वाडेश्वर, तुम्बाड आणि सोनाली....हे दरवयतंं...
वाडेश्वर, तुम्बाड आणि सोनाली........ हे दरवयतंं...मायेनं इवलुशा चिंब न्हायतंं... हे पाघळतंं....ऊब मिळता जरा वाहू लागतं... या वेळची दिवाळी कधी सुरू झाली आणि कधी संपली कळलंच नाही. संपताना मात्र बाबा (अनिल अवचट) बरोबर सकाळी ब्रेकफास्टला जायचं ठरलं. मग वाडेश्वरचा डोसा आणि बटाटेवडा असा ताव मारून बाबाच्या कॅमेर्यात अनेक दृश्यं बंदिस्त झाली. कौशिक आणि त्याची पत्नी, मि. अँड मिसेस अँड. शालिग्राम असे बाबाचे चाहते भेटले. त्यांच्यासोबतही गप्पा रंगल्या. पुण्यातल्या विक्षिप्त लोकांविषयी खूप विनोद आणि किस्से ऐकले/वाचले असले तरी प्रत्यक्षातला माझा पुण्याचा अनुभव खूपच चांगला आहे. रात्री-मध्यरात्री एकटीनं पुण्यात येणं, आशा साठे यांच्याकडे हक्कानं उतरणं, सुहासिनी जोशी हिची त्या काळातली सोबत आणि मदत, यमाजीची प्रतिकूल काळातली साथ, लिखाणाला मिळालेली दिशा, पुण्यातली पुस्तकांची दुकानं, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असं खूप काही पुण्यानं दिलं. अनेक माणसं कायमची जोडली गेली. त्यातलाच एक बाबा! मवाळ, कधीही स्वतःच पडती बाजू घेणारा पण नातं तुटू नये याची काळजी घेणारा.....छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारा, आनंद वाटणारा आणि माणसांत रमणारा......त्यामुळे वाडेश्वरमधल्या गप्पा आणि खाणं यामुळे सकाळ प्रसन्न झाली. सायंकाळी आसावरीAsawari Kulkarni आणि आरोही यांच्याबरोबर 'तुम्बाड' बघायचं ठरलं होतं. रात्रीचा साडे अकराचा शो....प्रचंड गर्दी.....आसावरीनं जम्बो पॉपकॉर्न, कोक वगैरेंची जय्यत तैयारी केलेली.....
चित्रपट सुरू झाला आणि संपला. मात्र 'तुम्बाड'नं माझ्या मनावर कुठलाही प्रभाव पाडला नाही. जशी कोरी मी आत गेले होते, तशीच बाहेर आले. मनात काही रेंगाळलंच नाही. पुण्यानं अनेक माणसं दिली. विशेषतः फेसबुकनं अनेक न बघितलेली, न भेटलेली माणसं जोडून दिली. त्यातलीच एक सोनाली!Sonali Badhe-kadam ती मला काही वर्षांपासून फॉलो करत होती. माझ्या पोस्ट वाचत होती. आवडल्याचं कळवत होती. एकदा तर फोन करून भरभरून बोलली. ही दिवाळी साजरी करताना तिनं ठरवलं होतं की काही गोष्टी स्वतःसाठी करायच्या. त्यातली एक गोष्ट होती मला भेटणं! मला तिचा फोन आला आणि आम्ही भेटायचं ठरवलं. तिला आमचं घर बघायचं होतं. तिला व्हॉट्सअपवर लोकेशन पाठवलं. धायरीवरून न चुकता ती आली आणि घराची बेलच वाजवली. छान, चुणचुणीत, समंजस अशी तरुणी माझ्यासमोर साध्या सुती ड्रेसमध्ये उभी होती. दोन दोन कॉलेजेसमध्ये शिकवतेय. प्रत्येक गोष्टी शिकण्याची अपार उत्सुकता तिच्यात दिसली.
निघताना म्हणाली, ‘मी तुम्हाला मिठी मारू?’ मी हात पसरले.....तिच्या हसर्या चेहर्यातून, तिच्या स्पर्शातून माझ्याविषयीचं प्रेम खूप काही बोलून गेलं. 'सोनाली, तुझ्यासारखे वाचक असतील, तर लिखाणाला किती बळ मिळतं हे वेगळं सांगायलाच नको.' सध्या मी नाळचं ‘आई, मला खेळायला जायचंय, जाऊ दे ना व’ हे गाणं अनेकदा ऐकतेय. त्यातच नागराज मंजुळेनं दुसरं गाणं फेसबुकवर पोस्ट केलं आणि ते गाणं वैभवनंVaibhav Deshmukh लिहिल्याचं बघून मी आनंदानं १०० फूट उंच उडाले. वैभवबद्दल खूप खूप अभिमान वाटला....औरंगाबादचे ते दिवस आठवले....आम्ही दोघंही चाचपडत रस्ता शोधत होतो. मात्र त्याही वेळी आम्ही रात्री बारा-बारा पर्यंत अनेक कविता म्हणायचो, गाणी गायचो, रेकॉर्ड करायचो. मग वरणभाताचा कुकर लावून जेवायचो. निरोप घेताना पुन्हा उद्या हाच कार्यक्रम असं ठरलेलंच असायचं. वैभवचं ‘दरवयतंय’ हे गाणं जरूर ऐका! आणि आता आज रात्री उशिरा काशीनाथ घाणेकर बघायचाय, आणि उद्या पहाटेपासून कामाला लागायचंय मोगॅम्बो, कळलं का!
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment