'अथश्री'मध्ये कोजागरीची रंगत ‘सिंफनी’ संगे!
कोजागरीच्या रात्री 'अथश्री'मध्ये सिंफनीचा कार्यक्रम करण्याचं दोन महिन्यांपूर्वीच ठरलं होतं. सकाळपासून एक उत्सुकता मनाला लागली होती. याचं कारण अथश्रीमध्ये असलेले सर्वच ज्येष्ठ स्त्री-पुरुष आपापल्या क्षेत्रात कारकीर्द गाजवलेले, अनुभवी, ज्ञानी.....आयुष्याच्या सायंकाळी आणखीनच अंतर्मुख होऊन आयुष्याचा, आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करणारे....ते आपल्या 'सिंफनी'ला कसा प्रतिसाद देतील ही ती उत्सुकता होती. त्यातच गीतानं इतक्या प्रेमानं आग्रहानं खास माझ्या आवडत्या रंगाची पैठणी माझ्यासाठी पाठवली होती, तिचा आग्रह टाळणं शक्यच नव्हतं. मग पैठणीसह अपूर्व आणि मी अथश्रीमध्ये पोहोचलो.
सरिता (आवाड) नुकतीच गोव्याहून आल्यामुळे तिनं अतिशय सुरेख असे कानातले मला भेट दिले. (कार्यक्रमाच्या आधीच रंगा खुश झाला.) तांत्रिक बाबी बघण्यासाठी आम्ही हॉलमध्ये आलो आणि सगळ्या गोष्टींची पूर्तता केली. आसावरी, गीता, आर्या, विश्वास काळे, जयश्री काळे आणि अथश्रीचे सर्व सदस्य हॉलमध्ये जमले होते. हॉल खच्चून भरला होता. कार्यक्रम सुरू झाला. सरितानं जरा हटके पद्धतीनं आमची ओळख करून दिली. आम्हीही सिंफनीत रंगून गेलो. एक एक किस्सा उलगडत गेलो आणि एक एक गाणी सादर होत गेली. 'सायोनारा' या सुरेख गीतानं कार्यक्रम कधी संपला कळलंच नाही.
याच भावना कार्यक्रम संपल्यावर प्रत्येकानं आवर्जून जवळ येऊन बोलून दाखवल्या. पुन्हा आलंच पाहिजे असा प्रेमळ दमवजा आग्रहही केला. सरिताच्या वतीनं काल अथश्रीकरांना आणि आम्हाला खास आटवलेलं दूध प्यायला देण्यात आलं.
मनात दरवळत असलेली सिंफनी घेऊन आम्ही सगळ्यांचा निरोप घेत घरी परतलो.
दीपा देशमुख, पुणे.