पुणे वेध, झपाटलेपण ते जाणतेपण २९ आणि ३० सप्टेंबर २०१८.

पुणे वेध, झपाटलेपण ते जाणतेपण २९ आणि ३० सप्टेंबर २०१८.

डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या संकल्पनेतून साकार झालेला वेध हा उपक्रम महाराष्ट्रातल्या १० शहरांमधून संपन्न होतो. 'स्व'च्या पलीकडे जाऊन हा प्रवास घडतो. मात्र 'स्व'च्या पलीकडे गेलेली ही मंडळी त्या प्रवासात कशी सामील होतात, त्यांना ते वेड झपाटून कसं टाकतं आणि त्या वेडाची किंमत देऊन ते काय साध्य करतात हे सगळं सगळं वेधमधून उलगडलं जातं. त्यांच्यासारख्या वेड्यांमुळे आपल्यालाही त्यातून एक नवी दृष्टी मिळते, नवी जाणीव तयार होते आणि आयुष्य जगण्याचं नवं भानही येतं. 

पुण्यातला वेध २९ आणि ३० सप्टेंबर २०२८ या दोन दिवसांत झपाटलेल्या १० व्यक्तींच्या सहभागाने संपन्न झाला. 
पुणे वेधचे या वेळचे हे दोन दिवस म्हणजे संपूच नये अशी सजलेली एक सुंदर अशी मैफल होती. ही मैफल रंगत रंगत गेली आणि अखेरच्या नेहा सेठच्या सत्रानं तिनं एक अत्युत्तम उंची गाठली आणि मैफल संपली, मात्र पुढल्या वर्षीचं खास आमंत्रण देऊन! 

या वेळी पुणे वेधमध्ये दहा वेगवेगळ्या व्यक्तींनी व्यासपीठावरून उपस्थितांशी संवाद साधला होता आणि संवादक म्हणून डॉ. ज्योती शिरोडकर आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांनी आपल्या खास शैलीत त्यांना बोलतं केलं होतं. या दहा जणांमध्ये आनंद शिंदे, तुषार कुलकर्णी, सारंग गोसावी, यास्मिन युनूस, डॉ. शारदा बापट, अमृत देशमुख, अमीत गोडसे, जयदीप पाटील, संजय पुजारी आणि नेहा सेठ होते. 
या वर्षी विषय होता, 'झपाटलेपण ते जाणतेपण'!

डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याविषयी बोलावं तेवढं कमीच आहे. अफाट ऊर्जेचा स्रोत असलेला हा मनुष्य कधी थकलेला, वैतागलेला, चिडलेला बघायला मिळतच नाही. या दोन दिवसांत मी पुन्हा नव्यानं या माणसाच्या प्रेमात पडले. हजारो मुलांना, युवांना, पालकांना, प्रौढांना, विकारग्रस्तांना दिलासा देणारा, त्यांच्या समस्यांवर हळुवार फुंकर घालणारा, त्यांचा दिशादर्शक होणारा, त्यांच्या चेहर्‍यावर हसू पेरणारा, त्यांना अर्थपूर्ण आयुष्याचा अनुभव देणारा, त्यांना जगण्याची मूल्यं आणि खर्‍या यशाची व्याख्या सांगणारा हा माणूस आहे. त्यामुळे डॉक्टर आनंद नाडकर्णी यांना सुरुवातीलाच सलाम!

खरं तर वेधचे निर्माते डॉ. आनंद नाडकर्णी हेच माझ्यासाठी जगातल्या आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहेत. पण या वेळचा वेध अशाच अनेक आश्चर्यांनी भरलेला होता. प्रत्येक सत्रात मनाला अविश्वसनीय आणि अशक्य वाटाव्यात अशा गोष्टी समोर घडत होत्या. एक धक्का पचवावा, तोच दुसर्‍या सत्रात त्यापेक्षाही मोठा धक्का बसत होता. 

पुणे वेधची आख्खी टीम आणि त्यांना बरोबर घेऊन चालणारे दीपक पळशीकर यांच्याविषयी देखील मनापासून कृतज्ञता व्यक्त करायला हवी. पुण्यासारख्या व्यस्त शहरात वेध आयोजित करून तो यशस्वी करणं हे आव्हान ते दरवर्षी लीलया पेलतात. तसंच महाराष्ट्राच्या सर्वच भागातून आलेले वेधचे इतर संयोजक यांचाही सहभाग तितकाच उत्साह वाढवणारा वाटतो. 
आनंद नाडकर्णी यांनी पुण्याच्या आठव्या वेधमध्ये सगळ्यांचं स्वागत केलं. पुण्यात सुरू झालेल्या आयपीएच संस्थेच्या शाखेची माहितीही त्यांनी या प्रसंगी दिली. 

या दोन दिवसांत ८३ वं वेध संपन्न झालं. वेधच्या व्यासपीठावर पावणेआठशे वेळा डॉ. आनंद नाडकर्णी यांनी वेधच्या माध्यमातून संवाद साधलाय. त्या त्या वेळचा अनुभव त्यांना महत्वाचा वाटतो. प्रत्येक वेध त्यांना झपाटून टाकतो आणि वेध संपला की जाणतेपण अंगी येतं. डॉ. नाडकर्णीना प्रत्येक वेळी वेध नवा वाटतो. 

डॉ. ज्योती शिरोडकर हिनं डॉक्टरांबरोबर अतिशय प्रसन्नपणे त्यांना संवादक म्हणून साथ दिली. पुणे वेधच्या गायक-वाद्यवृंदानं सादर केलेलं आणि डॉ. आनंद नाडकर्णी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं वेधचं 

'कसे होतसे वादळ शहाणे, चला घेऊ या त्याचा शोध
भान दिशेचे, जाण स्वतःची, लपला यातच सुंदर बोध’ 

हे गाणं मनावर गारूड घालणारं होतं.

जिराफ हाथी मेरे साथी - पहिलं सत्र
आनंद शिंदे - एलिफंट व्हिस्फरर

 आनंद शिंदे या तरुणाकडे बघताना मला लहानपणी बघितलेला राजेश खन्ना आणि तनुजा यांच्या भूमिका असलेला ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट आठवला. त्यातलं ‘चल चल चल मेरे हाथी, ओ मेरे साथी’ हे गाणं खूपच लोकप्रिय झालं हेातं. राजेश खन्ना आणि त्यातल्या हत्तीची दोस्ती, त्यांचं एकमेकांवरचं प्रेम आणि अस्वस्थ करणारा तो करूण शेवट यानं कित्येक दिवस मन हळवं झालं होतं. आज हा आनंद नावाचा तरूण त्या राजेश खन्नाची आठवण करून देत होता. 

राजेश खन्नानं चित्रपटात हत्तीच्या मित्राची भूमिका साकारली होती, मात्र आनंद शिंदे हा हत्तीशी संवाद साधणारा, हत्तींचा खरोखरचा मित्र माझ्यासमोर उभा होता. 
बीएची पदवी मिळवलेला आनंद यानं राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. खरं तर हा मुळात फोटोग्राफीची आवड असणारा फोटो पत्रकार! अनेक वर्तमानपत्रांत त्यांची छायाचित्रं प्रसिद्ध झाली आहेत. संपूर्ण भारतभर त्याची भ्रमंती सुरू असते. असंच एकदा केरळमध्ये मार्शल आर्ट आणि कथकलीवर फोटो फिचर करण्यासाठी तो गेला असताना तिथे त्याला हत्ती भेटले आणि या हत्तींनी त्यांचं आख्खं जगणंच व्यापून टाकलं. 

आनंद यानं ठाण्यातल्या पहिल्या वेधमध्ये विद्यार्थी म्हणून उपस्थित राहिला होता. त्या वेधमध्ये बुद्धीबळपटू आनंद विश्वनाथन आला होता. त्या वेळी डॉक्टरांनी अकरावीत असलेल्या आनंद शिंदेला प्रश्न केला होता, ‘तू आनंद, तोही आनंद आणि मीही आनंद. तुला आमच्याकडून काही घ्यायचं झालं तर काय घेशील?’ त्या वेळी आनंद शिंदे डॉक्टरांना म्हणाला होता, ‘तुमच्याकडून बळाकरता लागणारी बुद्धी घेईन आणि विश्वनाथनकडून बुद्धीकरता लागणारं बळ घेईन.’ ती आठवण या प्रसंगी आनंदला आठवली. 

आनंदच्या लहानपणी त्याच्या घरात कुठलाच प्राणी नव्हता. एकदा त्यानं वडिलांना कुत्रा पाळण्याविषयी विचारलं, तेव्हा त्याच्यावरचा खर्च सांगत त्याचे वडील त्याला म्हणाले, 'एकतर तू तरी शिकशील किंवा कुत्रा.' त्यांचं उत्तर ऐकून आनंदनं पुन्हा प्राणी पाळण्याविषयी चकार शब्द काढला नाही. 

पुढे शिक्षण झाल्यानंतर आपल्या एका कामासंदर्भात आनंद केरळला गेला, तेव्हा त्याला तिथली मल्याळी भाषा कळत नव्हती. केरळमधलं प्रसिद्ध त्रिशूल नावाचं फेस्टिव्हल आनंदनं शूट केलं. त्या फेस्टिव्हलमध्ये असलेले हत्ती त्यानं पहिल्यांदा शूट केले आणि रांगेत असलेले ते हत्ती तो बघत राहिला. हत्ती ताकदवान म्हणून त्याला माहीत होता, पण त्याचं हदृय किती मऊ आहे हे त्याला एका दृश्यानं दाखवलं. एका हत्तीचा माहूत त्याला पायाला सारखं टोचून पुढे चालायला त्याला भाग पाडत होता. त्यामुळे त्या हत्तीच्या पायाला खूप जखमा झाल्या होत्या. त्या हत्तीच्या पायाला जखमा होऊनही जेव्हा तीव्र उन्हाचे चटके माहुताला बसायला लागले, तेव्हा त्या हत्तीनं आपल्या चार पायांच्या मध्ये बसायला माहुताला जागा दिली. ते दृश्य पाहून आपण हत्तीला घाबरण्याची गरज नाही हे आनंदला कळलं. 

कृष्णा नावाच्या हत्तीच्या पिल्लाचा पाय मोडला होता. ते बघून आनंदला वाईट वाटत होतं. कृष्णा आपल्या आईशिवाय राहू शकत नव्हता. तो सारखा एका विशिष्ट पद्धतीनं आवाज काढायचा. एक हत्ती दुसर्‍या हत्तीशी संवाद साधण्यासाठी र्‍हमलिंगची भाषा वापरतो. सात किमी पर्यंत एक हत्ती दुसर्‍या हत्तीशी संवाद साधू शकतो हे विशेष आणि चकित करणारं होतं! या प्रसंगी आनंदनं सभागृहातल्या प्रेक्षकांना हत्तीचा आवाज काढून दाखवला. हत्तीच्या पोटातून धुमारायुक्त आवाज ऐकायला येतो. आनंदला मात्र घशातून आवाज काढता आला. आनंदच्या कृष्णाशी संवाद साधण्याच्या अथक प्रयत्नांनंतर कृष्णानं कान हलवून आनंदच्या येण्याचा आनंद व्यक्त केला. कृष्णा आणि आनंद यांच्यात जवळीक निर्माण व्हायला दीड महिना गेला. सकाळी सात ते रात्रीपर्यंत आनंद कृष्णाच्या पिंजर्‍याजवळ बसून राहायचा. तिथले लोक म्हणायचे, 'आला वेडा!' आपल्या आईला बरं नसल्यानं आनंदला मुंबईला परतावं लागलं. आनंदनं कृष्णाचा निरोप घेतला, तेव्हा तो आनंदला सोडत नव्हता. आनंद मुंबईला परतल्यानंतर दोनच दिवसांत कृष्णा वारला. कुठेतरी त्याला आपला मृत्यू कळला होता म्हणूनच तो आनंदला सोडू इच्छित नव्हता.

