वयम दिवाळी २०१९ - गूगल - लॅरी पेज, सर्गी ब्रिन आणि गूगल सर्च इंजिन

वयम दिवाळी २०१९ - गूगल - लॅरी पेज, सर्गी ब्रिन आणि गूगल सर्च इंजिन

आपल्या मनात एखादी गोष्ट यावी आणि आपण ती मागितली की क्षणात समोर येऊन हजर व्हावी....तसंच काहीसं खुल जा सिम सिम असं गूगलच्या बाबतीत आहे. गूगल हे एक सर्च इंजिन असून, आपण कुठलीही माहिती त्याला विचारली की क्षणात आपल्यासमोर ती सादर केली जाते. त्यासाठी कोणाला विचारायची गरज पडते ना डिक्शनरी शोधायची तसदी!

खरं तर आजच्या य्ाुगात माणसाला गूगल ही आधुनिक तंत्रज्ञानानं दिलेली अनमोल अशी भेट आहे. गूगल नसेल तर आज जगण्याची कल्पनाही करता येत नाही. गूगलमध्ये काहीही टाका, जसं कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसावं आणि कुठलीही इच्छा व्यक्त करावी की काही क्षणात इच्छापूर्ती होते म्हणतात, तसंच सगळं इथं गूगलवरही काही सेकंदात घडतं. कुठल्याही अनोळखी शहरात गेल्यावर तिथे ठरलेल्या पत्त्यावर जाताना मोबाईलमध्ये गूगलमॅपला जाण्याचं ठिकाण सांगितलं की गूगल मॅप अगदी त्या माणसाच्या घराची बेल वाजवण्यापर्यंत आपल्याला न चूकता घेऊन जातो. कुठल्याही व्यक्तीची, शहराची, वस्तूची, नाट्यगृहाची, सिनेमागृहाची, मॉलची आणि हॉटेलची माहिती मिळवायची असेल तर गूगलमध्ये टाका, क्षणात माहितीचं भांडार समोर! कुठलाही व्हिडीओ असो, चित्रपट असो, माहितीपट असो वा बातम्या असोत, गूगलला विचारलं की तो व्हिडीओ, तो चित्रपट, ती बातमी काही सेकंदात समोर हजर! कोणाला पत्र लिहायचंय, महत्त्वाची कागदपत्रं पाठवायची आहेत तर गूगलचं जी-मेल आहेच सेवेला! बरं तर बरं, गूगलला हिंदी, मराठी, उर्दू, पंजाबी, सिंधी, गुजराती, तेलुगू, मल्याळम, कन्नड, बंगाली, नेपाळी, उडिया आणि तमीळ या सगळ्या भाषा कळतात आणि या भाषांमधून आपल्यालाही सेवा गूगल उपलब्ध करून देतं. कुठल्याही देशाची, तिथल्या हवामानाची, तिथल्या वैशिष्ट्यांची, तिथल्या वेळेची आणि लोकजीवनाची माहिती गूगल देतं. इतकंच नाही तर किती रुपयांचे किती डॉलर्स किंवा किती पौंडाचे किती डॉलर्स अशी सगळी किचकट गणितं गूगलच सोडवून आपल्याला देतं. एखादा शब्द अडला, तर त्याचे उच्चार कुठल्या देशात कसे आणि काय असावेत याचीही माहिती गूगल एका क्षणात देतं. आपल्या हव्या त्या ठिकाणाची लोकसंख्या, बेरोजगार, यांचीही आकडेवारी गूगल उपलब्ध करून देतं. गूगल आपल्याला विनोंदांची पखरण करून हसवतं, तर कधी आपल्याला आदर्शवत वाटणार्‍या लोकांच्या जंयतीची आठवण ठेवून त्यांच्या स्मृति जागणावरी माहितीही शेअर करतं. गूगलनं आपल्या वापरकर्त्यांसाठी जी-मेल, गूगल अलर्ट, गूगल चॅट, गूगल कॅलेंडर, गूगल बुक्स, गूगल क्रोम, गूगल न्य्ाूज, गूगल डिक्शनरी, गूगल पिकासा अशा अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

या सगळ्या जादूमागची गोष्ट काय?  गूगल म्हणजे काय? यामागचे खरे सूत्रधार कोण आहेत? त्यांच्या डोक्यात ही गूगलची किमया आली कशी आणि ती प्रत्यक्षात साकारली कशी? या सगळ्या प्रवासाची गोष्ट समजून घ्यावी लागेल.

