पुस्तकपेठेतला संमोहनतज्ज्ञ संभा!
पुस्तकपेठेतला संमोहनतज्ज्ञ संभा! आज ठरल्यानुसार साडेअकराच्या ऐवजी पावणेबाराला पुस्तकपेठेत पोहोचले. संभा (संजय भास्कर जोशी), अनंत अच्युत (फेसबुक फ्रेंड) आणि हरी नरके (ज्यांच्या लिखाणाची मी चाहती आहे) यांनी माझं स्वागत केलं. मी येणार असल्यानं हरी नरके माझी भेट घेण्यासाठी आवर्जून आल्याचं कळताच मला तो माझा खूप मोठा सन्मान वाटला. हरी नरकेंचं २५ हजारांच्या वर पुस्तकं असलेलं वैयक्तिक ग्रंथालय बघण्याची इच्छा मनात निर्माण झाली.
कितीही कोणी आग्रहानं मागितलं तरी त्याला आपल्याकडलं पुस्तक आपण देत नाही ‘एकदा गेलेलं पुस्तक परत कधीच येत नाही’ हे अनुभवातून आलेले त्यांचे बोल मला अक्षरशः पटले. कारण माझं 'समिधा', 'फ्रीडम ऍट मिडनाईट' यासारखी अनेक पुस्तकं परत कधीच आली नाहीत. मीही कोणाला पुस्तक देत नाही आणि दिलंच तर दुसरं विकत घेऊन देते. त्यांनी या संदर्भात त्यांच्या गैरहजरीत कोणी घरी आलं आणि व्यक्ती खूपच नामांकित असेल तर एखादं पुस्तक मागितल्यावर त्यांची मुलगी प्रमिती आणि पत्नी संगीता यांची किती तारेवरची कसरत होते याचे किस्से सांगितले. प्रमितीनं तर एका मुलाखतीत ‘आमच्या घरात पुस्तकं राहतात आणि उरलेल्या जागेत आम्ही स्वतःला ऍडजस्ट करून राहतो’ असंही सांगितलं. हरी नरके यांनी आदल्या दिवशी झालेल्या त्यांच्या व्याख्यानातले काही मुद्दे सांगितले.
तसंच पु.लं.बरोबरच्या आणि गोविंद तळवलकरांबरोबरच्या खूप छान आठवणी त्यांनी सांगितल्या. मीही कॅनव्हास लिहून झाल्यावर विख्यात चित्रकार प्रभाकर कोलते यांनी कसं कौतुक केलं आणि आपला स्नेह कसा वृद्धिंगत होत गेला याबद्दलची आठवण सांगितली.
आज पुस्तकभेटीबरोबरच 'हरीभेट' खूपच संस्मरणीय झाली! यानंतर मात्र आपण हे काय करून बसलो अशी अवस्था माझी झाली. काही अडलं होतं का आपण त्या पुस्तक पेठ नामक वाघाच्या गुहेत जायचं? ते 'मिठी छुरी' वगैरे असं काय काय शब्दप्रयोग असतात त्याचा प्रत्यक्ष अनुभव संभाच्या संवादातून आला. संभा या माणसानं संमोहनशास्त्राचे रीतसर चांगलेच धडे घेतलेले असणार. समोरच्या व्यक्तीला एकदा संमोहित केलं रे केलं की ती संभा म्हणतील तसंच ती व्यक्ती वागू लागते. मी तर या गोष्टीला मुळीच अपवाद नव्हते. मला तिथे जाण्यापूर्वी अनेक लोकांनी सावध केलं होतं, ‘दीपा पुस्तकपेठेत जाऊ नकोस. तो संजय भास्कर जोशी जबरदस्त मार्केटिंग करतो. तुमची इच्छा असो वा नसो, तुम्ही पुस्तक खरेदी केल्याशिवाय बाहेर पडूच शकत नाही’ वगैरे वगैरे.....पण प्रत्येक वेळी आपला स्वभाव आडवा येतो ना. अनुभव हीच खात्री वगैरे.
