रयतेचा राजा शिवबा!
रांझ्याची पाटलाची एक गोष्ट खूप प्रसिद्ध आहे. या वतनदार पाटलानं एका गरीब शेतकर्याच्या तरुण मुलीला भर दिवसा सगळ्या लोकांसमोर उचलून नेलं आणि तिची अब्रू लुटली. आता जगून काय उपयोग असा त्या निष्पाप मुलीनं विचार करून विहिरीत उडी मारून जीव दिला. त्या काळी असे प्रकार सर्रास चालायचे. त्यामुळे गावालाही अन्याय बघण्याची आणि सहन करण्याची सवय लागली होती. सगळ्या गावाला या मुलीच्या आत्महत्येनं खूप वाईट वाटलं, पण ते असाहाय होते. त्या वेळी तिथल्या राजाच्या कानावर ही गोष्ट गेली. त्यानं त्या पाटलाच्या मुसक्या बांधून पुण्यात आणलं आणि त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा ठोठावली. त्या शिक्षेची लगेचच अंमलबजावणी झाली. एका गरीब मुलीसाठी न्याय मिळणं ही गोष्ट लोकांसाठी प्रथमच घडत होती. आख्खा गाव चकित झाला. आपल्याला न्याय मिळू शकतो ही भावना त्यांच्या मनात नवी आशा निर्माण करणारी होती. आपल्या अब्रूचं रक्षण करणार्या अशा राजासाठी आपला जीव ओवाळून टाकण्याची आता गावकर्यांची तयारी होती. सर्वसामान्य लोकांचं रक्षण करणारा हा राजा होता - रयतेचा राजा शिवबा, छत्रपती शिवाजीराजे भोसले!
नीच कृत्य करणार्यांवर शिवाजी महाराजांनी जबरदस्त वचक बसवला. १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी महाराष्ट्रातल्या जुन्नर जवळच्या शिवनेरी किल्ल्यावर महाराष्ट्राचंच नव्हे तर भारताचं स्फूर्तिस्थान असलेल्या मराठी साम्राज्याचा संस्थापक, उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, सहिष्णु राजा म्हणून भारतभर ओळखल्या जाणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. या माणसानं आपल्या कार्यानं एक नवा इतिहास घडवला आणि प्रत्येक माणसाला स्वातंत्र्याचा अर्थ समजावून सांगितला. कथा, कांदबर्या, नाटकं, चित्रपट, पोवाडे, चरित्र, इतिहास अशा सर्व प्रकारांतून शिवाजी महाराजांचं कार्य लोकांसमोर आलं आहे.
तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव घराण्याची सत्ता संपुष्टात येताच महाराष्ट्रावर पुढली तीनशे वर्षं परकीय सत्ताधार्यांनी आपली हुकमत गाजवली. या काळात दिल्लीच्या तख्तावर औरंगजेब होता, तर विजापूरला आदिलशहा आणि अहमदनगरला निजामशाहीची सत्ता होती. गोवळकोंड्याला कुतुबशाहीनं आपली पकड मजबूत केली होती. मालोजीराजे निजामशाहीतल्या प्रमुख मनसबदारांपैकी एक होते. त्यांना शहाजी आणि शरीफजी अशी दोन मुलं होती. शहाजी राजांचं लग्न सरदार लखुजी जाधवराव यांची मुलगी जिजाबाई यांच्याशी झालं. शहाजीराजे अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून काम पाहत होते. मुघल सम्राट शहाजहानच्या सैन्यानं अहमदनगरवर चढाई करून शहर ताब्यात घेतलं. त्यामुळे मग शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाचे सरदार झाले. आदिलशहानं शहाजीराजांना पुणे आणि सुपे प्रातांची जहागिरी दिली होती. या सगळ्यांच्या काळात जुलूम, अन्याय, लुटालूट, बलात्कार, गुलाम करून छळ करणं असे अनेक प्रकार वाढले. मराठी माणूस या सगळ्या काळात गांजून गेला होता. पण तो इतका दुर्बल झाला होता की त्याच्यात बंड करण्याची ताकदच उरली नव्हती.
