बर्ट्रांड रसेल (Bertrand Arthur William Russell) (18 May 1872 - 2 February 1970) - छंद दिवाळी 2018

बर्ट्रांड रसेल (Bertrand Arthur William Russell) (18 May 1872 - 2 February 1970) - छंद दिवाळी 2018

एका गावात जे लोक स्वतःची दाढी करत नाहीत, त्यांची दाढी त्या गावातला एकमेव असलेला न्हावी करतो. आता याच गोष्टीकडे त्या गावाचा नियम म्हणून बघितलं तर मग तो न्हावी स्वतःची दाढी करतो की नाही? समजा, न्हावी स्वतःची दाढी करत नाही असं गृहीत धरलं तर वरच्या नियमाप्रमाणे तो स्वतःची दाढी करतो असं सिद्ध होतं. किंवा याउलट तो स्वतःची दाढी करतो असं गृहीत धरलं तर तो न्हावी त्याची स्वतःची दाढी करत नाही असं सिद्ध होतं. थोडक्यात आपण कुठल्याही गृहितकापासून सुरुवात केली तरी निष्कर्ष हे त्याच्या विरुद्धच जातात. या पॅरॉडॉक्स सोडवणं म्हणजे डोक्याला मस्त ताण देणारी गोष्ट आहे. आणि हा पॅराडॉक्स आहे बर्ट्रांड रसेल या माणसाचा! सातत्यानं काम केलं नाही, तर आपण काहीच साध्य करू शकत नाही असं रसेल म्हणायचा. तसंच विज्ञान आपल्या ज्ञानाच्या सीमा निर्धारित करू शकतं, पण आपण आपल्या कल्पनाशक्तीला, सृजनशीलतेचा कधीच सीमीत केलं न पाहिजे असं तो म्हणायचा. 

बर्ट्रांड रसेल हा जगप्रसिद्ध ब्रिटिश गणितज्ञ, तत्वज्ञ, वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ, राजनीतिज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि साहित्यिक म्हणून ओळखला जातो. संघटित धर्मावर त्याचा विश्वास नव्हता. लैंगिक स्वातंत्र्याला तो महत्त्व देत असे. तो युद्धविरोधी आणि शांतताप्रिय होता. ‘हिस्ट्री ऑफ फिलॉसॉफी’, ‘द प्रॉब्लेम्स ऑफ फिलॉसॉफी’,  ‘द कॉन्क्वेस्ट ऑफ हॅपिनेस’, ‘द प्रिंन्सिपल्स ऑफ मॅथेमॅटिक्स’, ‘व्हॉट आय बिलिव्ह’, ‘मॅरेज अँड मॉरल्स’, ‘दी प्रॉब्लेम ऑफ चायना’, ‘अनआर्म्ड व्हिक्टरी ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन’, ‘प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका’, ‘रिलिजन अँड सायन्स’, ‘लॉगिकॉमिक्स: अ‍ॅन एपिक सर्च फॉर ट्रूथ’, ‘इन प्रेझ ऑफ आयडियलनेस अँड अदर एसेज’, ‘स्केप्टिकल एसेज’, ‘द अ‍ॅनेलेसिस ऑफ माइंडस’, ‘अनपॉप्युलर एसेज’, ‘प्रपोज्ड रोड टू फ्रिडम: सोशॅलिझम, अनार्किझम अँड सिन्डिकॅलिझम’, ‘इन्ट्रोडक्शन ऑफ मॅथेमॅटिकल फिलॉसॉफी’, ‘मिस्टिसिझम अँड लॉजिक’, ‘पॉवर, एज्युकेशन अँड द सोशल ऑर्डर’, ‘द इॅम्पॅक्ट ऑफ सायन्स ऑन सोसायटी’, ‘पोलिटिकल आयडियल्स’, ‘विस्डम ऑफ द वेस्ट’, ‘द एबीसी ऑफ रिलेटिव्हिटी’, ‘वॉर क्राईम्स इन व्हिएटनाम’, ‘अ‍ॅम आय अ‍ॅन अ‍ॅथिस्ट ऑर अ‍ॅन अ‍ॅग्नोस्टिक’, ‘ऑन द एक्स्पिरियन्स ऑफ टाईम’, ‘हॅज मॅन अ फ्युचर’  ही आणि याशिवाय अनेक महत्वाची ६८ च्या वर पुस्तकं त्यानं लिहिली. रसेलला कुठल्याही विषयाचं वावडं नव्हतं. 

९८ वर्षं आयुष्य लाभलेल्या रसेलनं प्रचंड काम करून ठेवलंय. त्यानं आपल्या आयुष्यात इंग्लंडच्या वसाहतींचं साम्राज्य विस्तारताना बघितलं आणि याच वसाहती पुढे स्वतंत्र होतानाही बघितल्या. रसेलनं आपल्या आयुष्यात दोन महायुद्धं आणि त्याचे परिणाम जवळून बघितले. अनेक छोटीमोठी युद्धं, अराजकता, बंड, क्रांती, स्वार्थी वृत्तीचं फोफावणं, विज्ञानातले शोध अशा अनेक गोष्टी खूप जवळून अनुभवल्या. यातूनच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक-वैचारिक विषयांवर त्यानं सखोल अभ्यास करून आपल्या लिखाणातून आपलं म्हणणं सातत्यानं मांडलं. गणित विषय रसेलचा अत्यंत आवडता विषय होता. गणिताकडून नंतर तो तत्वज्ञानाकडे वळला. याबाबतीत त्याच्यात आणि रेने देकार्त या दोघांत साम्य आहे. 

