'बहर' काव्यसंग्रह प्रकाशन समारंभ- कर्‍हाड

'बहर' काव्यसंग्रह प्रकाशन समारंभ- कर्‍हाड

तारीख
-
स्थळ
कराड

५ ऑगस्ट २०१८ या दिवशी कर्‍हाडमध्ये ‘बहर’ या दिलीप कुलकर्णी लिखित काव्यसंग्रहाचं प्रकाशन करण्याची संधी रेणुका माडीवाले या मैत्रिणीमुळे मला मिळाली. रेणुका आणि मी डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याकडे आरईबीटी( रॅशनल इमोटिव्ह बिहेविअरल थेरॅपी) कोर्स करताना आमची मैत्री झाली. तिचं स्मार्ट दिसणं, तिचा कलात्मक दृष्टिकोन, तिची चित्रकला हे सगळं मी त्या वेळी खूप जवळून बघितलं. तिनं हक्कानं मला बोलावलं आणि मीही लगेच होकार दिला. काल कर्‍हाडमध्ये झालेला हा कार्यक्रम खूपच देखणा, अप्रतिम असा झाला. 

खरं तर पुण्याहून कर्‍हाडकडे जाण्याचा रस्ता खूप सुंदर रस्ता आहे. दोन्ही बाजूला हिरवाई दिसते, समोर दूरवर डोंगर दृष्टीला पडतात, रस्त्याच्या मधोमध रंगिबेरंगी विशेषतः पिवळ्या आणि गुलाबी रंगाची फुलझाडं नजरेला पडतात. प्रवास कधी संपला कळतच नाही. मी यापूर्वी कर्‍हाडमध्ये गेले ते काही शाळांमध्ये, इंजिनियरिंग कॉलेजमध्ये आणि कल्पना चावला विज्ञान केंद्रामध्ये! या सगळ्याच ठिकाणी मी विज्ञान या विषयावर बोलले होते. पण काल मात्र मी कवितेवर बोलले. मला नेहमीच वाटतं, की विज्ञान आपल्याला डोळसपणे जगायला शिकवतं, तर कला आपल्या आयुष्यात सौंदर्य भरते. त्यामुळे दोन्हीची तितकीच नितांत आवश्यकता आपल्याला आहे. 

'कॅनव्हास' या चित्र-शिल्प कलेवरच्या पुस्तकानंतर गेली दोन वर्षं मी विज्ञानात बुडाले. गॅलिलिओपासून ते रिचर्ड फाईनमन आणि आर्यभट्टापासून ते डॉ. जयंत नारळीकर यांच्यापर्यंतचा अभ्यास झाला आणि त्यांचा प्रवास ‘जीनियस’ या मालिकेतून उलगडता आला. पूर्वी मला वाटायचं, हे शास्त्रज्ञ झापड लावल्यासारखं आयुष्य जगत असावेत. म्हणजे प्रयोग आणि प्रयोग! त्यांचं सगळं जीवन प्रयोगशाळेत बंदिस्त असावं. पण या सगळ्या शास्त्रज्ञांनी माझे डोळे उघडले. 

गॅलिलिओनं त्याचा गणित या विषयावरचा 'आसेयर' नावाचा ग्रंथ लिहिला. पण किती सुरेख भाषेत. त्याचं वक्तृत्व देखील तसंच होतं. तो जेव्हा शिकवायचा, तेव्हा त्याचे विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन त्याचं बोलणं ऐकायचे. याचं कारण तो बोलायचाच तसा. 'आसेयर'मधलीच एक गोष्ट आहे. एका जंगलात एक माणूस एकटाच राहायचा. कुशाग्र बुद्धीच्या त्या माणसाला निसर्गातल्या प्रत्येक गोष्टींबद्दल जिज्ञासा आणि कुतूहल होतं. जंगलातल्या पशु-पक्ष्यांविषयी त्याला खूपच प्रेम वाटत असे. झुळझुळ वाहणारे झरे, भरारणार्‍या वार्‍याला वृक्षवेलींनी दिलेला मनमुक्त प्रतिसाद, आकाशातल्या मेघांनी पृथ्वीला दिलेली साद आणि पक्ष्यांच्या मंजुळ आवाजातलं संगीत ऐकताना हा माणूस भान हरपून जायचा. आपल्याला संगीतातलं बर्‍यापैकी कळतं असं मग त्याला वाटायचं.

एकदा रात्रीच्या वेळी रातकिड्यांचा लयीतला किणकिणता नाद ऐकत असतानाच अचानक त्या माणसाच्या कानावर एका वेगळाच मधुर  आवाज पडला. त्याला स्वस्थ बसवेना. हा कोण नवा पक्षी जंगलात येऊन दाखल झालाय, हे बघण्यासाठी तो माणूस मग आवाजाच्या दिशेनं शोध घेत निघाला. काहीच अंतरावर त्याला एक गुराखी मुलगा लाकडाची पोकळ नळी तोंडात धरून फुंकर मारत हुबेहूब पक्ष्यासारखे मंजूळ आवाज काढत असलेला दिसला. त्याला त्या मुलाच्या संगीतातली जादू मोहून गेली. हा मुलगा नसता तर आपल्याला लाकडी नळीतून अशा प्रकारचं संगीत निर्माण करण्याची पद्धत कळलीच नसती असं त्या माणसाला वाटलं. आपल्या ज्ञानात या क्षणानं नवीनच भर टाकलीय ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. त्या गुराखी मुलाचे संगीताचे स्वर कानात साठवत तो पुढे निघाला, तेव्हा त्याला वाटेत अनेक प्रकारांतलं संगीत भेटत गेलं. दूरवर असलेल्या मंदिराच्या दाराच्या बिजागरींच्या आवाजातलं नादावणारं संगीत, गांधीलमाशीच्या पंखांच्या फडफडण्यातलं अवीट संगीत, नाकतोड्याच्या पायातून निर्माण होणारं लयबद्ध संगीत त्याला या वाटेत ऐकायला मिळालं. इतकंच काय पण पुढे त्याला दोन माणसं मद्य पिताना दिसली. हातातल्या मद्याच्या प्यालावर ती माणसं आपल्या नखांनी टिचक्या मारत होती. त्या टिचकीनं निर्माण होणारं संगीतही त्या माणसाला खूपच जादुई वाटलं. 

तेवढ्यात त्या माणसाच्या हातावर चिकाला नावाचा एक कीटक येऊन आदळला आणि त्या माणसाला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्या चिकालामधूनही एक अनोखं संगीत बाहेर पडत होतं. चिकालाच्या पंखातून तर हा आवाज येत नसावा? असं वाटून त्या माणसानं त्या चिकालाचे वेगळेच दिसणारे पंख बोटांच्या घट्ट चिमटीत पकडून ठेवले. पण तरीही एक सुमधूर आवाज कानावर पडतच होता. मग त्या माणसानं चिकाल्याचं तोंड दाबून बघितलं, तरीही आवाज येतच होता. मग त्या माणसानं चिकाल्याच्या अंगावर दिसणारे मऊसर खवले दाबून बघितले तरीही तो नाद कमी होईना. मग त्या माणसानं चिकाल्याच्या शरीराच्या बरगड्या दाबून धरल्या. तरीही आवाज सुरूच होता. कुठल्याच कृतीमुळे काहीच फरक पडत नाहीये हे लक्षात आल्यानं त्या माणसाचं कुतूहल जास्तच वाढत चाललं होतं. अखेर त्यानं चिकाल्याच्या शरीरात खोलवर एका सुईनं टोचून बघितलं आणि त्याचा परिणाम असा झाला की चिकाल्याचं इवलंसं हृदय फुटलं आणि तो मरण पावला. त्यानंतर मात्र येणारा तो आवाजही थांबला. चिकाला मरण पावला तरी माणूस मात्र त्या संगीताचं उगमस्थान शोधू शकला नव्हता. माणूस म्हणून आपलं ज्ञान खूपच तोकडं आहे हे सत्य त्या क्षणी त्या जंगलातल्या  माणसाला कळलं. या विश्वातल्या अनेक गोष्टीं आपल्यासाठी गूढच राहणार आहेत. त्यापैकी काहींचीच आपण उकल करू शकतो हेही त्याच्या लक्षात आलं. ही गोष्ट होती, 'द आसेयर’ या ग्रंथातल्या चिकालाच्या गाण्याची!

गॅलिलिओप्रमाणेच होता रिचर्ड फाईनमन! या माणसाच्या तर मी प्रेमातच पडले. रिचर्ड फाईनमन म्हणजे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व! जीवनावर प्रचंड प्रेम करणारा, मिश्कील स्वभावाचा, नवनवीन गोष्टी कुतूहलानं शिकणारा, चित्रकलेची आवड असणारा आणि ती कला आत्मसात करणारा, सगळ्या रंगात रंगून जाणारा, संगीतावर जीव टाकणारा, ड्रम वाजवणारा, इतिहासाचा पाठपुरावा करणारा, भाषेचं सौंदर्य न्याहाळणारा, तल्लख बुद्धीचा, गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांची नुसतीच गोडी नव्हे, तर त्यात सखोल ज्ञान आणि प्रावीण्य असणारा, संशोधक वृत्तीचा, शिकवण्याची आवड असणारा, तत्त्वज्ञानाची आवड असणारा, माणसाच्या जगण्यावर गंभीरपणे विचार करणारा पण त्याचबरोबर सतत आनंदी असणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसा आहे तसा असणारा -असा भौतिकशास्त्रज्ञ ज्यानं क्वांटम मेकॅनिक्स, क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स थिअरी आणि भौतिकशास्त्र या विषयात सखोल काम केलं - म्हणजेच - रिचर्ड फाईनमन!

तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकलं.....असं वर्णन ज्याला लागू होईल त्या व्यक्तीमध्ये पहिलं नाव घ्यावं लागेल ते रिचर्ड फाईनमन या शास्त्रज्ञाचं! तसंच ज्या शास्त्रज्ञांना प्रचंड प्रसिद्धीचं वलय लाभलं, त्यातलं पहिलं नाव आईन्स्टाईनचं होतं, तर दुसरं नाव रिचर्ड फाईनमनचं होतं! नॅनो टेक्नालॉजीचं तंत्रज्ञान आज जगभर धुमाकूळ घालतंय, पण या तंत्राची चाहूल त्यानं सर्वप्रथम १९५९ सालीच व्यक्त केली होती. दुसर्‍या महायुद्धात अणुबॉम्ब प्रत्यक्ष बनवणार्‍या शास्त्रज्ञांमध्ये रिचर्ड फाईनचा प्रचंड मोठा सहभाग होता. अणुबॉम्ब चाचणीचा स्फोट गॉगल न लावता उघड्या डोळ्यांनी बघणारा हा धाडसी माणूस होता. नोबेल पुरस्कार प्राप्त रिचर्ड फाईनमन हा विसाव्या शतकातला एक प्रचंडच बुद्धिमान शास्त्रज्ञ होता. 

विज्ञान किती सुंदर दिसतं हे बघून रिचर्ड फाईनमन थक्क होत असे. गणित आणि विज्ञान यांच्यासारखे कठीण वाटणारे विषय अत्यंत सोपे करून सांगण्याचं कसब त्याच्यात होतं. एखाद्या प्रक्रियेत एखादा इलेक्ट्रॉन कसा वागेल हे समजण्यासाठी तो इलेक्ट्रॉन आपण असतो तर अशा परिस्थितीत कसे वागलो असतो अशा पद्धतीनं विचार करत असे. प्रचंड बुद्धिमान असलेल्या या माणसांत आपल्या बुद्धीचा जराही गर्व नव्हता. अतिशय कुशल चित्रकार! याची चित्रं बघितली तर मी काय म्हणतेय ते लक्षात येईल. त्याची बालमैत्रीण आर्लिन आणि त्याच्या प्रेमाची गोष्ट वाचताना डोळ्यात पाणी येतं....इतकं उत्कट प्रेम करणारा पुरूष बघून मन भरून येतं. 
गॅलिलिओ असेा वा रिचर्ड फाईनमन यांच्याकडे बघताना लक्षात येतं, की ही माणसं झापडबंद जीवन जगणारी नव्हती. चित्रकला, असो वा संगीत हे सगळं त्यांच्या आयुष्याचा भाग होतं. तसंच ही माणसं अत्यंत संवेदनशील होती, म्हणूनच जगातल्या समस्त मानवजातीचं दुःख त्यांना बघवलं नाही आणि त्यातूनच त्यांनी आपल्या शोधांनी लाखो, करोडो लोकांचे प्राण वाचवले. एखादी व्यक्ती किती मोठी वैज्ञानिक आहे, किती मोठी चित्रकार आहे किंवा किती मोठी संगीतकार आहे यापेक्षा ती माणूस म्हणून किती संवेदनशील आहे हे खूप महत्वाचं आहे!