अशा वातावरणात शिवबाचा जन्म झाला. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे आणि आई जिजाबाई यांच्या मनात या अन्यायाविरुद्ध चीड होती. त्यांनी स्वराज्याचा ध्यास घेतला होता आणि हे सगळं जिजाबाईंनी छोट्या शिवबाच्या मनात रुजवलं. आपली मातृभूमी परकियांची अंकित झाल्याचं तिनं निदर्शनाला आणून दिलं. जिजाबाईंनी शिवबाच्या मनात लहानपणापासूनच स्वातंत्र्याची बीजं पेरली. त्याला प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या आणि त्याला लढाई आणि राज्यकारभाराचं शिक्षण देण्यासाठी दादोजी कोंडदेव या कुशल व्यक्तीवर जबाबदारी सोपवली. दादोजी कोंडदेवांच्या शिकवणुकीनं मोगलांच्या तावडीतून आपला देश मुक्त करायचा निश्चय शिवबानं केला. तानाजी, नेताजी, सूर्याजी, बाजी, येसाजी आणि असे अनेक जिवाला जीव देणारे मित्र शिवबाला लाभले. त्यांच्या खेळात देखील स्वातंत्र्य हाच विषय असे आणि यातूनच त्यांनी रोहिडेश्वराच्या साक्षीनं स्वराज्याची शपथ घेतली. शिवबाचे बहुतांशी सवंगडी मावळ प्रांतातले असल्यामुळे त्यांना 'मावळे' म्हटलं गेलं. शिवाजी राजांनी जहागिरींची पुनर्व्यवस्था केली. शेतीकडे विशेष लक्ष दिलं. न्यायव्यवस्था बळकट केली. तसंच पुण्याच्या पश्चिमेला असणार्या बारा खोर्यांचा बंदोबस्त केला.
वयाच्या १५ वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. शिवाजी राजांच्या या कारवाया लक्षात येताच आदिलशाहानं शहाजीराजांना कैद केलं आणि फत्तेखान नावाच्या आपल्या विश्वासू सरदाराला शिवाजीवर हल्ला करण्यासाठी पाठवलं. मात्र शिवाजी राजांनी आपल्या मावळ्यांसह पुरंदरच्या परिसरात त्याचा पराभव केला आणि शहाजीराजांची सुटका केली. त्यानंतर शिवाजी महाराजांनी मागे वळून बघितलंच नाही. एका पाठोपाठ एक कोंढाणा, पुरंदर आणि मुरुंबदेव ऊर्फ राजगड असे किल्ले आणि गड त्यांनी जिंकले. बहुतांशी युद्धात त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा उपयोग जास्त केला. स्वराज्य निर्माण झालं तेव्हा स्वराज्यात ८४ किल्ले आणि २४० गड ताब्यात होते! अफजलखान हा त्या काळातला एक अत्यंत पाताळयंत्री, शक्तिवान आणि पराक्रमी असा आदिलशाहाचा सरदार होता. आदिलशहाची खोड मोडण्यासाठी शिवाजी महाराजांनी मोठ्या युक्तीनं अफजलखानाला ठार मारलं. आदिलशहानं आपला दुसरा सरदार सिद्दी जोहर याला शिवाजीचा बंदोबस्त करायला पाठवलं. सिद्दी जोहरनं पन्हागडाला वेढा घातला. त्या वेढ्यात शिवाजी महाराज अडकून पडले होते. अशा वेळी त्यांनी विशालगडावर गुपचूप पळून जायचा बेत केला. या बेताचा भाग म्हणून एक खोटा शिवाजी तयार केला. जेणेकरून त्याच्याच कडे शत्रूचं लक्ष जाईल. हा खोटा शिवाजी शिवा न्हावी नावाचा शिवाजी महाराजांवर प्रेम करणारा एक साधा माणूस होता. आपले प्राण जाणार हे माहीत असूनही त्यानं ही जबाबदारी आपल्या अंगावर घेतली आणि प्राणांची आहुती दिली. दुसरीकडे स्वामीनिष्ट बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंड लढवून आपल्या प्राणांचं बलिदान केलं आणि राजांना सुखरूप विशाळगडावर पोहोचवलं. शिवाजी महाराजांना नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबानं आपला मामा शाहिस्तेखान याला पाठवलं. शाहिस्तेखानानं पुण्यात लाल महालात मुक्काम ठोकला आणि उच्छाद मांडला. शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं कापून त्याला पळून जायला भाग पाडलं. नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी औरंगजेबाची त्या वेळची आर्थिक राजधानी समजल्या जाणार्या सुरत शहराची लूट केली. चिडलेल्या औरंगजेबानं मिर्झा राजे जयसिंग याला शिवाजीवर आक्रमण करायला पाठवलं. मिर्झाराजानं शिवाजीराजांना शरण यायला भाग पाडलं आणि बदल्यात २३ किल्ले आणि ४ लाख उत्पन्न देणारा प्रदेश ताब्यात घेतला. शिवाजीराजांना औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्रयाला पाठवलं आणि तिथे पोहोचताच त्यांना ठार मारण्याचा बेत रचला. मात्र तिथूनही युक्तीनं शिवाजीराजे निसटले. परतताच त्यांनी आपले किल्ले पुन्हा जिंकून घेतले. या वेळी कोंढाणा जिल्हा ताब्यात घेताना तानाजी मालुसरे याला वीरमरण आलं. या सगळ्यांनी वीरमरण एवढ्याचसाठी पत्करलं की त्यांना आपल्या शिबवाबद्दल गाढा विश्वास आणि निस्सीम प्रेम होतं.