१९५० साली रसेलला साहित्यातल्या त्याच्या योगदानाबद्दल सर्वोच्च समजल्या जाणार्‍या नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं. १९५७ साली कलिंगा पुरस्कार तर १९६० साली डेनिश सोनिंग पुरस्कार यासह अनेक मानाच्या पुरस्कारानं रसेलला सन्मानित करण्यात आलं. वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी रसेलला लंडनच्या रॉयल सोसायटीनं फेलोशिप बहाल केली होती. आपल्या कर्मठ विचारांच्या आजी-आजोबांच्या शिस्तीत वाढलेल्या रसेलनं श्रद्धा, ईश्वराचं अस्तित्व या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास केला आणि तो निरिश्वरवादी बनला. सशंयवादी असायला हवं यावर त्याचा ठाम विश्वास बसला. आपल्या ९६ वर्षांच्या आयुष्यात आपण सत्याचा शोध घेत केवळ प्रवास केला असं रसेल म्हणतो. 

१८ मे १८७२ या दिवशी बर्ट्रांड रसेल याचा जन्म अ‍ॅम्बर्ले रसेल आणि केट स्टॅन्ले या दांपत्याच्या पोटी जन्मला. अ‍ॅम्बर्ले हे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून आले होते आणि केट स्टॅन्ले देखील आपल्या नवर्‍याप्रमाणेच सुशिक्षित आणि सुधारक मतांची होती. स्त्री-पुरुष समानता, स्त्री-स्वातंत्र्य, संतती नियमन यासारख्या महत्वाच्या विषयांवर दोघंही ठिकठिकाणी जाहीर सभेमध्ये व्याख्यानं देत आणि जागृती आणण्याचा प्रयत्न करत. त्या वेळच्या कर्मठ लोकांना रसेल दांपत्याची ही मतं पचनी पडत नसत. पण दोघांनीही शेवटपर्यंत पुरोगामी विचार आणि कृती यांची कास सोडली नाही. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना सांभाळण्यासाठी सुशिक्षित असा नोकरवर्ग ठेवला होता. मुलांचं सुख मात्र दोघांनाही जास्त काळ लाभलं नाही. 

बर्ट्रांड रसेल हा तीन वर्षांचा असतानाच त्याचे आई-वडील वारले. पोरक्या झालेल्या दोन्ही मुलांना त्यांच्या आजी-आजोबांनी (जॉन रसेल आणि लेडी रसेल) यांनी सांभाळण्याची जबाबदारी घेतली. अर्ल जॉन रसेल हे बर्ट्रांड रसेलचे आजोबा व्हिक्टोरिया राणीच्या खास मर्जीतले सरदार होते. त्यांचं राजकीय वजन खूप होतं. बर्ट्रांडला घरात बर्टी या टोपणनावानं हाक मारत, तर त्याच्याहून पाच वर्षांनी मोठा असलेल्या त्याच्या भावाला फ्रँक म्हटलं जात असे. बर्ट्रांड रसेलवर जे. एस. मिल या पुरोगामी विचारवंताचा खूप मोठा प्रभाव पडला. तसंच मिलची मुलगी हेलन टेलर हिच्या नास्तिक आणि सुधारक विचारांचाही परिणाम रसेलवर झाला. 

आजोबांचं राहतं घर पेम्ब्रोक लॉज हे रिचमंड पार्कमध्ये होतं. अकरा एकराच्या जागेत पसरलेलं दुमजली घर आजूबाजूला हिरव्यागार वृक्ष, वेली, फुलं अशा निसर्गानं नटलेलं होतं. राजवाड्यासारख्या त्या भव्य घरात रसेल भावंडांच्या दिमतीला अनेक नोकरचाकर होते. रसेलच्या आजोबांना वाचनाची खूप आवड होती आणि त्यांच्याकडे अनेक विषयांवरचे ग्रंथ होते. रसेलची आजी - लेडी रसेल खंबीर आणि शिस्तप्रिय होती. तिनं आपल्या नातवांना चांगल्या सवयी लागाव्या, वाचनाची आवड लागावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. प्रतिष्ठित लोकांशी आदबीनं वागणं, हळू आवाजात बोलणं आणि हसणं, टापटीप राहणं अशा अनेक गोष्टी ती आपल्या नातवंडाना शिकवत असे. 

त्या वेळच्या शाळा आवडत नसल्यानं लेडी रसेलनं रसेल भावंडांना शिकवण्यासाठी घरीच उत्तम शिक्षकांची व्यवस्था केली होती. बर्ट्रांड रसेलचा काका रोलेा हा विज्ञानप्रेमी असल्यानं तो मुलांना भेटायला घरी आला की त्यांना नवनवीन संशोधनातल्या गोष्टी सांगत असे. एवढंच नाही तर त्याच्या देखरेखीखाली तो प्रयोग करायला भाग पाडत असे. रोलोमुळे रसेलला विज्ञानाची गोडीही लहानपणापासूनच लागली. 
इतकं सगळं असलं तरी फ्रँक आणि बर्ट्रांड यांच्याबरोबर खेळायला त्या एवढ्या मोठ्या परिसरात कोणीही मुलं नव्हती. फ्रँकनं बंड करून दूर अंतरावर असलेल्या शाळेत जायचं म्हणून आजीजवळ हट्ट धरला आणि त्यात तो यशस्वीही झाला. आता मागे फक्त बर्ट्रांड उरला. उंचच उंच झाडावर चढून बस, झाडांवरच्या घरट्यांमधली अंडी पळव, झाडाला दोर बांधून झोके घे, नोकरांबरोबर क्रिकेट खेळून मन रमव असे उद्योग बर्ट्रांड फावल्या वेळात करत असे. एवढं करूनही वेळच वेळ उरत असे आणि मग त्या एकटेपणानं त्याला जास्तच अंतर्मुख आणि अबोल केलं. जास्तीत जास्त वेळ पुस्तकांच्या सोबतीनं घालवल्यामुळे रसेलनं गणित आणि विज्ञान या विषयांत प्रावीण्य तर मिळवलंच. पण साहित्य, काव्य देखील त्याला आवडायला लागलं. वर्डस्वर्थ, मिल्टन हे कवी त्याला खूप आवडायचे. आजोबांची मोठमोठी ग्रंथसंपदा बर्ट्रांडनं थोड्याच दिवसांत वाचून संपवली. धर्म आणि राजकारण यासारखे विषय वाचून त्याची चौकस आणि तीक्ष्ण बुद्धी त्याला अनेक प्रश्न विचारत असे. फ्रँक सुट्टीत आला की बर्ट्रांडला भूमितीचे सिद्धांत शिकवत असे. त्याला आपल्या लहान भावाचं खूपच कौतुक वाटे. 

फ्रँक सुट्टी संपवून परत गेला की बर्ट्रांडला घर खायला उठत असे. याच वेळी त्याच्या मनात परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण होऊ लागले. हे जग असं का आहे, जग विशिष्ट नियमांनी बनलेलं आहे का, परमेश्वराचं यात कोणतं काम आहे असे अनेक प्रश्न असत. मात्र यावर कोणाशी चर्चा करावी हेच त्याला कळत नसे. त्यामुळे तो आणखीनच पुस्तकांमध्ये त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत बसे. जे. एस. मिलचं हू मेड मी हे पुस्तक त्यानं एका दमात वाचून काढलं. याच दरम्यान त्याच्या मनातून ख्रिश्चन धर्माचा प्रभावही कमी होऊ लागला. याच काळात त्यानं फ्रेंच, जर्मन आणि इटालियन भाषा आत्मसात केल्या. विज्ञान, गणित, साहित्य या विषयांबरोबरच बर्ट्रांडला सेक्स आणि नीतिमत्ता या विषयाविषयी कुतूहल जागं झालं. त्या काळी सेक्स विषयावर कोणीही मोकळेपणी बोलत नसल्यानं त्याच्या मनातलं कुतूहल शमवण्यासाठी त्याला मार्गही दिसत नव्हता. मग वैद्यकीय विषयांवरची पुस्तकं वाचून बर्ट्रांड रसेल आपली उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करत असे. कोणाला समजू नये यासाठी तो आपल्या वहीत चक्क ग्रीक भाषेत टिपणं लिहून ठेवत असे. 

वयाच्या १६ व्या वर्षी बर्ट्रांड रसेल पेम्ब्रोक लॉजच्या परिसरातून बाहेर पडून केंब्रिजमध्ये अखेर दाखल झाला. त्याच्या वर्गातल्या मुलांपेक्षा तो वयानं लहान असूनही बुद्धीनं मात्र त्यांच्यापेक्षा जास्त परिपक्व होता. त्यानंतर त्यानं ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. रसेलला इथं जी. ई. मूर हा नीतिशास्त्रातला थोर विचारवंत भेटला. प्रा. ए. एन. व्हाईटहेड हे गणित आणि तत्वज्ञान या विषयांत ज्ञान असलेलं मोठं नाव होतं. त्यांचीही रसेलबरोबर चर्चा होत असे. द सोसायटी ऑफ अ‍ॅपॉसल्स मध्ये अनेक विचारवंत, बौद्धिक भूक असलेले विद्यार्थी वाद-चर्चा करत. या मंडळात प्रवेश मिळवणं तितकंसं सोपं नव्हतं. मात्र रसेलला त्यात सहजपणे प्रवेश मिळाला. या मोकळ्या वातावरणात रसेल खूपच रमला. इथंच सायकलनं दूरदूर भटकणं, पोहणं, टेबलटेनिस खेळणं, एकत्र जमून चर्चा करणं अशा अनेक गोष्टींमुळे मुळचा अबोल असलेला रसेल या वातावरणात खुलला आणि मित्रांमध्ये सगळ्यांत बडबड्या म्हणून ओळखला जायला लागला. या अ‍ॅपॉसल्स सोसायटीनं रसेलला त्याच्या विचारांना मुक्तपणे मांडायचं कसं हे शिकवलं. 

१८९२ साली जी.ई. मूर या तत्वज्ञानाच्या विद्यार्थ्याशी रसेलची ओळख झाली आिाण अल्पावधीतच दोघं एकमेकांचे चांगले मित्र झाले. मूरचा रसेलवर इतका प्रभाव पडला की दोघंही तत्वज्ञानावर तासनतास चर्चा करत. इतकी की काही वेळा तोंडातला पाईप शिलगवण्याचंही ते विसरून जात. याच काळात रसेलचा गणितामधला रस हळूहळू कमी होत गेला. न्यूटनच्या मृत्यूनंतर लोकांचा गणिताबद्दल घोकंपट्टीवरचा भर वाढला. या गोष्टीचं रसेलला खूप वाईट वाटत असे. त्यानं आपली गणिताची सगळी पुस्तकं विकून टाकली आणि त्यानं मोठ्या प्रमाणात तत्वज्ञानाचा अभ्यास सुरू केला. जे. एस. मिल, हॅरॉल्ड जोखिम, देकार्त, स्पिनोझा, लायब्निझ, बेकन, कांट, हेगेल यांच्या विचारांचा अभ्यास केला. याच काळात मनातला संभ्रम दूर होऊन आपण अ‍ॅगनॉस्टिक आहोत, अज्ञेयवादी आहोत हे त्याला कळलं. 

एका सुट्टीत रसेल रोलोकडे हाइंडहेड इथं गेला असताना त्याची पिअरसल स्मिथ नावाच्या कुटुंबाशी ओळख झाली. पिअरसल कुटुंब क्वेकरपंथी होतं. त्यांची तीन मुलं आिाण अ‍ॅलिस नावाची मुलगी या सगळ्यांबरोबर त्याची परमेश्वर, पापपुण्याच्या संकल्पना यावर चर्चा होत असे. आपल्यापेक्षा चार वर्षांनी मोठी असलेली अ‍ॅलिस रसेलला आवडली होती. दोघंही एकमेकांना पत्रं लिहीत, पण आपण एकमेकांवर प्रेम करतो आहोत याचा उच्चार दोघांनीही जवळपास पाच वर्षं केलाच नाही. त्यानंतर मात्र प्रेमाची कबुली देत रसेलनं आपल्या आजीजवळ अ‍ॅलिसवरच्या प्रेमाबद्दल सांगितलं. अ‍ॅलिस आणि रसेल यांच्या प्रेमाला सगळीकडूनच जोरदार विरोध झाला. त्यांनी लग्न केलं तर त्यांचं होणारं अपत्य वेड होऊ शकतं असं रसेलच्य आजीनं सांगितलं. तेव्हा आपण मूलच होऊ देणार नाही असा निर्णय अ‍ॅलिस आणि रसेल यांनी घेतला आणि सगळ्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत अ‍ॅलिस आणि रसेल यांनी १४ डिसेंबर १८९४ या दिवशी क्वेकर पद्धतीनं लग्न केलं. दोघांचाही संसार सुखात सुरू झाला. लग्नानंतर तीन वर्ष अ‍ॅलिस आणि रसेल जर्मनी, लंडन, अमेरिका अशा अनेक ठिकाणी फिरत राहिले. 

त्यानंतर रसेलनं भूमितीवर काम करायला सुरुवात केली. गणित आणि तत्वज्ञान झाल्यावर त्याचा ओढा राजकारणाकडे वळायला सुरुवात झाली. मार्क्सवाद, समाजवाद आणि आर्थिक उत्पादन या सगळ्यांविषयी त्याला खोलात जाणून घेण्याची उत्कंठा लागली. त्यामुळे या विषयांचा अभ्यास करून रसेलनं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत राजकारणावर तब्बल सहा व्याख्यानं दिली. आपण चांगला वक्ता आहोत ही गोष्टही रसेलला याच काळात लक्षात आली. या व्याख्यानांवर आधारित ‘जर्मन सोशल डेमॉक्रॉसी’ नावाचं पुस्तक लिहिलं. मार्क्सच्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टोचं त्यात विश्लेषण होतं. तसंच जर्मन स्त्रियांविषयीही त्यानं यात लिहिलं होतं. प्रा. व्हाईटहेड यांच्याबरोबर रसेलनं याच काळात गणितावर अभ्यास सुरू केला. दहा वर्षांच्या अवधीत प्रिंसिपिया मॅथेमॅटिका या ग्रंथाचा पहिला खंड अथक प्रयत्नांनी तयार झाला. यातल्या शााीय संकल्पना अतिशय सोप्या, सुटसुटीत पद्धतीनं करण्यावर त्याचा भर असायचा. या काळात रसेल झपाटल्यासारखा रोज दहा-दहा तास काम करत असे. जेव्हा प्रिंसिपिया मॅथेमॅटिकाचं काम संपलं तेव्हा ४००० पानांचा गठ्ठा त्यानं विद्यापीठात पोहोचवण्यासाठी चक्क एक हातगाडी केली होती. गणितातला हा बुद्धिमत्तेला आव्हान देणारा अप्रतिम असा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. 

प्रिन्सिपियाचं काम संपल्यावर रसेलनं ट्रिनिटीमध्ये अध्यापनाचं काम सुरू केलं. याच दरम्यानं त्यानं ‘दी प्रॉब्लेम्स ऑफ फिलॉसॉफी’ नावाचं अप्रतिम असं पुस्तक लिहिलं. 

‘प्रिंन्सिपिया मॅथेमॅटिका’च्या कामामुळे जगभरातून रसेलवर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव झाला. याच काळात त्याच्या आयुष्यात अनेक सुंदर आणि बुद्धिमान स्त्रिया आल्या. खरं तर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्त्-पुरुष यांच्या मैत्रीकडे निखळपणे बघितलं जात नसे. स्त्री-पुरुष मैत्रीसाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते असं रसेलचं मत होतं. समानता, विश्वास आणि स्त्री-पुरुष यांना वेगळे निकष न लावण्याची वृत्ती. स्त्रियांबरोबरच्या मैत्रीत तो या गोष्टींकडे आवर्जून लक्ष देत असे. पण सततचा प्रवास, आणि लोकांचा गराडा यामुळे अ‍ॅलिसकडे रसेलचं दुर्लक्ष होत गेलं. अ‍ॅलिसला नैराश्यानं घेतलं आणि अखेर पंचवीस वर्षांच्या संसारानंतर दोघांनीही घटस्फोट घेतला. 

१९१४ च्या सुमाराला पहिल्या महायुद्धाचं सावट जगभर पसरलं. युद्धामुळे औद्योगिक प्रगती खुंटते, सामान्य नागरिकांचं जगणं दुसह्य होतं, दैनंदिन जीवन विस्कळीत होतं, समाजातले अनेक तरुण अपंगत्वाला तोंड देतात आणि यासारख्या युद्धांच्या अनेक परिणामांचा विचार मनात येत राहिल्यानं रसेलला या काळात खूपच नैराश्य आलं. इतकं की त्याच्या मनात आत्महत्येचे विचार डोकावायला लागले. युद्धविरोधी एक परखड लेखही रसेलनं लिहून संपादकाला गळ घालून छापायला लावला. तो लेख संपादकांनी छापला. मात्र यापुढे असे लेख आपण छापणार नाहीत असं त्यांनी रसेलला ऐकवलं. त्यांच्या मते असे लेख छापण म्हणजे एक प्रकारचा राष्ट्रद्रोह होता. युद्धाच्या बातम्यांनी रसेलचं अंतःकरण विदीर्ण होत असे. आपल्यापेक्षा लहान लहान तरूण मृत्युमुखी पडताना पाहून तो भावनाविवश होत असे. एच. जी. वेल्स, जी. ई. मूर आणि व्हाईडहेड या सगळ्यांचीच मतं रसेलच्या मताच्याविरोधी होती. रसेलसारखा विचार करणारी एकच व्यक्ती त्याला भेटली ती म्हणजे जॉर्ज बर्नार्ड शॉ! या काळात रसेलनं युद्धाच्या विरोधात बरंचसं लेखन केलं. दी एथिक्स ऑफ वॉर हा त्याचा लेख आंतरराष्ट्रीय स्तरावरल्या एका नियतकालिकात प्रसिद्ध झाला. युद्धाची कारणं, युद्धं सुरू का होतं अशा अनेक गोष्टींचा वेध त्यानं या लेखात घेतला. रशियातला साम्यवाद, इटलीतला फॅसिझम, जर्मनीतला नाझीवाद आणि ही राष्ट्रं युद्धाला जबाबदार असल्याचं रसेलचं मत बनलं होतं. त्यांच्या आततायीपणामुळे संपूर्ण जगाचं स्थैर्य धोक्यात आल्याचं त्याला वाटत असे. या काळात रसेल शांततेवर व्याख्यानं देऊ लागला. कला, स्थापत्य, राजकारण, नीतिशास्त्र, विज्ञान, साहित्य, शिक्षण, कुटुंब, आर्थिक नियोजन अशा सगळ्या गोष्टी युद्धानं उदध्वस्त होऊ शकतात असं रसेल मांडत असे. याच दरम्यान त्याचा मानसशााावरचाही अभ्यास झाला. माणसं युद्धासारखा आत्मघाती मार्ग का निवडतात याचा तो विचार करत असे. रसेलच्या व्याख्यानांना प्रचंड प्रतिसाद मिळत असे. ही सगळी व्याख्यानं पुस्तकरूपात ‘दी प्रिन्सिपल्स ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन’ या नावानं तर अमेरिकेत ‘व्हाय मॅन फाईट‘या नावानं प्रसिद्ध झालं. ही पुस्तकं खूपच लोकप्रिय ठरली. 

महायुद्ध सुरू होऊन वर्ष झालं असताना ब्रिटनमध्ये सैन्यभरती करण्यासाठीचे नियम अधिक जाचक केले गेले. उदाहरणार्थ, पूर्वी सैन्यात भरती होण्यासाठी ५ फूट ८ इंच उंची लागत असे, तो नियम बदलून ५ फूट ३ इंच असलेल्या पुरुषांनाही सैन्यात सामील केलं जाईल असं जाहीर करण्यात आलं. जर्मनी विषारी वायूचा सैन्यात उपयोग करत असल्यानं ब्रिटिश सैनिक मोठ्या संख्येनं मृत्यूमुखी पडू लागले. अशा वेळी रसेलनं निःशा कायदेभंगाचं शा उचललं. तो सैन्यात न जाऊ इच्छिणार्‍यांच्या बाजूनं उभा राहिला. त्यानं नो कन्स्क्रिक्शन फेलोशिप नावाची (एनसीएफ) संघटना सुरू केली. यात अनेक स्त्री-पुरुष प्रचंड संख्येनं सामील झाले. युद्धाला विरोध असणारे अनेक जण या संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र जमत आणि चर्चा करत. मात्र तत्कालीन पंतप्रधान अ‍ॅसक्विथ याला काही सुचत नव्हतं. त्यानं सक्ती सुरू केली. इतकंच नाही तर जे विरोध करतील त्यांना तुरुंगात डांबण्यात येऊ लागलं. एकदा तर सैन्यात जायला नकार देणार्‍या ५० लोकांना रात्रीतून फ्रान्सला हलवलं आणि त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. रसेलला या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसला. याच वेळी एनसीएफच्या कार्यकर्त्यांवरही कोर्टमार्शल  होऊन शिक्षा ठोठावण्यात आली. रसेलनं या सगळ्या गोष्टींवर एक पत्रक काढलं आणि ते वाटलं. अखेर रसेलवर खटला भरण्यात आला. रसेलनं स्वतःच स्वतःची केस लढवण्याचं ठरवलं. स्वतःच्या बचावात रसेलनं इंग्लंडची परंपरा, राष्ट्राचा मानसन्मान, स्वातंत्र्य, सद्विवेकबुद्धी, सत्याचा वापर अशा अनेक मुद्दयांवर आपलं म्हणणं मांडलं. त्याच्या भाषणातला एकही मुद्दा खोडता येण्याजोगा नसल्यानं लॉर्ड मेयर खूपच वैतागला. अखेर त्याला किरकोळ १०० पौंड दंड ठोठावून सोडून देण्यात आलं. मात्र रसेलनं आपल्याकडे दंड भरण्याइतके पैसे नसल्याचं सांगितलं. त्यावर लॉर्ड मेयर आणखीनच वैतागला. अखेर रसेलच्या मित्रांनी रसेलची पुस्तकं आणि फर्निचर विकून पैसे उभे केले आणि त्याला सोडवलं. रसेलच्या मित्रांनीच ही पुस्तकं आणि फर्निचर विकत घेतलं असल्यानं त्यांनी ते रसेलला परत दिलं. हे सगळं करण्यामागे जॉर्ज बर्नार्ड शॉ हा पडद्यामागचा सूत्रधार किंवा सल्लागार म्हणून रसेलसाठी उभा होता. यानंतर सरकारनं रसेलला किती त्रास देता येईल तितका देण्याचं ठरवलं. त्याला ट्रिनिटी कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं. 

आता तर चोवीस तास रसेलला मिळणार होते. रसेलनं संपूर्ण इंग्लंडभर आपण युद्धविरोधी व्याख्यान करत असल्याचं जाहीर केलं. त्याच्या व्याख्यानांवर बंदी घालण्याची तयारी सरकार करत असलं तरी दी टाइम्स नावाच्या वृत्तपत्रानं सरकारची ही दडपशाही योग्य नसल्याचं स्पष्टपणे मांडलं. तसंच रसेलचं युद्धविरोधात असलेलं एक व्याख्यानं छापून सर्वत्र वाटलंही गेलं. यानंतर युद्धात नसलेली अमेरिकाही युद्धात पडली आणि रसेलला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. रसेलचे लेख आणि व्याख्यानं सुरू असल्यानं पुन्हा एकदा त्याच्यावर खटला भरला गेला. याही वेळी रसेलच स्वतःचा बचाव करणार होता. मात्र या वेळी त्याचं म्हणणं ऐकून न घेता न्यायाधीश सर जॉन डिकन्सन यानं त्याला सहा महिन्याचा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. याचा परिणाम असा झाला की रसेलला सगळ्या वृत्तपत्रांनी हिरो ठरवलं तर सरकारला खलनायक!

१९१८ साली रसेल तुरुंगात गेला. इथं तो वाचन आणि लिखाण करण्यात आपला वेळ घालवू लागला. याच वेळी त्यानं ‘अ‍ॅनॅलेसिस ऑफ माइंड’ या पुस्तकाचा आराखडाही तयार केला. माणसाच्या विवेकवादी वृत्तीवर त्याचा विश्वास होता.  मॅथेमॅटिकल फिलॉसॉफीवर त्यानं एक दीर्घ लेख याच काळात लिहिला. तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्याच्या मित्रांनी त्याच्यासाठी फंड जमा करून त्याची सर्व व्यवस्था केली. १९१९ मध्ये एनसीएफ संघटनेचं कार्यालय बंद करण्यात आलं. कारण युद्ध संपलं होतं. 

वयाच्या ४६ व्या वर्षी रसेलची गणितज्ञ जे. इ. लिट्लवूड याच्याशी मैत्री झाली. दोघांनी मिळून एका निसर्गरम्य ठिकाणी घर भाड्यानं घेतलं आणि फिरणं, पोहणं, भेटायला येणार्‍यांशी गप्पा मारणं असा दिनक्रम त्यांचा सुरू झाला. या दरम्यान रसेलला डोरा ब्लॅकवेल नावाची चोवीस वर्षांची तरूणी भेटायला आली. डोरा ही स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करायची. तिचं रसेलवर खूपच प्रेम होतं आणि तिला रसेलपासून मुलं हवी होती आणि खरं तर रसेललाही अ‍ॅलिसबरोबर असतानाच आपल्याला मुलं असायला हवीत असं तीव्रतेनं वाटायला लागलं होतं. मुलांमुळे माणूस स्वतःच्या अहंकाराच्या कोषातून बाहेर पडून विचार करायला लागतो असं त्याला वाटायचं. रसेल आणि डोरा यांनी तीन वर्षांनी लग्नाचा निर्णय घेतला.  

या दरम्यानं रसेल आणि डोरा अनेक देश फिरले. अनेक लोकांना भेटले. रशियात गेल्यावर मॅक्झिम गार्की आजारी असल्यानं त्याची भेट रसेलनं घेतली. लेनिनलाही तो भेटला. मात्र रसेलला लेनिन जुलमी वाटला. त्याला रशियातून कधी एकदा परत जातो असं झालं. यानंतर रसेल आणि डोरा यांनी चीनमध्ये जायचं ठरवलं. चीनमध्ये ते दोघं काही काळ राहिले. परतल्यावर काहीच काळात जॉन आणि केट या दोन मुलांना डोरानं जन्म दिला. आपल्या मुलांचं संगोपन करण्यात रसेल पूर्ण गुंग होऊन गेला होता. मुलांबरोबर खेळताना, मुलांना समजून घेताना, मुलं वाढत असताना त्यांना आता शाळेत पाठवावं लागणार असल्याची जाणीव रसेलला झाली. रसेल कधी शाळेत गेला नव्हता. त्याच्या आजीनं घरीच शिक्षक लावून त्याचा अभ्यास घेतला होता. मात्र त्या वातावरणातल्या एकटेपणाचा परिणाम रसेलला आठवत असल्यानं त्याला आपल्या मुलांच्या बाबतीत असं करायचं नव्हतं. मुलांनी सोशल व्हायला हवं आणि त्यासाठी शाळा आवश्यक असल्याचं त्याचं मत होतं. रसेल आणि डोरा यांनी चांगल्या शाळेचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्या वेळी फ्रॉईडनं अबोध मनावर प्रकाश टाकणारं लिखाण केलं होतं. माँन्टेसरीनं बंधनमुक्त शिक्षणपद्धतीवर काम सुरू केलं होतं. अशा वातावरणात रसेलनं शिक्षणावर खूप सखोल अभ्यास केला आणि ‘ऑन एज्युकेशन’ नावाचं पुस्तक लिहिलं. ऑन एज्युकेशन या पुस्तकात शिक्षण घेताना निर्भयता, उत्साह, संवेदनशीलता आणि बुद्धिमत्ता या चार घटकांवर काम करण्याची आवश्यकता असल्याचं रसेलनं म्हटलं होतं. यानंतर लगेचच ‘एज्युकेशन अँड दी सोशल ऑर्डर’ या नावाचं आणखी एक पुस्तक प्रसिद्ध केलं. ही दोन्ही पुस्तकं प्रचंड लोकप्रिय झाली. 

रसेल हा रूढ अर्थानं शिक्षणतज्ज्ञ नसला तरी तो एक प्रेमळ पिता होता. जगातला क्रूरपणा आणि हिंसा याला विरोध करणारी तरुण पिढी असावी असं त्याला वाटत होतं. रसेल त्या वेळी वाखाणल्या गेलेल्या अनेक शाळांमध्ये जाऊन आला आणि अखेर आपणच शाळा सुरू करायचा निर्णय त्यानं घेतला. रसेलचा भाऊ फ्रँक यानं आपली जागा रसेलला दिली. १९२७ साली बीकन हिल नावाची शाळा रसेल आणि डोरा यांनी सुरू केली. या शाळेत हिंडण्याफिरण्याची मोकळीक होती, निसर्गरम्य वातावरण मुलांसाठी उपलब्ध करून दिलं जाणार होतं. शाळेच्या परिसरात बकर्‍या, गायी, बदकं, डुकरं असे प्राणीही होते. निसर्गाबरोबरच मुलांचा प्राण्यांचाही अभ्यास सहजपणे व्हावा असा त्यामागे उद्देश होता. डोरानं पूर्ण वेळ शाळेच्या कामात आपलं लक्ष घातलं होतं. मात्र या मुक्त वातावरणाचा फायदा काही मुलं घेत आणि शिस्त किंवा शिक्षा नसल्यानं तिथं मनाला येईल तसं काही मुलं वागू लागली. काही मुलांना लवकर उठायला आवडायचं नाही, काहींना दात घासायला आवडायचं नाही, तर काही मुलं विनाकारण आपल्यापेक्षा लहान असलेल्या मुलांच्या खोड्या काढून त्यात आनंद घेत. या सगळ्या गोष्टीं बाहेर पडायला लागल्यावर रसेलची मनसोक्त खिल्लीही वृत्तपत्रांनी उडवली. रसेलही हे सगळं बघून वैतागून गेला. योग्य वातावरण आणि संधी मिळाली की मुलं काहीतरी करून दाखवू शकतील यावरचा रसेलचा विश्वास उडाला. मुलांच्या आक्रमक खोड्यांनी अनेक शिक्षक कंटाळून शाळा सोडून निघून जात. आदर्श शाळा बनवण्याचं स्वप्न रसेलला पूर्ण करता आलं नाही. अखेर रसेलनं शाळेचा राजीनामा दिला आणि तो त्या जबाबदारीतून मुक्त झाला. मात्र डोरानं ही शाळा पुढली दहा वर्षं चालवली. 

याच काळात रसेलचं मॅरेज अँड मॉरल्स नावाचं विवाहसंस्था आणि नीतिमूल्यांवर भाष्य करणारं पुस्तक प्रसिद्ध झालं. या पुस्तकानं इतिहास घडवला. कुटुंबसंस्था, विवाहसंस्था, मुलं, त्यांचं संगोपन याबरोबरच पुरुषांइतकंच लैगिंक स्वातंत्र्य स्त्रीलाही हवं याबद्दलची त्याची ठाम मतं या पुस्तकात होती. विवाहसंस्थेत नवरा-बायको यांनी एकमेकांशी एकनिष्ठ राहायला हवं असं म्हटलं गेलं. मात्र रसेलच्या म्हणण्यानुसार आयुष्यात अनेक टप्प्यांवर अनेक स्त्री-पुरुष एकमेकांना भेटतात. अश वेळी त्यांना एकमेकांविषयी आकर्षण वाटू शकतं. अशा वेळी त्या दोघांची परस्पर संमती असल्यास त्यांच्या भेटण्यात काहीच गैर नाही. यामुळे कुटुंबसंस्था धोक्यात येण्याचं काहीच कारण नाही. मात्र या विवाहबाहृय संबधात मूल जन्माला घालू नये असं रसेलचं म्हणणं होतं. या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद व्हावेत यासाठी प्रकाशक परवानगीसाठी त्याच्या माग लागले होते. त्यानंतर वर्षभरातच ‘दी कॉन्क्वेस्ट ऑफ हॅपिनेस’ हेही पुस्तक प्रसिद्ध झालं. जीवन सुखी कसं करावं याबद्दल या पुस्तकात विवेचन होतं. असंतुष्ट लोकांनी आपला एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा संकुचित दृष्टिकोन बदलला तर आपल्याला आनंद मिळू शकतो असं रसेलनं त्यात म्हटलं होतं. ही दोन्ही पुस्तकं प्रचंड गाजली. काही काळानंतर डोरा आणि रसेल यांचाही घटस्फोट झाला. रसेलचे तर बाहेर अनेक स्त्रियांशी मैत्री आणि संबंध होतेच, पण डोराचंही एका पत्रकारावर प्रेम जमून तिला त्याच्यापासून दोन मुलंही झाली. रसेलनं आपल्या दोन्ही मुलांचा ताबा घटस्फोटात मिळवला. घटस्फोट मिळवताना कोर्टात गेलं की पती-पत्नीमधल्या एका सुंदर नात्याची समाप्ती तर होतेच, पण त्यातल्या वाईट गोष्टी वेशीवर टांगल्या जाण्याची खंत रसेलनं व्यक्त केली होती. डोराशी विभक्त झाल्यावर रसेलनं आपल्या दोन्ही मुलांना सांभाळत असलेल्या पॅट्रिशिया स्पेंसशी लग्न केलं. पॅट्रिशिया रसेलची सेके्रटरी म्हणूनही काम बघू लागली आणि जॉन आणि केट या दोन्ही मुलांकडे लक्षही देऊ लागली. रसेलची दोन्ही मुलं आपल्या सावत्र आईबरोबर खुश होती. 

