कल्पना चावला विज्ञान केंद्र, कर्हाड
कल्पना चावला विज्ञान केंद्र, कर्हाड कर्हाड इथे झालेल्या टिळक हायस्कूल आणि ज्यू.. कॉलेज व्याख्यानाच्या वेळी मला अचानक समोर कल्पना विज्ञान केंद्राचे संचालक संजय पुजारी दिसले. कार्यक्रम संपताच पंधरा मिनिटं का होईना केंद्राला भेट द्या या त्यांच्या आग्रहाला नकार देणं अशक्य होतं. मागच्या वर्षी याच काळात अच्युत गोडबोले आणि माझा 'जीनियस'वर कल्पना चावला विज्ञान केंद्रात कार्यक्रम संपन्न झाला होता. अरविंद गुप्ता आणि कल्पना चावला यांच्यापासून प्रेरणा घेतलेला संजय पुजारी हा विज्ञानानं झपाटलेला एक तरुण आहे. त्यानं आमच्या जीनियसचे १०० तरी संच आत्तापर्यंत लोकांना भेट दिले असतील. त्याच्याविषयी लवकरच 'बाईट्स ऑफ इंडिया' मध्ये लिहिणार आहेच. कल्पना चावला विज्ञान केंद्र म्हणजे जादुची नगरी आहे. मात्र ही जादू विज्ञानाची आहे. कोणाच्याही घरात किंवा कार्यालयात न बघायला मिळणारे सर्व फोटो इथल्या भिंतीवर दिमाखात विराजमान झालेले आहेत. ते सगळे फोटो वैज्ञानिकांचे आहेत आणि चांगले मोठमोठे!
आईन्स्टाईन, न्यूटन, फाईनमन, स्टीफन हॉकिंग, एडवर्ड जेन्नर, डॉ. होमी भाभा अगदी सगळे सगळे! तिथे गेलेल्या माणसाला, मुलाला स्थळाकाळाचं भानच राहणार नाही इतके प्रयोग तिथे बघायला मिळतात आणि संजयची टीम ते सगळं उत्साहानं दाखवते. संजयच्या टीममध्ये उच्चशिक्षित चिन्मय, भूषण असे तरुण असून कामाशिवाय ही मंडळी मस्त गाणी देखील गातात. आम्ही निघताना किशोरची गाणी गायलो. मी लिहिलेला शशीकपूरचा लेख आठवत असल्यानं संजय पुजारी यांनी चिन्मयला खिलते है गुल यहॉं गायला लावलं. मी शशी कपूरच्या आठवणीत रमते न रमते तोच भूषणनं एक लडकी भीगी भागीसी म्हणत किशोरला साक्षात माझ्या पुढ्यात उभं केलं. निघायला उशीर होत असतानाही मी मोह न आवरून ये राते ये मोसम नदी का किनारा गाणं गायलं. मनात संगीताचे सूर बरोबर घेऊन मी कल्पना चावला विज्ञान केंद्राला तात्पुरता टाटा केला.
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment