बीज अंकुरे - क्षितिज पेण वेध २०१९
१ डिसेंबर २०१९, क्षितिज पेणचा चौथा 'वेध'असणार होता! सदानंद धारप आणि प्रीती देव यांचं आग्रहाचं निमंत्रण होतंच, १ डिसेंबरचा तलत महेमूद संगीत रजनीचा कार्यक्रम आणि पुण्यातल्या जुन्या बाजाराला भेट देण्याचा कार्यक्रम रद्द करून मी पेणला जायचं ठरवलं. पुणे वेधचे दीपक पळशीकर आणि प्रदीप कुलकर्णी यांच्याबरोबर पेणचा प्रवास सुरू झाला.
पुणे ते पेण या प्रवासात या वेळी जरा वेगळीच धमाल आली. प्रदीप कुलकर्णी यांनी त्यांच्या मधुमेहासाठी आणि वाढलेल्या वजनासाठी आयुर्वेदिक उपचार सुरू केल्यानं त्याबद्दलच्या सुरस कथा त्यांच्याकडून ऐकताना अचंबित व्हायला झालं. ती सगळी औषधं, ते सगळे चित्रविचित्र नावांचे काढे आणि लेप हे सगळं दिवसभर करताना ठेवायचा तासातांसाचा हिशोब, वर कमी पडतंय की काय यासाठी आहारावरही नियंत्रण आणि पथ्य! हे सगळं गेले काही दिवस काटेकोरपणे प्रदीप कुलकर्णी पार पाडत असल्याचं त्यांनी सांगितलं. मला तर या माणसाला लगेचच 'भारतरत्न' पुरस्कारानं गौरवावं असं वाटून गेलं! प्रदीप कुलकर्णी मात्र आपलं वजन कसं आटोक्यात आलं आहे, शुगर आता कशी नियंत्रणात आहे आणि आपल्याला किती ताजंतवानं वाटतं आहे हे आनंदानं सांगत होते. मी मात्र मला असे अघोरी उपचार करावे लागले तर माझं काय होईल या विचारानं हबकून गेले होते.
खरं तर पेणपर्यंतचा प्रवास कसा संपला कळलंच नाही. याचं कारण सुरेखसा रस्ता आणि दोन्ही बाजूंनी सोबत करत असलेली हिरव्यागार झाडांची सावली! त्यातच दीपक पळशीकर, प्रदीप कुलकर्णी, राजू आणि अनिता भाले यांची सुरेख सोबत! आम्ही थेट वेधच्या कार्यक्रमस्थळी पोहोचलो होतो.
श्रीखंडी कलरच्या फुलाफुलांच्या सुरेखशा साड्यांमधल्या वेधच्या स्त्री कार्यकर्त्यांनी आमचं स्वागत केलं. हिरव्यागार रंगांच्या टीशर्टमध्ये वेधचे इतर कार्यकर्ते लगबग करत तयारीवर शेवटचा हात फिरवताना दिसत होते. कायम हसतमुख असलेले डॉ. आनंद नाडकर्णी व्यासपीठावरची तयारी बघण्यात गुंतले होते, तर सदानंद धारप घरातलीच लगीनघाई असल्यामुळे सगळं कसं नीट पार पडलं पाहिजे या भावनेतून सगळीकडे लक्ष देत होते. रिकाम्या असलेल्या खुर्च्या क्षणार्धात भरल्या. रोहे, अलिबाग आणि जवळच्या इतर गावांमधूनही वेधसाठी मंडळी आली होती. वेधचं वैशिष्ट्यं असं की यात सगळ्याच वयोगटातले लोक सामील होत असतात. त्यामुळे इथेही विद्यार्थी, पालक, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक सगळेच दिसत होते. विशेष म्हणजे आश्रमशाळेतली मुलंही यात सामील झाली होती. व्यासपीठासमोरचं पटांगण गर्दीनं फुलून गेलं होतं, त्याचबरोबर शाळेच्या दुसर्या मजल्यावरचे तिन्ही बाजूंचे कॉरिडॉर देखील विद्यार्थ्यांनी भरून गेले होते. प्रत्येकाच्या हातात वेधची कापडी पिशवी आणि त्यात वेधच्या कार्यक्रमाची पुस्तिका होती.
क्षितिज पेणच्या वेधची या वेळची थीम होती - बीज अंकुरे! या थीमला अनुसरून ऋचा नावाच्या वेधच्या कार्यकर्तीनं सुरेखसं चित्र काढलं होतं, जे बॅकड्रॉपवर सजलं होतं. तिचं कौतुक करण्यात आलं. डॉक्टरांचा प्रसन्न आवाज कानावर पडला आणि सगळं लक्ष आता पुढे काय घडतंय इकडे लागलं. डॉ. आनंद नाडकर्णी यांचं बोलणं नेहमीच ऐकत राहावं वाटतं. डॉक्टर बोलत होते, वेधच्या थीमबद्दल - बीज अंकुरे बद्दल! डॉक्टर म्हणाले, व्यक्तामध्ये अव्यक्त दडलेलं असतं, तसं बीजामध्ये झाड दडलेलं असतं. आजच्या वेधमध्ये अशा वेगवेगळ्या माणसांच्या मनात बीजं कशी रुजली गेली हे बघणार आहोत. त्यातून त्या त्या माणसामध्ये झाड कसं निर्माण झालं हे बघणार आहोत. बीजाचं झाडं होणं हा खूप मोठा प्रवास आहे. बीज महत्वाचं का आहे कारण त्यात सूक्ष्मावंशानं संपूर्ण झाड रिप्रैंझेंट केलेलं असतं. ज्याला बीज कळलं त्याला झाडही कळलं.’
आजच्या वेधमध्ये बुकलेटगाय नावानं ओळखला जाणारा अमृत देशमुख, ४० एकराचं जंगल निर्माण करून जैवविविधता जपणारा नंदू तांबे, काश्मीरमध्ये काम करणारा असीमचा सारंग गोसावी, इस्त्रोमध्ये कार्यरत असलेल्या आणि चांद्रयान/मंगळ मोहिमेत सक्रिय असलेल्या शास्त्रज्ञ नंदिनी हरिनाथ आणि विख्यात शास्त्रीय संगीताच्या गायिका आरती अंकलीकर-टिकेकर सहभागी असणार होते.
अमृत देशमुख हा व्यासपीठावर आला आणि डॉक्टरांनी त्याला बोलतं केलं. शिक्षणानं आणि व्यवसायानं सीए असलेला अमृत एके दिवशी सगळं सोडून पुस्तकांच्या दुनियेत रममाण होतो काय आणि जगभरात जास्तीत जास्त वाचक वाढावेत यासाठी बुकलेट हे अॅप तयार करून त्याद्वारे लोकांमध्ये वाचनवेड वाढवतो काय सगळंच चकित करणारं होतं. सुमारे ११ लाखाहून जास्त लोक आज अमृतचं अॅप वापरत आहेत. अमृत पुस्तकांचा सारांश ऑडियो स्वरूपात देतो. हा सारांश ऐकल्यानंतर वाचक ते मूळ पुस्तक विकत घेऊन वाचतात आणि त्यामुळे त्या त्या पुस्तकांची विक्री देखील वाढते. अमृतला पुस्तकांची आवड त्याच्या मोठ्या भावामुळे लागली. व्हॉट्सअप माध्यमाचा त्यानं यासाठी सुरुवातीला उपयोग केला. घरी पुस्तकं असतात, पण लोक ती वाचतीलच असं नाही ही गोष्ट अमृतच्या लक्षात आलं. अमृतनं आजपर्यंत १३५० पुस्तकं वाचली आहेत. त्याच्या अॅपवर पहिलं पुस्तक किंवा सारांश वाचल्यानंतर दुसरं अॅड होतं. सगळे सारांश तो एकदम देत नाही. खूप सहजासहजी गोष्ट उपलब्ध झाली तर माणसाची प्रेरणा हरवते. त्यामुळे सगळं काही एकदाच द्यायचं काम तो करत नाही. त्यामुळेच थोडं थोडं द्यायचं असं अमृतनं ठरवलं. रीड वन गेट वन असं अमृत म्हणतो. त्यानं आपल्या इंग्रजी भाषेच्या उच्चारांवर भर दिला. त्याच्या ऑडिओमध्ये हळूहळू संगीत असेल, बोलण्यातले चढउतार असतील, त्यानं स्वतःमध्ये अनेक बदल घडवून आणले. पर्फेक्शन आणि एक्सलन्स यामधला फरक अमृतनं सांगितला. तो म्हणाला, परिपूर्ण असण्यापेक्षा उत्कृष्टतेचा घ्यास धरायला हवा. परिपूर्णता एका चौकटीत आपल्याला बद्ध करते, मात्र उत्कृष्टता पुढे पुढे जायला मदत करते.
अमृतला हे सगळं करताना खूप वेगळे अनुभव येतात. एके दिवशी एका मुलीचा रात्री अकरा वाजता अमृतला फोन आला. ती त्याचं खूप कौतुक करत होती. अमृतला वाटलं ती फ्लर्ट करतेय, त्यामुळे अमृतला तिची फिरकी घ्यावी वाटली. मात्र काहीच क्षणात जेव्हा अमृतला कळलं की ती मुलगी अंध आहे. त्या वेळी अमृतच्या अंगावर काटा आला. आपल्या कामाचं, आपल्या करण्याचं महत्व त्याला समजलं आणि जबाबदारीची जाणीव देखील झाली. त्याच क्षणी त्याला आठवलं की पंधरा वर्षांपूर्वी आपल्या आईनं मृत्यूनंतर आपले डोळे दान केले होते! आपण देत असलेली माहिती, तिचा कोणी उपयोग म्हणण्यापेक्षा स्वतःच्या नावानं दुरूपयोग केला तर असा प्रश्न विचारल्यावर अमृत म्हणतो, कॉपी राईट, पेटंट हे शब्द मला आवडत नाहीत. जे मला सांगायचंय, द्यायचंय ते मी करतो आहे. इतरांनी ते घेऊन त्याचा काही उपयोग केला तर करू दे.
अमृतला क्षितिज पेण वेधतर्फे एक छोटीशी भेटवस्तू देण्यात आली. त्याच्या पुढल्या प्रवासाला डॉक्टरांनी शुभेच्छा दिल्या.
यानंतर व्यासपीठावर आल्या इस्रोच्या शास्त्रज्ञ नंदिनी हरिनाथ! एखाद्या व्यक्तीनं किती साधं असावं याचा प्रत्यय त्यांच्याकडे पाहून आला. माणूस पेहरावानं नव्हे, दागिन्यांनं नव्हे वा पैशानं नव्हे तर त्याच्यातल्या कर्तृत्वानं आणि साधेपणानं समोरच्याचं मन कसं जिंकू शकतो हे नंदिनी हरिनाथ यांच्याकडे बघून लक्षात येत होतं. लहानपणापासून भौतिकशास्त्राची आवड असलेल्या नंदिनी या गेली २० वर्षं इस्रोमध्ये कार्यरत आहेत. मंगळयान मोहिमेत तसंच नुकत्याच पार पडलेल्या चांद्रयान मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. रोजच १२ ते १४ तास काम करणार्या नंदिनी हरिनाथ कुठेही थकलेल्या जाणवत नाहीत हे विशेष. त्यांचं ताजंतवानं राहण्याचं गुपित त्यांच्या अथक कामात आहे हेही लक्षात येत होतं. जमिनीवर पाय घट्ट रोवून उभी असलेली ही मृदू सौम्य स्वभावाची स्त्री सगळ्यांनाच भावून गेली.
नंदिनी हरिनाथ यांची आई गणित आणि वडील भौतिकशास्त्र या विषयातले एक्सपर्ट होते. घरातलं वातावरण सर्व सुविधांनी युक्त होतं. जे करायचं ते चांगलंच करायचं हे नंदिनीच्या मनात लहानपणापासूनच ठसलं होतं. वडिलांचा खूप मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. लहान लहान गोष्टींतून ते नंदिनीला शिकवत. साधं उदाहरण द्यायचं झालं तर पाणी वरच्या टाकीत कसं चढवलं जातं, त्यामागचं विज्ञान काय हे ते सोप्या भाषेत समजावून सांगत. दैनंदिन जीवनातलं विज्ञान त्यांना यातून कळत गेलं.
एमएस्सी फिजिक्स दिल्ली विद्यापीठातून नंदिनी यांनी केलं. त्यांना पुढे संशोधन करायचं होतं. त्यांनी इाोमध्ये अप्लाय केलं आणि त्यांना तिथं कामासाठी संधी मिळाली. मिशन प्लॅनिंग अँड ऑपरेशन्स या विभागात त्यांना काम करायचं होतं. उपग्रहाची कल्पना, त्याचं नियोजन, त्याला तयार करणं, त्याची कार्यवाही, त्याची प्रत्येक यंत्रणा कार्यान्वित करणं ही सगळी कामं नंदिनी यांना करायची होती. त्या वेळी इस्रोमध्ये स्त्रियांचं प्रमाण कमी होतं. उपग्रह जेव्हा आकाशात जातं तेव्हा दिवसरात्र काम करावं लागतं. त्यामुळे इस्त्रोचे शास्त्रज्ञ स्त्रियांपेक्षा पुरुषांना जास्त प्राधान्य देत असत. आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पुरुषांइतक्याच स्त्रिया आज सक्षमपणे इस्त्रोमध्ये काम करत आहेत. नंदिनी यांनी २८ मिशन्सवर काम केलं. २९ वं मिशन ११ डिसेंबरला होणार आहे. माणसाच्या आयुष्यातल्या अंत्यत महत्वाच्या गोष्टींमध्येही म्हणजे जयपूर फूट असो वा दातांच्या कवळ्या बनवणं असो, यात इस्रोनं मोठी भूमिका बजावली आहे. इस्रो आशियातली महत्वाची अशी अवकाश संशोधन करणारी संस्था आहे. या संस्थेत असो की संशोधन क्षेत्रात काम करणं असो हे ज्यांना कोणाला करायचं असेल त्यांच्यासाठी नंदिनी म्हणतात, तुमचं कुतूहल नेहमी जागृत ठेवा. आसपासची प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टीनं न्याहाळा. प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत 'का' असा प्रश्न विचारा.
टाळ्यांच्या कडकडाटात नंदिनी यांना लोकांनी उभं राहून गौरवलं. वेधतर्फे त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर निशिकांत ऊर्फ नंदू तांबे हा वाणिज्य शाखेत शिक्षण घेतलेला तरूण व्यासपीठावर आला आणि या तरुणानं ४० एकराचं जंगलं चिपळून जवळच्या शिरवली गावात निर्माण केलंय यावर विश्वासच कसा ठेवावा कळेनासं झालं. मात्र त्याच्या जंगलाच्या फिल्म्स जेव्हा समोर दिसायला लागल्या, तेव्हा मन थक्क होऊन बघत राहिलं. या जंगलात राहणारे, येणारे इतके विविध पक्षी की बघून हरखून जावं. नंदूच्या जंगलात आज २३० पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. या पक्ष्यांचं पाणी पिणं असो वा पाण्यात नाचणं असो, एकमेकांना साद घालणं असो वा नंदूकडून स्वतःची शुश्रूषा करून घेणं असो सगळं अजब होतं.
चिपळूण जवळ शिरवली गावात नंदूचं शिक्षण झालं. खोडकर स्वभावामुळे नंदू विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये प्रसिद्ध होता. नंदूचा आठवीपासून पुस्तकी ज्ञानातला रस कमी झाला. फिरण्याची आवड निर्माण झाली. नंदूला निसर्ग खूप आवडायचा. शाळेला सुट्टी मारून फिरायला खूपच आनंद मिळायचा. पुढे नंदूनं वाणिज्य शाखेत प्रवेश केला. काय करायचं नक्की हे त्याला ठाऊक नव्हतं. गंमत म्हणजे नंदूनं पाच वर्षं रेल्वेत फेरीवाल्यासारखं काम केलं. पाणी आणि शीतपेयं कोकण रेल्वेत विकण्याचं काम केलं. थोडी वाचणाची आवड निर्माण झाली. अभ्यासक्रमातलं वाचन त्याला आवडायचं नाही. मात्र अवांतर वाचन करायला आवडायला लागलं. हातात पडेल ते वाचायची सवय लागली. बीकॉमच्या शेवटच्या वर्षात नंदू परीक्षेचा शेवटचा पेपर किती वाजता आहे हेच विसरला. पेपर संपण्याच्या वेळात तो परीक्षा केंद्रावर जाऊन पोहोचला. त्यानंतर मात्र नंदूनं परीक्षा दिली नाही. ते शिक्षण तिथेच सोडलं. अँडव्हेंचरचा इस्ट्रक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली. काही कॅम्पस घ्यायला सुरुवात केली. टीम बिल्डिंगचं काम कंपन्यांबरोबर केलं. यासाठी तो मुंबईत होता. मात्र मुंबई त्याला भावली नाही आणि मुंबईत पुन्हा पाउल टाकायचं नाही असं त्यानं ठरवलं.
हाऊ टू सी द जंगल, हाऊ टू फील द जंगल या बरोबरच हाऊ टू रीड द जंगल ....हे मी लोकांना शिकवतो असं जंगलवेडा नंदू म्हणतो. जंगल वाचायला आपण शिकलं पाहिजे असं त्याला वाटतं. प्रेमाच्या भाषेवर नंदूचा अढळ विश्वास आहे. हुशारीपेक्षा जन्मतः लाभलेल्या बुद्धीवर त्याचा विश्वास आहे. ४० एकराचं जंगल आता त्याला १०० एकरापर्यंत त्याला करायचं आहे.
नंदूला क्षितिज पेण वेधतर्फे २५ हजारांची देणगी त्याच्या कामासाठी देण्यात आली आणि त्याच वेळी उपस्थितांमधून उत्स्फूर्तपणे जमा झालेले २० हजार रूपये देखील त्याला सुपूर्त करण्यात आले.
यानंतरच्या सत्रात सारंग गोसावी आणि महेक हे दाखल झाले. असीम संस्थेतर्फे काश्मीरमध्ये काम करणारा, काश्मीरमधल्या तरुणांना आणि महिलांना रोजगार मिळवून देणारा, मुलांना शिक्षित करणारा, भारतातल्या इतर ठिकाणांशी त्यांना जोडू पाहणारा सारंग काश्मीरच्या महेकसह आला होता. महेक ही तरुणी काश्मीरच्या हॉटेल ताजमध्ये शेफचं काम करतेय. हे पद, हे काम केवळ सारंग दादामुळे आपल्याला मिळालं असं ती अभिमानानं सांगत होती. महेक मुद्दाम महाराष्ट्रीय साडी नेसून वेधमध्ये सामील झाली होती.
सारंगनं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बालगंधर्वला जनरल पाटणकर यांचं भाषण ऐकलं. तोपर्यंत सारंगच्या मोठ्या भावानं जीआरई देऊन अमेरिकेला येण्याविषयी सल्ला दिला होता. पण त्याआधा पाटणकरांच्या भाषणानं त्याच्यावर परिणाम झाला. काश्मीर प्रश्नावर बोलताना त्यांनी तरूणांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यांचं बोलणं ऐकून सारंगनं काश्मीरमध्ये जाऊन धडकायचं ठरवलं. काश्मीरचं नाव काढताच आईनं जायला विरोध केला. सारंगला काहीही करून काश्मीरमध्ये जायचंच होतं. त्यामुळे आपण गोव्याला जातो आहे असं सांगून म्हणजे खोटं बोलून तो काश्मीरमध्ये पोहोचला. जनरल पाटणकर यांनी त्याला कूपवाडा या भागात काम करायला सांगितलं. सारंगनं मुलांना शिकवायला सुरुवात केली. काश्मीरची निरागस माणसं त्याला आवडली. त्यानं तिथली बंद पडलेली शाळा सुरू केली. तिथेच कम्प्युटरचं शिक्षणही सुरू केलं.
यानंतर सारंग सतत काश्मीरला जातच राहिला. सुरुवातीला अनेक अडथळे आले. मात्र काश्मीरच्या लोकांचा विश्वास आणि प्रेम त्याला मिळवता आलं. त्यानंतर त्यानं तिथल्या महिलांसाठी आक्रोड आणि सफरचंद यांची बेकरी प्रॉडक्ट तयार करण्याचं काम सुरू केलं. त्यासाठी सारंग आणि त्याचे मित्र पुण्यातल्या बेकरीमध्ये जाऊन प्रशिक्षण घेऊन एक्सपर्ट झाले. क्रिकेट असो वा फूटबॉल या खेळांच्या मॅचेस घेऊन एक चैतन्य सारंगनं तिथे आणलं. एकीची भावना निर्माण केली. काश्मीरमधल्या तरुणांनाही सारंगच्या सान्निध्यामुळे प्रेरणा मिळाली आहे. जावेद नावाच्या तरुणानं अपंगांसाठी काम सुरू केलं. त्याच्या कामाबद्दल राष्ट्रपतींकडून त्याला गौरवण्यात आलं. आज जावेदचं काश्मीरमध्ये मोठं काम उभं राहिलं आहे.
आज काश्मीर हे सारंगचं दुसरं घर झालं आहे. काश्मीरची अनेक मुलं-मुली पुण्यात शिकायला येतात. सारंग त्यांना त्यांचा पालक, भाऊ असा वाटतो. इतकंच नव्हे तर काश्मीरमधली मिलिट्री देखील कुठल्याही कामात सारंगला बोलावते आणि त्याचं साहाय्य घेते. आपण फार मोठं काम करतो आहोत असं सारंगला आजही वाटत नाही. आपण फक्त माणसं जोडण्याचं काम करतोय अशीच भावना त्याच्या मनात आहे.
सारंगनं स्थापन केलेली असीम संस्था दिवसेंदिवस विस्तारत आहे. यातले सर्व तरूण आपापल्या नोकर्या, व्यवसाय करत यात आपलं योगदान देत आहेत. वेधतर्फे सारंग आणि महेक यांनाही भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं.
वेधचं शेवटचं सत्र आग्रा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या सहभागानं झालं. लहानपणापासून आयुष्यात गाणं कस भरून गेलं होतं आणि त्यासाठी त्यांचे आई-वडील आणि गुरू यांनी त्यांच्याकडून करून घेतलेली मेहनत याबद्दल त्या बोलत होत्या. त्या वेळी गाणं हे व्यवसाय म्हणून बघितलं जात नव्हतं. ती एक साधना होती. आरती अंकलीकर बोलत असताना मधूनमधून त्या अनेक रांगाचं, ठुमरीचं, ख्यालचं स्वरूपही गाऊन सांगत होत्या. त्यांचा तो पहाडी, खडा आवाज वातावरणात चैतन्य निर्माण करत होता.
आरती अंकलीकर यांचे आई-वडील उत्तम गाणारे तर होतेच, पण ते अतिशय उत्तम पालक होते. त्यांनी आपल्या तिन्ही मुलांकडे खूप चांगलं लक्ष दिलं. आरती अंकलीकर प्रत्येक क्षणाला त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करत होत्या. दासबोध, हरिपाठ, ज्ञानेश्वरी यांचं भारलेलं वातावरण त्यांच्या घरात असायचं. म्हाडो परमेश्वर.....हे पहिल्यांदा ऐकलेलं भजन त्यांना आठवलं आणि त्यांनी गाऊनही दाखवलं. त्यांनी गायलेला यमनचा ख्याल मनावर आपलं राज्य गाजवून गेला.
लहानपणी शाळेतून घरी आल्यावर तास दीडतास झोक्यावर बसून झोका घेत असताना आरती अंकलीकर शाळेतली गाणी गात असायच्या आणि तितका वेळ त्यांची आई ते सगळं ऐकत असायची. आपल्या मुलीचा त्यातला कल आईने ओळखला आणि त्यातलं शिक्षण द्यायचं ठरवलं. वेळोवेळी मिळत गेलेली बक्षिसं, गुरुजनांची वाहवा आणि आपल्या गुरूंसारखं म्हणजे कधी किशोरीताईंसारखं, कधी मालिनी राजूरकरांसारखं तर कधी आशा भोसले यांचं गाणं ऐकलं की आरतीताईंना वाटायचं आपल्यालाही असं गाता आलं पाहिजे. प्रत्येक गाणं चारपाचशे वेळा आरती अंकलीकर यांच्याकडून त्यांची आई गावून घेत असे. जाहल्या काही चुका हे गाणं त्यातलंच. गाण्यातल्या जागा कळल्या पाहिजेत, तसंच गाणं बुद्धीला कळलं पाहिजे, गळ्याला समजलं पाहिजे आणि मग नंतर त्यात भावना ओतायच्या असं त्या म्हणाल्या. त्यांची गाण्याची इच्छा दृढ होत गेली.
आपापला आदर्श आपण रोज शोधायला हवाय असं आरती अंकलीकर मुलांना उद्देशून म्हणाल्या. आरती अंकलीकर यांना भारतीय संगीत असो की पाश्चिमात्य संगीत असो सगळं संगीत आवडतं. अवघा रंग एक झाला या भैरवीने आरती अंकलीकर यांनी वेधची सांगता केली.
पाचही सत्रांबद्दल डॉक्टर आनंद नाडकर्णी आपल्या खास शैलीत बोलते झाले. ते म्हणाले, वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला अनेक माध्यमं समजत असतात. अमृत वाचनाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचतो तेव्हा त्याच्यातला ‘मी’ हा विशाल होतो. आज त्याच्याबरोबर ११ लाख वाचक आहेत. त्याच्यामधला संकुचित ‘मी’ आता राहिलाच नाही. नंदिनी हरिनाथ यांनी शास्त्रीय स्वप्न सिद्ध करण्यासाठी शेकडो हजारो लोक इस्रोमध्ये काम करतात तेव्हा त्यांच्यातला छोटा छोटा ‘मी’ नष्ट होतो आणि ते सगळे जे स्वप्न असतं ते स्वप्न उतरवताना त्यांचा तिथला ‘मी’ विशाल होतो. नंदू तांबे यांनं निसर्गाकडे पाहा तुमचा ‘मी’ किती खुजा आहे हे तुम्हाला कळेल असं सांगितलं. निसर्ग हा तुमच्यातला ‘मी’ विशाल करण्याची संधी देतो. आपल्या कोंडवाड्यातल्या ‘मी’ ला कवटाळू नका. सारंगनं आपण आपल्या ‘मी’ ला सामान्य समजायला नको असंच सांगितलं. ‘मी’ कडे एक उत्तर आहे. काहीच करता येत नसेल तर निदान एका ‘मी’ ला दुसर्या ‘मी’ ला जोडावं आणि त्यातून ‘आम्ही’ निर्माण करावा. या ‘आम्ही’ची ऊर्जा बहुगुणित झालेली असेल असं सांरग म्हणाला. आरती अंकलीकर तर म्हणाल्या, 'मी’ गातच नाही. देवच गातोय. निसर्गातला देव आहे, माणसामधला देव आहे, गळयातला देव आहे. देव सर्वत्र आहे. त्याला शोधायला मात्र आपली दृष्टी विशाल करायला हवी. स्वकेंद्रितपासून स्वतःला कसा वाचवायचं हे सगळ्यांनी सांगितलं.
डॉ. आनंद नाडकर्णी जेव्हा निरूपण करतात, तेव्हा सगळा सार डोळ्यासमोर उभा राहतो. त्यांचं वाचन, त्यांचं आकलन, त्यांची संवाद साधण्याची आणि समोरच्याला आपलंसं करण्याची हातोटी, त्यांची समोरच्याविषयी असलेली एम्पथी सगळं सगळं त्यांच्या व्यक्तिमत्वातून, त्यांच्या वाणीतून कळतं आणि त्यांच्याविषयीचा, त्यांच्या कामाविषयीचा आदर आणखी आणखी वृद्धिंगत होत राहतो.
पेण वेध अतिशय सुरेख झाला, हे सांगायलाच नको. अतिशय उत्कृष्ट नियोजन, आसनव्यवस्थेपासून ते खाणपिण्याच्या सर्व व्यवस्थेपर्यंत चोख व्यवस्था! हसतमुख आणि मदतीला तत्पर असलेले कार्यकर्ते, शिस्तशीर प्रेक्षक/श्रोते असं सगळं! सहभागी दिग्गजांना बोलतं करण्यासाठी डॉक्टरांबरोबर सदानंद धारप यांनी देखील त्यांना साथ दिली. आयोजकांना एकच सूचना करावीशी वाटते, पेण वेधचं व्यासपीठ आणखी देखणं करता आलं असतं का? बॅकड्रॉप, रंगसंगती, प्रकाशयोजना या गोष्टी करण्यात पेण वेधची टेक्निकल टीम खूपच सरस असल्याचं कानावर आल्यामुळे त्यांनी या सूचनेचा विचार करावा कारण त्यांना ते सहजशक्य आहे!
सप्टेंबर २०२० मध्ये पुण्यात १०० वा वेध संपन्न होणार आहे. त्यासाठी सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण डॉक्टरांनी उपस्थितांना दिलं. प्रत्येक ठिकाणच्या वेधचं एक वैशिष्ट्य म्हणजे वेध संपला तरी सगळी सत्रं मनात रेंगाळत राहतात. सतत कार्यमग्न राहा, वेगळं काहीतरी करा, इतर करत असलेलं टीपून घ्या, जगणं सुंदर आणि समृद्ध बनवा हे विचार अधिकाधिक दृढ होत पावलं घरचा रस्ता धरतात हे मात्र खरं!
Add new comment