आनंदला हत्तींनी झपाटून टाकलं होतं. त्याला हत्तींच्या संदर्भात अनेक गोष्टी कळत होत्या. वय वाढतं तसा हत्तीमध्येही पोक्तपणा येतो. तसच ते एकमेकांची थट्टा, चेष्टा करत असतात, इतकंच काय माणसाला मित्र मानल्यावर त्याचीही ते चेष्टा करतात. चेष्टा केल्यावरचा हत्तींचा आवाज वेगळा असतो. एक हत्ती आनंदला सोंडेनं जवळही बोलवायचा. डोक्यावर सोंड ठेवून कुरवाळायचा. हत्ती असो वा माणूस बायकाच जास्त बोलतात हे आनंद म्हणाल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पुरूष हत्ती आपल्या प्रतिक्रिया पाय आपटून व्यक्त करतात, तर स्त्री हत्ती मात्र अखंडपणे बोलत राहतात. ओळख झाली की हत्ती माणसाचं स्वागतच करतो. हत्तीचं अंतःकरण खूपच विशाल असतं. काही हत्तींच्या बाळांना आनंद जवळ खायला काहीतरी मिळणार हे ठाऊक असायचं. तो आला की ते त्याची बॅग खेचायचे. किंवा त्याचा पाय ओढायचे. आपला हत्तीबरोबर संवाद होतोय हे जेव्हा आनंदनं आपल्या बायकोला-श्रेयाला सांगितलं, तेव्हा तिला त्याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय असंच वाटलं. 

श्रेया जेव्हा त्याला फोन करायची तेव्हा गंगा नावाची हत्तीण जोरात ओरडायची. ती आनंदच्या बाबतीत पझेसिव्ह झाली होती. तिचा आवाज ऐकताच श्रेया घाबरून फोन ठेवून द्यायची. हे असं होणं काही बरोबर नाही हे आनंदला उमगलं. गंगाला श्रेया आणि आपल्यामधलं नातं कळलं पाहिजे या भावनेतून मग आनंदनं गंगाला मराठीतून समजावून सांगितलं आणि तिनं ते ऐकलं. हत्ती जेव्हा गंभीरपणे ऐकतो तेव्हा त्याचे कान त्याच्या शरीराला चिकटलेले असतात. त्यानंतर गंगा श्रेयाचा फोन आल्यावर कधीच ओरडली नाही. हे सगळं अविश्वसनीय असलं तरी खरं आहे. 

आईपासून वेगळं झालेल्या हत्तींच्या बाळाला कसं सांभाळायचं याचा अभ्यास आनंदनं केला. आपल्या आईपासून वेगळं राहणं त्यांना खूप जड जातं. हत्तीच्या वेडामुळे आनंदनं पूर्ण वेळ काम करण्यासाठी आनंदच्या बायकोनं श्रेयानं त्यांचं मन ओळखून, तो हत्तीशिवाय जगू शकत नाही हे कळल्यामुळे त्याचा नोकरीचा राजीनामा पाठवून दिला आणि आनंदला 'आपण आर्थिक बाजू सांभाळू तू हे काम निर्धोकपणे कर' असं सांगून ती खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली. 

'ट्रंक कॉल वाईल्ड लाईफ फाउंडेशन' ही विनय सहस्त्रबुद्धे यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली संस्था! हत्तींची कमी होणारी संस्था, हत्तींचं जतन, हत्तींशी संवाद, हत्तींचं नैराश्य यांच्यावर तिथं काम केलं जातं. हत्तीसाठीचे अनेक खेळ आनंदनं तयार केले. आनंदनं वेगवेगळ्या हत्ती-हत्तीणी यांच्याबरोबरचे अनेक गमतीदार पण विलक्षण असे अनुभव सांगितले. हत्तींचा आहार प्रचंडच असतो. मात्र त्यांना तेलकट पदार्थ देऊ नयेत. एकदा एक मनुष्य आपल्या मालकीच्या हत्तीणीला खाण्यासाठी वडापाव देत असे. त्याचा परिणाम असा झाला की तिचं हजार किलो वजन वाढलं. त्यांची खाण्याची एक विशिष्ट पद्धत असते. 
२००८ ला मुंबईवर अतिरेक्यांचा अ‍ॅटक झाला होता. मलबार हिलवरून येताना एका मोटारगाडीनं पोलिस अधिकार्‍याला उडवलं होतं. अशा वेळी आतली माणसं भारतीय वाटत नव्हती. आनंदनं त्यांचा पाठलाग सुरू केला आणि त्यांना थांबवलं. त्यांनी स्टँडर्ड चार्टट बँक लुटली होती. आणि ते लूट घेऊन पळत होते. त्यांनी आनंदवर देखील हल्ला केला. त्या साहसाबद्दल आनंदला गॉडफ्रे पुरस्कारानं पुरस्कृत केलं गेलं. 

डॉ. जेकब अ‍ॅलेक्झांडर त्रिवेंद्रम झोनचे व्हेर्टनरी डॉक्टर आहेत. यांनी आनंदला खूप मदत केली. कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत हे सांगितलं. मार्गदर्शन केलं. आनंद आता वाघ, बिबट्या, सिंह यावरही अभ्यास करतो आहे. हत्तींप्रमाणेच त्यांच्याशी संवाद साधणंही आनंदला जमायला लागलं आहे. जेकब अ‍ॅलेक्झांडरच्या संधीमुळेच त्याला अशा अनेक गोष्टी करता आल्या. लॉरेन्स अँन्थनी हत्ती तज्ज्ञ गेल्यावर त्यांच्या आफ्रिकेत राहणार्‍या बायकोला आनंद हत्तींबरोबर संवाद साधतो हे कळल्यावर खूप समाधान वाटलं. 

हत्तीनीं एकदा तुम्हाला आपलंसं केलं की ते किती करतात, याची एक विलक्षण गोष्ट! लॉरेन्स अँन्थनी हा जगातला पहिला हत्ती व्हिस्परर, आफ्रिकेत त्याच्याकडे २० हजार एकराचं जंगल होतं. तिथल्या फॉरेस्ट ऑफिसरनं नऊ हत्ती लॉरेन्स अँथनीला देऊ केले. त्यानं ते स्वीकारले नाही तर ते त्यांना मारणार होते. लॉरेन्स अँन्थनीनं ते हत्ती घेतले आणि त्यांना आपल्या जंगलात नेलं. मात्र त्या हत्तींना या नव्या जगात राहायचं नव्हतं. रोज रात्री तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते पळून जायची तयारी करायचे. अँन्थनीला ते समजायचं. तो त्या ठरावीक वेळी, त्या विशिष्ट ठिकाणी बसून राहायचा आणि त्या हत्तींना पुन्हा पुन्हा सांगायचा की तुम्ही इथून पळून गेलात तर तुम्हाला धोका आहे. तुम्ही मारले जाल. आता हेच तुमचं घर आहे. इथे तुम्ही सुरक्षित आहात. सततच्या सांगण्यानं अखेर हत्तींनी लॉरेन्सचं म्हणणं ऐकलं. लॉरेन्स जेव्हा वारला, तेव्हा ते सगळे हत्ती कित्येक मैल अंतर चालून त्याच्या घरासमोर येऊन उभे राहिले होते. ते इथे कसे आले कोणालाच कळलं नाही. त्याच्या बायकोनं जेव्हा त्यांच्या सोंडेला हात लावून जायला सांगितलं तेव्हा ते गेले. त्याच्या पहिल्या डेथ अ‍ॅनिव्हर्सरीला ते पुन्हा आले होते. ही त्या वेळची बीबीसीची सर्वात मोठी बातमी होती. 

आता मात्र आनंद पूर्ण हत्तीमय झालाय. 'प्राण्यांना काय बोलायचंय हे त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदा दिसतं. मी हत्तीकडून माणुसकी शिकलो', असं तो आवर्जून सांगतो. 
हत्ती जर माणसाशी बोलायला लागला तर पहिल्यांदा हे सांगेल की 'तुम्ही माणसासारखं वागा. आम्ही पुस्तक वाचून शिकलो असतो आणि सातभारा शिकलो असतो तर तुम्हा माणसांना सुईच्या टोकावर असेल इतकी जागाही शिल्लक राहिली नसती.’ वन्यजीव क्षेत्रात काम करताना डॉक्टर मे यांचा रिपोर्ट आहे या जगात दहा दशलक्ष जीव आहेत. आपण फक्त २.८ दशलक्ष जीव शोधू शकलो आहोत. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्राण्यावर काम करायचं असेल तर त्याचा आधी अभ्यास करायला हवा. कारण काही दुर्घटना घडली तर माणसं त्या प्राण्याला बदनाम करतात. आपल्या अभ्यासाला संशोधनाची जोड देणं तितकंच महत्त्वाचं.

तुषार कुलकर्णी - जिराफ मित्र

तुषार कुलकर्णी यानं वाणिज्य शाखेतली पदवी मिळवली आणि तो जिराफाचा दोस्त कसा बनला याची ही कहाणी! जिराफ हा जगातला सर्वात उंच प्राणी आहे. शिकागो इथं भरलेल्या इंटरनॅशनल परिषदेमध्ये जिराफांवरच्या वर्तनावरचा त्याचा पेपर प्रसिद्ध झाला. तसंच उत्तर युगांडामध्ये जिराफांच्या सर्व्हेक्षणात त्यानं सहभाग घेतला. जिराफांशी मैत्री करणार्‍या तुषारला योगासनं आणि शास्त्रीय संगीताची आवड आहे. जिराफाचं बार कोडिंग सध्या तो करतोय. युगांडा आणि अमेरिका इथल्या जिराफांवरचा अभ्यास करतोय. 

तुषारनंही वेधचे ठाण्यामधले प्रेक्षक म्हणून अनेकदा उपस्थिती लावली. त्यानं हा विचारच कधी केला नव्हता की वेधमध्ये आपल्याला व्यासपीठावर बसून डॉक्टरांबरोबर बोलायला मिळेल. त्याला आजचा दिवस अविस्मरणीय वाटत होता. 

तुषारला नॅशनल जॉग्रफी चॅनेल बघायला आवडायचं. त्यातून त्याला प्राण्यांची आवड निर्माण झाली. 
खरं तर जिराफ प्राण्याची माहिती सर्वसामान्यांना फारशी माहिती नसतेच. जिराफाची मान लांब का झाली याबद्दल एक गोष्ट ठाऊक असते. ती म्हणजे त्याला झाडाच्या पानांपर्यंत पोहोचण्यासाठी, ते अन्न मिळवण्यासाठी ती लांब झाली वगैरे.

तुषार हा २०११ साली तुषार युगांडामध्ये गेला आणि तिथे त्याला जिराफ भेटला. जिराफांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. जिराफ हा शब्द अरेबिक शब्द आहेत. जराफा याचा अर्थ जोरात चालणारा असा आहे. पूर्वी रोमन्स आणि ग्रीक्स यांना या प्राण्याला काय म्हणायचं हे त्यांना कळायचं नाही. त्यामुळे त्यांना हा उंट आणि लेपर्ड असं कॉम्बिनेशन त्यांना वाटायचं. जिराफांचं रोजचा दिनक्रम न्याहाळणं, त्यांचं आरोग्य, खाणं बघणं हे सगळं तुषार त्या वेळी करायचा. त्यांचं खाणं डोकयाच्या स्तरावर ठेवलं जातं. 

भारतात परत आल्यावर अठरा फूट उंच उंटाला जवळून बघताना आणि त्याच्याबरोबर काम करताना तुषारला त्याच्याविषयी कुतूहल निर्माण झालं. त्यानंतर तुषार जिराफाचा अभ्यास करताना जिराफासाठी पूर्णपणे झपाटला गेला. जगामध्ये जिराफ हे फक्त आफ्रिकेच्या जंगलात आहेत. बाकी ठिकाणी ते प्राणिसंग्रहालयात आहेत. आफ्रिकेच्या जंगलात जाऊन तुषारनं काम केलं. भारतामध्ये ३० जिराफ आहेत. दहा प्राणिसंग्रहालयामध्ये आणि सर्वात जास्त कलकत्त्यामध्ये आहेत. तुषार कलकत्त्यामध्ये तो पोहोचला. प्राणिसंग्रहालयात आलेल्या पर्यटकांना तुषारनं जिराफाविषयीची रोचक माहिती थोडक्यात द्यायला सुरुवात केली. 