त्या काळी पाटील, कुलकर्णी, देशमुख, जहागिरदार, वतनदार जनतेला छळत आणि त्यांच्याकडून पैसे आणि धान्य वसूल करत. आपला हिस्सा मिळाल्यावर राजालाही प्रजेचं काय चाललंय याच्याशी देणंघेणं नसे. पण याउलट शिवाजीराजांनी लोकांमध्ये जाऊन त्यांची सुखदुःखं समजून घेतली. शिवाजीराजांनी या वतनदारांवर कठोर कारवाई केली. यामुळे लोकांमध्ये राजाविषयी विश्वास निर्माण झाला आणि हे राज्य आपलं आहे ही भावना निर्माण झाली. शेतीची दुरावस्था पाहून शिवाजीराजांनी बी-बीयाणं उपलब्ध करून देणं, औतफाट्याला मदत करणं, महसूल कमी ठेवणं ही कामं केल्यानं शेतकरीही सुखावला. दुष्काळी परिस्थितीत शेतकर्याला विशेष मदत देऊ केली. शिवाजीराजांनी आपल्या राज्यात व्यापार वाढावा यासाठी परराज्यातून येणार्या मालावर जास्त कर बसवला आणि स्वराज्यात तयार होणार्या मालाला उत्तेजन दिलं. ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. शिवाजीराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळाची घोषणा केली. या वेळी त्यांनी तांब्याचा पैसा शिवराई आणि सोन्याचा शिवराई होन अशी नाणी काढली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान होता. त्यांच्या सैन्यात ३५ टक्वे सैनिक मुस्लिम होते. तसंच त्यांचे स्वतःचे १३ अंगरक्षक हेही मुस्लिम होते. सैन्यानं लोकांच्या शेताची नासधूस करू नये, त्यातल्या पिकांना हात लावू नये अशी तंबीही शिवाजीराजांनी दिलेली होती.
तसंच ज्या वेळी अफजलखानाला शिवाजीमहाराजांनी ठार मारलं, तेव्हा जिजाबाईंनी आपलं वैर त्याच्या प्रेताशी नाही असं सांगितल्यावर शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा दफनविधी मानसन्मानानं करून त्याची कबरही बांधली. शिवाजी राजांच्या पदरी अनेक मुसलमान सरदार, वतनदार आणि इतर चाकर मोठमोठ्या पदांवर होते. शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने आरमार उभारलं होतं आणि त्या विभागाचा प्रमुख सरदार म्हणून दर्यासारंग दौलतखान याची नियुक्ती त्यांनी केली होती. शिवाजी महाराज म्हणजे सर्व जाती-धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारा राजा होता. धार्मिक तीर्थक्षेत्रांची डागडुजी केली. विविध कलांना राजाश्रय दिला. दोन हजार सैनिकांच्या तुकडीपासून ते एक लाख सैनिकांचं लष्कर शिवाजी महाराजांनी उभं केलं. त्या वेळचा राज्यकारभार फारसी भाषेत होत असे. पण लोकांना फारसी भाषा समजत नसे. त्यामुळे शिवाजीराजांनी राज्यकारभार कोश मराठीत केला.
शिवाजी महाराजांना रयतेचा राजा म्हटलं जातं कारण ते वारसाहक्कानं गादीवर बसलेले राजे नव्हते. आपल्या पराक्रमातून त्यांनी स्वराज्य निर्माण केलं होतं. लोकांचं हित बघितल्यामुळे लोकांना ते आपले वाटायचे. दर्याकपारीतून राहणार्या खचलेल्या, अन्यायांनी त्रस्त झालेल्या साध्या भोळ्या मावळ्यांना त्यांनी आपलं मित्र बनवलं. त्यांचं संघटन करून त्यांच्यात स्वराज्याची स्वप्नं जागवली. शिवाजी महाराजांवर संत तुकारामांच्या विचारांचा प्रभाव होता. संत रामदास यांना ते आपले राजकीय गुरू मानत. आपल्या ५० वर्षांच्या आयुष्यात शिवाजी महाराजांनी विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य अशा मुघल साम्राज्याची लढा दिला. शत्रूंपासून सर्वसमान्य जनतेची सुटका करून स्वराज्याची स्थापना केली. शौर्य, पराक्रम, ध्येयवाद, कुशल संघटन, सर्वधर्मसमभाव, मुत्सद्दीपणा, धाडस, दूरदृष्टी या गुणांच्या जोरावर स्वराज्याचं सुराज्य केलं. अशा या रयतेच्या राजाचं ३ एप्रिल १६८० या दिवशी दुःखद निधन झालं.
Add new comment