कविमनाचे आ.ह. साळुंखे!

कविमनाचे आ.ह. साळुंखे!

महाराष्ट्रातले अभ्यासू पुरोगामी विचारवंत म्हणून आ. ह. साळुंखे ओळखले जातात. त्यांच्या कविता, त्यांची स्वकथनं, त्यांचं ललित लिखाण, त्यांचं बालसाहित्य, त्यांचं समीक्षात्मक लेखन आणि त्यांचं वैचारिक लेखन आज संपूर्ण महाराष्ट्राला नवा विचार देत आहे. त्यांच्या जगण्यावर चार्वाक, बुद्ध, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा प्रभाव आहे. धर्म असो वा धर्मचिकित्सा, िायांचे प्रश्न असोत वा गुलामगिरीविषयीचं भाष्य, मनुस्मृतीबद्दलची आपली भूमिका असो वा चार्वाक, बुद्ध, फुले, शाहू महाराज यांच्या विचारांची केलेली मांडणी आ. हं.नी सतत आपल्या लिखाणातून समाजाला प्रगतीचा आधुनिकतेचा, विवेकाचा आणि सुजाण नागरिक बनण्याचा मार्ग दाखवला. आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवत असतानाच त्यांनी या समाजाला त्यावर विचार करायला भाग पाडलं. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी आपल्या लेखणीतून समाज प्रबोधनाचं कार्य हाती घेतलं. आ. ह. साळुंखे यांनी वेदांचा अभ्यास केला, त्यासाठी त्यांनी संस्कृत भाषेचं अध्ययन केलं. त्यांनी पाली भाषा आत्मसात केली कारण त्यांना बुद्धाचं कार्य आणि बुद्धाची शिकवण शिकायची होती. याच वेळी त्यांना रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये जाऊन आणखी शिकावं अशी तीव्र इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली होती. काही कारणानं ते शक्य झालं नाही, पण त्यांनी टागोरांच्या ‘गीतांजली’ची अक्षरशः पारायणं केली. संस्कृत, पाली बरोबरच त्यांनी मग बंगाली भाषाही आत्मसात केली.

आपल्या सगळ्या लिखाणातून आ.हं.नी अतिशय सौम्यपणे तरीही स्पष्ट भूमिका घेत आपल्या विचारांची मांडणी केली. त्यांनी आपल्या मूल्याशी कधीही तडजोड केली नाही. मात्र त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व इतकं त्रजू आणि हळुवार आहे की त्यांनी आपल्या लिखाणातून स्पष्टपणे आपले विचार जरी मांडले असले तरी त्यांनी कधी कुणाला दुखावलंही नाही आणि म्हणूनच त्यांचं लिखाण वाचणार्‍या, त्यांना प्रत्यक्ष भेटणार्‍या माणसांना ते आपलेसे वाटतात. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाणं आणि त्यातलं मर्म समजून घेणं हा आ.हं.च्या स्वभावातला एक विशेष पैलू अनुभवायला मिळतो. आज परिवर्तनवादी चळवळीतलं अग्रेसर नाव घ्यायचं झालं तर आ.हं.चंच नाव घ्यावं लागेल. 
 आ. ह. साळुंखे यांचं सर्वच प्रकारचं लिखाण लोकांना आवडलं, लोकांनी ते लिखाण आपलंस केलं, त्यावर अंतर्मुख होऊन विचार करायला सुरुवात केली आणि त्यानुसार आपल्या जगण्यातले बदल घडवण्यासाठी पावलं उचलली. याचं कारण आ.हं.च्या भाषेतला साधेपणा, समोरच्याच्या मनात उतरून त्याच्यापर्यंत आपले विचार पोहोचवण्याची जबरदस्त ताकद! आ. हं. च्या आय्ाुष्यात जेव्हा कविता या प्रकारानं हळूच प्रवेश केला आणि समोर येईल त्या विषयाला सोबत घेऊन त्यांची कविता कागदावर उतरू लागली, तेव्हा त्यांच्या मनात येणार्‍या प्रत्येक विषयांमधून कविता आपलं अस्तित्व दाखवू लागली. भारत-चीन य्ाुद्ध असो वा राष्ट्रप्रेम भरभरून कविता कागदावर उतरत गेल्या. याच वेळी प्रेमकवितांनीही आपला ठसा उमटवला. आ.हं.चा तारुण्यातला प्रवास खूपच अनोखा आहे. शरदचंद्र चटर्जींंच्या देवदाससारख्या कादंबर्‍यांनीही त्यांच्यावर मोहिनी टाकली होती. मुकेश या गायकाची गाणी त्यांच्या हृदयाला कातर करून सोडत होती. 
आ.हं.ची सखी, प्रेयसी अिाण नंतर पत्नी म्हणून आयुष्यात  आलेली मधुश्री हिला संस्कृत शिकवता शिकवता आ.ह. तिच्या प्रेमातच पडले. मधुश्रीचं आ.हं.च्या  आय्ष्यातलं असणं हे त्यांच्यासाठी स्फूर्तिदायी बनलं. त्यांच्यातल्या अफाट ऊर्जेला मधुश्रीमुळे चालना मिळाली.  हे पे्रम इतकं उत्कट आणि अतुट होतं आणि आहे की मधुश्रीच्या आकस्मिक मृत्यूनंतरही ते तिच्यापासून क्षणभरही दूर होऊ शकले नाहीत. मधुश्रीचं असणं, मधुश्रीचं दूर जाणं, मधुश्रीच्या आठवणी, मधुश्रीचा सहवास हे सगळं सगळं व्यक्त होण्यासाठी मनात उसळी मारत होतं आणि मग प्रतीक्षा करत असलेली कविता पुन्हा एकदा सगळे बंध तोडून धावतच त्यांच्याकडे आली आणि त्यातून आ.हं.चा ‘अशी भेटत रहा तू’ आणि ‘जीवनाची लय वेदनेत’ हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. 
आ.हं.ची कविता सहज, सोपी, रसाळ आणि ओघवती आहे. ती त्यांचीच नव्हे तर समोरच्याची त्याच्याही नकळत होऊन जाते. ही कविता सोपी असली तरी तिच्यातली खोली, तिच्यात दडलेले अर्थ इतके सुलभ नाहीत. आ.हं.ची कविता आक्रमकतेची कास धरत नाही, तर ती सौम्यतेला जवळ करणारी आहे. आ.हं.ची कविता निराशेचा सूर काढते, पण ती निराशेला कवटाळून बसत नाही. आ.हं.ची कविता दुःखाची भाषा बोलते, पण दुःखाला ती आपल्यावर अतिक्रमण करू देत नाही. आ.हंची कविता मनस्वी आहे, पण ती त्यांना वाहवत जाऊ देत नाही. 
करूणा हृदयी मस्तकी विवेक
याहून अधिक काय हवे?
आटू नये कधी झरा करूणेचा
दीप विवेकाचा विझू नये
बळ इतुके दे तुझ्या स्मृतीतून
मागणे याहून नाही दुजे

मधुश्रीच्या आपल्या प्रियतमेच्या जाण्यानं देखील आ.ह. सावरले. त्यांच्यातल्या विवेकानं त्यांना आजपर्यंत साथ दिली. मात्र मनातल्या करूणेनं त्यांच्या मनात कठोरतेचा प्रवेश होऊ दिला नाही. अर्थात, तरीही त्याचं श्रेय आ.ह. स्वतःकडे घेत नाहीत. 
तिचं असणं आता आ.हं.च्या इतक्या सवयीचं झालंय की ते म्हणतात ः 
धड एक काम 
करू देत नाहीस
सारख्या आपल्या येरझारा
आणि सुरू तोंडाची वटवट
क्षणभर सुद्धा 
स्वस्थ बसू देत नाहीस
हे घ्या, ते घ्या
अशी चालू सारखी कटकट

यातले वटवट आणि कटकट हे शब्दही प्रेमच व्यक्त करतात. ती नाही हे ठाऊक असूनही ती तरीही तिचा वावर कसा त्यांच्या आसपास आहे, ती त्यांची काळजी कशी घेते आहे आणि सतत काहीतरी त्यांना सांगते आहे....त्यामुळे काम करू देत नाही ही त्या प्रियकराची लाडिक तक्रार या कवितेतून व्यक्त होते आहे. 
ती होती तेव्हाचं जगणं हे खरं जगणं होतं. त्या सगळ्या गोष्टींमध्ये ताजेपणा होता, एक प्रकारचा जिवंतपणा होता. आता मात्र जगणं हा एक उपचार बनून राहिलाय असा त्यांच्यातला विव्हल प्रियकर सांगतो ः
तू सोबत होतीस
तेव्हाचे जगणे जिवंत होते
ते आतासारखे 
जगण्याचे केवळ सोंग नव्हते.....

ती असताना रोज नवं सर्जन काही करण्यासाठी खुणावत राहायचं. ते सगळं जगणंच खूप उत्स्फूर्त होतं, उल्हसित करणारं होतं. आता केवळ एखाद्या यंत्रानं हालचाली करत राहाव्यात असं काहीसं जगणं झालंय अशी खंतही आ.हं.च्या मनातून बाहेर पडते. 

कितीक जण चांगलं सांगत होते
सात जन्माची सोबत असते म्हणून
खरंही वाटत होतं
पण मध्येच या चार्वाकानं ‘घात’ केला
तसा तो आजही माझा जिवलग मित्रच
त्याचं ऐकून
पुनर्जन्मावरचा विश्वास
मी साफ धुडकावून लावला....

कल्पनेत जगू पाहणार्‍या आ.हं.मधल्या प्रियकराला आता ती नसली तरी साता जन्माची सोबतीण म्हणून लवकरच पुन्हा भेटेल असं स्वप्नरंजन सुरू होतं. मात्र त्यांच्या या स्वप्नरंजनात बिब्बा टाकण्याचं काम करण्यासाठी चार्वाक उभाच असतो. चार्वाक आपल्याला भेटला नसता तर आपण खोटं खोटं का होईना मनाचं समाधान केलं असतं असं ते म्हणतात, मात्र त्याच वेळी सत्याचा प्रकाश दाखवणार्‍या चार्वाकाची साथ त्यांना सोडवत नाही. तसंच आज आय्ाुष्यात तुझ्या नसण्याचं दुःख आहे म्हणूनच तुझी आठवणही आहे असं त्यांना वाटतं. आनंदाचे क्षणही आहेत, पण ती सर आता त्यांना नाही. 
एका तुझ्या जाण्यामुळे
सारी हरवली सृष्टी
आणि पाची इंद्रियांनी
माझ्या, गमावली दृष्टी

तिचं आपल्या आयुष्यात  नसणं किती भयाण आहे, हे सांगताना आ.हं.मधला कवी आपल्या सगळ्या संवेदना बधिर झाल्याची जाणीव व्यक्त करतो. 
...तू गेल्यापासून मात्र
मीच बनलो आहे मिथ्या
सापानं टाकलेल्या कातीसारखा
अस्तित्वाचा केवळ एक भ्रम...

असं म्हणताना आ.हं.मधला कवी म्हणतो ः तू खरंच होतीस का, मात्र या प्रश्नाचं उत्तर लगेचच मिळतं. हो ती होतीच आणि मीही होतोच. ते सगळं स्वप्न नसून सत्यच होतं. मात्र आता मात्र आपणच मिथ्या बनलो आहोत असं त्यांना वाटायला लागतं. आपण तिच्यावर किती विसंबून होतो हे तिच्या नसण्यानं दाखवलंय. एकट्यानं जगणं या गोष्टीचा आपण कधी विचारच केला नव्हता असं ते म्हणतात. इतकाच एक मोठा दिलासा आहे की तिच्या स्मृती मात्र सदैव सोबत करत राहतात. जगण्यात बहर नुकताच आलेला असताना मात्र तिचं अचानक निघून जाणं त्यांना असह्य करतं. मग ती आहे असं समजून ते तिच्याशी भांडतात, तिचीच तिच्याजवळ तक्रारही करतात आणि मग आपल्या मनातल्या आकांताला शांत करण्याचा प्रयत्न करत तिचीच माफीही मागतात. 
सारा संताप संताप
राग काढू कुणावर?
फाडफाड बोलू कुणा
मन निवळाया पार?

आ.हं.मधला कवी म्हणतो ः तू माझ्या इतक्या जवळ होतीस, तुझ्यावर इतका हक्क होता की माझा राग, माझा आनंद, माझं दुःख सारं काही व्यक्त होण्याची एकमेव जागा म्हणजे तूच होतीस. आता मी इतका एकटा पडलोय की तशी जागाच आता  नाही. मी मनातलं हे गुज, मनातला हा कल्लोळ कोणाजवळही सांगू शकत नाही. मनातल्या या आक्रोशाला बाहेर पडायला आता जागाच नाही. 
नाही आणली भारी मी
वो आणि प्रावरणे
नाही तुझ्यासाठी केली
मौल्यवान आभूषणे
काय माझ्यापाशी होते
सारी शब्दांचीच दौलत
उधळली नाही तीही 
होऊनिया मुक्तहस्त

आपल्या मनातली खंत कवी एका हुरहुरत्या क्षणी व्यक्त करतो. आपल्या जवळच्या व्यक्तीला इतकं गृहीत धरलेलं असतं की ती असताना तिच्यासाठी काही वेगळं करावं, तिला काही भेटवस्तू द्याव्यात असं मनातही येत नाही. भरजरी वा असो वा दागिने आपण तिच्यासाठी काहीही आणलं नाही. ते कदाचित आणूही शकलो नसतो. पण आपल्याजवळ शब्दांची संपत्ती होती.  आपण आपल्या सखीसाठी मुक्तहस्तानं तिची देखील उधळण केली नाही. आपण हे सगळं ती असताना तिच्याजवळ व्यक्त करायलाच हवं होतं असं आ.हं.मधल्या कवीचं मन आक्रोश करत सांगतं ः
अशी भेटत रहा तू
मला अधून-मधून
पुन्हा पेटलाच वन्ही
ती जाईल विझून

असं मनाला सांगताना आ.ह. म्हणतात ः तू आहेस माझ्याजवळ या एका भावनेनं मला शांत केलंय. तुझ्या वियोगानं मी दुःखी जरी झालो असलो तरी मी या रणभूमीवरून पळ काढलेला नाही. हा प्रवास मी तुझ्या स्मृतींना सोबत घेऊन करतच राहणार आहे. 
वेदनेचा अविष्कार
देतो जगण्याचे बळ
ऊर्जा पुरवितो जीवा
पचविण्यास वादळ
अश्रू अनावर जेव्हा 
वाहतात आपोआप
मन धुतल्यासारखे 
होते निर्मळ निष्पाप

ही वेदनाच आपल्याला जगण्याचं बळ देतेय असंही हा कवी म्हणतो. अनेक प्रकारांनी तो आपल्या मनाची समजूत घालताना दिसतो. आपण आपलं दुःख जगापुढे मांडणं काही बरं नाही असंही कधी कधी  त्याचं मन सांगतं. मात्र मनातल्या भावना आपोआप प्रवाही होत बाहेर पडतात. तसंच प्रत्येक गोष्टीतून त्याचं दुःख त्याला नैराश्याकडे नेत नाही. त्याच्यातला आशावाद, त्याच्यातली सकारात्मक वृत्ती त्याला पुन्हा पुन्हा चांगलं काही करण्याची प्रेरणा देत राहते. तिच्या आठवणी देखील त्याला तुझा प्रवास, तुझी वाट तू चालत राहा. तुझं जगणं कधीच तुझं एकट्याचं नव्हतं, तेव्हा ते इतरांसाठी अर्थपूर्ण करत चालत राहा असंच जणू काही सांगत राहतात. 
कवी अनिल (आत्माराम रावजी देशपांडे) आणि इंदिरा संत यांच्या कवितांशीही काही समीक्षक आ.ह. साळुंखेंच्या कवितांची तुलना करताना आढळतात. या दोहोंच्या हृदयातली प्रेमभावना, तळमळ यांत साम्य आहे. मात्र आ.हं.मधला कवी वाट्याला इतकं दुःख आलं तरी तो अध्यात्माकडे झुकताना दिसत नाही. त्यांच्या कवितांमधून चार्वाक, बुद्ध त्यांना सदोदित साथ करत राहतात. तसंच त्यांचा विवेकनिष्ठ आणि विज्ञानवादी दृष्टिकोनच त्यांना जगण्याचं अधिकाधिक बळ देत राहतो. त्यामुळेच आ.हं.ची कविता मधुश्रीची, त्यांची आणि वाचणार्‍या प्रत्येकाला ती त्याचीच असल्याची जाणीव करून देते हे विशेष! आ.हं.च्या कवितेला अलंकारिक भाषेचा सोस नाही, ती साध्यासुध्या शब्दांनी खुलणारी आहे. तिला तिचा एक स्वतःचा नाद आहे, गेयता आहे आणि लय आहे. 
खरं तर मधुश्रीच्या जाण्यानं आ.ह. दुःखात बुडाले होते. तिचा वियोग हा सहन होण्याजोगा नव्हता. अशा वेळी मात्र पुन्हा त्यांचा लाडका चार्वाकच त्यांच्या मदतीला धावून आला. ‘कवितेला काही काळाकरता जरा बाजूला सार आणि थोडा कठोर होऊन वास्तवाकडे बघ’ अशी जणू काही चार्वाकानं त्यांना आज्ञाच दिली. आणि म्हणूनच आ.हं.नी आपल्या मनाला समजावत आपलं जगणं हे फक्त आपल्यासाठी नाही हे लक्षात घेऊन समाजाप्रतीची आपली कर्तव्यं पूर्ण करण्यासाठी मागे पडलेलं लिखाण हाती घेतलं. सहा वर्षांच्या अथक परिश्रमातून आणि अभ्यासातून  ‘सर्वोत्तम भूमिपुत्र ः गौतम बुद्ध’ सारखा अप्रतिम असा ग्रंथ निर्माण होऊ शकला. एकीकडे विचारप्रवर्तक गंभीर लिखाण करणारे आ.ह. तर दुसरीकडे अतिशय हळवं मन सोबत घेऊन आपल्या कवितेतून व्यक्त होणारे आ.ह. दोन्हीही व्यक्ती एकच आहेत. 
आ.ह. साळुंखे यांनी मानवतेप्रती हाती घेतलेलं कार्य स्पृहनीय आहे, त्यांच्यातल्या सच्च्या कार्यकर्त्याला, अभ्यासू विचारवंताला आणि माणुसकी जपणार्‍या संवेदनशील मनाला कोटी कोटी प्रणाम!
दीपा देशमुख

 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.