याच वेळी तुषारनं जिराफांच्या वर्तनाचा अभ्यास केला. प्राणिसंग्रहालयातल्या जिराफांना सतत भिंती चाटताना त्यानं बघितलं आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की जंगलामध्ये जिराफ त्यांची जीभ झाडावरची पानं तोडण्यासाठी वापरतात. इथं त्यांना ट्रेमध्ये पानं दिली जायची. त्यांना आपल्या जिभेचा वापरच करता यायचा नाही. त्यामुळे त्यांच्यात अ‍ॅबनॉर्मल बिहेविअर सुरू झालं होतं. तुषारनं त्यावर अभ्यास करून एक पेपरही लिहिला. हा प्रश्न कसा सोडवायचा यासाठी त्यानं जिराफाच्या उंचीवर एक मोठी बरणी ठेवून त्याला मोठं छिद्र केलं आणि आत त्याचं अन्न पाला ठेवला. त्यामुळे जिराफाला आपली जिभ वापरून तो आतला पाला मिळवणं सुकर झालं. मात्र त्या बरणीत जीभ घालून ते एक एक पान त्याला मिळवण्यात त्याचे दोन तास जायला लागले. जे जेवण आधी तो पाच मिनिटात करायचा इथं त्याच्या जिभेला व्यायाम होत ते झाल्यानं त्याच्या भिंती चाटण्याच्या वर्तनात बदल झाला. त्याचा स्ट्रेस कमी झाला. 

जिरापफ जगातला सगळ्यात उंच आणि लांब मानेचा प्राणी. त्याची जीभ १९ इंच लांब असते. तिच्या टोकाला गडद रंग असतो. आफ्रिकेतल्या उन्हात त्याला सन बर्नपासून तो रंग वाचवतो. जिराफाची मान सहा फुटापर्यंत लांब असते. मात्र माणसाच्या आणि त्यांच्या मानेतल्या मणक्यांची संख्या मात्र एकसारखीच म्हणजेच सात असते. त्यांच्या स्कीनवर पॅचेस असतात. प्रत्येक जिराफाच्या शरीरावरचे पॅटर्न कधीच एकसारखे नसतात. आपल्या अंगठ्यावरचे ठसे जसे वेगवेगळे असतात तसंच. जणू काही जिराफांसाठीचं ते आधारकार्ड!

तुषार यूएसए मध्ये गेला असताना जिराफ कसा जन्मतो हे प्रत्यक्ष बघितलं. त्याच्यासाठी तो अविस्मरणीय अनुभव होता. जिराफाच्या बाळाला तपासणीसाठी आणलं गेलं तेव्हाचा अनुभवही तुषारला खूप लक्षात राहण्याजोगा होता. जिराफाचं एक दिवसाचं बाळ घट्ट पकडून ठेवायचं होतं. पाच लोक त्याला धरण्यासाठी कमी पडत होते. 

जिराफांच्या पॅटर्नमुळे ते जंगलात लपू शकतात. ते लपलेले कळतही नाही. इतका त्यांचा पॅटर्न जंगलाशी मॅच होतो. जन्माच्या वेळी फिमेल जिराफ तिचा जन्म झाला तिथेच जाऊन आपल्या पिल्लाला जन्म देतात. ते आपल्या बाळाबद्दल खूप जागरूक असतात. फिमेल जिराफ सगळ्या लहान पिल्लांकडे लक्ष देतात. त्या पाळीपाळीनं पिल्ल्लांकडे लक्ष देण्याचं काम करतात. त्यांना सिंहापासून धोका असतो. 
जिराफ त्यांची ताकद आणि त्यांचा आकार यावरून त्यांचं मोजमाप करता येत नाही. ते नम्र असतात. ते कधीच तुमच्यावर विनाकारण हल्ला करत नाहीत. सिंहानं हल्ला केला तर ते आपल्या पायानं लाथ मारून हल्ला करतात. मात्र फारच धोका असेल तरच ते तसं करतात. त्यांच्यात नेहमीच सरेंडरचा भाव असतो. जिराफ माणसाळले जातात. मात्र ते आवाज करत नाहीत. त्यांना कळपात राहायला आवडतं. जिराफ गेल्या ३०वर्षांत ४० टक्के कमी झाले आहेत. जगातला मोठा प्राणी धोक्यामध्ये आला आहे. वन्यजीवन एका बाजूला आणि एका बाजूला माणूस असं भयानक चित्र दिसतं आहे. 

जिराफांचं भारतातलं बारकोडिंग करायचं काम तुषार करतोय. जिराफांच्या जाती कोणत्या आहेत हे बघणं. २०१८ मध्ये तुषार आफ्रिकेत गेला असताना त्यानं तिथल्या २५ जिराफांवर काम केलं. त्यांचे ब्लड सॅम्पल्स घेणं, त्यांच्या शरीराची मोजमापं घेणं, सॅटेलाईट कॉलर त्यांच्या शरीरावर बसवणं, ही कामे करताना त्याला खूप आनंद मिळाला. जिराफाला पकडणं ही देखील खूप नाट्यमय गोष्ट असते हे त्याला समजलं. 

'कुठल्याही प्राण्यांवर अभ्यास करताना आधी व्हॉलिंएटर म्हणून काम करावं. स्वअभ्यास आणि सातत्यानं अभ्यास करणं महत्त्वाचं. इंटरनेटच्या सुविधेनं आपण खूप अभ्यास करू शकतो. आवडत्या कामासाठी जगात कुठेही आपण संपर्क साधू शकतो. प्रयत्न करा, आणि संयम बाळगा.' असं तुषार या प्रसंगी म्हणाला. 

तुषारला डॉक्टरांनी विचारलं की जिराफांकडे शब्द असते तर ....त्या वेळी तुषार म्हणाला, जिराफांना मी धन्यवाद दिले असते. आणि सांगितलं असतं, की तुमच्यामुळे मला वेधमध्ये यायची संधी मिळाली. आकाशाला भिडून जमिनीवर पाय ठेवायला शिकायचं असेल तर जिराफांकडून शिकावं. जिराफांजवळ कायमचं राहायला मिळालं तर मी स्वतःला चिमटा काढून ते स्वप्न आहे की सत्य हे बघेन असंही तो म्हणाला. 

आनंद आणि तुषार यांच्या सहभागाचं पुणे वेधचं हे सत्र संपताना डॉक्टरांनी त्यावर बोलताना म्हटलं, की या दोघांनी आपल्याला एक वैश्विक गोष्ट शिकवली ती म्हणजे आस्था, सहवेदना. आजच्या माणसांच्या जगात आपण स्व पलीकडे पाहायला विसरलो आहोत. समोरच्या माणसाच्या भावना, विचार संवेदना जाणायला त्यांच्या जागी ठेवणं इतकं जड होत असताना ही दोघं मात्र प्राण्यांच्या मध्ये स्वतःला ठेवू शकतात. ही दोघं प्राण्यांबाबत जे करतात ते आपण सर्वांनी माणसांच्या बाबतीत का करू नये. निसर्गानं माणसाला शिकवलेलं मूल्य म्हणजे परस्परावलंबनाचं आहे. आपण आज माणसामाणसांमधलं परस्परावलंबन आपण विसरायला लागलो आहोत. आज या मूल्याचं महत्त्व किती आहे ते परत कळलं. पसायदानामध्ये 'भूता परस्परे जडो मैत्र जिवाचे' म्हटलं गेलंय. या भूतामध्ये सर्व प्राणिमात्र आहेत, निसर्ग आहे. जर परस्परांमधलं प्रेम जगलं तर या जगामधली दूरभावना आपोआप जाईल. जसं की 'दूरितांचे तिमीर जावो....' जे लोक वाईट पद्धतीनं विचार करताहेत त्यांच्यावरच्या अज्ञानाचा अंधार दूर होऊ दे. आनंद आणि तुषार ही दोघं सगळ्यांकडे डोळे उघडून बघायला सांगताहेत. दुसर्‍याच्या डोळ्यांनी बघायला सांगताहेत. 
त्यानंतरच्या सत्रात काश्मीरमध्ये जाऊन काम करणार्‍या सारंग गोसावीचं सत्र होतं. 

सारंग गोसावी आणि यास्मिन युनूस 
 पुण्यातून इंजिनिअरची पदवी प्राप्त केलेला हा तरूण आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. जनरल विनायक पाटणकर यांचं एक व्याख्यान त्यानं ऐकलं आणि त्यानंतरचं त्याचं सगळं जीवनच बदलून गेलं. काश्मीर आणि भारत यांच्यात सुसंवादाचा पूल जोडण्याचं अफलातून काम तो करतो आहे. तो काश्मीरला जाऊन थडकला आणि त्यानं काश्मीर आणि इतर भारत यांना मैत्रीच्या धाग्यात गुंफण्याचा कसा प्रयत्न केला याची गोष्ट या सत्रात ऐकायला मिळाली. या मैत्रीच्या नात्यामधून काश्मीरमधली उद्योजकता कशी वाढली हेही त्याच्या प्रवासातून जाणून घेता आलं. त्याला भेटलेली यास्मिन युनूस ही मानसशास्त्र विषय घेऊन बीए करते आहे आणि ती एक उद्योजक तरूणी आहे. या निमित्तानं तीही भेटली आणि तिलाही सारंगमुळे काय काय गवसलं हे तिच्या तोंडून ऐकायला मिळालं. आज सांरगचं काम असीम या सस्थेमार्फत अनेक हात एकत्र येऊन अधिक जोमानं विस्तारतं आहे. 

महाराष्ट्राच्या मातीतून सुरू झालेलं सारंगची गोष्ट काश्मीरमध्ये पोहोचलं, याची ही गोष्ट! इंजिनिअर झाल्यावर पहिल्यांदा सारंगला टाटामध्ये नोकरी मिळाली. बालगंधर्वला ऐकलेल्या जनरल पाटणकर यांच्या व्याख्यानामुळे त्यानं आईला काश्मीरला जाण्याविषयी विचारलं आणि तिनं साफ नकार दिला. मित्रांबरोबर गोव्याला जाऊन येतो असं खोटं सांगून सारंग काश्मीरला गेला. तिथे जाऊन तो विनायक पाटणकर यांना भेटला आणि त्यानंतर तो वारंवार काश्मीरमध्ये जातच राहिला. काश्मीर त्याचं दुसरं घरचं बनलं. काश्मीरच्या त्याच्या प्रवासात सारंगला काश्मीरमधल्या तरुणांचे शिक्षणाचे, रोजगाराचे अनेक प्रश्न समजत गेले. आपण काहीतरी करायला हवं त्या विचारानं त्याला झपाटून टाकलं. तो तिथल्या युवकांना भौतिकशास्त्र शिकवायला लागला. लवकरच त्याला आपण या मुलांसाठी कम्प्युटरचं शिक्षण देऊ शकतो ही गोष्ट लक्षात आली. मग तिथे कम्प्युटर प्रशिक्षण केंद्र सुरू झालं. तिथल्या मुलामुलींना गणित सोपं करून शिकवायला त्यानं सुरुवात केली. 

सुरुवातीला सारंग सुट्टीच्या दिवसांमध्ये काश्मीरला जायचा. त्याच्या सातत्यानं तिथं येण्याविषयी काही लोकांना न रुचल्यानं सारंगच्या घरी धमक्यांचे फोनही यायला सुरुवात झाली. पण काश्मीरी लोक आपल्याबरोबर आहेत या विश्वासानं सारगंनं या धमक्यांची पर्वा केली नाही. हळूहळू सारंगचं काम बघून त्याला येणारे फोन बंद झाले. 

सारंगनं बिजबेरा या गावात आपल्याबरोबर १७ कार्यकर्त्या मुलींना तयार करून काश्मीरमध्ये नेलं आणि तिथे व्यक्तिमत्व शिबिर घेतलं. दारा शुकोह या बागेमध्ये २०० मुलामुलींनी या शिबिरात भाग घेतला. गावातल्या स्थानिक लोकांनी सारंग आणि आलेल्या मुलींच्या सरंक्षणाची जबाबदारी उचलली. 
तिथल्या युवांना आणि स्त्रियांना रोजगार मिळावा यासाठी सारंगनं तिथे मुबलक प्रमाणात पिकणारी सफरचंद आणि आक्रोड यांना विचारात घेऊन त्यांची बिस्किट्स (कुकीज) बनवायची ठरवलं. त्यासाठी त्यानं स्वतः नोकरीचा वेळ संपल्यानंतर संध्याकाळी रोज दोन तास बेकरीत जाऊन प्रशिक्षण घेतलं. सुरुवातीला अनेक चुका झाल्या. पण त्या चुकांमधून अखेर चांगल्या प्रकारच्या कुकीज बनत गेल्या. आज ही बिस्किट्स श्रीनगर, पुणे, मुंबई आणि अनेक ठिकाणी वितरित होतात. 

काश्मीरमध्ये सुसंवादाचं वातावरण निर्माण होण्यासाठी तिथं त्यांचा आवडता खेळ क्रिकेट असल्याचं लक्षात येताच त्यानं काश्मीरी मुलांच्या क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या. या स्पर्धांमुळे गावागावांमधून चैतन्य निर्माण झालं. तयानंतर याच मुलांना त्यानं पुण्यात आमंत्रित केलं आणि पुणे टीमबरोबर त्यांची स्पर्धा घडवून आणली. या एकत्र येण्यानं त्यांच्यातली खिलाडूवृती वाढली आणि एकात्मतेची बीजं त्यांच्या मनात रुजली गेली. सारंग म्हणजेच आता असीम फाउंडेशन फक्त काश्मीरमध्येच काम करत नसून त्यांच्या कामाचा विस्तार पार अफगणिस्तान पर्यंत विस्तारला आहे. 
काश्मीरमधून आलेली यास्मीन हिनं असीम फाउंडेशन आणि सारंग यांच्यामुळे आपल्यासारख्या अनेक युवती पायावर उभ्या राहिल्या असून हा आत्मविश्वास आम्हाला मिळाला असं सांगितलं. आज असीम फाउंडेशन हे काश्मीरमधल्या अनेक मुलांमुलींसाठी घर बनलं आहे. अनेक मुलं मुली काश्मीर आणि नेपाळ इथून असीममध्ये राहून पुण्यात शिक्षण घेताहेत. त्यांच्यासाठी एक नवं जग खुलं झालं आहे. 
सारंगचं सत्र संपायच्या वेळी जनरल विनायक पाटणकर यांनाही व्यासपीठावर बोलावण्यात आलं. हे सत्र इतकं भारावून टाकणारं होतं की शेवटाकडे जाताना संपूर्ण सभागृहानं राष्ट्रगीत गायलं आणि 'भारत माता की जय' या जयघोषानं सभागृह देशभक्तीच्या लहरींनी भारून गेलं. 

--------
३० सप्टेंबर २०१८, रविवार
सत्राच्या सुरुवातीला डॉ. आनंद नाडकर्णी म्हणाले, ‘आपण कुठलीही गोष्ट आठवताना फक्त शब्द आठवू नयेत तर ते दृश्यही आठवावं. आनंद शिंदेनं हत्तीचा आवाज काढतानाचं दृश्य त्यांना आठवलं. ही दृश्यं आपण लक्षात ठेवावीत. शब्द लक्षात ठेवायचे असतील तर दृश्यासह ठेवावेत. हत्तीकडून आपण माणुसकी शिकलो हे दृश्य आपण डोक्यात ठेवलं तर ते लक्षात राहील. जिराफ म्हणजे काय तर उंच मान आकाशाकडे हे सगळं दृश्यासह लक्षात राहिलं पाहिजे. या सगळ्यातली एकतानता, विचार, वाक्यांमधून मिळणारी गोष्ट. या सगळ्यांनी मिळून कोणता दृष्टिकोन दिला तर त्यांचं झपाटून जाणं. झपाटून गेल्याशिवाय त्या विषयांत गंमत येत नाही. त्या विषयाची आवड निर्माण होत नाही. आनंदचं दहा-दहा तास वेड्यासारखं काम करणं, तुषारचं जिराफासाठीचं जगणं आणि सारंगची अठरा वर्षांची काश्मीरयात्रा आपण लक्षात ठेवावी. आपली मेमरी दृश्य, शब्द, विचार, दृष्टिकोन आणि मूल्य अशा पाच पद्धतीनं वापरली तर जे आपल्या लक्षात राहील ते कायमचं लक्षात राहील.’ 

 ‘कसे होतसे वादळ शहाणे, चला घेऊ या त्याचा शोध
भान दिशेचे, जाण स्वतःची, लपला यातच सुंदर बोध’ 
या गीतानं दुसर्‍या दिवशीच्या सत्राला सुरुवात झाली. 

डॉ. शारदा बापट

 शारदा बापट यांनी इंग्रजी विषयातली बीएची, त्यानंतर एलएलबी करत कायद्याची पदवी घेतली. कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमध्ये डिप्लोमा घेतल्यावर सॉफटवेअर इंजिनिअर म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. वयाच्या ३५ नंतर डॉक्टर होण्याच्या ध्यासानं झपाटलेली शारदा बापट बघून तिच्याविषयीची आदर भावना वाढीला लागली. प्रवासातल्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत ती पुढे पुढे चालत राहिली, तिनं आपलं ध्येय तर साध्य केलंच, पण इतक्यावरच ती थांबली नाही. तिनं त्या दरम्यानं विमान चालक (पायलट) म्हणूनही रीतसर शिक्षण घेऊन त्यातली परीक्षा ती उत्तीर्ण झाली. ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडनच्या पियानोवादनाच्या परीक्षेत तिनं यश मिळवलं. आज ती शाश्वत शेती करतेय. या सगळ्या प्रवासाची तिची कहाणी ऐकताना तुम्ही देखील हे करू शकता असा विश्वास तिनं दिला. 

बारावी सायन्सची पार्श्वभूमी नसताना डॉक्टर होण्याचा विचार कसा मनात आला या प्रश्नाचं उत्तर देताना शारदा म्हणाली, तिची आई शारदा आठवी इयत्तेत असल्यापासून आजारी असायची. आपल्या आईला नेमकं काय झालंय यासाठी वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करायला शारदानं सुरुवात केली. उत्सुकता आणि आईचं आजारपण जाणून घेणं या गोष्टीतून शारदानं डॉक्टर व्हायचं ठरवलं. 

शारदा बापट हिला विज्ञान विषय घेऊन बारावी पुन्हा करावं लागणार होतं. मात्र एकदा बारावी झाल्यामुळे पुन्हा बारावी करता येणार नाही अशी उत्तर महाराष्ट्र सेंकडरी हायर सेंकडरी बोर्डानं दिली. निराशा पदरी येऊनही शारदाला स्वस्थ बसवेना. तिथल्या संचालकाना वारंवार जाऊन भेटल्यावर त्यांनी वेगळे विषय घेऊन बारावी विज्ञान करता येईल असं सांगितलं. शारदा एसपी कॉलेजमध्ये प्रवेशासाठी गेल्यावर तिला तिथून प्रवेश न देता चक्क घालवून देण्यात आलं. शारदाचं शालेय शिक्षण पुण्यातल्या हुजूरपागा शाळेत झालं होतं, त्यामुळे ती हुजूरपागेच्या ज्यू. कॉलेजमध्ये जाऊन पोहोचली. तिथं प्रवेश मिळेल असं सांगितलं गेलं. मात्र त्यासाठी एसपी कॉलेजमधून एनओसी आणावा लागेल असं सांगितलं गेलं. एसपी कॉलेजचे लोक एनओसी देईनात, मग शारदा तिथले त्या वेळचे प्राचार्य मोडक यांना भेटली. त्यानंतर मग हुजूरपागामध्ये प्रवेश मिळाला. सगळ्यांना हे शारदाचं वेडच वाटत होतं. 

कॉलेजमध्ये सगळ्यांमध्ये आणि शारदामध्ये वयाचं मोठं अंतर होतं. सुरुवातीला सगळ्यांना ती टिचरच आहेत असं वाटलं. पण नंतर सगळ्यांशी मैत्री झाली. नियमितपणे कॉलेजला जाणं सुरू झालं. बारावी करताना शारदानं आपल्याला मेडिकलला प्रवेश नंतर मिळू शकेल का याची देखील चौकशी करायला सुरुवात केली. बीजे मेडिकलच्या डीनजवळ चौकशी केली पण नीटशी माहिती कळेना. सगळ्यांनी या भानगडीत पडू नका असेच सल्ले दिले. एके दिवशी एक आंतरराष्ट्रीय मेडिकल कॉलेजची माहिती मिळाली. डेव्हिड पिल्ले नावाची व्यक्ती भेटली आणि त्यांनी व्यवस्थित माहिती दिली. 
जिच्यासाठी हे सगळं करायचं होतं, नेमकं त्याच दरम्यानं शारदाची आई वारली. शारदाची मनस्थिती खूप वाईट झाली. पण शारदाच्या नवर्‍यानं नरेंद्र यांनी त्यांना मानसिक आधार दिला आणि बारावीची परीक्षा देण्यासाठी तयार केलं. बारावीचा निकाल चांगला लागला. 

मेडिकलला प्रवेश घेतल्यानंतर त्या अभ्यासात शारदाला खूपच गोडी लागली. शारदाला दोन वर्ष फिलिपाईन्सला जावं लागलं. जाण्याच्या आधी शारदाचे पती नरेंद्र आणि मुलगा यांनी घरातली कामं शिकून घेतली. नरेंद्रनं एका आठवड्याचा कुकिंगचा कोर्स केला. त्यानंतर त्यांच्या घरी अनेक फोन यायला सुरुवात झाली. कारण टाईम्स ऑफ इंडियाच्या दुसर्‍या पानावर नरेंद्रचा स्वयंपाक करतानाचा फोटो प्रसिद्ध झाला होता आणि 'लूक हू इज कुकिंग' असा प्रश्न त्यात विचारला होता.

 
शारदाची अडथळ्यांची शर्यत फिलिपाईन्सला गेल्यावरही थांबली नव्हती. शाकाहारी अन्न मिळायला खूप त्रास व्हायचा. 
कुठल्या ना कुठल्या कागदपत्रांसाठी अडवणूक, चकरा, सातत्यानं केलेला पाठपुरावा या सगळ्यांतून तो प्रश्न निकाली लागायचा. फिलिपाईन्सला कामाचे तास खूप असायचे. अर्थात त्यामुळे शिकायलाही खूप मिळायचं. या सगळ्या ३६ तासांच्या सलग ड्यूट्या करताना अनेक गोष्टी तिला शिकता आल्या. जितकं नवं कळायचं तेवढं आपल्याला आणखी शिकायचंय हे समजायचं. 

या काळात साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी काय करायचं या विचारानं शारदानं तिथे वैमानिक (पायलट) होण्याचं प्रशिक्षण घेतलं. फिलिपाईन्स हा ७१०० छोट्या छोट्या बेटांचा देश आहे. तिथे अनेक फलाइंग स्कूल अनेक आहेत. क्लार्क इंटरनॅशनल एअरपोर्ट देखील तिथे जवळच आहे. तिथल्या एका फलाइंग स्कूलमध्ये प्रवेश घेऊन शारदानं रीतसर ती परीक्षा उत्तीर्ण केली. विमान हवेत उडवून, त्यातली तंत्र आत्मसात करून ती एक कुशल वैमानिक झाली. वैमानिक होत असताना, हवेत विमान उडवतानाही तिला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. मात्र तशा परिस्थितीत गोंधळून न जाता, अतिशय संयमानं ती परिस्थिती कशी हाताळायची ही गोष्ट शिकली आणि यामुळेच एका प्रसंगात होणारा अपघात तिला टाळता आला. येणार्‍या अनुभवाला सतत सामोरं जावं, त्यातून आपल्याला सुचत जातं आपण आणखी प्रगल्भ होतो असं शारदा म्हणाली. आयुष्य म्हणजे अनुभव घेण्याची एक संधी असं तिला वाटतं. 