गूगलचा निर्माता नव्हे निर्माते! गूगलचे निर्माते म्हणजे अमेरिकेतल्या स्टॅनफर्ड विश्वविद्यालयात कम्प्युटर  सायन्स विषयात डॉक्टरेट करणारे लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन हे दोघं  एकाच वयाचे असलेले हे दोन युवक  उच्च मध्यमवर्गीय, सुशिक्षित आणि सुसंस्कारित घरातून आलेले, मात्र दोघांचेही स्वभाव परस्परविरोधी! लॅरी अबोल, भिडस्त, गंभीर स्वभावाचा आणि फारसा कोणात न मिसळणारा य्ाुवक तर सर्गी बडबड्या, लोकांमध्ये मिसळणारा, व्यवहारकुशल, उत्तम नेतृत्वगुण असलेला आणि सामाजिक कार्यात रस असलेला उत्साही युवक! शिकत असताना लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन यांची ओळख झाली. एकाच रुममध्ये दोघंही पार्टनर असल्यानं अनेक विषयांवर दोघांची चर्चा होत असे आणि त्या चर्चेत दोघांची मतं देखील परस्परविरोधीच असायची. असं असलं तरी दोघं एकमेकांचे जिवलग मित्र बनले. 

लॅरी पेज याचा जन्म २६ मार्च १९७३ या दिवशी अमेरिकेतल्या ईस्ट लॅन्सिंग, मिशिगन इथे एका ज्यू  कुटुंबात कार्ल व्हिक्टर पेज आणि ग्लोरियो या दांपत्याच्या पोटी झाला. एका सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सुखवस्तू कुटुंबात जन्मल्यामुळे लॅरीचं लहानपण सुखात गेलं. आई-वडील दोघंही कम्प्युटर तज्ज्ञ असल्यानं लॅरी पेजच्या घरातच कम्प्युटर  होता. त्यामुळे कम्प्युटर संबंधी कुठलंही लिखाण असो, मासिकं असोत, त्याला सगळं काही आपोआपच वाचायला मिळत असे. लहानपणी लॅरी पेज स्व्रू ड्रायव्हर घेऊन घरातल्या अनेक यंत्रांना उघडून बघायचा. घरातली जवळपास सगळी यांत्रिक उपकरणं लॅरी पेजच्या उपद्व्यापामुळे खिळखिळ्या अवस्थेत घरभर विखुरलेल्या असायच्या. या गोष्टींनी लॅरीचे आई-वडील वैतागून गेले होते. पुढे मिशिगन युनिव्हर्सिटीमधून लॅरी पेजनं कम्प्युटर  सायन्स या विषयातली इंजिनिअरिंगमधली पदवी मिळवली. नंतरच् उच्च शिक्षणासाठी - मास्टर्स डिग्री मिळवण्यासाठी लॅरीनं स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. ११ नोव्हेंबर १८८५ साली स्थापन झालेलं अमेरिकेतलं स्टॅनफर्ड हे जगातलं मानाचं समजलं जाणारं एक नामांकित विद्यापीठ असून या विद्यापीठाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे शिकलेेले विद्यार्थी पुढे उद्योजक व्हावेत यासाठी प्रयत्न केले जातात. आजही स्टॅनफर्डमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी सिलिकॉन व्हॅली इथे आपल्या कंपन्या काढलेल्या बघायला मिळतात. विद्यार्थ्यांच्या संशोधनामध्ये त्यांच्या प्राध्यापकांची खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन आणि साथ असते. या काळात लॅरी पेजनं डोनल्ड नॉर्मन यांनी लिहिलेली पुस्तकं वाचली. तसंच निकोला टेस्ला या संशोधकाचंं चरित्र वाचून तर तो खूपच भारावून गेला.  

एकदा लॅरी पेजची सॅन फ्रन्सिस्कोला सहल गेली असताना तिथे त्याची भेट सर्गी ब्रिन या युवकाबरोबर झाली. सुरुवातीला दोघांमध्ये खूप भांडणंही झाली. कारण दोघांचे स्वभाव खूपच वेगळे होते. पण काहीच काळात दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री झाली. आणि ही मैत्री गूगलच्या शोधाला कारणीभूत ठरली.

