला नेहमीच जाणवतो. आपण त्यांच्यासारखे होऊ शकणार नाही, पण प्रयत्न करायला हवा. या भावनेतून मी याही क्षेत्रात पाऊल टाकलं. यात अच्युत गोडबोले यांचं मार्गदर्शन मला खूप मोलाचं ठरलं. ते नेहमीच मला सांगतात, ‘दीपा पहिलीच्या मुलांसमोर जरी तुला बोलायचं असलं तरी तयारी कर.’ त्यांच्या या बोलण्यामुळे कितीही छोटा कार्यक्रम असो वा मोठा....गृहपाठ केल्याप्रमाणे मी तयारी करते आणि समोरच्या श्रोत्यांकडून, रसिक प्रेक्षकांकडून पसंती आली की मग आपला अभ्यास सार्थकी लागल्याचं समाधानही मिळतं.

जे आजही मिळालं. जेव्हा कॉलेजच्या तरुणाईनं जवळ येऊन पसंतीची पावती दिली. आजचा कार्यक्रम खूप चांगला झाला. आयोजक खुश झालेले दिसले. प्राचार्य झावरेसर यांचं व्यवस्थापन कौशल्य आणि मनमिळाऊ स्वभाव याचा प्रत्यय प्रत्येक गोष्टीतून येत गेला. संस्थेचे विश्‍वस्त खानदेशेसर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यांनी आमची सगळी पुस्तकं वाचली होती आणि माझी भेट होणार म्हणून ते आवर्जून आले होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यांच्यासारखी निगर्वी व्यक्ती आपलं कौतुक करतेय म्हटल्यावर मला नगरवासीयांकडून हा देखील गौरवच झाल्यासारखं वाटलं. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे डॉ. सतीश जगताप यांनीही खूप आपुलकीनं आमचं आदरातिथ्य केलं. कार्यक्रमाचं निवेदनकर्ते खूपच चांगले होते. अतिशय नेमक्या शब्दात त्यांनी आपली भूमिका पार पाडली. खरं तर नगरमधल्या अनेक व्यक्तींची नावं घ्यावी लागतील कारण ही यादी खूपच मोठी आहे.

थिंक ग्लोबल फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण काळे....याला अहोजाहो म्हणून शकत नाही कारण याच्याशी जे नातं निर्माण झालंय ते कधीच तुटणारं नाही. अर्ध्या रात्री धावत येईल असा हा किरण.....सतत काहीतरी चांगलं करण्यासाठी धडपडत असतो आणि त्याच्या या धडपडीत साथ द्यायला मला नेहमीच आवडतं. आजच्या कार्यक्रमाचं त्यानं केलेलं आयोजन अतिशय अप्रतिम असं होतं. आज मुलाखतीच्या कार्यक्रमाला परीक्षा जवळ आलेल्या असूनही तरुणाईनं सभागृह भरलं होतं. मला नगरचे युवा नेहमीच आवडतात. याचं कारण दोन वर्षांपूर्वी सदाशिव अमरापूरकर पुरस्कार नगरमध्येच मिळालेला असताना त्या वेळची तरुणाई मला आठवली. त्यांनी मुलाखतीला दिलेला भरभरून प्रतिसाद आठवला. त्या वेळी अच्युत गोडबोले आणि माझी मुलाखत साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी अतिशय सुरेखरीत्या घेतली होती. आजच्या कार्यक्रमाबद्दल! अभिजीतनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून सीए केलं. या मुलाखतीच्या वेळी स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटाच्या क्लिप्स मधून मधून पडद्यावर दाखवण्यात येत होत्या.

चित्रपटातला नायक चमत्कार झाल्याप्रमाणे जिंकतो....पण प्रत्यक्षातला अभिजीत मात्र यश मिळवण्यासाठी झगडतो, विद्येची साथ सोडत नाही....मूल्यांना सोडचिठ्ठी देत नाही....प्रत्येक निंदकाला आपल्या मार्गातला प्रेरणाकर्ता मानत तो पुढे जातो. आपल्या उपकारकर्त्यांच्या आठवणीनं त्याचे डोळे भरून येतात. त्याचा प्रवास उलगडताना खूपच मजा आली. यशाला shortcut नसतो हे मी तरुणाईला सांगितलं. अभिजीतबरोबर आज त्याच्या यशात आणखी एका व्यक्तीचं नाव घ्यावं लागेल. ती म्हणजे माय मिररचे प्रकाशक/लेखक - मनोज अंबिके! मनोज अंबिके यांनी स्लमडॉग सीए ही अभिजीतच्या जीवन प्रवासावर कादंबरी लिहिली आणि लोकांनी तिला भरभरून प्रतिसाद दिला. असं वाटतं की अभिजीतला मनोज अंबिके यांनी त्याला स्वतःलाही ठाऊक नसेल इतकं छान ओळखलंय.

अभिजीतच्या मनाच्या तळाशी जाऊन जणू काही मनोज अंबिके यांनी त्याचा प्रवास आणखीनच हृदयस्पर्शी केलाय. आज या कार्यक्रमाला अभिजीतच्या आयुष्याला कलाटणी देणारे विक्रांतदादा सपत्नीक आले होते. हा माणूस एखाद्या चित्रपटात शोभेल असाच आहे. जो कोणी याला भेटेल तो मित्र होईल हेही नक्की! आजच्या कार्यक्रमाला माझ्या पुस्तकांचे चाहते आणि अभिजीतवर मुलासारखं प्रेम करणारे पुस्तकवेडे अप्पाही नगरला आले होते. माझं लिखाण आवडणारी, माझ्यावर प्रेम करणारी आयटी क्षेत्रात सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली अश्‍लेषा ही तरुणीही मुद्दाम नगरला या कार्यक्रमासाठी आली होती. अभिजीत सातभाई, रुद्र, स्वप्नील आणि अनेक कॉलेज तरुण-तरुणी या वेळी खूप प्रेमानं भेटले. प्रत्येकाला सेल्फी काढायचा होता.

डोक्याला डोकी लागून निघालेला सेल्फी स्नेहाची उधळण करत होता! स्नेहल, राजवर्धन तुमची सोबतही खूप काही देऊन गेली! रुद्र या तरुणाला कॅनव्हास खूप आवडल्याचं सांगत होता, तर अभिजीत सातभाई मुलाखतीच्या शैलीने प्रभावित झाला. मी मात्र माझ्यासाठी आणखी नवीन, चांगले युवा मित्र मिळाले या आनंदात होते. सभागृहातून बाहेर पडताना तरुणाई ‘जय हो, जय हो’ हे ए.आर. रेहमानचं गाणं गुणगुणत बाहेर पडत होती .... प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस नवं काहीतरी शिकवतोय हे मात्र खरं!

 

दीपा देशमुख १३ मार्च २०१८.

कार्यक्रमाचे फोटो