मेडिकलचं रजिस्ट्रेशन करतानाही पुन्हा बारावीच्या दोन गुणपत्रिका आहेत म्हणून परत अडथळे आले. मात्र त्याचाही पाठपुरावा करत मेडिकलचं रजिस्ट्रेशन करता आलं. पदोपदी परीक्षा द्यावी लागली. ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शारदानं ४२ वय गाठलं होतं. आता वैद्यकीय प्रॅक्टिस करता येणार होती. रुबी हॉस्पिटलमध्ये शारदा जॉईन झाली. घरी देखील प्रॅक्टिस सुरू केली. या दरम्यान आलेल्या अनुभवांतून शारदा बापट ‘नाही’ म्हणायची अत्यंत कठीण गोष्ट शिकली. लोक सहजपणे आपल्याला गृहीत धरतात आणि आपल्याला अनेकदा नाही म्हणता येत नाही, पण त्याचा ताण मनावर येतो. तेव्हा यातून मार्ग काढत नाही म्हणता यायला हवं असं तिला वाटतं आणि तिनं ते साध्यही केलं. सध्या शारदा डेटा सायन्स नावाच्या एका कंपनीत काम करत असून तिचं मेडिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर यातलं ज्ञान उपयोगात येत आहे. 

वायू, अन्न, पाणी यांचं प्रदूषण यावर एका पॉलिसीची आवश्यकता शारदाला वाटते आणि नागरिकांनीही आपली जीवनशैली बदलण्याची गरज असल्याचं ती म्हणते. सध्या ती नैसर्गिक शाश्वत शेतीचा प्रयोग करते आहे. 
शारदाचं सत्र संपताना डॉ. आनंद नाडकर्णी म्हणाले, ‘बुद्धिमता ही एकपदरी गोष्ट नाही. परंपरागत मापन आपण बुद्धीचं करतो आणि आपण आपल्या मर्यादित क्षमतांचाच फक्त विचार करतो. गणिती मेंदू, लॉजिकल थिंकिंग... वगैरे. पण या सगळ्या पलीकडे एक वेगळी बुद्धिमत्ता असते. ६० च्या वर बुद्धिमत्ता असतात. या बुद्धिमत्ता काही ठिकाणी रंगांबरोबर, काही सुरांबरोबर काही माणसांबरोबर तर काही यंत्रांबरोबर असतात. काही माणसं अशी असतात की त्यांच्यात बहुरंगी बुद्धी असते पण आपली शिक्षणव्यवस्था खूप परिश्रमपूर्वक तिला छाटून टाकते. आपण आपला मुलगा किंवा मुलगी नववीत दहावीत गेली की तिला सूचना द्यायला लागतो. एका ठिकाणी लक्ष केंद्रित कर वगैरे. या आपल्या मुलांना सततच्या सांगण्यानं आणि आपल्या हटटानं आपण मुलांच्या पसरणार्‍या बहुरंगी बुद्धीचं बोन्साय करतो. या बहुरंगी बुद्धीला जर आपण खतपाणी घातलं, जर आपण तिला वाव दिला तर ती आपल्याला वेगवेगळ्या तर्‍हेनं स्वतःला व्यक्त करेल आणि तिच्या वेगवेगळ्या शाखांमधला स्वतःचा अनुबंध मिळत जाईल. शारदा बापट कायद्याचं, इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकलचं ज्ञान एका बाजूनं एकसंध वापरताहेत, त्यातून तुमची जिवनाची शैली शाश्वतेकडे नेताहात. यात पियानोचे सूर कधी गुंपले आणि विमानाची लय आणि तान कधी आली यात अवघा रंग एक झाला.......हा प्रवास आम्ही मनामध्ये घेतला तर तुम्हाला समजून घेणं सोपं जाईल. तुम्ही बहुरंगी बुद्धीचं रोल मॉडेल आहात. काहीजणांना बुद्धीचे असे अनेक दिशांनी जाणारे पंख असतात, ते छाटू नका, त्यांना वाढू द्या त्यांची एकमेकांमधली गुंफण समजेल अशी स्पेस त्यांना द्या. हे आम्ही तुमच्या प्रवासातून शिकलो.’

अमृत देशमुख
 सीएसारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण करून सीएचं काम बघणारा अमृत देशमुख हा तरूण एके दिवशी एका मोठ्या कंपनीतली आपली सहा आकडी पगाराची नोकरी सोडून देतो आणि पुस्तकांनी झपाटला जातो. सध्या तो अनेक पुस्तकं वाचतो आणि त्यांचा सारांश काढतो. आपल्या पुस्तकवेडानं आपल्याबरोबरच जगभरातल्या साडेसहा ते सात लाख लोकांना त्यानं स्वतःबरोबरच जोडून घेतलं आहे, त्याची ही गोष्ट. त्यानं या वेडातूनच बुकलेटगाय नावाचं अ‍ॅप तयार केलं आणि ते मोफत कुणालाही इन्स्टाल करता येईल याची व्यवस्था केली. 
'मेक इंडिया रीड' या वेडानं अमृत झपाटला आहे. त्याला बुकलेटगाय म्हणूनच आज ओळखलं जातं. 

अमृतला लहानपणापासून वाचनाचं वेड नव्हतं. अमृत लहान असताना अमृतचा भाऊ सगळ्यांना सांगायचा की कोणीही भेट देताना फारतर पुस्तक द्यायचं बाकी काही द्यायचं नाही. त्या वेळी अमृतला ती गोष्ट मुळीच आवडायची नाही. एकदा सगळे गावाला गेले असताना अमृतनं एक फेक वाढदिवस साजरा करून आनंद मिळवला. पण पुढे आपल्या भावामुळेच अमृतला
पुस्तकं वाचायला आवडायला लागलं. अमृत आधी लहान मुलांसाठी असलेली पुस्तकं वाचायचा. त्यानंतर हळूहळू प्रकार बदलत गेले. 

यातूनच अमृतला वेगानं वाचनाचं तंत्र समजलं. वाचनाची स्पीड चांगली असेल तर आपली झोप उडते. ब्रेन लव्हज स्पीड. स्लो वाचलं की झोप येते. वाचनाचा अ‍ॅव्हरेज स्पीड १५० ते २५० शब्द एका मिनिटाला असतो अमृतचा तो १२०० शब्द आहे. त्याचं एक तंत्र आहे. ते माहीत करून त्याची प्रॅक्टिस करायला हवी. विवेकानंद अशाच पद्धतीनं (व्हिज्युअल पद्धत) वाचायचे. 
अमृत सीए झाला आहे. खरं तर त्यानं सीए होणं हेही काही सोपं काम नव्हतं. सीएचा लाँग फॉर्म लोक गमतीनं 'कम अगेन' असं म्हणतात. मात्र अमृतनं सांगितलं, 'मी सीए झालो याचं कारण माझ्या वडिलांचे जे जे सीए मित्र होते, त्यांच्या बायका दिसायला खूप सुंदर होत्या.' त्याचं हे वाक्य ऐकताच प्रेक्षागृहात एकच हशा पिकला. 

पुस्तकांनी आपल्या आयुष्याचा उद्देश काय हे कळायला मदत केली. अमृतचा दृष्टिकोन बदलला. आधी तो कमी बोलणार्‍यांना तुच्छ लेखायचा. हळूहळू त्याचा दृष्टिकोन बदलला. ब्रेन मल्टीटास्कींग साठी अनुकूल नाही. वन थिंग अ‍ॅट अ टाईम. फोकस करा. हेही त्याला कळलं. तसं करणं हे शॅडो वर्क आहे. खोलवर लक्ष केंद्रित करून काम करणं त्याला कळलं. आणि हे पुस्तकांनी त्याला सांगितलं. 
सोशल मिडियाचा वापर अमृत व्यवस्थितपणे करतो. त्याचे पाच फेसबुक अकाउंट आहे, त्याचं यूट्यूब अकाउंट आहेत. 
एकदा अमृत आणि त्याचा मित्र गप्पा मारत बसलेले असताना सीएमधलं सुरुवातीचं अपयश, स्टॉक मार्केटमधलं अपयश यामुळे तो थोडा निराश झाला होता. त्याच्या मित्रानं त्याला 'आपण बाहुबली चित्रपटाला जाऊ' असं म्हटलं. सिनेमाला गेला असताना मूड तर नव्हताच. सेव्हन हॅबिट्स हे स्टीफन कोवेनचं पुस्तक वाचत असल्यामुळे त्यानं चित्रपट सुरू व्हायला वेळ असल्यानं आपल्या मित्राला या पुस्तकात काय आहे ते अमृतनं सांगितलं. मित्र इतका इंप्रेस झाला की तो म्हणाला, मला पुस्तक वाचायला वेळ मिळत नाही. पण तू पुस्तक वाचलं की त्याचा सारांश मला पाठवत जा. अमृतला आपल्या वाचनाचा आणि ते सांगण्याचा दुसर्‍याला उपयोग होतोय, आवडतंय हे कळताच खूप आनंद झाला. त्याचं नंतर चित्रपटात लक्षच लागेना. मध्यंतरात खोटं बोलून तो निघाला. इंटरनेटवर सर्च केल्यावर असं काम दुसरं कोणी करत असल्याचं त्याला आढळलं नाही. आपण हे काम करायचं असं त्यानं पक्क ठरवलं. मात्र त्याला त्यासाठीचं अ‍ॅप बनवायचं माहीत नव्हतं. तसंच आयटीचं ज्ञान त्याच्याजवळ नव्हतं. अमृतनं 'विंग्ज ऑफ फायर' हे अब्दुल कलाम यांचं पुस्तक वाचून त्याचा सारांश लिहिला आणि तो आपल्या दहा मित्रांना पाठवला. तो वाचून एकाच आठवड्यात त्याला हजार लोकांनी आम्हाला पण असा पुस्तकांचा सारांश पाठव अशी विनंती केली. 

अमृतनं आत्तापर्यंत १२५० पुस्तकं वाचली आहेत. १५० सारांश बनवले आहेत. आठवड्याला एक असे आपण पाठवत असतो, असं तो म्हणाला. वाचणारे लोक नंतर पुस्तकापर्यंत जातात की तिथे थांबतात या गोष्टीची अमृतला भीती वाटत होती. मग त्यानं अ‍ॅमेझॉनच्या लिंक चेक केल्या तेव्हा त्या पुस्तकांचा खप वाढलेला त्याला आढळला. 
५० हजार लोक व्हॉटसअपवर झाले तेव्हा अमृतनं पुन्हा त्यांच्या वाचनाचा पाठपुरावा केला, तेव्हा अनेक लोकांनी वाचलेलं नव्हतं. अमृतला वाईट वाटलं. पण अमृतनं एका पुस्तकात वाचलं होतं, की ज्या लोकांना प्रभावित करायचंय त्यांचा दिनक्रम तपासा आणि त्यातून उपाय शोधा. अमृतनं ते करून बघितलं की सगळे लोक कानात हेडफोड घालून काहीतरी ऐकताहेत. त्या दिवशी घरी आल्यावर अमृतनं त्या पुस्तकाच्या सारांशाचं स्वतःच्या आवाजात रेकॉर्डिंग केलं. मात्र त्यानं रेकॉर्ड केलेलं त्यालाच फारसं आवडलं नाही. मग त्या रेकॉर्डिंगवर आणि स्वतःवर देखील त्यानं खूप काम केलं. त्यात नाट्यमयता आणली. आवाजाचे चढउतार तो शिकला. आपलं म्हणणं ऐकायला हवं अशी रंजकता त्यानं त्यात आणली. या ऑडिओ रेकॉर्डिंगनं मात्र लोक पुस्तकं ऐकू लागले आणि त्यावरच्या प्रतिक्रियाही देऊ लागले. 
हे सगळं करताना अमृतमध्ये अनेक गोष्टीत बदल झाले. आधी त्याला परिपूर्णतेत रस होता. पुस्तकांनी त्याला वेगळी दृष्टी दिली. मी जे काही करीन त्यात इंप्रुव्ह करत करत पुढे जाणं त्याला कळलं. अमृतची वाचनाची गती वाढली. अमृतचा भाऊ हेमंत त्याला पुस्तक वाचताना रँडमली वाचायला सांगायचा. एकाच प्रकारची पुस्तकं वाचायची नाहीत असं तो म्हणायचा. एकच जॉनर आवडतो असं करायचं नाही. त्यामुळे अमृत कुठं तरी काय आहे त्यापेक्षा तुमच्याकडे काय आहे त्याचं तुम्ही काय करता हे महत्वाचं. हे अमृतनं वाचलं होतं. त्याच्या रेकॉर्डिंगमध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आधी शिकायचं मग करायचं हे आपण शिकतो. पण जॉन हर्टनं म्हटलंय, की करत करत शिका. करणं हेच शिकणं. शिकणं आणि करणं या दोन गोष्टी नसून त्या एकच आहेत. 
अमीत पुस्तकं कशी निवडतो हे त्याला लाखो लोक जोडल्यागेल्यामुळे कळायला लागलं आहे. लोकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया येतात. अनेक लोक पुस्तकं पाठवतात. त्यामुळे लायब्ररी आपोआप वाढते. 
वाचकवर्गात ७५ टक्वे स्त्रिया अमृतच्या अ‍ॅपवर आहेत. त्यानंतर कॉलेजवयीन आणि इतर आहेत. आता इतरही अनेक लोक अमृतला मदतीसाठी पुढे येताहेत. अनेक भाषांमधल्या पुस्तकांसाठीही लोक आज विचारणा करताहेत. 

अमीत गोडसे
अमीत गोडसे हाही बीई मेकॅनिकल विषय घेऊन इंजिनिअर झालेला तरूण. एका फ्रेंच कंपनीत तो काम करत होता. एके दिवशी याची गाठ मधमाशांशी पडली आणि मधमाशांचं संवर्धन हेच त्याच्या आयुष्याचं ध्येय कसं बनलं त्याची ही कहाणी! मधमाश्यांना न मारता त्यांचं पोळं उतरवणं त्याचं काम आहे. त्याची 'बी बास्केट एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड' नावाची कंपनी आहे. मधमाश्यांचं पुनर्स्थापन तो करतो. अमृत जसा पुस्तकांमधून मधुसंचय गोळा करून वाचकांपर्यत तो पोहोचवतो, त्याप्रमाणे अमीत मधमाशांचं आख्खं पुस्तक आपल्यासमोर उलगडून दाखवतो. 
अमीतनं स्वप्नातही कधी मधमाशांचा विचार केला नव्हता. तो मुंबईतल्या एका कंपनीत काम करत होता. त्याला ते आयुष्य रटाळ आणि कंटाळवाणं वाटत होतं, पण तरी तो ते करत होता. अमीतनं पुण्यात एक फलॅट विकत घेतला होता. त्याच्या सोसायटीत मधमाशाचं एक पोळं होतं. तिथल्या लोकांनी ते काढण्यासाठी पेस्ट कंट्रोलच्या लोकांना बोलावलं आणि दुसर्‍या दिवशी अमीतला लाखो मधमाशांचा मरून पडलेला सडा बघायला मिळाला. अमीतला खूप वाईट वाटलं. आपल्याला मध हवा आहे पण मधमाशा नको आहेत या गोष्टीनं तो खूप अस्वस्थ झाला. 

अमीतनं थोडा शोध घेऊन मधमाशांवरचं प्रशिक्षण घेतलं. त्यावर आपणच काम केलं पाहिजे असं त्यानं ठरवलं. मधमाशांना वाचवलं पाहिजे या ध्यासानं तो कामाला लागला. अनेक आदिवासी पाड्यांमध्ये तो फिरला. मधमाशांना वाचवायचं तंत्र तो शिकला. अनेक सोसायट्यांमध्ये तो फिरला आणि त्यानं लोकांना मधमाशांना मारू नका असं सांगितलं. मधमाशांच्या अनेक स्पिशीज असतात. त्याप्रमाणे त्यांना पोळ्यापासून कसं दूर करायचं याचे उपाय असतात. अमीतनं संपूर्ण भारतभर फिरून अनेक ठिकाणचे उपाय आणि स्वतःची काही तंत्रही मधमाशांच्या बाबतीत विकसित केली होती. 
अमीतनं जेव्हा चांगली नोकरी सोडली, तेव्हा त्याच्या आईला खूप वाईट वाटलं. कारण इतके दिवस त्यांच्या म्हणण्यानुसार तो ऐकायचा. तो इंजिनिअर झाला होता. आणि एक चांगली नोकरी सोडून बसला होता. त्याच्या या कृतीनं त्याच्या नातेवाईकांनी तो वेडा झालाय असंच म्हणायला सुरुवात केली. अमीतची बहीण आणि वडील मात्र त्याला समजून घेत असत. 

मधमाशा संपल्या तर चारच वर्षांत मानवजात नष्ट होईल. मधमाशा नसतील तर पुनरूप्तादन होणार नाही. ते झालं नाही तर वनस्पती जगणार नाहीत. वनस्पती नसतील तर प्राणी जगणार नाहीत. मधमाशांचं जग खूप वेगळं आहे. झाडांचं आणि मधमाशांचं सहजीवन आहे, असं अमीत म्हणतो. 
अमीत हे काम करताना पोळं काढल्यावर अर्धा त्यांना देतो अर्धा तो ठेवतो. पोळं काढण्यासाठी हजार रुपये घेतले जातात. हा मिळालेला मध विकलाही जातो. विदर्भ, छत्तीसगढ, मध्यप्रदेश इथूनही मध गोळा केला जातो. पाच टन मधाची विक्री सध्या अमीत करतो. अमीतचा हेल्पलाईन नम्बर आहे. त्याची वेबसाईट आहे. मधमाशा कुणाला हव्या असतील तर त्याही पुरवल्या जातात. आज पोळं काढताना मधमाशांना मारलं जात नाही. 

खरं तर अनेक लोक उत्तर प्रदेश आणि बिहार मधून येतात आणि मध म्हणून वेगळाच माल विकतात. त्यावर कोणाचंही नियंत्रण नाही. आज चांगल्या मधासाठी कुठला कायदा नाही. आज तर प्रत्येक गल्लीबोळात मधाच्या बाटल्या विक्रीला ठेवलेल्या दिसतात. त्यामुळे शुद्ध मधाची शंका निर्माण होते. 
मधमाशा अमीतला चावत नाही कारण आता त्याच्या शरीरावर मधमाशांच्या चावण्यावर परिणाम होत नाहीत. मधमाशी एक किंवा दोन चावल्या तरी ते माणसासाठी उपकारकच आहे. त्याचं कारण विषामध्ये मेलेटिन नावाचा प्रकार असतो. यामुळे संधीवात होत नाही, पॅरेलेसिस होत नाही. कॅन्सरवर देखील मेलेटिन विषयी संशोधन सुरू आहे. 

आज अमीतबरोबर सहा लोक काम करतात. आता लवकरच औरंगाबादला हा प्रकल्प सुरु होत आहे. अमीत आता इतर लोकांनाही मधमाशांचा मध कसा गोळा करायचा याचं प्रशिक्षणही देण्याचं काम करतोय. आता महाराष्ट्रच नव्हे तर अमीतचं काम आता सीमा ओलांडून बाहेरही गेलं आहे. 
अमीतचा वाढदिवस असल्यानं पुणे वेधतर्फे व्यासपीठावर केक आणून त्याचा वाढदिवस खूप आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. 

संजय पुजारी 
 विज्ञान प्रसाराचं कार्य हेच आपलं जीवन ध्येय समजणार्‍या कर्‍हाडच्या संजय पुजारी या तरुणाला भारत सरकारनं राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केलं. संजय पुजारी हा तरूण एमएस्सी झाला असून कर्‍हाडमधल्या टिळक हायस्कूलमध्ये विज्ञानशिक्षक म्हणून कार्यरत आहे. कर्‍हाडसारख्या ठिकाणी या आदर्श शिक्षकानं डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र उभं केलं आणि महाराष्ट्रातल्या मुलांना, शिक्षकांना, पालकांना विज्ञानाकडे कसं वळवलं याची ही गोष्ट!
जगण्याच्या सार्थकाची लागली रे आस अशा गीतातल्या शब्दांचा अर्थ खूप महत्वाचा. विज्ञानानं संजयच्या जगण्यात ती सार्थकता भरली आहे. शहरी वातावरणापेक्षा वेगळ्या वातावरणातून संजय आला. विज्ञानाची गोडी कशी लागली हे सांगताना संजयनं आपले आई-वडील दोघंही शिक्षक असल्याचं सांगितलं. 

संजयचे आई-वडील कोल्हापूरजवळच्या गडहिंग्लज या गावात राहायचे. गावात चार चार दिवस लाईट गायब असायची. संजयच्या शाळेतले विज्ञानशिक्षक प्रयोग करत विज्ञान शिकवायचे. तसंच गावात विज्ञानप्रदर्शन करायचे. संजयला ते सगळं आवडायचं आणि आपणही असं काहीतरी वेगळं करावं असं त्याला वाटायचं. 
दिवाळीच्या सुट्टीत संजय किल्ला करायचा. पाणी गडावर आणणं, गावात लाईट आणणं, जनरेटर तयार करणं, हे सगळं तो मन लावून करायचा. त्याचा किल्ला बघायला सगळा गाव गर्दी करायचया. त्या वेळी गावात टीव्ही नव्हता, पण संजयनं मेनबत्तीच्या उष्णतेवर टीव्ही तयार केला होता. त्या वेळी स्कायलॅब कोसळण्याची भीती जगभर पसरली होती, तेव्हा संजयनं स्कायलॅबचं एक मॉडेल तयार केलं होतं आणि आकाशकंदिलासारखं ते लटकवून ठेवलं होतं. ते बघायलाही लोक गर्दी करायचे. 

संजय अभ्यासात हुशार असल्यानं त्याला पुढे मेडिकलला प्रवेश मिळाला. त्याला डॉक्टर व्हायचं होतं. एकदा एका मित्रानं त्याला 'तुझ्यात एक चांगला शिक्षक दडलाय तू डॉक्टर कशाल होतोस', असं म्हटलं आणि संजयला ते पटलं. त्यानं हॉस्टेलवरून आपलं सामान उचललं आणि तो परत आला. 'तू मेडिकलला गेला तरी बीएड होता येतं का बघ' असं संजयचे आई-वडील म्हणायचे. त्यामुळे त्याच्या परतण्यानं घरात विरोध वगैरे झाला नाही. 

संजयनं आता विज्ञान नीटपणे शिकायचं असं ठरवलं. त्यानं बीएस्सी केलं, नंतर एमएस्सी आणि बीएडही केलं. तो नाटकांमधूनही काम करायला लागला. विज्ञानातली तत्वं वापरून वेगवेगळे उपक्रम करणंही चालूच असायचं. एकदा संजयनं एका झुरळाचं मॉडेल तयार केलं. त्याचे पंख, त्याचे अवयव, त्याचे पाय कसे काढले जाऊ शकतात हे मॉडेलद्वारे दाखवलं. 
विज्ञान शिकवताना जेवढं सोपं करता येईल ते केलं पाहिजे असं संजयला वाटतं. पद्मश्री अरविंद गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार 'प्रत्येक मुलाच्या डोळ्यातली जिज्ञासा पुरवण्याचा प्रयत्न कर', हे वाक्य त्याच्यावर परिणाम करून गेलं. 