सर्गी ब्रिनचा जन्म रशियाची राजधानी मॉस्को इथे एका छोट्याशा घरात मायकेल ब्रिन आणि  युजेनिया या दांपत्याच्या पोटी २१ ऑगस्ट १९७३ या दिवशी झाला. मायकेल ब्रिन हे मॉस्को युनिव्हर्सिटीमध्ये गणिताचे प्रोफेसर होते आणि आई गणितज्ञ तर होतीच, पण ती सिव्हिल इंजिनिअर देखील होती. ज्यू असल्यानं अनेक गोष्टींमध्ये या कुटुंबाला उपेक्षा सहन करावी लागली होती. त्यामुळे जिथं भेदभाव नाही अशा ठिकाणी आपण जावं जेणेकरून आपल्या मुलाचं - सर्गी ब्रिनचं भविष्य घडवता येईल या हेतूनं त्यांनी अमेरिकेला जायचं ठरवलं. 

सर्गी ब्रिन खूप बुद्धिमान असल्यानं वयाच्या १९ व्या वर्षी स्टॅनफर्डमध्ये डॉक्टरेट करण्यासाठी त्यानं प्रवेश घेतला. त्याला गणित विषय जास्त आवडायचा, असं असलं तरी इतर विषयातही त्याला गोडी होती. एकदा डोनल्ड नथ नावाचा कम्प्युटर सायन्स मध्ये दादा समजल्या जाणार्‍या प्रोफेसरशी त्याची ओळख झाली आणि त्याचा खूप मोठा प्रभाव सर्गी ब्रिनवर पडला. 

लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन यांनी स्टॅनफर्डमध्ये असताना सर्च इंजिनच्या संशोधनात खूप वेळ व्यतीत केला आणि त्यातूनच हाच विषय आपल्या डॉक्टरेटसाठी घ्यायचा असं त्यांनी ठरवलं. तसंच आपल्या कामातून चार पैसे मिळावेत असंही त्यांना वाटत होतं. त्यांनी शोधून काढलेल्या सर्च इंजिनला त्यांनी व्हॉटबॉक्स असं नाव द्यायचं ठरवलं. व्हॉट म्हटलं की त्या प्रश्नाचं उत्तर या बॉक्समधून मिळेल अशी त्यामागची कल्पना होती. मात्र त्यांच्या एका मित्रानं गुगॉल असा शब्द सुचवला. सर्गी ब्रिन आणि लॅरी पेज यांचं काम खूप मोठं आहे हे दाखवण्यासाठी हा शब्द त्यानं सुचवला होता. या शब्दाचा अर्थ एका आकड्यापुढे १०० शून्यं म्हणजेच प्रचंड मोठी संख्या असा होता. दोघांनाही हे नाव आवडलं. पण हे नाव दुसर्‍या एका कंपनीनं आधीच घेतल्याचं कळालं. पण तरीही गंमत अशी झाली की या दोघांनी गूगॉलचं स्पेलिंग चुकीचं लिहिलं, त्यामुळे त्याचा उच्चार गूगल होत होता आणि त्यांना हे नाव मिळालं. 

गूगल सर्च इंजिन परिपूर्ण अचूक करताना अनेक अडथळे येत होते, अनेक अडचणींना सर्गी ब्रिन आणि लॅरी पेज यांना तोंड द्यावं लागत होतं. पण दोघंही ते बनवण्याच्या ध्येयानं झपाटून गेले होते. एखादी अडचण आली की लॅरी पेजला टेस्ला समोर दिसायचा. त्याच्या आयुष्यातली फरफट आठवायची आणि मग त्याला समोर आदर्श ठेवून निराशा झटकून लॅरी पेज कामाला लागायचा. याच काळात त्यांनी स्वतःची कंपनी सुरू करावी असा सल्लाही त्यांना मिळाला होता. त्यांनी गूगल नावानं रीतसर कंपनीची नोंदणी केली आणि त्याच नावानं बँकेत खातं उघडलं. त्यांच्या या कामासाठी अनेकांनी त्यांना आर्थिक मदत केली. अगदी सुरुवातीच्या काळात अ‍ॅमॅझॉन कंपनीचा सर्वेसर्वा जेफ बेझॉस यांनही काही रक्कम दिली.

लोकांना त्या वेळी असलेल्या अल्टाव्हिस्टा नावाच्या सर्च इंजिनपेक्षा गूगलचं सर्च इंजिन आवडायला लागलं. कारण जी माहिती हवी, ती अचूकपणे त्यांना मिळत होती. एवढ्या गोष्टीवर लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन स्वस्थ बसले नाहीत, तर आपण गूगलच्या सर्च इंजिनमध्ये नवनवीन सुधारणा करायच्या मागे ते लागले. कामाच्या ध्यासानं दोघं इतके झपाठले होते की दिवसाचे २४ तासही दोघांना कमी पडायला लागले होते. गूगलचा व्याप आता वाढत चालला होता आणि त्याबरोबरच सर्गी ब्रिन आणि लॅरी पेज यांचा नावलौकिकही वाढत होता. कंपनीचं काम इतकं वेगानं वाढत चाललं होतं की त्यांनी कंपनीत सीईओ नेमला पाहिजे असं त्यांना जवळची मंडळी सांगायला लागली. अतिशय बुद्धिमान आणि तंत्रज्ञानात तज्ज्ञ असलेल्या एरिक श्मिट नावाच्या व्यक्तीची गूगलच्या सीईओपदी नेमणूक करण्यात आली. एरिक श्मिट हा लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन यांच्यापेक्षा वयानं २० वर्षं मोठा असल्यानं तो अतिशय समंजसपणे दोघांच्या अनेक खोड्या समजून घेई. सुरुवातीच्या काळात या दोघांना आपण सगळं काही करू शकतो असं वाटायचं. तसंच कामाची शिस्त त्यांच्याकडे नव्हती. खर्चाचा ताळमेळ त्यांना नीट ठेवता येत नसे. या सगळ्या गोष्टी एरिक श्मिटनं नियंत्रणात आणल्या आणि इतकंच नाही, तर गूगल कंपनीच्या वाढीतही मोठा हातभार लावला. 

गूगलनं गूगल डॉक्स असेल, गूगल मॅप, गूगल होम मिनी आणि मॅक्स अशा अनेक उपयुक्त गोष्टी लोकांसमोर आणल्या. इतकंच नाही तर  २००५ साली जावेद करीम, स्टीव्ह चेन आणि चॅड हर्ली या तीन तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेली यू-टयूब कंपनी विकत घेतली. आज यू-टयूब म्हटलं की कुठलंही गाणं, कुठलाही व्हिडिओ आपण बघू शकतो, टाकू शकतो अिाण ऐकू शकतो. आज गूगलच्या यू-टयूब वरून जगभरातून प्रचंड संख्येनं व्हिडिओज अपलोड होत असतात. गूगल आणि फेसबुक यांच्या खालोखाल यू-टयूब ही लोकप्रियतेच्या बाबतीत जगातली तिसर्‍या क्रमांकावर असलेली वेबसाईट आहे. २०१० सालच्या आकडेवारीनुसार एका महिन्यात एकूण १४०० कोटी लोक यू-टयूब वरचे व्हिडिओज बघत असल्याचं आढळून आलं आहे. 

लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन यांनी अनेक चांगल्या ग्रंथांचं डिजिटलायझेशन करायचं ठरवलं. लॅरी पेज लहान असताना मिशिगन विद्यापीठातल्या ग्रंथालयात जायचा. तेव्हा तिथलं ७० लाख पुस्तकं असलेलं ग्रंथालय बघून तो चकित व्हायचा. हे सगळे दुर्मिळ ग्रंथ कायमस्वरूपी जतन करायला हवेत याच भावनेतून मिशिगन विद्यापीठाशी संपर्क साधून लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन यांनी २०१० साली दीड कोटी पुस्तकं स्कॅन करून आपल्या वेबसाईटवर टाकली. अजूनही हे काम अविरतपणे चालू आहे. अनेकांनी या उपक्रमाची तुलना गटेनबर्गच्या छपाई यंत्राच्या शोधाबरोबर केली 

आज जगातलं सगळ्यात लोकप्रिय सर्च इंजिन म्हणून गूगल ओळखलं जातं. गूगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन यांची नावं आज श्रीमंतांच्या यादीत असली तरी दोघंही अतिशय साधं जीवन जगतात. श्रीमंती मिरवणं आणि एैषोरामात राहणं दोघांनाही आवडत नाही. त्यांची मैत्री आजही तितकीच घट्ट आहे. गूगलसाठी जगातली सगळ्यात मोठी दुसरी बाजारपेठ म्हणजे भारत असून सध्या गूगलच्या सीईओपदी भारतीय असलेला सुंदर पिचाई आहे. 

लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन हे दोन युवक एकत्र येतात काय आणि आपल्यातलं कुतूहल, जिज्ञासा, चिकाटी, कल्पकता आणि हुशारी यांच्या जोरावर जगाला एक नवं तंत्रज्ञान निर्माण करून जवळ आणतात काय, हे सगळं एखाद्या चमत्काराइतकंच अदभुत आणि आश्चर्यकारी आहे हे मात्र खरं!

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.