प्रकाशन प्रमोदच्या तीन पुस्तकांचं!
काल सायंकाळी पत्रकार भवनमध्ये गजलकार प्रमोद खराडे याच्या मनस्पंदन, समतोल आणि एकांताचं स्वगत या तीन पुस्तकांचं प्रकाशन झालं. पत्रकार भवनला पोहोचताच सुरेखशा तीन पुस्तकांच्या रांगोळीनं स्वागत केलं. हॉलमध्ये पोहोचले तर सगळे सजावटीत गर्क होते. प्रमोदनं माझं स्वागत केलं. काहीच वेळात हॉल भरला आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. गजलचं विश्व काही वेगळंच आहे. गजलच्या विश्वात असणारी माणसं जणूकाही गजलसाठीच जगतात. गजल हाच त्यांचा श्वास आणि गजल हाच त्यांचा ध्यास असलेला बघायला मिळतो. गजलशिवाय त्यांचं दुसरं जगच नसावं. अशी सगळी माणसं पत्रकार भवनच्या हॉलमध्ये एकत्रित झाली होती. तसंच आपल्या मित्राच्या प्रमोदच्या प्रेमापोटी नगर, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, मुंबई, ठाणे, पनवेल आणि अहमदाबाद अशा अनेक ठिकाणांहून ती येऊन पोहोचली होती.
कार्यक्रमाचं सुरेख निवेदन तितकीच सुरेख असलेली प्राजक्ता करत होती. मला वाटतं गजल ही तुमच्या व्यक्तिमत्वातही सौंदर्य भरत असावी. तिचं दिसणं, तिचं बोलणं, तिचं भाषेवरचं प्रभुत्व सगळं काही देखणंच होतं. प्रास्ताविक जनार्दननं केलं. छानच बोलला. पुस्तकाच्या निर्मितीप्रक्रियेचा प्रवास त्यानं सांगितला. प्रमोदची बहीण अपर्णा हिनं घरातलं वातावरण आणि प्रमोदची गजलेची आवड यावर संवाद साधला. भावाचं यश बघून तिला गहिवरून आलं होतं. प्रमोदनंही आपलं मनोगत व्यक्त केलं. आपल्या वडिलांनी आपल्याला वाचनाची गोडी कशी लावली यावर तो बोलत होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ए. के. शेख हे आपले गुरू असून त्यांनी आपलं बोट धरून गजलेची वाट कशी दाखवली, तर दीपाताईंच्या भेटीतून आपण किती गोष्टी शिकलो यावर त्यानं संवाद साधला.
सुना है वहाँ फूल आने लगे, चलो अपने आसूँ ठिकाने लगे
उसे चंद लम्हाने छिना गया, जिसे अपना कहते जमाने लगे
हा शेर त्यानं पहिल्यांदा ऐकला, तेव्हा तो अंर्तबाह्य थरारून गेला. आपल्या गजलेच्या प्रवासात भेटलेले मार्गदर्शक कसे होते यांच्याबद्दल तो बोलत होता. सुरेशचंद्र नाडकर्णींबरोबरच्या आठवणीमध्ये तो रमला. सुरेश भट यांच्या आठवणीही यानिमित्तानं निघाल्या. मोठमोठे लोक आपल्याला भेटत गेले आणि त्या सगळ्यांमुळे आपली जडणघडण झाली असं तो म्हणाला.
तिन्ही पुस्तकांचं प्रकाशन जोरदार झालं. प्रकाशनाच्या वेळी कविता क्षिरसागर, प्रसाद जोशी आणि सुनिती लिमये या गजलकारांनी प्रमोदच्या काही गजल सादर केल्या. सुनितीनं तर प्रमोदची गजल आपल्या भावपूर्ण आवाजात गावून सादर केली आणि रसिक श्रोत्यांची वाहवा मिळाली. कविता आणि प्रसाद यांचं दमदार आवाजातलं सादरीकरणही मनाला भिडणारं होतं. खरं तर गजलचा एक अनोखा माहोल तयार झाला होता. स्वरूपानं लावलेलं अत्तर माझ्या आसपासच नव्हे तर संपूर्ण पत्रकार भवनमध्ये सुगंधी वातावरण निर्माण करण्यात यशस्वी झालं होतं.
मला प्रमुख पाहुणी म्हणून बोलायचं होतं. खरं तर मी प्रमोदला कार्यक्रमासाठी दोन-अडीच महिने आधी होकार दिला असला तरी तो केवळ त्याच्या प्रेमापोटी. पण आता मात्र आपण गजलेच्या विश्वापासून बरंच दूर आहोत आणि इतक्या सगळ्या गजल दिग्गजांसमोर आपण काय बोलणार असा प्रश्नही मनाला पडला होता. मी बोलायला सुरुवात केली. गजलेशी माझा आलेला संबंध, ए. के. शेख आणि जहीर शेख यांच्याशी झालेली औरंगाबादच्या अखिल भारतीय उर्दू, हिंदी आणि मराठी गजल संमेलनातली पहिली भेट, प्रमोदची भेट, जनार्दन, मनोज आणि वैभव यांच्याकडून गिरवलेले गजलेचे धडे, मनोजनं माझ्या गजलांना लावलेल्या सुरेख चाली सगळं काही या निमित्तानं आठवत गेलं. मग मात्र गजलेपासून थोडी दूर गेले आणि गद्याच्या प्रांतात प्रवेश झाला. माझ्या पुस्तकांमधले सगळे नायक शास्त्रज्ञ असले, तंत्रज्ञ, चित्रकार असले आणि संगीतकार असले तरी त्या सगळ्यांमध्ये मला एक संवेदनशील माणूस सापडला होता आणि त्यांच्या आयुष्यात प्रमोदच्या गजलेनं, कवितेनं प्रवेशही केलेला मला दिसला. त्यांच्या दुःखात सामील होऊन प्रमोद म्हणत होता,
गजल ही येते कशी, हे जर कळाया पाहिजे
अंतरीची जखम आधी भळभळाया पाहिजे
मला जाणवलं, प्रमोदच्या मनाची स्पंदनं त्याचं एकांतातलं स्वगत आणि मनाचा समतोल, त्याच्या जगण्यातून जाणवतो. त्याच्या चढउताराच्या काळातही तो सकारात्मक विचारानंच पुढे जातो आणि गजलेची सोबतच त्याला त्या त्या दुःखातून बाहेर निघण्याचं बळ देते. प्रमोदच्या तिन्ही पुस्तकांची मुखपृष्ठ सुनितीनं अतिशय सुरेख तयार केली आहेत. मी सुनितीचं, ले-आऊट, मांडणी करणार्या जनार्दनचं आणि प्रमोदचं अभिनंदन करून माझं बोलणं संपवलं.
अध्यक्षीय समारोप करताना ए. के. उभे राहिले. ए. के. म्हणजे चालतीबोलती गजल आहे. त्यांचं सगळं व्यक्तिमत्वच गजलेसारखं आहे. हळुवार, सौम्य, मृदू! प्रमोदच्या घराशी आणि एकूण पुण्याशी असलेलं आपलं दृढ नातं याबद्दल ए.के. बोलले. त्यांनी प्रमोदच्या गजलेची वैशिष्ट्यं सांगितली. त्याचबरोबर त्यांनी काही गजला गावूनही दाखवल्या. ए. के. जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांनी थांबूच नये असं वाटतं. त्यांच्या प्रत्येक वाक्यातून काव्य बहरताना दिसतं. प्रमोदबरोबरचं गुरू-शिष्याचं नातं त्यांनी उलगडून दाखवलं. क्षणात काही घडून जाते, कुणीतरी आवडून जाते प्रमोदचं हे काव्य त्यांनी सादर केलं. त्याच्या शेरातली ताकद त्यांनी दाखवली. प्रत्येकाला आपला वाटावा असा शेर! भेटायचे होते तिला पण भेटली नाही कधी ती रोज टाळत राहिली, मी रोज शोधत राहिलो प्रमोद म्हणजे एक हळुवारपणा, बोलण्यातलं मार्दव आणि नजाकत असल्यानं त्याच्या गजलाही तशाच हळुवार असतात. त्याच्या गजलेतली प्रासादिकता एकही शब्द इकडेतिकडे होऊ देत नाही. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे प्रमोद असं ते म्हणाले.
गजलेची अतिशय सुरेख व्याख्या एके शेख यांनी केली. ते म्हणाले, ‘गजल आमच्या जाणिवांची क्षितीजं विस्तारत असते, आमच्या भाषेची जाणीव अधिकाधिक समृद्ध करत असते. गजल आम्हाला शुद्धलेखन शिकवत असते. ही गजलेली खास खासियत असल्याचं एके म्हणाले. माय मराठीची श्रीमंती मराठी गजल वाढवत असते. मराठी भाषा अधिकाधिक लवचिक बनवण्याचं कामही मराठी गजल करत असते. आपलं लेखन शुद्ध असलं पाहिजे, प्रासादिक असलं पाहिजे असंही ते म्हणाले. गजल ही रुपवती, लावण्यवती असून ती जेव्हा येते, तेव्हा तिच्यासाठी पायघड्याच घालायला हव्यात. मखमली शब्दांच्या पाकळ्या तिच्या पायाखाली अंथरायला हव्यात. अभद्र शब्दांचे काटे तिच्या मार्गातून दूर केले पाहिजेत. कारण गजल म्हणजे कुण्या रुपवतीचे लयबद्ध पदन्यास. गजल म्हणजे जखमी कळ्याफुलांचा हव्यास, गजल म्हणजे आकाशीच्या विद्युलतेचा ध्यास, गजल म्हणजे कवी कुलगुरू कालिदास वाल्मिकी व्यास.’
अडीच तास चाललेला हा कार्यक्रम कधी संपला कळलंच नाही. कार्यक्रमानंतर अर्थातच सगळ्यांनी प्रमोदभोवती गराडा घातला आणि मी ते सगळं कौतुक माझ्या मनात साठवत कार्यक्रमाचा सुगंध मनात साठवत सगळ्यांचा निरोप घेतला.
दीपा देशमुख, पुणे