यानंतर रसेलनं ‘पोट्रेट्स फ्रॉम मेमरी’ नावाचं पुस्तक लिहिलं. यात प्रा. व्हाईटहेड, एच. जी. वेल्स, जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि आणखी काही जिवलगांविषयी  रसेलनं खूप चांगलं चित्र उभं केलं होतं. यानंतर त्यानं फ्रीडम व्हर्सेस ऑर्गनायझेशन नावाचं पुस्तक लिहिलं. बर्नार्ड शॉनं या पुस्तकाची खूपच प्रशंसा केली. यानंतर रसेलची भेट गिल्बर्ट मरे याच्याशी झाली आणि त्यानं रसेलबरोबर चर्चा करत धर्म आणि विज्ञान या विषयावर लिहावं असं सुचवलं. यातूनच रिलिजन अँड सायन्सेस या पुस्तकानं जन्म घेतला. रसेलचा संघटित धर्माला विरोध होता. धर्मसंस्था सुख, चारित्र्य, आणि सत्य यांच्या विरोधात काम करणार्‍या संस्था असल्याचं त्याचं मत होतं. सगळेच धर्म माणसांवर आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी मग पापपुण्याच्या, स्वर्ग-नरकाच्या संकल्पना ठसवतात. धर्मसंस्था खुळचट प्रथांचं अनुकरण करायला सांगतात. बंधनं घालतात आणि या गोष्टी रसेलला मुळीच आवडत नव्हत्या. धार्मिक असण्यापेक्षा वैज्ञानिक वृत्ती असणं जास्त महत्त्वाचं तो मानत असे.  खरं तर रसेलची पुस्तकं बघितली की त्याला कुठलाही विषय वर्ज्य नव्हता ही गोष्ट लक्षात येते. १९३८ साली रसेलला अमेरिकेतल्या शिकागो विद्यापीठानं प्राध्यापक म्हणून यावं अशी विनंती केली आणि रसेलनं अमेरिकेत जाण्याचा निर्णय वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला. 

अमेरिकेतही लोक रसेलला ऐकण्यासाठी गर्दी करू लागले. त्याचे विचार ऐकण्यासाठी ते आतुर होत. मात्र इथेही स्थैर्य मिळण्यापूर्वीच १९३९ साली दुसर्‍या महायुद्धाची चाहूल लागली. रसेल खूप बेचैन झाला. शांततेसाठी प्रयत्न केल्यानंतरही जर्मनी दाद देत नाही असं लक्षात आल्यानंतर रसेल युद्धात भाग घेऊन लढलं पाहिजे असं म्हणू लागला आणि हिटलर सारख्या जुलमी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी पुढे आलं पाहिजे असं म्हणायला लागला. रसेलच्या या भूमिकेनं लोकांच्या मनात गोंधळ तयार झाला. अमेरिकेत असताना रसेल आणि आईन्स्टाईन यांच्याही भेटीगाठी होत असत. रसेलनं गांधीजींचीही भेट घेतली होती. गांधीजींच्य तत्वज्ञानाबद्दल रसेलला प्रचंड आदर आणि कुतूहल होतं. 

अमेरिकेत रसेलच्या मॅरेज अँड मॉरल्स या पुस्तकानं विक्रीचा उच्चांक गाठला. पण त्याचबरोबर कर्मठ विचारसरणीच्या लोकांनी आकांडतांडव करायला सुरूवात केली. आपली पुढली पिढी बिघडवण्याचं काम रसेल करतोय असा पवित्रा घेत त्याला त्याच्या कामावरून काढून टाकावं अशी मागणी या लोकांनी केली आणि त्याच्यावर खटला भरला गेला. या खटल्यात रसेलचं म्हणणंही ऐकून घेण्यात आलं नाही. त्याला शिकागो विद्यापीठातून पायउतार व्हावं लागलं. यानंतर रसेलला फिलाडेल्फियामध्ये बॉर्न्सच्या संस्थेत प्राध्यापक म्हणून बोलावण्यात आलं. रसेल फिलाडेल्फियात जाऊन पोहोचला. इथेही त्याचं बिनसलं आणि त्यानंतर रसेल वयाच्या ७२ व्या वर्षी इंग्लंडला परतला. 

यानंतरच्या काळात रसेलनं तत्वज्ञानावर लक्ष केंद्रित केलं. तत्वज्ञानामुळे माणसाच्या जगण्याला अर्थ मिळतो असं रसेल म्हणत असे. प्रत्येक गोष्टीबद्दल प्रश्न विचारला पाहिजे, मनात संशय निर्माण झाला पाहिजे या त्याच्या विचारांमुळे त्याला स्केप्टिकल म्हणजेच संशयवादी म्हटलं गेलं. यानंतर रसेलचा तिसरा घटस्फोट झाला आणि तो ८० वर्षांचा असताना त्याच्या आयुष्यात एडिथ फिंच ही स्त्री आली. दोघांनी १९५२ साली लग्न केलं. एडिथ ही अतिशय समंजस जोडीदार ठरली. याच काळात रसेलनं आईन्स्टाईनबरोबर चर्चा करत जगात या दोन महायुद्धानंतर युद्धं होऊ नयेत यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत याबद्दल चर्चा करत संयुक्तपणे एक पत्रक प्रसिद्ध केलं. रसेलनं याच दरम्यानं पीस फाउंडेशनचीही स्थापना केली. वयाच्या अखेरपर्यंत रसेल काम करतच राहिला. इतक्या वृद्धावस्थेतही त्यांच्यात इतकी अफाट ऊर्जा कुठून येत होती हे एक कोडंच होतं. 

१९७० साली २ फेब्रुवारी या दिवशी रसेलचा मृत्यू झाला. शेवटच्या क्षणी त्याच्याजवळ त्याची चौथी पत्नी एडिथ होती. आपल्या मृत्यूनंतर आपला दफनविधी न करता आपल्या दहनानंतर आपली रक्षा अनेक पर्वतरांगांमधून विखुरली जावी अशी त्याची शेवटची इच्छा होती. त्याच्या इच्छेनुसारच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अतिशय साधेपणानं कुठलीही गर्दी, सभा, संगीत, हार-तुरे न करता रसेलला शेवटचा निरोप देण्यात आला. रसेलच्या इच्छेनुसार त्याच्याकडे  असलेल्या सगळ्या गोष्टी पीस फाऊंडेशनला देण्यात आल्या. रसेल गेला, पण त्याच्या अफाट अशा कार्यातून तो एखादी दंतकथा ठरावी असाच जगावर ठसा उमटवून गेला. विसाव्या शतकातला विख्यात विचारवंत, गणितज्ञ, तत्वज्ञ, विज्ञानवादी, विवेकनिष्ठ म्हणून लोक त्याला कधीही विसरू शकणार नाहीत हे मात्र खरं!

दीपा देशमुख, पुणे

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.