प्रोफेसर हेमंत पाटील
प्रोफेसर हेमंत पाटील एके दिवशी अच्युत गोडबोले यांचा मुंबईहून फोन आला, 'दीपा, हे माझे मित्र हेमंत पाटील. आयआयटीमध्ये प्रोफेसर आहेत. यांना आपलं 'कॅनव्हास' खूप आवडलंय. त्यांच्याकडूनच ऐक ते काय म्हणताहेत.....’ मी हेमंत पाटील यांच्याशी बोलायला सुरुवात केली आणि आम्ही दोघं कितिक वेळ बोलतच राहिलो. काही माणसं जशी परकी वाटतच नाहीत तसंच काहीसं झालं...... या गोष्टीला, या मैत्रीला फक्त दोन महिने झालेत. १ ऑक्टोबरला व्हॉटसअपवरून आणि नंतर प्रत्यक्ष मोबाईलवरून बोलणं सुरू झालं.
एकातून दुसरा विषय, दुसर्यातून तिसरा विषय.....अखंडपणे अर्थपूर्ण गप्पांचा सिलसिला सुरू होतो. प्रत्यक्ष कधीही न बघितलेला हा बुद्धिमान इंजिनिअर मित्र पुण्यात एका लग्नासाठी आलेला असताना त्यांनी मला तसं कळवलं आणि आम्ही आज भेटलो. नेहमीप्रमाणेच विषयांची कमी पडूच नये अशा आमच्या गप्पा सुरू झाल्या. आईन्स्टाईन, मेघनाद साहा, रामानुजन, टेस्ला, अॅलन ट्युरिंग, शरदचंद्र चट्टोपाध्याय, सुनिल गंगोपाध्याय, विश्वेश्वरैया आणि मलिक अंबर, शहाजहान आणि औरंगजेब......अथेन्सचं अॅक्रोपोलिस आणि रोमचं कोलोजियम..... वेळ कुठे कसा निघून गेला कळलंच नाही. आम्ही लिहिलेलं तंत्रज्ञ जीनियस त्यांना मी भेट दिलं, तर त्यांनी खास सुरतहून आणलेली विलायची मला भेट दिली. हेमंत पाटील यांच्यासारखा बुद्धिमान, व्यासंगी, सकारात्मक विचारांचा, मित्र लाभणं म्हणजे खरोखरंच २०१८ सालानं मला दिलेली अनमोल भेट आहे! थँक्यू, २०१८!
दीपा देशमुख, पुणे
३१ डिसेंबर २०१८.
Add new comment