त्यामुळे खडडयात उडी मारायला मीच तर गेले होते!!! चित्रपटाला सुरुवात झाली. संभानें गोड हसत म्हटलं, ‘दीपा ही सवलतीची पुस्तकं बघीतलीस? एकदा बघ तर खरं...’ मी ती बघितली आणि संभा म्हणाले, ‘अग, हे पुस्तक तुझ्याकडे आहे? असणारच म्हणा. पण हे नुकतंच नव्यानं आलंय. हे बघ. हे तुझ्याजवळ असायलाच हवंय.....’ माझ्याकडे कुठली पुस्तकं आहेत आणि कुठली नाहीत या संभ्रमात मी पडले. माझ्या चेहर्यावरचे भाव ओळखून संभानं लगेचच ती पुस्तकं उचलली आणि म्हटलं, ‘आता इकडे ये. तू जरा ही पुस्तकं बघ.....ही तर तू आवर्जून वाचलीच पाहिजेत. या पुस्तकांना न वाचणं म्हणजे आपल्या जगण्यालाच काही अर्थ नाही.....’ मी निमूटपणे मान डोलावली....संभानं तीही पुस्तकं हातात घेतली. तेवढ्यात काहीतरी आठवल्यासारखं करत संभा म्हणाले, ‘अरे हरी, अनंत, मी विसरलोच सांगायला... या या तुम्ही दोघंही इकडे या.......’ आता मीच काय पण हरी नरके आणि अनंत अच्युत यांच्यावरही संमोहन प्रक्रिया सुरू झाली होती.
आम्ही बळी जाणार्या बकरीप्रमाणे वगैरे आतल्या दालनात शिरलो. आपलीच पुस्तकं पण आपणच पहिल्यांदाच पाहत आहोत अशा रीतीनं एक एक पुस्तक संभानं स्वतःच्या हातात घेतलं आणि म्हणाले, ‘हरी, दीपा हे बघितलंत? अरे हिंदीतला काय खजिना आहे तुमच्यासमोर. बघा बघा, बशीर बद्र, निदा फाजली, दुष्यंत कुमार, उदय प्रकाश....ओहोहो, अरे काय पुस्तकं आहेत ही.....सगळा शरद्च्चद्र आहे तुमच्याकडे? तिरिछ आहे, ब्राह्मण की बेटी आहे?’ आम्ही आता परवानगी देण्याच्या अवस्थेतही राहिलो नव्हतो आणि आमच्या होकाराची संभालाही आता गरज उरली नव्हती. पुस्तकांचा ढीग अतिशय प्रेमानं काउंटरपर्यंत आणत संभा म्हणाले, ‘दीपा, ताम्हणकरांच्या या सहा पुस्तकांचा दुर्मीळ संच तुझ्याकडे आहे? नसेलच. हाही घे.’ आम्ही काउंटरजवळ पोहोचताच संभानं अतिशय उत्साहानं बिल तयार केलं. त्या बिलाकडे बघण्याची माझ्यात ताकद राहिलीच नव्हती. संभा उत्साहात म्हणाले, ‘दीपा, आता तू पुस्तकपेठेची स्टार झालीस....लवकरच तू सुपरस्टार होणार....’ मलाही अमिताभ नंतर मीच असं वाटायला लागलं. माझं रुपांतर एका हत्तीणीत झालंय आणि मी माझ्या सोंडेमध्ये भरगच्च फुलांचा एक हार घेऊन तो संभाला घालून त्यांचा सत्कार करतेय असेही भास मला होऊ लागले.
त्याच वेळी संभा म्हणाले, ‘दीपा, तुला पुस्तक पेठेची पिशवी देऊ?’ मी काय बोलणार यावर? द्या - नका देऊ - तुमची मर्जी....असं फक्त मनातल्या मनात पुटपुटले....हरी नरके म्हणाले, ‘त्या नेतील कशी पुस्तकं? पिशवी तर द्यावीच लागेल.’ आपल्या खजिन्यातला एखादा दुर्मीळ, अनमोल हिरा काढून द्यावा तशा दोन-तीन पिशव्या संभानं बाहेर काढल्या आणि मला म्हणाले, ‘दीपा, या पुस्तक पेठेच्या पिशव्या आहेत. यातली एक पिशवी घेऊन तू भाजी आणायला जात जा. भाजीवाल्यानं ही पिशवी बघितली पाहिजे आणि पुढल्या वेळी पुस्तक पेठेत तो भाजीवाला पुस्तक खरेदीला आला पाहिजे....’ मी मान डोलावली. तो भाजीवाला आला नाही तर, तो निरक्षर असला तर वगैरे प्रश्न पडण्याऐवजी त्याला मी साक्षर करीन आणि मी स्वतः पुस्तकपेठेत घेऊन येईन असं संमोहनात असलेल्या माझ्यातल्याच मीनं मला उत्तर दिलं. तेवढ्यात माझ्यासारखेच इतर ग्राहक पुस्तकपेठेत शिरले....संभानं त्यांच्यावर त्याच्याजवळ असलेलं मंतरलेलं पाणी शिंपडलं असावं.
कारण तेही संमोहित अवस्थेत संभाच्या मागोमाग चालू लागले आणि संभा त्यांना 'हे पुस्तक घेतलंच पाहिजे, तुमच्याकडे असलंच पाहिजे' असं सांगत नव्या उत्साहात दालनातून फिरू लागले. हरी नरके, अनंत अच्युत आणि संभा यांचा ‘येते’ म्हणून मी निरोप घेतला. संभानं प्रेमानं ‘नक्की ये हो दीपा’ म्हणत गोड हसत मला निरोप दिला.....मी घराचा रस्ता कापू लागले..... यातला सर्वच भाग खरा आहे....कुठेही अतिशयोक्ती अलंकाराचा वापर करण्यात आलेला नाही. सत्यता तपासायची असेल तर पुस्तक पेठेत जाऊन या आणि अनुभव घेऊन पहा! हरी नरके तर मला म्हणाले, ‘कालच्या व्याख्यानात मी कमीत कमी पाच-सहा वेळा पुस्तक पेठेचा उल्लेख केला....नंतर मलाच माझं वाटलं की मी पुस्तक पेठेचं मार्केटिंग करतो आहे की काय?’ थोडक्यात ही त्या संमोहनाची कमाल आहे. यातला गमतीचा भाग सोडला तर एक मात्र गंभीरपणे सांगेन. संभामधलं हे कौशल्य वाखाणण्याजोगं आहे. पुस्तकांवरचं त्यांचं प्रेम त्यांच्या चेहर्यावर झळकतं. खरं तर असाच विक्रेता हवा की जो वाचकाला, ग्राहकाला आपुलकीनं सुचवतो, की 'हे पुस्तक नवं आलंय, नक्की घ्या.
वाचून पहा'....नाहीतर पुण्यात मी अनुभव घेते, तो असा की....'घ्यावं वाटलं तर घ्या नाहीतर चालायला लागा'....त्यातही आपल्याला पुस्तकाचा लेखक किंवा प्रकाशन नीटसं आठवत नसेल तर विक्रेत्याच्या कपाळावर आलेली आठी आपल्याला स्पष्टपणे दिसते. पुस्तक खरेदीत आधीच आपला प्राधान्यक्रम तसाही नगण्य असतो आणि त्यातच आपल्याबद्दलची तुच्छता, उदासीनता विक्रेत्यानं दाखवली तर मग संपलंच. म्हणून मी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छिते, पुण्यातले समस्त प्रकाशक आणि पुस्तक विक्रेते यांनी एकत्र येऊन संभाकडे मार्केटिंगचं प्रशिक्षण घ्यावं. त्यामुळे प्रकाशक, लेखक आणि पुस्तक विक्रेते यांच्या पुस्तकांच्या विक्रीत प्रचंड वाढ होऊन त्यांना सुगीचे दिवस येतील आणि या यशाचं श्रेय फक्त आणि फक्त संभा ऊर्फ संजय भास्कर जोशी यांचं असेल!
दीपा देशमुख, पुणे
११ मार्च २०१८
Add new comment