आणि असं संवेदनशील मन जपणारा आणि तशीच कृती करणारा कवीमनाचा माणूस दिलीप कुलकर्णी म्हणजेच डी एच कुलकर्णी यांची आणि माझी कर्‍हाडमध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट झाली. यांची पत्नी पुष्पा कुलकर्णी यांना तर आदर्श शिक्षिका म्हणून  राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालाय. चित्रकला असो वा इतर अनेक गोष्टी या बाईंच्या शब्दकोषात ‘येत नाही’ असा शब्दच नसावा. आणि या दोघांची मुलगी म्हणजे माझी मैत्रीण रेणुका! रेणुकाशी मैत्री होतीच, पण या प्रवासात तिचे यजमान अतुल, मुलगा आकाश, तिच्या काकू या सगळ्यांशी खूप चांगली दोस्ती झाली. हे आख्खं कुटुंब खूप आवडलं. त्यांच्या नात्यातलं बॉन्डिग खूप खूप आतपर्यंत स्पर्शून गेलं. ही सगळीजण खूप आपलीशी वाटली. 

'बहर' काव्यसंग्रहाचं प्रकाशन करताना खूप आनंद झाला. प्रेमानं आलेली समोरची सगळी स्नेहीमंडळी बघताना कुठेही परकेपणा वाटत नव्हता. आजकाल प्रकाशक काव्यसंग्रह काढायला नकार देतात, कारण कविता कोणी विकत घेत नाही. अशा वेळी विजया प्रकाशनचे जोशी दांपत्य मात्र कविता, ललित, कथा‘कादंबर्‍या यांना छपाईसाठी प्राधान्य देताना पाहून खूप आनंद वाटला. कारण ज्याप्रमाणे आज माहितीपर, ज्ञानवर्धक पुस्तकांची गरज आहे, त्याचप्रमाणे माणसाचं मन, समृद्ध होण्यासाठी कविता, कथा, कादंबर्‍या, ललितपर लिखाण यांची नितांत आवश्यकता आहे. लहानपणी आपण सगळ्यांनी चांदोबा, किशोर, राजाराणी, पर्‍यांच्या, राक्षसांच्या गोष्टी वाचल्या नसत्या, तर आपली कल्पकता, कुतूहल वाढलंच नसतं. लहानपणी शिकलेल्या कविता, बडबड गाणी आजही जशीच्या तशी आपल्याला आठवतात. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर येणार्‍या कवितांनी आपल्याला हसायला शिकवतं, डोळ्यातले अश्रू पुसायला शिकवलं. मी तर म्हणेन जगायला शिकवलं. खूप काही सांगायचंय, पण सांगता येत नाहीये. अशा वेळी कवितेची एक ओळ, चार शब्द पुरेसे पडतात त्या भावना पोहोचवण्यासाठी. इतकी ताकद इतकी ताकद या कवितेमध्ये आहे. 

आजच्या धकाधकीच्या जगण्यात तंत्रज्ञानानं आपल्या जगण्यावर आक्रमण केलंय. पण तंत्रज्ञान असो वा इतर काही भौतिक सुखसोयी...निराशेच्या वाटेवरून, दुःखातून खेचून आणण्याची ताकद केवळ कलेत आहे. ती कला कुठलीही असो, तुम्हाला संगीत येत असो, तुम्हाला नृत्य येत असो वा तुम्हाला सरस्वती प्रसन्न झालेली असो. ही कला तुम्हाला कधीही एकटेपण भासू देत नाही. ती तुमच्या जगण्यात आनंदच पेरते. 

'बहर' काव्यसंग्रह वाचत असताना वाटलं, त्यातल्या कवितेला, त्यातल्या आनंदाला घेऊन दिलीप कुलकर्णी नावाचा हा कवी वाटचाल करतो आहे. समोरच्याच्या जीवनात आनंद पेरतो आहे. सगळ्या रसांना, सगळ्या भावनांना, सगळ्या नात्यांना स्पर्श करत त्यांच्या कविता चालताहेत. शारदेचं स्तवन असो वा गुरुस्तुती, विडंबन गीतं असो वा आयुष्याविषयीचं भाष्य, समाजप्रश्नांना केलेला स्पर्श असो वा जगण्यातली अलिप्तता या सगळ्याच काव्याला लय आहे, नाद आहे, ताल आहे....कविता वाचतानाच त्या एका लयीत हळुवार झोक्यासारख्या गतीत ओठ गुणगुणू लागतात. तसंच दिलीप कुलकर्णींच्या कवितेला कुठल्या अलंकाराचा सोस नाही की जडबंबाळ शब्दांचा मोह नाही. ती साध्यासरळ रुपात अतिशय सुंदर दिसली. वाचता वाचता ती वाचकाचीच होते, असंच वाटलं. दिलीप कुलकर्णींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कविता आशावादी आहेत. त्या हसवणार्‍या, फुलवणार्‍या आणि खुलवणार्‍या आहेत. त्या निराशेच्या गर्तेत नेणार्‍या नाहीत. त्या सकारात्मक दृष्टिकोन देत आयुष्य जगायला शिकवणार्‍या आहेत.
दिलीप कुलकर्णींच्या कवितेमधून तेही दिसत राहतात. त्यांच्यातला तबलजी, त्यांच्यातला संगीतरसिक, त्यांच्यातला माणूसवेडा आणि नाटकवेडा माणूस आणि त्यांच्यातला आशावादी संवेदनशील माणूस सगळया कवितांमधून वाचकांसमोर येतो आणि त्यांच्याशी दोस्तीचं नातं निर्माण करतो. 

बहरच्या निमित्तानं कर्‍हाडकरांशी मनमुक्त संवाद साधता आला. या वेळी आलेले दुसरे अतिथी श्री बंडा जोशी हे हास्य कवी असल्यामुळे त्यांच्या व्याख्यानात एक खुसखुशीतपणा होता. त्यांनी समोरच्या रसिक श्रोत्यांना खूप हसवलं. अंगी साधेपण असलेले बंडा जोशी दिलीप कुलकर्णी यांचे मित्र आहेत. 

कार्यक्रमात सुरुवातीला नियती आपटे हिनं अतिशय सुरेल असं स्वागतगीत गायलं, तर प्रशांत कुलकर्णी यांनी दिलीप कुलकर्णींच्या 'बहर' या काव्यसंग्रहातलं विडंबनगीत गायलं. याची चाल 'शूर आम्ही सरदार' या गाण्यावर बेतलेली होती. दिलीप कुलकर्णी यांच्यावर प्रेम करणार्‍या सर्व मित्रांनी या कार्यक्रमाचं नियोजन आणि अंमलबजावणी अतिशय उत्कृष्टरीत्या केली होती. 

कार्यक्रम खूप खूप सुरेख झाला. कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांना भेटताना, बोलताना खूप आनंद मिळाला.  'बहर'चं सुरेख मुखपृष्ठ रेणुकाने स्वतः केलं आहे. जरूर वाचा 'बहर'!

दीपा देशमुख, पुणे. 

कार्यक्रमाचे फोटो