गडहिंग्लजनंतर संजय कर्‍हाडला आला. तिथे त्यानं नारळाच्या झाडावर किटकनाशकं कसे मारता येतील यावर उपकरण तयार केलं. नॅशनल सायन्स कॉग्रेससाठी त्याची निवड झाली. संजयला दिल्लीला बोलावण्यात आलं. अटलबिहारी बाजपेयी त्या वेळी भारताचे पंतप्रधान होते. अब्दुल कलामांच्या हस्ते संजयचा सत्कार होणार होता. संजयनं अब्दुल कलाम यांचं अग्नीपंख वाचलं होतं. त्या गर्दीमध्ये अब्दुल कलामांच्या पाया पडला. त्यांनी त्याच्या गालावरून हात फिरवला. त्यांचा ऑक्सिजन जणूकाही आपल्या हृदयात भरला गेलाय असं त्याला वाटलं. हा यशवंतराव चव्हाण यांच्या गावचा तरूण आहे, असं अब्दुल कलामांना कोणीतरी सांगितलं. तेव्हा तू पुढे काय करशील अशी अब्दुल कलाम यांनी विचारणा केल्यावर संजयनं मी तुमच्या मिसाईलचं काम सर्वत्र पसरवेन असं सांगितलं. संजयच्या विनंतीला मान देऊन दुसर्‍या दिवशी अब्दुल कलाम यांनी त्याला स्टेजवर बोलावून त्याच्यासोबत फोटो काढले. 

परतल्यावर आपण कर्‍हाडचे अब्दुल कलाम आहोत या थाटात संजयनं त्यांच्यासारखे कसे वाढवून फिरायला सुरुवात केली. त्याच्या मनानं कल्पना चावलाच्या दुर्घटनेमुळे तिच्या नावानं वेध अवकाशाचा या नावानं जागोजागी व्याख्यानं करावीत असं ठरवलं. अब्दुल कलाम यांनी संजयला रॉकेट्सची काही मॉडेल पाठवली संजयनं काही मॉडेल्स स्वतः तयार केली. संजय आपली शाळा करून गावोगाव कॉलेजेसमध्ये व्याख्यानं देत फिरू लागला. संजयची पत्नी आणि त्याचे मित्र म्हणाले आपण कल्पना चावला विज्ञान केंद्र उभारू. नोंदणीच्या वेळी कल्पना चावलाचं ना देण्यासाठी त्याला नकार देण्यात आला. मग तेच नाव आपल्या विज्ञान केंद्राला द्यायचं या चिकाटीनं संजयनं प्रयत्न सुरू ठेवले. त्यानं कल्पना चावलाच्या वडिलांना पत्रव्यवहार केला. एके दिवशी संजय, त्याची पत्नी आणि मुलं रेल्वेनं चक्क त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांच्याकडून परवानगी मिळवली.

सुरुवातीला दहा बाय दहाच्या खोलीत असणारं कल्पना चावला विज्ञानकेंद्र आज ३००० स्क्वेअर फूटच्या हॅालमध्ये आहे. 
दर रविवारी इथं मुलांना प्रयोग करायचं शिकवलं जातं. मुलं मॉडेल करून बघतात. कल्पना चावला विज्ञान केंद्रामुळे कामाला स्थैर्य प्राप्त झालं. संजयनं २०० प्रयोग या विज्ञानकेंद्रात निर्माण केले आहेत. हे प्रयोग खूप रंजक बनवले आहेत. त्याला संगीत आणि गाणी यांची साथ दिली. विज्ञानाच्या सहल काढायला सुरुवात केली. मुलांबरोबर पालकही केंद्रात यायला लागली. जादूचे प्रयोग दाखवून त्यामागचं विज्ञान सांगितलं जातं. आकाशदर्शन, आकाश निरीक्षण करण्यासाठी शुका्रचं अधिक्रमण झालं ते बघण्यासाठी मोहन आपटे यांच्याबरोबर नगरच्या चांदबिबी महालात जाऊन मुलाना शुक्र सूर्यावरून जात असताना प्रतयक्ष मुलांना दाखवलं. विज्ञान कंटाळवाणं होऊ नये म्हणून मॉडेलची साथ घेऊन संजय पुजारी विज्ञान समजावून सांगतो. 
संजयच्या विज्ञान केंद्रात डॉ. जयंत नारळीकर, सुरेश नाईक, दीपा देशमुख, अच्युत गोडबोले यांच्यासारखे विज्ञानावर प्रेम करणारे लोक येतात. संजय पुजारीचे गुरू विद्यासागर पंडित वेधला संजयचं कौतुक करण्यासाठी खास आले होते. 

न्यूटन, गॅलिलिओ आणि एडिसन अशा वैज्ञानिकांची भेट घडवणारा हा एक चित्रपट संजयनं ३४ मुलांना घेऊन तयार केला. आणि यात या वैज्ञानिकानी मुलांशी केलेल्या चर्चा दाखवल्या. या चित्रपटात या वैज्ञानिकांबरोबर मुलंही प्रयोग करताना दाखवली आहेत. 
विज्ञानवादी, विवेकवादी तरूण निर्माण करून युवा निर्माण करायचेत. विज्ञानकेंद्र डिस्नेलॅडसारखं बनवायचं संजयचं स्वप्न आहे आणि त्याला ते साकार करायचं आहे. 

जयदीप पाटील
मराठी विज्ञान परिषदेचा ‘विज्ञान सेवक’ पुरस्कार मिळवणारा जयदीप पाटील यानं जळगाव जवळच्या आपल्या गावाला विज्ञानगाव बनवण्याचा विडा कसा उचलला आणि मिशन नोबेल प्राईझ ही चळवळ कशी उभी केली त्याविषयीची ही गोष्ट!.........रसायनशास्त्र विषय घेऊन जयदीपनं एमएस्सी केलं. 
जळगावपासून २६ किमती अंतरावर कल्याणेहोळ हे जयदीपचं गाव. शेतकरी कुटुंबाच्या समस्या बरोबर घेऊनच जयदीप मोठा होत होता. श्रीमंतीची जी लक्षणं मानली जातात, टीव्ही पाहिजे, फ्रीज पाहिजे हे त्याच्या घरात काहीही नव्हतं. पण त्यामागची तत्वं, टीव्ही कसा चालतो, फ्रीजचं तंत्र काय हे समजून घेण्याचा प्रयत्न तो करायचा. 

लहान असताना एकदा कुणी नातेवाईक आजारी असताना एका तांत्रिकाला बोलावलं गेलं होतं. जयदीप तेव्हा लहान ना मोठा अशा अवस्थेत होता. जयदीपच्या भावानं त्या तांत्रिकाला सरळ बदडून काढलं. काही वेळानंतर तांत्रिक गयावया करत म्हणाला, दादा चार महिन्यांपासून पाऊस नाही, शेतात मजुरी नाही. या कामातून मला पैसा मिळतोय म्हणून मी हे काम करतोय. ही घटना जयदीपच्या मनावर खूप मोठा परिणाम करून गेली. दिसतं तसं नसतं, आणि त्यापलीकडल्या असलेल्या जगाला समजून घ्यावं लागेल हे त्याला या प्रसंगातून समजलं. 
जयदीपची आई धार्मिक वृत्तीची. मात्र तिनं कधी व्रतवैकल्या केलेली जयदीपनं बघितलं नाही. तिला अन्नदान करायला आवडायचं. अन्नदानाचा एकच धर्म असतो हे तिला वाटायचं. वडील धार्मिक नव्हते. पण आईला विरोध करायचे नाहीत. जयदीपला दोघांपैकी कोणाचं ऐकायचं असा प्रश्न पडायचा. अशा वातावरणात जयदीप दहावी पास झाला. त्याच्या आईला तो डॉक्टर व्हावा असं वाटायचं. जयदीपलाही आपण हुशार आहोत असं वाटायचं. मात्र डोक्यात हवा गेल्यानं त्याला बारावीत ४६ टक्के मिळाले. तो बीएस्सीलाही पात्र नव्हता. पण तालुक्याच्या ठिकाणी प्रवेश मिळाला. बॉटनीचे शिक्षक चांगले असल्यानं १०० पैकी ९३ गुण त्याला पडले आणि बाकी चार विषयांत तो नापास झाला. त्याच वेळी 'किमयागार' या अच्युत गोडबोले यांच्या पुस्तकानं त्याला एक नवा दृष्टिकोन दिला. नरेंद्र दाभोळकरांची पुस्तकं जयदीपला आवडायला लागली. जयदीप स्पर्धा परीक्षांसाठी शिकवण्याचं काम करायचा.
या सगळ्यांतून एके दिवशी अचानक मिशन नोबेलचा जन्म झाला. 

जयदीप नियमित लोकसत्ता वाचायचा. दहा ऑक्टोबर या तारखेला पेपर हातात घेतला, तेव्हा कैलास सत्यार्थी यांना शांततेचं नोबेल पारितोषिक मिळाल्याची बातमी त्यात होती. या बातमीनं त्याला खूप आनंद झाला. पण एक ओळीनं त्याचं लक्ष वेधून घेतलं. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशात ११ नोबेल विजेते झाले आणि अमेरिकेची लोकसंख्या ३५ ते ३८ कोटी असताना तिथे मात्र ३६८ नोबेल विजेते असल्याची ती खंत व्यक्त करणारी ओळ होती. जयदीपनंही आपली नाराजी व्यक्त केली, तेव्हा जयदीपची पत्नी त्याला म्हणाली, इतर कोणाकडून काही करण्याची अपेक्षा करण्यापेक्षा तुम्हीच हे काम हाती का घेत नाही? 

जयदीपनं आता आपल्या कामातून विज्ञानात काम करणारी मुलं तयार करायचं ठरवलं. आधी आपण लोकांमध्ये जागृती करायची या भावनेतून त्यानं मिशन नोबेल ही चळवळ सुरू केली. ज्या शाळेत आपण शिकलो तिथे आणि अनेक शाळांमधल्या शिक्षकांना नोबेल पारितोषिक नेमकं काय असतं, ते का दिलं जातं याविषयी काहीच माहिती नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. अशी परिस्थिती असताना नोबेल मिळवण्यासाठी मुलं तरी कशी तयार होतील हा प्रश्न त्याला पडला. यातूनच जयदीप शाळाशाळांमधून, कॉलेजेसमधून जायला लागला आणि नोबेल पारितोषिकावर, विज्ञानावर बोलायला लागला. शिक्षकांसमोर, विद्यार्थ्यांसमोर, पालकांसमोर त्याची व्याख्यानं सुरू झाली. संपूर्ण महाराष्ट्र फिरून पाचशेच्या वर व्याख्यानं त्यानं दिली. 

