यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्यूनियर कॉलेज, देवराष्ट्रे
अतिशय सुरेख निसर्गरम्य देवराष्ट्रे या यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मगावी व्याख्यानाच्या निमित्त जाण्याची संधी मिळाली. एवढ्याशा चिमुकल्या गावात शाळा आणि कॉलेज इतकं सुरेख बांधलंय आणि बाजूलाच यशवंतराव चव्हाण यांचं स्मारक आणि ऐसपैस असं अप्रतिम ऑडिटोरियम आहे. एकूणच हा सगळा परिसर आकर्षून घेणारा, ओढ लावणारा वाटला. तिथे पोहोचताच सगळा थकवा दूर झाला. स्मारकावर यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला हार घालून त्यांच्या स्मृती मनात जागवल्या. माझ्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग! अशा उंचीवरच्या इतक्या थोर पुरुषाला हार घालून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हृद्य क्षण! खरं तर यशवंतराव चव्हाण यांचं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक कर्तृत्व इतकं उत्तुंग आहे की त्यांच्यापुढे आपण कोणीही नाही ही जाणीव मनात आहेच आणि असतेच. मात्र त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन सतत कार्यमग्न राहायचं हे मात्र मनात वेळोवेळी ठामपणे नक्की होतं.
ऑडिटोरियममध्ये मुले आणि मुली छान शिस्तीत बसलेली होती. तालबद्ध टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं. फारशी औपचारिकता न करता लगेचंच माझ्या व्याख्यानाला सुरुवात झाली. आयुष्यात विज्ञान का महत्वाचं, आपल्या जीवनाचा पाया विज्ञान आणि गणितावर कसा उभा आहे आणि यांची कास धरून कलेला आयुष्यात बरोबर घेऊन जगणं कसं सुंदर करता येईल याविषयी मुलांमुलींशी संवाद झाला. आपल्या कर्तृत्वानं यशस्वी झालेल्या एका विद्यार्थीनीचा खास सत्कार या प्रसंगी करता आला. एवढ्याशा गावात राहणारी मुलगी जिद्दीनं पुढे जातेय याचं कौतुक वाटलं. यानंतर यशवंतराव चव्हाण जिथे जन्मले, त्या घरात जाता आलं. इतकं इतकं छान वाटलं. जणू काही यशवंतराव आणि कुटुंबीय, ‘बस घटकाभर शांत, निवांत’ असं मला म्हणताहेत असंच मला वाटलं.
मी आख्खं घर फिरून बघितलं. आता तिथे यशवंतराव चव्हाण यांचं ग्रंथालय, फिल्म्स आणि फोटोंचा संग्रह बघायला मिळाला. फोटो तर इतके बोलके आणि सुरेख की एका एका फोटोपासून पाय उचलत नव्हता. ही वास्तू अतिशय चांगल्या रीतीनं जतन केलीय आणि देखरेखही उत्तम! या प्रसंगी पत्रकार दत्ताजीराव सपकाळ आणि प्रदीप मोहिते यांनी मला अनेक गोष्टींची माहिती दिली आणि सोबतही केली. त्यांची मी मनापासून आभारी आहे.
परतीच्या प्रवासात यशवंतरावांचं वास्तव्य असलेल्या कर्हाड इथल्या 'विरंगुळा' या बंगल्याला भेट दिली. जणूकाही ते माझंच घर असावं इतकी आपलीशी वास्तू ती वाटते. अतिशय साधासा टुमदार बंगला, बाहेर प्रसन्न बाग, पारिजातक, प्राजक्त आणि अनेक झाडं स्वागता उभी. तिथले व्यवस्थापक मनोहरराव डकरे यांनी मनापासून स्वागत केलं. ८२ वर्षांचा एक ठणठणीत तब्येतीचा आणि आवाजाचा तरूण मला तिथल्या एकएक गोष्टींबद्दल माहिती देत होता. निघताना त्यांनी मला त्यांनी लिहिलेलं पुस्तक भेट दिलं. इथेही असलेले फोटो अतिशय सुरेख आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा आढावा घेणारे हे फोटो बघून अभिमानानं छाती फुलून आली.
इथे असलेला यशवंतराव आणि वेणुताई यांचा एक फोटो मला खूप आवडला. त्याखाली त्यांचंच एक वाक्य उदृत केलेलं होतं. यशवंतराव यांनी वेणुताईंना म्हटलं होतं ः ‘माझ्या आयुष्याला आकार आणि आशय देणारी माझी पत्नी’ इतकं उत्कट नातं असणार्या त्या जोडीला मनात तसंच घेऊन मी पुण्याच्या रस्त्याला लागले आणि 'विरंगुळा'चा निरोप घेतला.
दीपा देशमुख, पुणे