अचानक एके दिवशी त्याचे एक शिक्षक त्याला म्हणाले, 'जयदीप फक्त बोलण्यानं तुला कुठलाही निष्कर्ष हाती येणार नाही. तुला काहीतरी सर्जनशील काम करावं लागेल, तरच त्याचा चांगला निकाल तुला मिळेल.' त्यांच्या बोलण्याचा परिणामही जयदीपवर झाला आणि त्याच्या डोक्यात विज्ञानगावाच्या संकल्पनेनं जन्म घेतला. जयदीपच्या कल्याणेहोळ गावात ही संकल्पना राबवायचं ठरवलं. जयदीपनं विज्ञानवेड्या १८ तरुणांना या कामासाठी एकत्रित केलं. या सगळ्यांनी संपूर्ण गावात वैज्ञानिकांची पोस्टर्स लावायला सुरुवात केली. न्यूटन, आईन्स्टाईन दूरच पण सीव्ही रामनलाही कोणी ओळखायचं नाही. गावात बॅनर लावताना एकानं सी.व्ही. रामन यांचा फोटो पाहून जयदीपला विचारलं, 'हा तुझ्या आजोबांचा फोटो आहे का.' जयदीपनं त्यांना समजावून सांगितलं. गावातल्या ८० विजेच्या खांबावर सगळे वैज्ञानिक त्यांचे शोध आणि माहिती झळकायला लागली. दुसर्‍या दिवशी गावात चर्चा सुरू झाली. गावातली मुलं आपल्या घरात ही मंडळी कोण आहेत हे सांगायला लागली. जयदीपला चांगलं शिकवता येत असल्यामुळे मुलांना दर गुरुवारी जमा करायला सुरुवात केली. आपली मुलं चांगलं काहीतरी मोबाईल न खेळता, टीव्ही न बघता काहीतरी शिकताहेत या विचारानं ते खुश झाले. 
जयदीपनं ६० मुलांची सहल इस्त्रोला नेली. तिथं खरंखुरं रॉकेट बघून मुलं हरखून गेली. जळगाव जिल्हयाच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर इस्त्रोला गेलेली ती पहिली सहल होती. त्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली. 

जयदीपच्या घरात ३२ कोटीपैकी देवादिकाचे फोटो होते. आपल्या मनात आपण या देवांना जागा देऊ असं आईला म्हटल्यावर आई म्हणाली तू काहीतरी पुस्तकात वाचतोस आणि घरात धिंगाणा घालतोस. जयदीप म्हणाला, हे फोटो घरातून निघाले तर मी तुला मिक्सर घेऊन देईन. तिचं काम हलकं होणार होतं. जयदीपनं मिक्सर घरी आणला. घरातून सगळे देवादिकांचे फोटो बाहेर गेले. 
काही दिवसांनी जयदीपला मुलगा झाला. आपल्या नातवाला गोष्टी सांगताना जयदीपची आई त्याला राजा आणि त्याच्या दोन राण्यांची गोष्ट सांगायला लागली. इतकंच नाही तर गावातल्या भूत, चुडेल, वडापिंपळाचं झाड अशा गोष्टी ती सांगायची. यातून कधीही अंधाराला न घाबरणारा जयदीपचा मुलगा दिवसा देखील एकटा फिरायला घाबरायला लागला. ही गोष्ट जयदीपनं आपल्या आईच्या नजरेत आणून दिली. जयदीपची आई सहावी पास होती, पण तिला त्याच जुन्या गोष्टी ठाऊक होत्या. ती गोष्ट लक्षात येताच जयदीपनं तिला दीपा देशमुख यांची 'जीनियस' मालिका आणून दिली. सुरुवातीला तिला न्यूटन वगेरे नावं उच्चारताच यायची नाहीत. मग तिनं त्यावर उपाय काढून एक माणूस असं म्हणत शास्त्रज्ञांच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. आता जयदीपच्या घरात सगळे वैज्ञानिक आसपास आहेत. 
जयदीपची २००७ मध्ये जळगावला अच्युत गोडबोलेंची भेट झाली. त्यांच्या प्रोत्साहनामुळे त्यानं विज्ञानावरचं पुस्तक लिहिलं आणि त्याच्या ६५ हजार प्रती विकल्या गेल्या. या पुस्तकावर जयदीपनं त्याच्या आईचा फोटो पहिल्या पानावर होता. तिनं त्याच्या शिक्षणासाठी आपलं मंगळसूत्रही विकलं होतं. पुस्तक हातात पडल्यावर ती भरल्या अंतःकरणानं म्हणाली 'मला आज तू सगळ्यात मोठा दागिना दिलास.' 
ग्रामीण भागात रिझल्ट मिळायला वेळ लागतो. कारण तिथे बदल लवकर स्वीकारला जात नाही. मात्र जयदीप अशाह वातावरणात चिकाटीनं काम करत राहणार आहे. आपल्या गावातल्या गावठाण जमिनीवर भारतातलं पहिलं विज्ञान संग्रहालय उभारण्याचं काम त्याला सुरू करायचं आहे आणि हेच त्याचं स्वप्न आहे. 

संजय पुजारी आणि जयदीप पाटील यांच्या सहभागाचं विज्ञानमयी सत्र संपताना डॉ. आनंद नाडकर्णी म्हणाले, ‘शहरी भागात राहणारी मंडळी साधनसामग्री कशी नाहीत याची तक्रार आपण करतो. पण सगळ्या गोष्टींचा अभाव असतानाही संजय आणि जयदीप यांनी त्याची तक्रार न करता अथकपणे विज्ञानप्रसाराचा वसा घेतला आहे हे आपण सगळ्यांनी त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे.’ 

नेहा सेठ
 नेहा सेठ ही हरियाणा राज्यातली इंजिनियर झालेली तरूणी कबीरमय कशी होते हा तिचा प्रवास तिनं शेवटच्या सत्रात उलगडून दाखवला. नेहा ही राजस्थानी लोकसंगीताचे धडे महेशराम मेधावाल या आपल्या गुरूंकडून गिरवते आहे. तसंच लखनौ घराण्याचे अमीत मुखर्जी यांच्याकडे तिचं अभिजात संगीताचं शिक्षणही सुरू आहे. भारतभर भ्रमंती करणारी ही तरूणी म्हणजे एक आश्चर्यच आहे. 
तिच्या सत्राच्या सुरुवातीला पल्लवी गोडबोले हिनं कबीराचं 'मन लागो यार फकिरी मे' हे भजन गायलं. सगळं वातावरण भक्तिमय झालं. 

नेहाचे आईवडील विज्ञान विषयाचेच विद्यार्थी, त्यामुळे तिलाही विज्ञानाची आवड होती. ती इंजिनिअर झाली. मुंबईला येऊन तिनं कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करायला सुरुवात केली. तिला त्या नोकरीचा कंटाळा आला. दिवसभराच्या व्यस्ततेमुळे दिवस कधी सुरू होतो आणि रात्र कधी संपते हेच तिला कळायचं नाही. दोन वर्षांनी तिनं आपल्या या नोकरीचा राजीनामा दिला. नेहाला आपल्याला काय करायचं हे ठाऊकच नव्हतं. १४ वर्षं शाळेचे आणि त्यानंतरचे ४ वर्ष कॉलेजचे शिकूनही मला आजही कळत नाही मला काय करायचंय या विचारानं नेहा अस्वस्थ झाली. 

मग त्या तारुण्याच्या जोषात तिनं शिक्षणावर काम करायचं ठरवलं. तिनं टाटा सोशल सायन्सेस इन्स्ट्यिूटमध्ये एमएचं शिक्षण तिनं घेतलं. फिलॉसॉफी, चाईल्ड सायकॉलॉजी वगेरे विषयांच्या शिक्षणातून नेहाला स्वतःचा शोध लागायला सुरुवात झाली. आता आपण आपल्यात बदल कसा करायचा यावर नेहाचा विचार सुरू झाला. दोन वर्षानंतर एमए झाल्यावर तिनं सहा महिने गणित हा विषय शाळेमध्ये शिकवायला सुरुवात केली. मुलांबरोबर मैत्री करत तिनं खूप चांगल्या पद्धतीनं काम सुरू केलं. पण हाही आपला अंतिम टप्पा नाही हे तिला कळलं. तिनं भावाच्या व्यवसायात मदत करायला सुरुवात केली. तिनं आठ वर्षं मुंबईत तो व्यवसाय केला. लग्नही त्या वेळी केलं. 
नेहानं त्यानंतर ध्यानधारणा करायला सुरुवात केली. तिला आपल्या मनात डोकावायची संधी यातून मिळाली. नेहानं संगीत कधी शिकलं नव्हतं. पण या दरम्यानं ती संगीताकडे आणि कबीराकडे, संतसाहित्याकडे वळली. तिला लोकसंगीत ऐकायला आवडायला लागलं होतं. आपण किती वर्षं जगणार आहोत असा प्रश्न एके दिवशी तिच्या मनात आला. जगू किती माहीत नाही पण आपल्याला मरताना आपलं काही करायचं राहिलंय असं वाटायला नको असं तिला वाटलं. 
आपण जे करतोय ते आपल्याला त्या गोष्टीकडे नेणारं आहे का हा विचार नेहाच्या मनात आला. तिचं अंतर्मन तिच्याशी बोलायला लागलं. तिला जे कळत नव्हतं, ते तिला कबीर सांगायला लागला, ते तिला मीरेच्या भजनातून कळायला लागलं. 

आपल्यासाठी कसं जगायचं, आपल्यासाठीच कसं गायचं हे ती शिकली. 
नेहा जेव्हा भजन गाते, तेव्हा ती आपल्यामध्ये इतकी एकरूप होऊन जाते की बाह्यजगाचं भानच तिला उरत नाही. नेहाकडे बघताना मला मीरा कशी असेल याचं चित्रच उभं राहिलं. इतकी तल्लीनता, इतकं एकरूप होणं आणि स्वतःलाही विसरणं कसं शक्य असू शकतं असा प्रश्न इतके दिवस पडायचा. पण नेहानं या प्रश्नाचं उत्तर तिच्या जगण्यातून दिलं होतं. 
दोन दिवसांचं पुणे वेध खूप काही भरभरून देत संपलं. या दोन दिवसांत डॉ. आनंद नाडकर्णी यांचं अचाट काम आणि सळसळता उत्साह आणि केवळ मुलंच नाही तर आबालवृद्धांनी अर्थपूर्ण जगावं यासाठीची त्यांची धडपड मला पुन्हा त्यांच्याकडे खेचत राहिली. मी त्यांच्यापुढे नतमस्तक झाले. 
पुणे वेधचे दीपक पळशीकर आणि त्यांची आख्खी टीम यांचे परिश्रम सार्थकी लागले होते. 

पुणे वेधमध्ये सहभागी झालेले दहा लोक वेगवान प्रवाहाबरोबर आले आणि त्यांच्याबरोबरच ओढत घेऊन गेलेत असंच वाटत राहिलं. आनंद शिंदेनं हत्तीकडे बघण्याची एक नवी दृष्टी दिली, तर तुषारनं जिराफाचं अनोखं जग उलगडून दाखवलं. अमृत देशमुखचं पुस्तकवेड स्वतःपुरतंच न राहता तो जगाला पुस्तकवेड लावू इच्छितो तेव्हा त्याच्यातला आत्मविश्वास आणि प्रयत्न मोहवून गेले. अमीत गोडसेचा मधमाशांना जगवण्याचा आटापिटा भूतदयेची जाणीव मनाला करून गेला. सांरग गोसावी आणि यास्मिन युनूस यांची काश्मीर आणि भारत यांच्यातला दुवा बनण्याची गोष्ट स्तिमित करून गेली. तर शारदा आपटे ही साध्या सुती साडीतली स्त्री मला एक परीच वाटली. तिचे अदृश्य पंखही मला दिसले. अशक्य हा शब्द आपल्या डिक्शनरीतून काढून टाका असंच ती प्रसन्नपणे म्हणत होती. संजय पुजारी आणि जयदीप पाटील यांचं विज्ञानवेड लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करत जगण्याचा सुंदर मार्ग दाखवताना दिसत होतं. नेहामधली मीरा प्रेम कसं करावं, भक्ती कशी करावी आणि स्वतःचा शोध कसा घ्यावा हे तिच्या तल्लीनतेतून सांगत होती. 

या सगळ्यांनी आपल्या प्रवासातल्या अडथळयांचा बाऊ न करता आपला मार्ग आनंददायी तर बनवलाच, पण इतरांनाही तो खुला करून दिलाय. त्यांच्या झपाटलेपणातून जाणतेपणापर्यंतचा झालेला प्रवास रोमांचित करून गेला, पण जगण्याचं एक नवं भानही देऊन गेला. 
नेहाच्या भजनाबरोबरच वेधचं दोन दिवसांचं सत्र संपलं. पण पुढल्या वेधची प्रतीक्षा करण्याचे वेध देत!

दीपा देशमुख, पुणे

 
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.